Friday 14 May 2010

अर्थात

अर्थात


अच्युत गोडबोले


राजहंस प्रकाशन, पृष्ठे : ४४६, मूल्य : ३०० रुपये


बार्टर आणि कमॉडिटी मनी
अमेरिकन टूरिस्टांविषयी बरेच विनोद फिरत असतात. एकदा म्हणे असाच एक अमेरिकन प्रवासी त्याच्या बायकोबरोबर इस्रायलमध्ये एके ठिकाणी बसला असताना एक अरब सेल्समन त्यांच्याजवळ आला. आपल्याकडच्या वस्तूंचं सेल्स टॉक करूनही त्या जोडप्यानं त्याच्यात काहीच रस न दाखवल्यानं शेवटी त्यानं त्या अमेरिकनाला विचारलं, ‘तुम्ही कुठचे?’ तो म्हणाला, ‘अमेरिका.’ त्याच्या बायकोच्या काळ्या केसांकडे आणि ऑलिव्ह रंगाच्या त्वचेकडे बघून तो सेल्समन म्हणाला, ‘पण ही नक्कीच अमेरिकन नाही.’ ‘मीही अमेरिकनच आहे,’ ती म्हणाली. मग सेल्समननं तिच्याकडे बघून विचारलं, ‘हा तुझा नवरा का?’ ती म्हणाली, ‘हो.’ मग त्या अमेरिकनाला तो म्हणाला, ‘तू तिला मला विकलस तर मी तुला शंभर उंट देईन.’ नवरा बराच काळ शांत बसला. शेवटी विचार करून म्हणाला, ‘ती विक्रीसाठी नाहीये.’ तो सेल्समन निघून गेल्यावर बायकोनं हसत हसत त्याला विचारलं, ‘तू उत्तर द्यायला एवढा वेळ का घेतलास?’ त्यावर तो म्हणाला, ‘ते शंभर उंट अमेरिकेला सहजपणे नेता येतील का याचा मी विचार करत होतो.’ यावर बायकोचा चेहरा बघण्यासारखा झाला, हे सांगायला नकोच.
आज हा आपल्याला विनोद वाटेल, पण एके काळी बायका या चक्क विकतही घेतल्या जायच्या. आणि त्याही गुरं ढोरं, धान्य यांच्या मोबदल्यात.(तेव्हापासून बहुधा ‘विकतची कटकट’ हा वाकप्रचार निघाला असावा.) आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की अनेक वर्षे मानवी इतिहासात पैसा असा नव्हताच. अलीकडले चेकबुक्स, क्रेडीट कार्ड अशा गोष्टी तर सोडाच, पण साधी नाणी आणि नोटाही नव्हत्या. पण व्यवहार मात्र होत असत. आणि ते वस्तूंमधलेच असत. त्यालाच ‘वस्तुविनिमय’ म्हणजेच ‘बार्टर’ म्हणतात.
बार्टर पध्दतीनं नाटकंही पूर्वीपासून बघितली जायची. नाटक बघायला पैसे देऊन तिकिट काढण्याऐवजी काही तरी वस्तू आणायच्या, अशी ही बार्टर थिएटरची कल्पना होती. १८३१ साली अशा बार्टर थिएटरच्या नाट्यगृहाची इमारत उभी राहिली. व्हर्जिनियन नावाचं नाटक १४ जानेवारी १८७६ रोजी दाखवलं गेल्याची एक नोंद आपल्याला मिळते. या नाटकातून मिळालेले पैसे त्या नाट्यगृहाच्या डागडुजीसाठी वापरले गेले. जेव्हा नाटक चालू नसे तेव्हा त्या इमारतीचा उपयोग अनेक कार्यालयांसाठी होई. या इमारतीच्या छपरावर एक फायर अलार्म बसवलेला होता. रात्री किंवा दिवसा जर कुठे आग लागली तर तो वाजे. जर तो वाजला आणि तेव्हा कुठलंसं नाटक चालू असेल तर आहे त्या पोझिशनमध्ये सगळ्या नटांना ‘स्टॅच्यू’ होऊन तो सायरन वाजेपर्यंत उभं राहावं लागे. हा अलार्म १९९४ सालापर्यंत होता. नंतर तो आधुनिक पध्दतीप्रमाणे इलेक्ट्रॉनिक करण्यात आला.
१९२९ साली चालू झालेल्या अमेरिकेतल्या महाअरिष्टाच्या (डिप्रेशन) काळात पुन्हा ही बार्टर थिएटरची कल्पना वर आली. याच काळात रॉबर्ट पोर्टरफील्ड नावाचा एक तरुण कलाकार नट त्याच्या व्हर्जिनियामधल्या मूळ गावी परतला तो एक भन्नाट कल्पना डोक्यात घेऊनच. त्या प्रांतातल्या भाज्या आणि फळं देऊन त्याच्या मोबदल्यात लोकांना नाटकं बघू द्यायची ही ती कल्पना. लोक या कल्पनेला हसले आणि त्यांनी त्याला चक्क वेड्यात काढलं. पण या पठ्ठ्यानं काही जिद्द सोडली नाही. १० जून १९३३ रोजी त्यानं त्याचं नाट्यगृह खुलं केलं. ‘तुमच्याकडल्या ज्या काही भाज्या विकल्या जात नसतील, त्या घेऊन या आणि तासभर तरी खळखळून हसा.’ अशी त्यानं जाहिरातही करायला सुरुवात केली. ‘ज्यांना शक्य होईल, त्यांनी ४० सेंटस द्यावेत, नाही तर भाज्या आहेतच’ अशा त-हेनं ते नाट्यगृह सुरू झालं. आणि मग काय विचारता! लोकांनी नाटक बघायला ही गर्दी केली. डिप्रेशनच्या काळात ब-याच गोष्टी विकल्या जात नव्हत्याच. मग उगाचच त्या वाया घालवण्याऐवजी नाटक बघायला काय हरकत आहे, असा विचार त्यांनी केला. हॅम्लेट बघायचय ना, मग हॅम (डुकराचं मांस) घेऊन या! ‘हॅम फॉर हॅम्लेट’ ही कल्पना खूपच हिट झाली. फक्त पंचवीस टक्के लोकांनी पैसे देऊन नाटक बघितलं. बाकीच्यांनी अनेक भाज्या, फळं, जिवंत प्राणी आणि काय काय आणायला सुरुवात केली.
खूप पूर्वी झेंदावेस्तमध्ये डॉक्टरची फी पशूंच्याच स्वरूपात द्यावी लागत असे. होमरच्या काव्यामधून डायमेडच्या शस्त्रांची किंमत नऊ बैल आणि युद्धात पकडून आणलेल्या कुशल स्त्रीची किंमत चार बैल होती, असं वर्णन आहे. पूर्व आफ्रिकेत बोकडाचा वापर पैसा म्हणून केला जात असे. दहा बोकडांच्या बदल्यात शिकारीचं शस्त्र, एका बोकडाला पन्नास केळी आणि सहा बोकडांना सुंदर स्त्री असे व्यवहार होत. आपल्याकडच्या पुराणांमध्ये अनेक ठिकाणी गायी, घोडे, यांचाही विनिमयासाठी वापर केल्याचा उल्लेख आहेच. शिवाय धार्मिक कार्यात ब्राह्मणाला हजारो गायी देत असत. न्यू गिनी इथल्या टोळ्या डुकरांचा पैसा म्हणून वापर करत. आफ्रिकेतले मासाई योद्धे गुरं देऊन बायको विकत घेत. नंतर धान्य, मासे, गन पावडर, पिसं, शंख, शिंपले, तंबाखू ( आणि चक्क माणसंही) अशा चित्रविचित्र वस्तू पैसा म्हणून वापरल्या गेल्या. जिवंत माणसं सोडल्यास यातल्या अनेक गोष्टी आज कॉंटिनेंटल बॅंकेच्या म्युझियममध्ये बघायला मिळतात.

