Friday 14 May 2010

अर्थात

अर्थात


अच्युत गोडबोले


राजहंस प्रकाशन, पृष्ठे : ४४६, मूल्य : ३०० रुपये


बार्टर आणि कमॉडिटी मनी
अमेरिकन टूरिस्टांविषयी बरेच विनोद फिरत असतात. एकदा म्हणे असाच एक अमेरिकन प्रवासी त्याच्या बायकोबरोबर इस्रायलमध्ये एके ठिकाणी बसला असताना एक अरब सेल्समन त्यांच्याजवळ आला. आपल्याकडच्या वस्तूंचं सेल्स टॉक करूनही त्या जोडप्यानं त्याच्यात काहीच रस न दाखवल्यानं शेवटी त्यानं त्या अमेरिकनाला विचारलं, ‘तुम्ही कुठचे?’ तो म्हणाला, ‘अमेरिका.’ त्याच्या बायकोच्या काळ्या केसांकडे आणि ऑलिव्ह रंगाच्या त्वचेकडे बघून तो सेल्समन म्हणाला, ‘पण ही नक्कीच अमेरिकन नाही.’ ‘मीही अमेरिकनच आहे,’ ती म्हणाली. मग सेल्समननं तिच्याकडे बघून विचारलं, ‘हा तुझा नवरा का?’ ती म्हणाली, ‘हो.’ मग त्या अमेरिकनाला तो म्हणाला, ‘तू तिला मला विकलस तर मी तुला शंभर उंट देईन.’ नवरा बराच काळ शांत बसला. शेवटी विचार करून म्हणाला, ‘ती विक्रीसाठी नाहीये.’ तो सेल्समन निघून गेल्यावर बायकोनं हसत हसत त्याला विचारलं, ‘तू उत्तर द्यायला एवढा वेळ का घेतलास?’ त्यावर तो म्हणाला, ‘ते शंभर उंट अमेरिकेला सहजपणे नेता येतील का याचा मी विचार करत होतो.’ यावर बायकोचा चेहरा बघण्यासारखा झाला, हे सांगायला नकोच.
आज हा आपल्याला विनोद वाटेल, पण एके काळी बायका या चक्क विकतही घेतल्या जायच्या. आणि त्याही गुरं ढोरं, धान्य यांच्या मोबदल्यात.(तेव्हापासून बहुधा ‘विकतची कटकट’ हा वाकप्रचार निघाला असावा.) आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की अनेक वर्षे मानवी इतिहासात पैसा असा नव्हताच. अलीकडले चेकबुक्स, क्रेडीट कार्ड अशा गोष्टी तर सोडाच, पण साधी नाणी आणि नोटाही नव्हत्या. पण व्यवहार मात्र होत असत. आणि ते वस्तूंमधलेच असत. त्यालाच ‘वस्तुविनिमय’ म्हणजेच ‘बार्टर’ म्हणतात.
बार्टर पध्दतीनं नाटकंही पूर्वीपासून बघितली जायची. नाटक बघायला पैसे देऊन तिकिट काढण्याऐवजी काही तरी वस्तू आणायच्या, अशी ही बार्टर थिएटरची कल्पना होती. १८३१ साली अशा बार्टर थिएटरच्या नाट्यगृहाची इमारत उभी राहिली. व्हर्जिनियन नावाचं नाटक १४ जानेवारी १८७६ रोजी दाखवलं गेल्याची एक नोंद आपल्याला मिळते. या नाटकातून मिळालेले पैसे त्या नाट्यगृहाच्या डागडुजीसाठी वापरले गेले. जेव्हा नाटक चालू नसे तेव्हा त्या इमारतीचा उपयोग अनेक कार्यालयांसाठी होई. या इमारतीच्या छपरावर एक फायर अलार्म बसवलेला होता. रात्री किंवा दिवसा जर कुठे आग लागली तर तो वाजे. जर तो वाजला आणि तेव्हा कुठलंसं नाटक चालू असेल तर आहे त्या पोझिशनमध्ये सगळ्या नटांना ‘स्टॅच्यू’ होऊन तो सायरन वाजेपर्यंत उभं राहावं लागे. हा अलार्म १९९४ सालापर्यंत होता. नंतर तो आधुनिक पध्दतीप्रमाणे इलेक्ट्रॉनिक करण्यात आला.