केवळ मैत्रीसाठी

केवळ मैत्रीसाठी

उमेश कदम

मेहता प्रकाशन, पृष्ठे : १६०, मूल्य : १३० रुपये


मी दहशतवादी?
"अहो, मी खरच दहशतवादी नाही, तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर!, मी त्या अधिका-यास पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो. पण तो काही ऐकायलाच तयार नव्हता."
आता ही चित्रफित पाहिल्यावर कोण शहाणा माणूस तुम्ही दहशतवादी नाही यावर विश्वास ठेवेल? त्या अधिका-याने मलाच विचारले.
गेले पाच दिवस मी उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे होतो. ताश्कंद येथील आमच्या कार्यालयातील सर्गी राखीमॉव्ह याची व माझी चांगलीच ओळख होती. जिनिव्हा येथील वार्षिक बैठकांदरम्यान त्याची व माझी भेट व्हायचीच. तसेच पूर्वी श्रीलंकेतील कॅंडी या सुंदर गावी झालेल्या एका प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात सर्गी हजर असताना मी तीन व्याखाने दिली होती. ती त्याला खूप आवडली होती. त्यानेच पुढाकार घेऊन मला ताश्कंदला आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याच्या एका स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बोलवावे, असे आमच्या तेथील कार्यालयाच्या प्रमुखांना सुचवले होते.
तीन-चार दिवसांच्या सततच्या कामानंतर आम्हाला थोडासा मोकळा वेळ होता त्या दिवशी ताश्कंदमधल्या काही महत्वाच्या प्रेक्षणीय स्थळांना आम्ही भेटी द्याव्यात असे सर्गीने सुचवले. त्याने आमच्यासाठी ऑफिसची गाडी आणि ड्रायव्हर यांची सोय केली. सर्गी म्हणाला, "येथे जवळच एक कपड्यांचे मोठे दुकान आहे, एक वस्तुसंग्रहालय आहे व एक छोटासा पार्क आहे. तुम्हा लोकांना कुठे जायचे आहे?"
पीटर म्हणाला, "मला वस्तुसंग्रहालय पाहायचे आहे." फ्रॉन्स्वाज म्हणाली, "मला कपड्यांच्या दुकानात जायचे आहे." तर ऑंत्वान म्हणाला,"मी पार्कमध्ये झाडाखाली बसून पुस्तक वाचत बसेन. "
"उमेश, तू काय करतोस?" सर्गीने मला विचारले.
"मला फोटोग्राफीची आवड आहे, मी या ऑपेरा हाऊसचे वेगवेगळ्या बाजूने फोटो घेईन व काही व्हिडिओ चित्रणही करेन. "
ऑपेरा हाऊसच्या उजव्या बाजूला थोडेसे चित्रण करत असतानाच पोलिसासारखा गणवेष परिधान केलेला एक गृहस्थ माझ्यासमोर आला. त्याने मला चित्रण थांबवण्याचा इशारा केला. त्याला इंग्रजी समजत नव्हते. तो मला त्याच्याबरोबर जायचा इशारा करत होता. मला अर्थातच त्याच्याबरोबर जाणे भाग होते. शेजारच्याच एका इमारतीत प्रवेशद्वारातून आत गेल्या गेल्या एक कार्यालय होते. तेथील एका अधिका-यास त्याने त्यांच्या भाषेत माझ्याविषयी काही तरी सांगितले. ते ऐकून तो अधिकारी आश्चर्यचकीत झाला व माझ्याकडे संशयास्पद नजरेने पाहू लागला. सुदैवाने त्याला इंग्रजी येत होते.
"तुम्ही कोणत्या उद्देशाने या इमारतीचे चित्रण करत होतात?"
मी त्याला माझा उद्देश सांगितला.
"ही इमारत अमेरिकन दूतावास आहे. आम्हाला तुमची कसून तपासणी केली पाहिजे." तो म्हणाला.
मागच्याच महिन्यात वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटॅगॉन या ठिकाणांवरील हल्ल्यांपासून अमेरिकन सरकारने आपल्या दूतावासांच्या सुरक्षा व्यवस्थेत आमूलाग्र बदल करून ती अतिशय कडक केली होती. या अधिका-याने आता माझी चौकशी करायची म्हटल्यावर मी मनातल्या मनात स्वत:लाच दोष दिला. छायाचित्रणाच्या हौसेखातर मी विनाकारण अडचणीत आलो होतो. त्यात गेल्या वर्षीपासून मी दाढी वाढवलेली. ब-याच वेळा लोक मला अरब समजायचे.
त्या अधिका-याने माझी व्हिडिओ टेप मागे फिरवून पहिल्यापासून दाखवायला सांगितले. टेप मागे फिरवून कॅमे-राच्या छोट्या पॅनलवर दाखवायला सुरुवात केली.
"हे काय? ताश्कंदचा विमानतळ?"
"हो. परवा इथे पोचल्यानंतर अन्यत्र क्वचितच दिसणारी रशियन बनावटीची टुपॉलोव्ह व अंतोनॉव्ह विमानं पाहायला मिळाली. मला विमानं बनवायला आवडतं." मी खुलासा केला.
"विमान अपहरण करायचा विचार दिसतोय. आताच तर तुम्ही म्हणालात की तुम्ही आंतरराष्ट्रीय कायद्याचे सल्लागार आहात म्हणून. मग एकदम एरॉनॉटीकल इंजिनियर झालात की काय विमानं बनवायला?"
"छे, छे, मला विमानांची छोटी छोटी मॉडेल्स बनवायचा छंद आहे."
"माझा तुमच्यावर मुळीच विश्वास नाही. नक्कीच एखादं विमान अपहरण करायचा किंवा विमानात स्फोटकं ठेवण्याचा तुमचा इरादा असणार! बरं पुढे पाहू काय आहे ते!"
मी पॉज केलेली टेप पुढे चालू केली. काल संध्याकाळी आम्ही सर्वजणं मिळून एका अरेबियन उपाहारगृहात जेवायला गेलो होतो. तिथे वैशिट्यपूर्ण अरेबियन बेली डान्स चालला होता. त्याचेही काही चित्रण मी केले होते.
"अरेबियन उपाहारगृह दिसतेय. तिथे नक्कीच तुमची आणि तुमच्या सहका-यांची गुप्त बैठक झाली असणार. ओसामा बिन लादेनचा सौदी अरेबियात खूप मोठा तळ आहे म्हणे. कित्येक अरेबियन राष्ट्र दहशतवाद्यांना आर्थिक मदत करतात, हे आता सिध्द झालेलं आहे. तुमचा आणि अरेबियन लोकांचा संबंध मला आता स्पष्टपणे दिसून येतो आहे."
आता त्याचा गैर्समज कसा दूर करावा, या संभ्रमात मी पडलो. तो कलुषित नजरेनेच माझ्याकडे पाहत होता. त्याने टेप पुढे चालू करायला सांगितली.
"हे काय? ताश्कंदचा गोल बाजार? गर्दीच्या ठिकाणी बॉंबस्फोट करण्यात दहशतवादी तरबेज असतात, हे जगजाहीर आहे. त्याचीच तयारी दिसतेय." तो म्हणाला.
"अहो, येथील संस्कृती लक्षात राहावी म्हणून हे चित्रण केलं आहे." मी माझा हेतू सांगितला.
"संस्कृती कसली? तुमची दहशतवादी विकृतीच मला यात दिसतेय. पुढे सुरू करा टेप."
नंतर संसद आणि महापौरांचे कार्यालय पाहिल्यावर तो म्हणाला, "पाहा, ताश्कंदमधील अतिमहत्वाच्या ठिकाणांना लक्ष्य बनवायच्या उद्देशानेच तुम्ही हे चित्रण केलेलं आहे, यात शंकाच नाही."
यावर काय बोलावे मला सुचेना. मी टेप पुढे चालू केली. सर्गी आम्हाला एक मदरसा दाखवायला घेऊन गेला होता. तिथे हस्तकलेचे पारंपरिक शिक्षण तरूण मुलांना दिले जायचे. आतमध्ये चित्रण करायला परवानगी नव्हती. मी मदरशाचे बाहेरूनच चित्रण केले होते.
"हे पाहा, तुम्ही मदरशांना भेटी देता म्हणजे तुमचा आणि दहशतवाद्यांचा घनिष्ट संबंध सिद्ध करायला आणखी कसला पुरावा हवा?"
"अहो, एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून त्याचं चित्रण केलं आहे. आयुष्यात पुन्हा कधी ताश्कंदला यायची संधी मिळेल असं वाटत नाही. म्हणून इथल्या आठवणींसाठीच केवळ हे चित्रण केलं आहे. " मी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होतो.
"एकदा इथे दहशतवादी कारवाया करून येथून पळ काढल्यानंतर तुम्ही परत कशाला इकडे याल?"
मी टेप पुढे चालू केली. नंतर ऑपेरा हाऊसचे व त्याच्या परिसरातील इमारातींचे चित्रण होते. ते बारकाईने पाहिल्यानंतर तो म्हणाला, "हे काय, दूतावासाच्या इमारतीचं अगदी सगळ्या बाजूंनी व्यवस्थित चित्रण केलेलं दिसतय. कोणत्या खिडकीतून आत घुसायचं, सुरक्षा कर्मचा-यांना कसं चकवायचं, स्फोटकं कुठे लावायची या तयारीशिवाय दुसरा कसला उद्देश असणार तुमचा? बरं, इतर प्रेक्षणीय स्थळांच्या बाबतीत मी समजू शकतो. पण या इमारतीत तसं पाहण्यासारखं आहेच काय? चित्रण करून जतन करण्याजोगं यात काहीच नाही. दिसायला अगदीच साधी आणि अनाकर्षक अशीच ही इमारत आहे. आता तर माझी खात्रीच पटली आहे. आता पुढच्या चौकशीसाठी आम्ही तुम्हाला ताब्यात घेणार आहोत." तो थंडपणे म्हणाला.
"अहो, दुपारी शिक्षणमंत्र्यांची भेट घ्यायची आहे"
"म्हणजे मंत्रालायालाही लक्ष्य करण्याचा इरादा दिसतोय. बरं झालं, कसलंही दहशतवादी कृत्य करायच्या आधीच तुम्ही आमच्या तावडीत सापडलात. मी आता माझ्या वरिष्ठांना फोन करतोय. कित्येक दिवस एखादी सनसनाटी कामगिरी पार पाडायची वाट्च पाहात होतो. तो योग आज आला. "
"अहो, कृपा करून जाऊ द्या. हवं तर ही टेप तुम्ही ठेवून घ्या."
"छे,छे, आता जायचं ते पोलीस कोठडीतच."
"बरं, माझे सहकारी आता मला भेटण्यासाठी ऑपेरा हाऊससमोर उभे असतील. त्यांच्यात एक स्थानिक सहकारी आहे. तो सगळा खुलासा करेल. तुम्ही चला माझ्याबरोबर." मी त्याला विनंती केली. त्यावर एक मिनिट विचार करून तो म्हणाला, "ठिक आहे. चला तर मग. आणखी काही दहशतवादी माझ्या तावडीत येतील."
माझ्या दोन्ही बाजूला बंदूकधारी पोलीस आणि तो पुढे अशी आमची वरात निघाली. आम्हाला पाहताच माझे सहकारी आश्चर्य चकीत झाले. त्यावर सर्गी उझबेकी भाषेत त्या अधिका-यांशी बोलाला. "उमेश, मी या साहेबांचा गैरसमज दूर केला आहे. पण हे म्हणतात की तुझ्या टेपमधील अमेरिकन दूतावासाचं चित्रण पुसून टाकलं पाहिजे."
हे ऐकल्यावर मी सुटकेचा नि:श्वास टाकला. मनातल्या मनात मी म्हटलं," हवं तर टेप किंवा टेपसहीत कॅमेराही जप्त करा म्हणावं. पण मला दहशतवादी असल्याच्या संशयावरून डांबून ठेवू नका. नाही तर यथावकाश माझी रवानगी ग्वांतानामो-बे कडे व्हायची.
सर्गी, तो अधिकारी, त्याचे बंदूकधारी सहकारी आणि मी त्याच्या कार्यालयात पुन्हा आलो. टेप पुन्हा रिवाईंड करून त्याला दाखवली. ते पाहिल्यावर त्याने मला जाऊ दिले.
"बरं झालं सर्गी तू होतास म्हणून, नाहीतर माझी काही धडगत नव्हती."
एवढ्यात पीटर मला म्हणाला, " माझा आणि ऑंत्वान व फ्रॉन्स्वाजबरोबर एक फोटो काढ." पीटरने आपला कॅमेरा माझ्याकडे दिला.
तो नाकारत मी म्हणालो, "माफ कर पीटर. तू अमेरिकन नागरिक आहेस. आता कोणत्याही अमेरिकन सजीव अथवा निर्जीव गोष्टींचं चित्रण करायचं नाही असा ठाम निर्णय मी घेतला आहे."










सोनेरी धराचे ठसके (पाव शतकी सौदी अनुभव)

सोनेरी धराचे ठसके (पाव शतकी सौदी अनुभव)


डॉ. उज्ज्वला दळवी


ग्रंथाली प्रकाशन, पृष्ठे : २७२, मूल्य : २७५ रुपये


जावे तिच्या वंशा

"या दक्तूर, अस्सलाम आलेकुम व श्लोनक? ये, ये, कॉफी प्यायला ये."
हाजचा पवित्र महिना होता. आम्ही दोघं आमच्या चौदा वर्षांच्या लेकीला घेऊन जुबैलच्या समुद्रावर संध्याकाळी फिरायला गेलो होतो. किना-यावरच्या वाळूत गालिचा अंथरून, एक पंचावन्नचा ढोल्या बेदू कुटुंबकबिल्यासह मजेत गहवा पीत पहुडला होता.

बायको, तीन वयात आलेल्या मुली, दोन लहान मुलगे, असं ते समस्त कुटुंब पेशंट म्हणून आम्हाला कधी ना कधी भेटलेलं होतं. त्यामुळे आम्हाला पाहिल्या पाहिल्या त्याने उठून कॉफी प्यायला बोलावलं. "श्लोनक"चं दळण दळून झालं. मग आम्ही कॉफी पीत, खजूर खात होतो. इकडचं तिकडचं बोलणं चाललं होतं. त्याच ओघात, अगदी सहजपणे तो म्हणाला, "या दक्तूर, ही कोण आहे तुझ्याबरोबर? तुझी मुलगी का? मला आवडली ती. देऊन टाक ती मला. तिचे किती पैसे घेशील तू? आणि तूसुद्धा आवडतोस मला. या माझ्या मुली. यांच्यातली कुठली तुला हवी तर बघ. जी आवडेल ती दिली तुला. काय म्हणतोस?"

माझ्या घशात खजूराची बी अडकली. एका दमात तो दोन मागण्या घालून मोकळा झाला होता. हसावं का रडावं ते कळेना. पण आमच्या लेकीचे बाबा परिस्थिती सांभाळायला समर्थ होते. "मलाही अतिशय आवडले असतं. पण या माझ्या लेकीला गेल्याच महिन्यात माझ्या दुस-या एका मित्राने मागणी घातली आणि ठरलं ते लग्न. आता नाइलाज आहे. आणि माझं म्हणशील तर माझ्या बाकीच्या तीन बायका भारतात आहेत. त्यामुळे पाचवं लग्न कठीण जाईल मला. शिवाय तुझ्या मुलीलासुद्धा तसं आवडणार नाही."
"असं म्हणतोस? मग कठीण आहे. बरं जाऊ दे. घ्या घ्या मामूल खाऊन तर बघा. माझ्या बायकोने केलेत."
आम्ही निर्धास्तपणे तो खाऊ खाल्ला. रणरागिणी असलेल्या आमच्या लेकीने एरवी तिसरा डोळा उघडून त्या माणसाचं भस्मच केलं असतं. पण अरबीत झालेलं ते संभाषण तिला कळलच नव्हतं. त्यामुळे तिने तो खाऊ आम्हाला खाऊ दिला. त्या माणसाच्या, तिच्याच वयाच्या मुलींना हसून थॅंक यू सुद्धा म्हटलं.
आम्ही बेदू असतो तर त्या बैठकीत ही दोन्ही लग्न सहज ठरली असती. तान्हं बाळ असल्यापासून अंगाखांद्यावर खेळलेली मित्राची मुलगी वयात आली की तिला स्वत:साठी मागणी घालणं इथे रास्तच असतं. इतकच नव्हे तर तो त्या मुलीच्या बापाचा बहुमान असतो. मुलगी दहा वर्षांची झाली की तिचं खेळणं, मोठ्यानं बोलणं, मान वर करून पुरुषांशी बोलणं, सा-यावर बंदी येते. आतापर्यंत चढला नसलाच तर आता तिच्या अंगावर अबाया म्हणजे बुरखा चढतोच. खास पदार्थ शिजले की पुरुष नोकरांनीसुद्धा ओरबाडून खाल्ल्यावर जे काही ताटात उरतं ते उष्टंच तिला खायला मिळतं. तिचं एकटीनं बाहेर जाणं बंद होतं. तिला कुठेही बाहेर जाताना बरोबर मुहर्रीम म्हणजे पाठीराखा लागतो. बाप, भाऊ, नवरा किंवा मुलगा यांच्यापैकीच एक जण पाठीराखा म्हणून जाऊ शकतो.
डॉक्टर, नर्स, शिक्षिका किंवा कारकून या चारच व्यवसायात तिचा शिरकाव होऊ शकतो. पुरुषांना काही काम सांगणं, त्यांना सल्ला देणं याचा अधिकार तिला नसतो. तिला गाडी चालवता येत नाही. भारतीय उद्योगपती श्री विक्रमपत सिंघानिया जेव्हा त्यांच्या छोट्या विमानातून पृथ्वीप्रदक्षिणा करत होते, तेव्हा सौ. सिंघानिया त्यांच्या सावलीसारख्या जमिनीवरून त्यांच्या मागोमाग प्रवास करत होत्या. वॉकीटॉकीने दोघं सतत संपर्कात होते. प्रवासाचा मार्ग सौदी अरेबियात शिरला मात्र आणि त्यांचा हा सततचा संपर्क तुटला. बाईनं गाडी चालवणं हा सौदी अरेबियात गुन्हा असल्यामुळे देशाची सरहद्द ओलांडल्याबरोबर सौ. सिंघानियांच्या गाडीची किल्ली जप्त झाली होती.

पंचविशीची, काळीसावळी पण रेखीव, उंचीपुरी, डौलदार आयेषा प्रकृतीने रसरशीत होती. ती झोकात इमर्जन्सीत शिरली. तिथल्या डॉक्टरांना म्हणाली, "मला उलटीत रक्त पडतं आहे कालपासून."
"कालपासून? आणि तू आजपर्यंत घरी बसून काय केलंस? संडासला कसं होतं? त्याचा रंग कसा आहे?"
"माझ्या केसांसारखा काळा."
"कसली ऍस्प्रोसारखी गोळी घेतली होतीस का? किती रक्त पडतं वेळेला? पेलाभर? चमचाभर?"
"साधारण अर्धा पेला. मला आत्ता उलटी येते आहे."
नर्सने घाईघाईने तस्त तिच्यापुढे केलं. आयेषा रक्त ओकली. तिला भरती करून तात्काळ चाचण्या सुरू झाल्या. दुर्बिणीतून अन्ननलिका, जठर इत्यादींचा तपास रातोरात झाला. पुढच्या आठवडाभर यकृताच्या, रक्ताच्या गोठण्याच्या या आणि त्या ब-याच परीक्षा झाल्या. आयेषाची प्रकृती त्या सगळ्यात फर्स्ट क्लासमध्ये पास झाली. शेवटी तिच्या कान-नाक-घशाचीसुद्धा तपासणी झाली. तब्येत ठणठणीत असल्याचा शिक्का बसला.
"आयेषा, आज संध्याकाळी घरून कुणी आलं की सांग हं. आज तुला घरी जायचय." सकाळच्या राउंडमध्ये डॉक्टरांनी सांगितलं.
दुपारी आयेषाला पुन्हा रक्ताची उलटी झाली. तिची पाठवणी लांबणीवर पडली.
पुढचा महिनाभर आयेषाची रक्तगुळणी तिच्या पाठवणीशी पाठशिवणीचा खेळ खेळली. शेवटी सगळ्या डॉक्टरांची एकत्र मीटिंग होऊन या रहस्याबद्दल वादविवाद झाला. कुणालाही उलगडा होईना. मग तिला रियाधच्या मोठ्या हॉस्पिटलला धाडायचं ठरलं. तिथल्या ओपीडीची एक आठवड्यानंतरची तारीख मिळाली. पण त्या आठवड्यात आयेषाला रक्त पडले नाही.
"मी आता घरी जाऊ का दक्तूर? आता बरी आहे मी."
"अग, घरी गेल्यावर पुन्हा रक्त पडलं तर?"
"नाही पडणार आता."
"तुझ्या स्वप्नात येऊन सांगतं का तुला ते?"
"ते सोडा ना. मला जाऊ दे. नाहीतर मी सही करून आपली आपणच निघून जाईन." तिने धमकावले.
डॉक्टरांनी सायकायट्रिस्ट डॉ. करीमना ती घरी जाण्यापूर्वी एकदा तिच्याशी बोलायची विनंती केली. आयेषाने धरलेली गुपिताची गुळणी बाहेर काढण्याचं काम करीमबाबांना बरोब्बर जमलं.
आयेषाच्या वडिलांनी तिचं लग्न एका म्हाता-याशी ठरवलं होतं. ते मोडावं म्हणून तिने हे नाटक महिनाभर चालू ठेवलं होतं. ती नखाने आपल्या नाकाचा घोणा फोडून तिथून वाहणारं रक्त पिऊन घेई. मग ते ओकून दाखवी. एकदोनदा ते पोटातच ठेवून त्याचा शेवटपर्यंतचा प्रवासही तिने पाहून घेतला होता. हॉस्पिटलमध्ये कान-नाक-घशाचा तपास सर्वात शेवट, जवळ जवळ आठवड्याने होई. तोवर नाकाची जखम भरलेली असे.
तिच्याच शब्दात सांगायचं तर महिन्याभरात या प्रकरणाचा "दमदमा दम (रक्ताचा डंका)" गावभर दणाणला. त्या "लग्ना अजुनी लहान" असलेल्या म्हाता-याने असल्या "रोगट" मुलीला नकार दिला. त्याचा असा निक्काल लावल्यावरच या रक्तपिपासू वाघिणीने नखं कापली.

दौला नावाची, पंधरासोळा वर्षाची एक देखणी मुलगी अशीच नेहेमी उगाचच भरती करा म्हणून हटून बसे. इमर्जन्सीच्या डॉक्टरांना मामा बनवून ऍडमिट होई आणि मग हजार सबबी सांगून घरी जाणं टाळत राही. अशीच एकदा ती घरी जायची टाळाटाळ करत बरेच दिवस वॉर्डात टिकून राहिली. तेव्हा मी ठरवलं, हिच्या नव-यालाच सांगावं, "ही धडधाकट आहे. हिला पुन्हा पुन्हा इथे आणू नका." साडेतीन वाजता तो नवरा आला, म्हणून मला फोन आला. मी तावातावाने गेले. तो नवरा माझ्यासमोर उभा राहिला. उकिरड्याच्या परिमळाने दरवळणारा, ढेरपोट्या, काळाकभिन्न, पंचाहत्तरीचा, डोळ्यात फूल पडलेला तो माणूस... त्याच्या चेहे-यावरचा तो रंगेल भाव... माझा आवेश माझ्या काळजाच्या पाण्यात कधी वाहून गेला ते मलाच कळलं नाही. "दौला बरीच आजारी आहे. तिला अजून इथेच राहावं लागेल," एवढच कसंबसं बोलले मी.