१९२९ साली चालू झालेल्या अमेरिकेतल्या महाअरिष्टाच्या (डिप्रेशन) काळात पुन्हा ही बार्टर थिएटरची कल्पना वर आली. याच काळात रॉबर्ट पोर्टरफील्ड नावाचा एक तरुण कलाकार नट त्याच्या व्हर्जिनियामधल्या मूळ गावी परतला तो एक भन्नाट कल्पना डोक्यात घेऊनच. त्या प्रांतातल्या भाज्या आणि फळं देऊन त्याच्या मोबदल्यात लोकांना नाटकं बघू द्यायची ही ती कल्पना. लोक या कल्पनेला हसले आणि त्यांनी त्याला चक्क वेड्यात काढलं. पण या पठ्ठ्यानं काही जिद्द सोडली नाही. १० जून १९३३ रोजी त्यानं त्याचं नाट्यगृह खुलं केलं. ‘तुमच्याकडल्या ज्या काही भाज्या विकल्या जात नसतील, त्या घेऊन या आणि तासभर तरी खळखळून हसा.’ अशी त्यानं जाहिरातही करायला सुरुवात केली. ‘ज्यांना शक्य होईल, त्यांनी ४० सेंटस द्यावेत, नाही तर भाज्या आहेतच’ अशा त-हेनं ते नाट्यगृह सुरू झालं. आणि मग काय विचारता! लोकांनी नाटक बघायला ही गर्दी केली. डिप्रेशनच्या काळात ब-याच गोष्टी विकल्या जात नव्हत्याच. मग उगाचच त्या वाया घालवण्याऐवजी नाटक बघायला काय हरकत आहे, असा विचार त्यांनी केला. हॅम्लेट बघायचय ना, मग हॅम (डुकराचं मांस) घेऊन या! ‘हॅम फॉर हॅम्लेट’ ही कल्पना खूपच हिट झाली. फक्त पंचवीस टक्के लोकांनी पैसे देऊन नाटक बघितलं. बाकीच्यांनी अनेक भाज्या, फळं, जिवंत प्राणी आणि काय काय आणायला सुरुवात केली.
खूप पूर्वी झेंदावेस्तमध्ये डॉक्टरची फी पशूंच्याच स्वरूपात द्यावी लागत असे. होमरच्या काव्यामधून डायमेडच्या शस्त्रांची किंमत नऊ बैल आणि युद्धात पकडून आणलेल्या कुशल स्त्रीची किंमत चार बैल होती, असं वर्णन आहे. पूर्व आफ्रिकेत बोकडाचा वापर पैसा म्हणून केला जात असे. दहा बोकडांच्या बदल्यात शिकारीचं शस्त्र, एका बोकडाला पन्नास केळी आणि सहा बोकडांना सुंदर स्त्री असे व्यवहार होत. आपल्याकडच्या पुराणांमध्ये अनेक ठिकाणी गायी, घोडे, यांचाही विनिमयासाठी वापर केल्याचा उल्लेख आहेच. शिवाय धार्मिक कार्यात ब्राह्मणाला हजारो गायी देत असत. न्यू गिनी इथल्या टोळ्या डुकरांचा पैसा म्हणून वापर करत. आफ्रिकेतले मासाई योद्धे गुरं देऊन बायको विकत घेत. नंतर धान्य, मासे, गन पावडर, पिसं, शंख, शिंपले, तंबाखू ( आणि चक्क माणसंही) अशा चित्रविचित्र वस्तू पैसा म्हणून वापरल्या गेल्या. जिवंत माणसं सोडल्यास यातल्या अनेक गोष्टी आज कॉंटिनेंटल बॅंकेच्या म्युझियममध्ये बघायला मिळतात.

1 comment:

  1. Marathi bekar aahe. Aani je kaahi lihila aahe te saamanya gyaan. konatahi vichar, yuktivaad, nav sanshodhan, nava drushtikon, navi maahiti naahi. Aso.

    ReplyDelete