स्वरार्थमणी : रागरससिद्धांत

स्वरार्थमणी : रागरससिद्धांत


गानसरस्वती किशोरी आमोणकर


राजहंस प्रकाशन, पृष्ठे : १५८, मूल्य : ४०० रुपये


वाणीच्या वा वाद्याच्या माध्यमातून जे स्वरमय साकार होते, व्यक्त होते, ते सारे संगीत या शब्दाने ओळखले जाते। ज्याला आपण संगीत म्हणतो, ती खरे म्हणजे स्वरभाषा आहे. मानवी भावसृष्टीचे म्हणजेच मनोवस्थांचे साक्षात तसेच रमणीय दर्शन घडवणारे सौंदर्यप्रधान गायनवादन हेच रागसंकल्पनेचं अधिष्ठान आहे. स्वरमाध्यमातून व्यक्त होणारी श्रवणप्रधानता आणि तर्कनिष्ठता - म्हणजे विवक्षित रागात ठराविकच स्वर येतात, त्या रागाचा विशिष्ट असा एक मुख्य वादी स्वर असतो इत्यादी विधाने- यांना महत्व असते; ते त्या रागाच्या मूळ स्वरूपाचे तत्व, भाव, आणि शास्त्र जाणून घेण्यासाठी किंवा रागभावाच्या वातावरणाची साधारण कल्पना येण्यासाठी. स्वरभाषा हे जसे शास्त्र आहे, तसेच ते भाव प्रकट करणारे नाट्यही आहे आणि काव्यही आहे. राग म्हणजे तालबद्ध, शब्दबद्ध आणि स्वरबद्ध असलेली बंदीश नव्हे. रागविस्तार किंवा रागदर्शन हे वाद्यावर वाजवल्या जाणा-या कोणत्याही तालाच्या आधाराने मांडलेले स्वरप्रकटीकरण किंवा शब्दबद्ध वा नोटेशनबद्ध केलेले संगीतही नव्हे. मग राग म्हणजे नेमके काय, याचा विचार होणे आवश्यक आहे.

विश्वातील सर्वच स्वरव्यवहार हा स्वर आणि भावार्थ यांच्याच माध्यमातून होत असतो. म्हणून व्यक्त होणा-या अभिव्यक्तीचे शरीर आणि आत्मा या दोहोंच्या संदर्भात होणा-या अभिव्यक्तीचा त्या दृष्टीने विचार होणे आवश्यक आहे. स्वर आणि अर्थ यांच्या सहिततत्वातून शरीराच्या अस्तित्वाचे अंतर्बाह्य सम्यक ज्ञान प्राप्त होऊ शकते. म्हणूनच रागाच्या आत्म्याचा शोध घेताना त्याच्या वादी, संवादी, अनुवादी, विवादी, पकड, चलन व इतर लक्षणांबरोबरच या लक्षणांहून अधिक सूक्ष्म अशा पूर्वसूरींनी दिलेल्या एकादश लक्षणांचा भावार्थसिद्धतेसाठी विचार करावा लागेल. इथे राग या शब्दाचा व्यापक अर्थ गृहीत धरून रागतत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
भरतमुनींनी नाट्यशास्त्रात नाट्याच्या संदर्भात काव्याची चर्चा करताना "अर्थ क्रियोपेतम काव्यम" म्हणजे अभिनयाच्या माध्यमातून व्यक्त होणारा सौंदर्यपूर्ण अर्थ म्हणजे काव्य, अशी व्याख्या केली आहे. राग हा निखळ स्वरूपामध्ये, नाट्य स्वरूपामध्ये आणि काव्य स्वरूपामध्ये वेगवेगळी रूपे धारण करत असतो. सर्वसाधारणपणे श्रोत्यांसमोर रागाचे होणारे सादरीकरण हे त्या रागाचे नाट्यस्वरूप असते. तसेच स्वराभिनयाच्या माध्यमातून व्यक्त होणारा सौंदर्यपूर्ण भावार्थ म्हणजे रागकाव्य, अशी रागकाव्याची व्याख्या करता येईल. रागाचे उच्चतम प्रकटीकरण म्हणजे रागकाव्य. नाटकातील अर्थ अभिनयातून व्यक्त करावयाचा असल्याने नाटकात दृश्यक्रियेला महत्व असते. काव्यामध्ये हाच अभिनय सौंदर्यपूर्ण शब्दार्थातून प्रकट होत असतो. म्हणजेच काव्यात सौंदर्यपूर्ण शब्दार्थाचा अभिनय होत असतो. नाट्यचर्चेचे संक्रमण काव्यचर्चेत झाले आणि दोन्हीचे संक्रमण रागचर्चेत करताना क्रियेची म्हणजेच अभिनयाची जागा आता स्वरांनी घेतली. हा स्वरांनी केलेला अभिनय असतो. म्हणजेच स्वर अभिनीत होत असतात. गायकाच्या किंवा वादकाच्या अंत:करणातील रागभाव श्रोत्यांच्या मनात संक्रमित करणे हेच स्वराभिनयन असते. असा स्वर प्रतिभावंत कलाकाराच्या स्वरव्यापारातून अवतरत असतो आणि त्यामुळे अशा स्वरातून व्यक्त होणारा अर्थ हा केवळ श्रवणार्थ किंवा स्वरार्थ राहात नाही. त्याला रससौंदर्य प्राप्त झालेले असते. रागाचे भावार्थपूर्ण प्रावाहिक सौंदर्यपूर्ण स्वरप्रकटीकरण हे त्या रागाला रसरूप प्राप्त करून देत असते. म्हणूनच राग हा नुसता त्याच्या आरोहावरोहातून वा वादी-संवादी तत्वातून प्रकट होत नसतो. ज्यामुळे रागभाव रसरूप धारण करतो, अशाच स्वरव्यापाराला म्हणजेच रागाला काव्यस्वरूप येत असते. नुसत्याच कंठातील सामर्थ्याला किंवा माध्यमातील कौशल्याला रागरूप म्हणता येणार नाही.
जसा नाट्यशास्त्र आणि काव्यशास्त्र यांचा अभ्यास झाला, चर्चा झाली, तशीच रसप्रचीतीच्या दृष्टीकोनातून रागव्यापाराची चर्चा व्हायला हवी. रसाशिवाय कोणताही अर्थ प्रवर्तित होत नाही, या भरताच्या वाक्याच्या संदर्भात अर्थ म्हणजे रसयुक्त रागार्थ, ही कल्पना स्पष्ट होते. रागगायनातून जर रस प्रतीत होत नसेल तर ती एक आत्मविरहित अशा रागशरीराची अनुभूती असते. आत्म्यासह येणा-या शरीराची प्रचिती ही त्या शरीराच्या चैतन्याची प्रतीती असते. म्हणूनच इथे स्वर आणि अर्थ यांचा आशय किती व्यापक आहे, याची कल्पना येऊ शकेल. कलाकाराच्या प्रातिभस्पर्शाने अपूर्व रूप धारण करून प्रकट होणारा स्वर आणि त्यातून अभिव्यक्त होणारा चमत्कृतीपूर्ण अर्थ म्हणजेच रागार्थाचे साहित्य होय. अशा प्रकारच्या स्वरविश्वातून रागमांडणी करायची असेल तर इथे रागातील स्वरार्थांच्या ठिकाणी असे कोणते वैशिष्ट्य असते की ज्यामुळे साध्या नुसत्या स्वरार्थातून अपूर्व अशा अर्थसौंदर्याचा साक्षात्कार व्हावा? साहित्यातील गुण, औचित्य, अलंकार, रीती, ध्वनी, इत्यादी तत्वे तसेच नाट्यशास्त्रातील विभावानुभवादी तत्वे स्वरभाषेला लावल्याखेरीज रागातून रसप्रचिती येते, हे सिद्ध करता येणार नाही. सह्र्दय रसिकाच्या ठिकाणी भावार्थसौंदर्याची प्रचिती घडवून आणणे, हेच नाट्य आणि काव्याप्रमाणे रागप्रकटीकरणाचे उद्दिष्ट आहे. म्हणूनच रागातील स्वरार्थांना रसत्व प्राप्त करून देणा-या स्वरमाध्यामातील निश्चित व्यापाराचा शोध घेणे आवश्यक ठरते.

सर्वोत्तम रवींद्र पिंगे

सर्वोत्तम रवींद्र पिंगे


राजहंस प्रकाशन, पृष्ठे: ३०४, मूल्य: २०० रूपये


पोएट बोरकरांच्या अंगणातलं चांदणं
मानापमान हा माझा विषयच नाही. संमेलनाध्यक्ष झाल्यामुळं मी अधिक मोठा झालो नसतो आणि न झाल्यामुळं लहानही झालेलो नाही. माझी कविता माझ्याबरोबर आहे आणि तेवढं पुण्य मला बस आहे. मला रसिकांचा कौल हवा होता आणि मला वाटतं तो यावच्चंद्रदिवाकरौ माझ्याच बाजूनं राहील.
तुमचं कविता लेखन काय म्हणतय?
उत्तम चाललय. एक लक्षात ठेवा, मी ईश्वराचा लाडका मुलगा आहे. आय अँम ए मॅन ऑफ डेस्टिनी!
याचं गमक काय?
पाहा, माझ्याबरोबरीच्या सर्वांचं स्फुरण थांबलं. मंदावलं. मला मात्र सारखी नवी नवी कविता स्फुरतच असते. याचा अर्थ, देवाचा अजूनही माझ्यावर अनुगख आहे. एरवी असं घडतच ना?
असं बोलत बोलत, डुलत डुलत आम्ही प्रराम अपार्ट्मेंटमधल्या त्यांच्या कन्येच्या घरी दाखल झालो.
बसल्या बसल्या मला त्यांचं पंधरा वर्षापूर्वीचं संभाषण आठवलं. तेव्हा कवी म्हणाले होते, आपल्या आयुष्यात एसेन्शियल्स असतात, तशीच नॉन-एसेन्शियल्सही असतात. पैकी, आयुष्यातल्या उच्च बाबींवर तडजोडी करू नये. मामुली बाबींवर तडजोड केल्यामुळं काही बिघडत नाही. शुध्द अभिजात कविता हे माझ्या आयुष्यातलं प्रधान अंग आहे. तिथं मी कालत्रयी तडजोड करणार नाही. कधी केलेली नाही. प्रचारी लेखनही मी केलं, तिथं फार काटेकोर राहिलो नाही. अभिजात कविता साहित्यात मोडते. प्रचारी पदं आणि लेख हे साहित्य नव्हे. तो मजकूर म्हणून त्याचे संगख मी काढले नाहीत. माणसानं प्रथम एसेन्शियल्स कुठली, ती ठरवून त्यांचा अग्रक्रम निश्चित केला पाहिजे. मग गोंधळ होत नाही. ज्यामुळे तुमचा विकास होईल, तिथे तडजोड नसावी. तसा मी फार सोवळा नाही. नीतिग्रस्त व्यक्तिमत्वाने पछाडलेला नाही. भीतीच्या पोटी जन्मलेली नीतिमत्ता मला नामंजूर आहे. माणसाकडे स्वत:ची म्हणून चिंतनसिध्द, अनुभवसिध्द अशी नैतिक मूल्य असावीत आणि ती त्यानं स्वत:ला नि इतरांना समदृष्टीने लावावीत. जे स्वातन्त्र्य मी भोगलं, ते मी इतरांनाही लुटू देईन. पर्सनल गॉडवर माझी श्रध्दा नाही. पण देव आहे. दैव आहे. पावलोपावली मला याचा प्रत्यय येतो.

व्हाय नॉट आय?

व्हाय नॉट आय?

वृंदा भार्गवे

अमेय प्रकाशन, पृष्ठे : २५२, मूल्य : २५० रुपये

सायनला जाताना देवूच्या डोळ्यांना जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून स्टरलाईज्ड गॉज डोळ्यांवर ठेवायचे. त्यावर काळा गॉगल घालायचे. कधी कडेवर घेऊन बसमध्ये, तिथून स्टेशन. मग परत ट्रेन. सायनला उतरून हॉस्पिटलपर्यंत चालणे, आता तिनेही निमूट सा-याची सवय करून घेतली होती.
जखमा ब-या झाल्या आणि तिच्या डोळ्यात एक पडदाही निर्माण झाला. त्या दिवशी सायनला डॉक्टर माधवानींनी तिचे डोळे तपासायला सुरुवात केली आणि देवूने सांगितले, "डॉक्टर, मला काहीच दिसत नाही. खूप सारा अंधार आहे. "
मी वेड्यासारखी पाहातच राहिले. डॉक्टरांनाही भीती होतीच. एक विलक्षण कातर क्षण होता तो.

माझ्या डोळ्यांसमोर तिचे मोठ्ठाले डोळे, हसणे, व्रात्यपणा सगळं येऊन गेलं. तिनं पाहिलेलं थोडंसं जग, थोडा निसर्ग आणि तिच्या जवळची माणसं आता गुडुप झाली असणार...
डॉक्टर म्हणाले, " काहीच दिसत नाही?"
"नाही. अंधार आहे. काळं काळं..."
डॉक्टरांनी मला पुन्हा त्यांच्या केबिनमध्ये आणलं. एक ग्लास पाणी दिलं.
"तुम्ही शक्य तितक्या लवकर हैदराबादला जाऊ शकता?"
"हैदराबाद?"
"भारतातलं कॉर्नियावरचं एक उत्तम रुग्णालय आहे तिथं. जाऊ शकाल, म्हणण्यापेक्षा जाच. मी तिथल्या डॉक्टरांशी बोलून ठेवतो. "

मी केबिनबाहेर पडले. बाहेरच्या बाकावर डोळ्यांवर गॉगल लावलेली माझी देवू बसली होती. कालपर्यंत तिला थोडंफार दिसत होतं. आता तिची दृष्टीच नव्हती. मला केविलवाणं वाटलं. क्षणभर सा-यांचा राग, संताप, नैराश्य दाटून आलं. या चार महिन्यात किती डॉक्टर, केवढे उपचार, किती हॉस्पिटल्समध्ये जाऊन किती खुर्च्यांवर तिला बसवलं. प्रखर लाईटस नी डोळ्यांची तपासणी, तिच्या शरीरावरचे डाग, व्रण, जखमा, डोळ्यांची बुबुळं, पापण्या चिकटू नयेत म्हणून केलेले प्रयोग. हा माझा पोटचा जीव, काय नशिब घेऊन आला आहे? आंधळेपणाचा शाप हिलाच का? आता इथून पुढे ना पाहिलेले हैदराबाद. तिथे पुन्हा डॉक्टर्स. ते काय बोलणार काही कळणार नाही. तेच ऑप्शन्स देणार. आपण कोणाची तरी मदत घेऊन एका ऑप्शनवर टीकमार्क करणार... कदाचित तोच ऑप्शन देवूच्या दृष्टीने घातक असेल. शेवटी कोणालाही आपल्या या मुलीच्या डोळ्यांबद्दल एवढी सहानुभूती वाटण्याचे कारण काय? त्यांच्या दृष्टीने एक पेशंट, एक नवी केस.

मी देवूपाशी गेले. तिला कडेवर घेतले. "ममा, मी चालेन. हां...पण मला आता गाड्या दिसणार नाहीत.”
आवंढा गिळला. चालू लागले.
"ममा, तू बोलत नाहीस. रडतेय?" तिने तिच्या बोटांनी माझ्या चेह-याला स्पर्श केला. तिची बोटं ओली झाली.
"ममा, मी त्रास देणार नाही. शहाण्यासारखी वागेन... तू मला काठी आणून दे."
रस्त्यावरून मी रडत चालले होते. कशाचीच पर्वा नव्हती. लोकांची...त्यांच्या पाहण्याची...गर्दीची...

------------------------------------------------------------------------------------------------
पाणीदार डोळ्याच्या देखण्या मुलीची दृष्टी डॉक्टरांच्या चुकीमुळे गेली. वय होतं सात. त्वचा, दात, केस, वर्ण सगळ्यावर परिणाम झाला. पण तरी या गोष्टीचं निराश समर्थन न करता माणसाचं जगणं अतिसुंदर अनुभव असतो, हेच आग्रहानं सांगणा-या आई-मुलीची ही संघर्ष आणि जिद्दीची प्रेरणादायी कहाणी.

व्हाया...वस्त्रहरण

व्हाया...वस्त्रहरण


गंगाराम गवाणकर


डिंपल प्रकाशन, पृष्ठे : २५६, मूल्य : २५० रुपये


पूर्वी कोकणात बोटीने प्रवास करताना आम्ही नाळीवर बसून प्रवास करीत असू। योगायोग असा की विमानातसुद्धा आम्हाला नाळीवरील (विमानाच्या शेपटीकडील) जागा मिळाली होती. पहाटेचे दोन वाजले होते. सर्वांनीच कसेबसे दोन घास खाऊन रात्री नऊ वाजता घर सोडलं होतं. त्यामुळे सर्वांच्याच पोटात कावळे ओरडत होते. आमचं विमान अध्ये मध्ये कुठेही न थांबता थेट लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उतरणार होतं. "विमान कुठेही थांबणार नाही" म्हटल्यानंतर आम्हा कोकण प्रांतियांमध्ये चुळबुळ सुरु झाली. कारण आम्हा कोकणवासीयांना धुळीनं माखलेल्या, कुबट वासाच्या, लाल डब्याच्या एसटीतून खाचखळग्यातून धडपडत प्रवास करण्याची सवय. शिवाय तासागणिक "येथे एसटी फक्त पाच मिनिटे थांबेल" असा कंडक्टरचा पत्रा कापल्यासारखा आवाज कानावर पडल्याशिवाय प्रवासही सुखकर होत नसे. पण विमानात खाण्यापिण्याची सर्व सोय आहे, हे कळल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला. तरीही "रेड वाईन अजून कशी येना नाय?" अशी काही जणांची चुळबुळ चालू होती.


काही वेळाने, पण अगदी वेळेवर आम्हाला लंडनला सुखरूप नेण्यासाठी विमानाची घरघर सुरू झाली. थोडंसं चुकल्यासारखं वाटलं. कारण आम्हाला बॉम्बे सेंट्रलच्या एसटी आगारातला ड्रायव्हर बघण्याची सवय. तो तंबाखू मळत एसटीभोवती आरामात फिरून मागील आणि पुढील टायर्सवर लाथा घालणार. स्वत:च्या सीटवर बसल्यावर पाचकन तंबाखूची पिचकारी खिडकीतून बाहेर टाकणार. कधीकधी ही पिचकारी एखाद्या प्रवाशाच्या मस्तकावर मारून झाल्यावर कंडक्टरने बॉम्बस्फोट झाल्यासारखा दरवाजा लावून घंटी वाजवली की ड्रायव्हर एखादी दरड कोसळल्यासारखी एसटी सुरू करायचा. हे सर्व आवाज कानात फिक्स असल्यानं कोकणात निघालोय असं मनापासून वाटायचं.

पण इथं तसं काहीच नव्हतं. सर्व कसं शांत शांत. फक्त विमानाच्या पंख्याची कानावर पडणारी घरघर... विमानातून प्रवास करायची बहुतेक जणांची पहिलीच वेळ होती. सर्वांनीच क्षणभर डोळे मिटून आपापल्या देवाचा धावा सुरू केला. पण त्या अगोदर म्हणजे विमान धावपट्टी सोडण्यापूर्वी रोबोसारखा दिसणारा एक माणूस समोर आला. त्याने कमरेला पट्टा कसा बांधावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. शिवाय देखण्या हवाई सुंद-या लगबगीने काहीजणांना कमरेला पट्टा बांधायला मदत करू लागल्या. खरं म्हणजे, अगदी सोपी कृती होती ती! पण इतरांनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा आपणाला कमरेला पट्टा बांधता येत नाही, असा अभिनय करायला सुरुवात केली. कारण त्यांना हवाई सुंदरीच्या नाजूक हाताने कमरपट्टा लावून घ्यायचा होता. सर्वांचे कमरपट्ट्याचे काम सुरू असतांना मोंडकरबाई खुर्चीतल्या खुर्चीत चुळबुळ करीत होत्या. सुलोचनाबाई त्यांच्या शारीरिक क्षेत्रफळाच्या मानाने खुर्चीत अगदी फीट बसल्या होत्या. त्यांना पट्ट्याचे टोक सापडत नव्हते. सुलोचनाबाईंच्या शेजारीच संजीवनी जाधव ( नाटकातील मंजुळाबाई) बसल्या होत्या. सुलोचनाबाईंची चुळबुळ पाहून हवाईसुंदरी आपलं नेहेमीचं झेरॉक्स हास्य करीत त्यांच्याजवळ आली आणि आपल्या मंजुळ आवाजात विचारती झाली, " शाल आय हेल्प यू?" तिचे अस्पष्ट उच्चार सुलोचनाबाईंना नीटसे कळले नाहीत. त्यांनी मग जवळच बसलेल्या संजीवनी जाधवना विचारलं, " संजीवनी, ह्या दात विचकून घुडग्या काय इचारताहा गो? " संजीवनीने हवाई सुंदरीच्याच पद्धतीने अगदी मृदू आवाजात तिला समजावून सांगितले, " अगो, तुझ्या कमरेक पट्टा बांधूक मदत करू काय, असं इचारता हा."

त्यावर सर्वांना ऐकू जाईल अशा मालवणी कचक्यात सुलोचनाबाई म्हणाल्या, " शिरा घाल या नकटीच्या तोंडार. अगो, बसल्याजागेर ह्या खुर्चेत मी इतक्या गच्च बसल्याला असय की, तुमचा ईमान जरी उलटा पालटा झाला तरी ह्या खुर्चेतून मी काय पडूचच नाय. माका तुमच्या टीचभर पट्ट्याची गरजच काय?" आणि मग स्वत:च सात मजली हसत सुटल्या. त्याबरोबर आम्ही एकाच वेळी बावीस जण ढग गडगडल्यासारखे हसत सुटलो. तशी विमानाची नाळ गदगदली आणि ब्रिटिश प्रवासी वर्गाच्या काळजाचे ठोके चुकले. त्यांनी बायबल वाचन सुरु ठेवलं.

काही जणांनी लाल शर्टस घातले होते. त्या लाल शर्टाकडे पाहून आणि अंगठा तोंडाकडे नेऊन रेड वाईन कधी येतली, असे एकमेकांना खाणाखुणा करून विचारीत होते. त्यांच्या खाणाखुणा सुरू असताना शिरस्त्यानुसार "संकटकाळी बाहेर पडनेका मार्ग" ची प्रात्यक्षिके एक जिवंत माणूस यंत्रमानवासारखा दाखवायला लागला. त्याच्या हालचाली इतक्या यंत्रवत होत्या की तो खरोखरच जिवंत माणूस आहे का नाही, अशी शंका येत होती.

यंत्रमानवाची प्रात्यक्षिके संपतात ना संपतात तोच फुलपाखरांसारख्या त्या सुंदर हवाईसुंद-यांनी प्रत्येकाच्या हातात आपल्या नाजूक हातांनी एकेक ट्रे द्यायला सुरुवात केली. त्या ट्रेमध्ये तेवढ्याच नाजूक चिमट्यांनी त्या एक हिरवी सुरळी ठेवत गेल्या. आमच्या दिलीप कांबळीची (गोप्या) चुळबुळ सुरू झाली. त्याला त्या हिरव्या सुरळीचं काय करावं ते कळत नव्हतं. तो माझ्या पाठीमागेच बसला होता. "गवाणकरानूं, या हिरव्या सुरळीचा फाटफाटी दोन वाजता काय करूचा?" असं विचारू लागला. ब्रिटिश वर्गाचा एक डोळा बायबलवर आणि दुसरा डोळा आमच्या कृतीवर होता. मी दिलीपला मागं वळून काही सांगणार तोच ब्रिटिश प्रवासी जो क्षणभरापूर्वी घाबरलेला होता, तो फिदीफिदी हसत होता. मी मागं वळून पाहिलं तर आमच्या दिलीपने ती हिरवी सुरळी काही तरी खाद्य पदार्थ आहे असं समजून त्याचा लचका तोडला होता. ब्रिटिश प्रवाशांना हसू फुटणं साहजिक होतं. कारण ती सुरळी म्हणजे चेहरा स्वच्छ पुसण्याचा जंतूनाशक रुमाल होता. दिलीपच्या कृतीने ब्रिटिश प्रवासी थोडे रेलॅक्स झाल्यासारखे वाटले. त्यांनी मनात विचार केला असेल, की ज्या माणसांना हातरुमालाचा उपयोग कसा करायचा हे कळत नाही ते रिव्हॉव्हरचा कसा काय उपयोग करणार?

मॅजेस्टिक कोठावळे

मॅजेस्टिक कोठावळे

संपादन : वि.शं. चौघुले

मॅजेस्टिक प्रकाशन, पृष्ठे : ३०८, मूल्य : ३०० रूपये


केशवराव-एक चांगला माणूस
पु.ल.देशपांडे

केशवराव हे अशा एका व्यवहारात होते की ज्यात 'लेखक' नावाच्या काहीशा 'स्फोटक' घटकाशी सतत संबंध येतो. केशवरावांनी हे सारे स्फोटक पदार्थ खूप चातुर्याने सांभाळले. मला वाटतं, त्यांना पुस्तक आणि पुस्तकाशी संबंधित असणारा जो कोण असेल त्याच्याविषयी आतूनच प्रेम असावं. 'पुस्तक' या गोष्टीवरच त्यांचं अतोनात प्रेम होतं. म्हणूनच त्यांनी केवळ स्वत: प्रकाशित केलेल्या पुस्तकांवरच प्रेम केलं नाही, आपल्या पुस्तकालयात सर्व मराठी प्रकाशकांकडची पुस्तकं ठेवली. मॅजेस्टिक ग्रंथप्रदर्शनात सगळ्या मराठी साहित्याच्या वैभवाचं प्रदर्शन दिसेल याची दखल घेतली. लेखकांत आपले लेखक आणि इतर प्रकाशकांचे लेखकआ सा पंक्तीप्रपंच केला नाही. उत्तम पुस्तकाला पुरस्कार देतांना ते मॅजेस्टिकचं प्रकाशन असावं असा कधी अप्रत्यक्ष सूचनेतून सुध्दा प्रयत्न केला नाही. या ग्रंथप्रेमामुळेच ते संबंध आलेल्या प्रत्येक ग्रंथप्रेमी माणासाला सोयरे सकळ आप्तजन या भावनेनेच भेटले. आणि त्यांच्याशी संबंध आलेल्या प्रत्येकाला जाणवला तो हा त्यांच्या आप्तभावापोटी आलेला चांगुलपणा. मॅजेस्टिक गप्पा ऐकायला आनंदाने जमणारा ग्रंथप्रेमी श्रोत्रृसमुदाय पाहणे याचाच आनंद त्यांना मोठा होता. ग्रंथजत्रेला जमणारी आबालवृध्दांची गर्दी हे त्यांचं टॉनिक होतं. लेखकांच मन:पूर्वक आदरातिथ्य करणं हा व्यावहारिक डावपेचाचा भाग नसून एक प्रकारचा कुळाचार असल्यासारखा हा प्रसंग ते साजरा करीत. या सर्व उपक्रमांचं नेतृत्व पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असे. पण चुकूनही त्यांनी कधी ते नेतृत्व किंवा यजमानपण मिरवलं नाही. मॅजेस्टिक गप्पांना येणार्या, ग्रंथप्रदर्शनात हिंडणार्या, ग्रंथ विकत घ्यायला येणार्या कित्येकांनी केशवराव कोठावळे यांना पाहिलेलंही नसेल. किंबहुना आपन दिसावं यापेक्षा आपण दिसू नये याच धडपडीत ते असायचे.

केशवरावांचं हसणं मिस्किल असे. ते कधी आवाज चढवूनही बोलत नसत. व्यवसायाचा व्याप प्रचंड होता. पण आसपासच्या मित्रमंडळींना त्यांनी कधी तो व्याप किती प्रचंड आहे, हे भासूही दिलं नाही. एक विलक्षण शांत, संयमी आत्मविश्वासानं ते हा व्याप सांभाळत असत. त्या व्यापाचा त्यांनी स्वत:चं मोठेपण सिध्द करायला कधी बाऊ करून दाखवला नाही. लक्षावधी रूपयांची उलाढाल करणार्या या माणसानं स्वत:च्या यशाची जाहिरात सदैव टाळली. यामागे नुसती खुबी नव्हती. एक प्रकारची सभ्यता होती. आपलं मोठेपण सतत दुसर्याच्या डोळ्यात खुपेल अशा पध्दतीनं मिरवणं ही अस्भ्यता आहे- नव्हे बराचसा अडाणीपणा आहे. अशा रीतीनं मिरवणं हास्यास्पद ठरतं हे कळण्याच्या सभ्यतेइतकीच सूक्ष्म विनोदबुध्दीही केशवरावांना होती. त्यांच्या सार्या वागण्या वावरण्यात एक प्रकारचा साधेपणा होता. कुणावर छाप टाकण्याचा प्रयत्न नव्हता. आपलं श्रेष्ठत्व सिध्द करण्याचा अट्टहास नव्हता. त्याबरोबरच गुळमट गोडवा किंवा भावनांचं प्रदर्शनही नव्हतं. एखाद्या पुस्तकाची भरमसाठ स्तुती करतांना मी त्यांना कधी ऐकलं नाही किंवा नावड्त्या पुस्तकाची किंवा लेखकाची अकारण निंदा करतानाही पाहिलं नाही. मतभेदाचा आग्रह किती ताणायचा याबद्दलही त्यांचे काही आडाखे होते. आपल्याला न पटणारी गोष्ट मुळात कुणालाही पटण्याच्या लायकीची नाही अशा हट्टाला पेटून ते कधीच उभे राहिले नाहीत.

मी बॅरिस्टरचं कार्ट बोलतोय!

मी बॅरिस्टरचं कार्ट बोलतोय!

डॉ. हिम्मतराव साळुबा बावस्कर

मॅजेस्टिक प्रकाशन, पृष्ठे : १०६, मूल्य : १०० रुपये



बिनडोक, अडाणी व दरिद्री शेतक-याच्या पोटी मी जन्मलो। शेतक-याच्या जीवनाशी निगडित असलेली जीवघेणी संकटे पाहिली, सोसली। विंचूदंश, सर्पदंशावर संशोधन केले। हे करत असताना नकळतपणे संसाराकडे दुर्लक्ष झाले. चंगळवादाचा अनुभव नाही. त्यामुळे ईश्वरचरणी एकच प्रार्थना की पुनर्जन्म मिळाल्यास तो मंत्र्याच्या पोटी व्हावा; म्हणजे कलियुगातील सा-या सोयी अनुभवण्यास मिळतील. भारत हा कृषीप्रधान देश केव्हा होईल, व या भारतात सोन्याचा दिवस तो असेल की ज्या दिवशी शेतक-याच्या घरावर इन्कमटॅक्स अधिका-यांच्या धाडीत हजारो रुपयांची रोकड मिळेल.

वैद्यकीय शिक्षण हे गरिबाच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहे. एका वैद्यकीय महाविद्यालयात मुलाला प्रवेश घेण्यासाठी गेलो असता वीस लाख भरा असे सांगितले गेले. मी केलेले संशोधन न ऐकल्यासारखे. जेथे महात्मा गांधीही त्यांचा मुलगा घेऊन गेल्यास पैसेच लागतील. अशाच एका वैद्यकीय कॉलेजातील प्राध्यापकाला विचारले की, अमाप देणगी देऊन तयार झालेला डॉक्टर गरीबांना सेवा देईल काय? त्यावर त्यांचे ( न पटण्यासारखे) उत्तर असे की ही मुले जन्मत:च श्रीमंताची आहेत. त्यामुळे त्यांच्यापुढे पैसा कमावणे हा हेतू नसतो. खरोखर, असे घडले तर महात्मा गांधीजींचे स्वप्न खरे ठरेल. कारण आतापर्यंतच्या माझ्या अनुभवास वैद्यकीय अधिकारी, जो गरिबीत जन्मला असूनही नोकरीमध्ये विनामूल्य वैद्यकीय सेवा देणारा क्वचितच. आजच्या जमान्यात वैद्यकीय पेशा हा एक बदनाम झालेला पेशा आहे. याचे कारण अज्ञानाद्वारे नकळत निरनिराळ्या तपासण्या करणे, अमाप पैसा वसूल करणे. सरकारी दवाखाने तर गुरांचे गोठे झाले आहेत. जोपर्यंत मंत्री किंवा त्यांचे नातेवाईक प्राथमिक आरोग्य केंद्रात फाटलेल्या, डाग पडलेल्या चादरीवर, घाणीचे साम्राज्य असलेल्या ठिकाणी भरती होऊन व न ऐकलेले शब्द तेथील कर्मचा-यांच्या कृपेने त्यांच्या कानी येतील, प्रत्येक वस्तू पदरमोड करून आणावी लागते हे त्यांना कळेल, तेव्हाच आरोग्य खाते सुधारेल. अन्यथा सर्व व्यर्थ आहे. नुकतेच मराठवाडा व विदर्भामध्ये हजारो लोकांना चिकनगुनियाची बिमारी झाली. हे एक संकट समजून त्यावर वैद्यकीय मंडळींनी मात करायला हवी होती. परंतु घडले ते उलटेच. काही वैद्यकीय अधिका-यांनी एक ते दोन महिन्यांच्या रजा काढून सरकारी दवाखान्याच्या शेजारी आपले खाजगी दवाखाने थाटले व हजारो रुपये मिळवले.
सर्पदंश म्हणजे कुटुंबावर येणारे एक धर्मसंकटच होय. त्याकरता सर्पदंशाच्या आणि विंचूदंशाच्या रूग्णावर सरकारी रूग्णालयात इलाज होणे महत्वाचे आहे. कारण हा गरीब शेतक-याचा जीवघेणा प्रश्न आहे. सर्पदंशावरील प्रतिलसेसाठी ४५० रुपये लागतात. एखाद्या वेळेस २०-२५ बाटल्या द्याव्या लागतात. ही प्रतिलस सरकारी दवाखान्यात विनामूल्य मिळते. म्हणून आजपर्यंतचे सर्व रूग्ण सरकारी दवाखान्यात नेऊन मी त्यांच्यावर इलाज करतो व करीत आहे. तेथे माझी सेवाही मी विनामूल्य देतो. महाराष्ट्रात आजही घोणस, मणेर व नागदंशाचे ३० टक्के रूग्ण मृत्यू पावतात. याला कारण म्हणजे वेळेवर प्राथमिक आरोग्य केंद्रात हजर नसलेले वैद्यकीय अधिकारी. तसेच प्रतिलस न देणे अथवा उपलब्ध नसणे. मी सतत दहा वर्षे वारंवार शासनास पत्रे लिहून प्रथमिक आरोग्य केंद्रास कृत्रिम श्वासोछ्वास देण्यासाठी ऍम्बू बॅग व इतर साहित्य उपलब्ध करावे अशी विनंती करत आहे. परंतु अद्याप यश आलेले नाही. ग्रामीण भागात व्हेंटीलेटर दिल्यास ते विनामूल्य वापरून दरवर्षी अहवाल पाठवीन अशी मी लेखी विनंती करूनही मुंबईच्या एका श्रीमंत देवालयाने नाकारली; परंतु माझ्या दोन मित्रांना मात्र त्यांची मंत्र्यांशी जवळीक असल्यामुळे याच देवालयाने करोडो रुपयांची यंत्रसामग्री दिली.
२१ सप्टेंबर, २००६ रोजी एका डॉक्टर मित्राचा दूरध्वनी आला व रात्री नऊ वर्षांची एक मुलगी सर्पदंशाने दगावली. सर्व माहिती विचारली असता, या मुलीला नाग या सर्पाने दंश केला होता व तिला श्वासोछ्वास घेण्यास त्रास होत होता. श्वसन नलिकेत टाकण्यासाठी असलेली नळी व इतर सामुग्रीचा ट्रे रोजच्या ठिकाणी नव्हता. म्हणून डॉक्टर स्वत: तो शोधण्यासाठी अपघाती विभागात पळत गेला, पण तेथेही नव्हता. दरम्यानच्या काळात ती मुलगी दगावली. नंतर शोध लावला असता ही जीवदान देणारी सामुग्री एक मंत्रीमहोदय त्या भागात दौ-यावर असताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणा-या ऍम्ब्युलन्समध्ये गेली होती. धन्य ती लोकशाही आणि धन्य ते आरोग्य खाते!

मालगुडी डेज

मालगुडी डेज


आर. के. नारायण


अनुवाद : मधुकर धर्मापुरीकर, साकेत प्रकाशन, पृष्ठे : ३०४, मूल्य : २५० रूपये

या संग्रहाला "मालगुडी डेज" असं नाव देण्याचा माझा हेतू असा की त्याला एक विशिष्ट भौगोलिक असं परिमाण मिळावं. मला अनेक वेळा विचारण्यात येतं की "हे मालगुडी कुठे आहे?" यावर मला एवढंच सांगायचं असतं की ते एक काल्पनिक असं नाव असून कोणत्याही नकाशात सापडणार नाही. ( तरीही शिकागो विद्यापीठाच्या प्रेसने प्रसिध्द केलेल्या एका साहित्य विषयक नकाशात मालगुडी हे ठिकाण दाखविलेलं आहे.) मी जर म्हटलं की मालगुडी हे गाव दक्षिण भारतात आहे तर मी केवळ अर्धसत्य सांगितलं असं होईल, कारण मालगुडीतील ही स्वभाववैशिष्ट्य तर मला जगात सर्वत्र दिसत असतात.
मालगुडीतील माणसं तर मी न्यूयॊर्कमध्येही पाहू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर वेस्ट ट्वेंटी थर्ड स्ट्रीट इथे मी काही महिने राहिलो होतो, तिथलं देता येईल. १९५९ पासून माझं इथं जाणं येणं राहिलं आहे. ही जागा मालगुडीची सगळी वैशिष्ट्य सांभाळून होती. रस्ते आणि माणसं यात काहीच बदल झालेला नव्हता. सिनागॊगच्या रस्त्यावर रेंगाळणारे तेच दारूडे, चमकदार अक्षरांच्या दुकानांवरच्या त्या पाट्या- या दुकानातली प्रत्येक वस्तू आठवड्यातच संपून जाते. सगळ्या मालावर पन्नास टक्के सूट, केव्हाही!- असे फलक, तो न्हावी, तो दातांचा डॊक्टर, वकील आणि मासेमारीचे हूक्स-जाळी-काठ्यांचे ते जाणकार, मांस-चीज-विक्रीची दुकानं ( एकानं तर माझे स्वागत केले होते. अरे, एवढे दिवस तिम्ही कुठे होतात? आअणि सध्या तुम्ही डाळ तांदूळ कुठून घेत असता? खरं म्हणजे त्या ट्वेंटी थर्ड स्ट्रीटचा, इतकेच काय, अमेरिकाचाही कायमचा रहिवासी नव्हतो, याची पुसटशीदेखील जाणीव नव्हती. ) ही सगळी जशीच्या तशी राहिली होती. आपल्या अविचलीत आणि शाश्वत आशा परिचयाचं ते वातावरण, त्याहीपेक्षा जेव्हा मी चेल्सिया हॊटेलला फार वर्षांनंतर पुन्हा एकदा गेलो, तेव्हा त्या मनेजरने मिठि मारून माझं उत्स्फूर्त असे स्वागत केलेच, शिवाय त्याच्या सहका-यांची ओळख करून दिली - जे हयात होते. त्यात एक गृहस्थ एकशे सोळा वर्षांचे होते. ते इथले कायमचे रहिवासी होते. ज्यावेळी मी इथे आलो होतो, तेव्हा ते नव्वदीचे असावेत.
मालगुडी हे अशा त-हेनं कल्पनेतलं असलं तरी माझ्या लेखनकामासाठी फार उपयोगी ठरलेलं आहे. तथापि मला कितीही वेळा विचारलं तरी यापेक्षा जास्त असं मूर्त स्वरूप देऊ शकत नाही. जेव्हा लंडनच्या एका उत्साही टीव्ही निर्मात्याने मला गाठले आणि मालगुडीला नेऊन त्याला तो परिसर दाखवावा, कादंबरीतल्या त्या सगळ्या पात्रांची ओळख करून द्यावी, असं सांगू लागला. त्याला त्यावर तासाभराची डॊक्युमेंटरी करायची होती. त्यावेळी मला क्षणभर धक्काच बसला. मी मोठ्या नम्रतेनं त्याला म्हणालो, मी एका कादंबरीच्या लेखनात व्यस्त आहे.
मालगुडीवर आणखी एक कादंबरी? त्याने विचारलं.
होय. मी म्हणालो.
ती कशाबद्दल आहे?
मानवी आत्मा असलेल्या वाघाबद्दल.
वा! फारच इंटरेस्टिंग! मला असं वाटतं की मी सध्या थांबावं. माझ्या डॊक्युमेंटरीमध्ये वाघाचा समावेश करणं फारच छान राहील....
आर. के. नारायण

नोबेल ललना

नोबेल ललना


मीरा सिरसमकर


मेहता प्रकाशन, पृष्ठे : २३०, मूल्य : १८० रुपये



१८६४ च्या सुमारास रसायन्शास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांनी नायट्रोग्लिसरीन आणि केसलगुर या दोन पदार्थांवर रासायनिक प्रक्रिया करून "डायनामाईट" हे स्फोटक तयार करण्याचे नवे तंत्र शोधले. त्याचप्रमाणे नायट्रोग्लिसरीनमध्ये गन कॉटन घालून जेलीग्नाईट नावाचे शक्तिशाली स्फोटक बनवले. पुढे १८७६ च्या सुमारास पोटॅशियम नायट्रेट आणि लाकडाचा लगदा वापरून अनेक प्रकारची स्फोटके तयार केली. परंतु दुर्दैवाने काही लोकांकडून या स्फोटकांचा युद्धाच्या वेळी गैरवापर होऊ लागला. त्याचप्रमाणे ही स्फोटके तयार करण्याच्या कारखान्यात योग्य सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे अनेक वेळा स्फोट होत असत. अशा स्फोटांमुळे किती तरी कामगारांचा भीषण मृत्यू होत असे. आल्फ्रेड नोबेल यांचे बंधू एमिल यांचेही अशा स्फोटादरम्यान कारखान्यात निधन झाले. या अपघातानंतर युरोपमधील काही लोक नोबेल यांना मृत्यूचा व्यापारी म्हणून संबोधू लागले. डायनामाईट आणि विविध प्रकारच्या स्फोटकांच्या शोधामुळे नोबेल यांचा आर्थिक फायदा झाला आणि अनेक जणांना मृत्यूच्या वेदीवर चढावे लागले, अशी उघड उघड टीका होऊ लागली. या टीकेनंतर ते खूप व्यथित झाले.

खरं तर कठीण कातळ, खडक फोडून रस्तेनिर्मिती करणे, मोठमोठ्या डोंगरांमध्ये बोगदे निर्माण करून वाहतुकीचा मार्ग आखणे, बांधकामाच्या वेळी मोठमोठ्या दगडांचा अडसर दूर करणे, खाणकामाच्या वेळी भुयारी मार्ग निर्माण करणे, पृथ्वीच्या पोटात दडलेल्या खनिजांचा आणि दुर्मिळ मूलद्रव्यांचा शोध घेणे, अनेक रासायनिक प्रक्रियांच्या वेळी घटक पदार्थ म्हणून वापर करणे अशा किती तरी लहान मोठ्या बाबतीत स्फोटकांचा वापर अत्यावश्यक असतो. परंतु वैज्ञानिक शोधांचा गैरवापर करणारी मूठभर माणसे या महत्वपूर्ण गोष्टींकडे दुर्लक्ष करून समाजाला त्या शोधांच्या आधारेच विध्वंसाकडे नेतात.

शस्त्रास्त्र म्हणून युद्धकाळात माणसे मारण्यासाठी या स्फोटकांचा वापर जेव्हा अति प्रमाणात वाढला, तेव्हा सह्र्दयी सर आल्फ्रेड नोबेलचा भ्रमनिरास झाला. शास्त्रांच्या प्रगतीमुळे व त्यामुळे उपलब्ध होणा-या शोधांमुळे मानवी जीवन अधिक सुखकर आणि सुकर व्हावे, अशी ख-याखु-या शास्त्रज्ञांची इच्छा असते. भौतिक जगातील शास्त्रज्ञ म्हणजे कळकळीने काम करणारी माणसे असतात. त्यामुळे आपल्या वैज्ञानिक शोधाचा वापर विघातकतेसाठी होत असल्याचे पाहून उत्कर्षदायी व प्रगतीशील समाजाचे स्वप्न पाहणा-या सर आल्फ्रेड नोबेलना आयुष्याच्या उत्तरार्धात निराश वाटू लागले. आपण आयुष्यभर कमावलेल्या संपत्तीचा आपल्या मृत्यूनंतर योग्य विनियोग व्हावा असा विचार त्यांच्या मनात घोळू लागला.

जगभरातल्या शास्त्रज्ञ, विचारवंत, संशोधकांनी काही तरी सकारात्मक, भरीव कार्य करावे, ज्यायोगे नवनवे शोध लागतील, निसर्गातील गूढ उकलतील, आणि त्यांच्या साहाय्याने अखिल विश्वातील मानव जातीचा विकास होईल, त्याचप्रमाणे साहित्यातून आणि शांततेच्या मार्गावरून मानवतावाद वाढीस लागेल, अशा संकल्पनेतून त्यांच्या मनात नोबेल पुरस्काराची कल्पना आकार घेऊ लागली आणि २७ नोव्हेंबर, १८९५ रोजी त्यांनी ही योजना आपल्या मृत्यूपत्राद्वारे सर्वांसमोर मांडली. सॅनरेमो येथे त्यांचा १० डिसेंबर, १८९६ रोजी मृत्यू झाला. जवळपास एकतीस दशलक्ष स्वीडिश क्रोनर एवढी रक्कम त्यांनी नोबेल पुरस्कार फाऊंडेशनला दिली.

विज्ञानातून आधुनिकता, साहित्यातून भावसृजनात्मकता व संस्कृती संवर्धन आणि शांततेच्या प्रसारातून स्थैर्य यांच्यामुळेच मानवाचा प्रवास सुखकर होणार आहे, हे जाणून त्यांनी नोबेल पारितोषिके देण्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शरीरविज्ञान/वैद्यकीय, साहित्य आणि शांतता या पाच शाखांची निवड केली.

नीलची शाळा

नीलची शाळा : ए.एस. नील

अनुवाद : हेमलता होनवाड, सुजाता देशमुख

राजहंस प्रकाशन, पृष्ठे : २७८, मूल्य : २०० रूपये



एक स्वतंत्र व्यक्ती, शिवाय सामाजिक भान असणारा समाजघटक, असं मूल शिक्षणामुळे तयार व्हायला हवं. स्वयंशासन हे नि:संशयपणे घडवून आणतं. 'आज्ञाधारकता' हा सदगुण समजला जाऊन सर्वसाधारण शाळेत तो मनावर इतका बिंबवला जातो, की नंतरच्या आयुष्यात जेमतेम हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या माणसांकडे कशाला तरी आव्हान देण्याइतकी धमक शिल्लक राहाते. शिक्षकासाठीचं प्रशिक्षण घेत असता हजारो विद्यार्थी - विद्यार्थिनी आपल्या शिक्षकी भविष्याकडे अत्यंत उत्साहानं डोळे लावून बसलेले असतात. मात्र शिक्षण संपल्यानंतर वर्षभरात शिक्षकी पेशात आपल्या खोलीत बसून ते विचार करतात तो 'शिक्षण म्हणजे विषय आणि शिस्त' असा. याला आव्हान देण्याची हिंमत नसते, कारण नोकरी गमावण्याची भीती. काही शिक्षक मनातल्या मनात त्याविरूध्द आवाज उठवतात. आयुष्याची घट्ट झालेली मूस मोडून काढणं फार कठीण. अशीच आणखी एक पिढी मोठी होते आणि ती नव्या पिढीवर तीच ती जुनी बंधनं, नीतिनियम आणि शैक्षणिक वेडेपणा लादत जाते. तेच ते जुनं दुष्टचक्र. या गोष्टी ज्यांच्यावर बिंबवल्या जातात ती सर्वसामान्य माणसं, यातल्या वाईट गोष्टी नुसत्या स्वीकारून थांबत नाहीत तर त्या गृहितच धरतात, हे आणखी दुर्दैव.

शाळा आणि शिक्षकांबद्दल विचार करावा तेवढा थोडाच आहे. सेल्बीनं लिहिलेल्या 'लास्ट एक्झिट टू ब्रुकलिन'चाच विचार करा. ब्रिटनमध्ये या पुस्तकावर बंदी घालण्यात आली. ही बंदी म्हणजे अडाणी कर्मठांच्या सरकारी बोगस बडेजावाचा एक शुध्द नमुना होता. असभ्य शब्द, लैंगिक विकृती, मानवतेची अधोगती या पुस्तकात ठासून भरलेली असूनही, आपल्या तद्दन बढाईखोर संस्कृतीचा एक पैलू त्यात दिसतो, म्हणून सर्वांनी हे वाचायला हवं. हे पुस्तक आपल्याला हादरवून सोडतं. या पुस्तकातून अमेरिकेच्या जीवनविन्मुख आणि दिखाऊ, चकचकीत बाजारू जीवनाची दुसरी बाजू आपल्याला दिसते. व्यापारी-व्यावसायिकांकडून होणारी पिळवणूक, झोपडपट्टीतलं आयुष्य आणि वाईट शिक्षणानं माणसाची काय हालत होते, याचंही चित्रण पुस्तकात आहे. कमी अधिक प्रमाणात ही परिस्थिती जगातल्या प्रत्येक शहरात आढळते.

मी अजून चाचपडतो आहे. माणूस इतक्या वाईट गोष्टी का करतो हे मी समजावून घ्यायचा असफल प्रयत्न करतो आहे. दुष्टपणा उपजत असतो, कुणी मुळापासून वाईट असतो, यावर माझा विश्वास नाही. समाजानं ओवाळून टाकलेल्या मुलांमध्येही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि मोठ्यांकडून शाबासकीची थाप मिळाल्यानंतर चांगले बदल झालेले मी पाहिले आहेत. पण मग मुद्दलात चांगला असा हा मानवसमाज रोगी, अन्याय्य आणि क्रूर जग निर्माण करतोच का? माझा स्वत:लाच असा सवाल आहे की द्वेष, क्रौर्य, युध्द, आणि विघातक विचारांपासून दूर अशी माणसं जर 'समरहिल'मधून निर्माण होत शकतात, तर अशी माणसं निर्माण करणार्या शाळा सार्या जगातच का नाहीत?

निसर्गोत्सव

निसर्गोत्सव


दुर्गा भागवत


दिलीप प्रकाशन, पृष्ठे : १२८, मूल्य : ७५ रुपये


ही गोष्ट जातक कथातली आहे. गौतम बुध्दाने आपल्या मागच्या जन्मातल्या ज्या कथा आपल्या शिष्यांना सांगितल्या त्यांना जातक कथा म्हणतात. मागच्या जन्मातल्या बुध्दाला बोधिसत्व म्हणतात. सर्व त-हेचा चांगुलपणा, सर्व त-हेचे कौशल्य बोधिसत्वात असे. कधी हा बोधिसत्व माणूस असे, तर कधी पक्षी असे. आता ही जी गोष्ट मी सांगणार आहे त्या गोष्टीत बोधिसत्व होता रानातल्या झाडावरचा देव. हे रान शाल नावाच्या झाडाचे. हे झाड फार मोठे व सुंदर असते. त्याची पाने मोठी व फुले नाजूक असतात. भारतातले हे एक फार जुने झाड आहे. गौतम बुध्दाचा जन्म शालाच्या झाडाखालीच झाला.
असे हे शालाचे झाड. अगदी गर्द रानातले. ते बागेत वाढत नाही. शालाच्या झाडाला एकटे दुकटे राहायला आवडत नाही. शालाचे रान वेगळेच असते नि त्यात झाडांची गर्दी असते. त्यांच्या फांद्या एकमेकीत गुंतून राहिलेल्या असतात. एकमेकांच्या गळ्यात टाकून ही झाडं मजेत हालत असतात.

अशा या झाडांचे एक गर्द रान हिमालयात होतं. त्यात बोधिसत्व एका झाडाच देव होता. त्यावेळी काय झाले, वैश्रवण-कुबेर यक्ष स्वर्गात राहत होता. देवलोकातला सारा कारभार तो पाहत होता. एकदा त्याच्या हातून एक अपराध घडला नि त्याला देवलोक सोडावा लागला. त्या वेळी इंद्राने दुस-या एका कुबेराची नेमणूक केली. या नव्या वैश्रवणाने सा-या यक्षांना देवांना असा आदेश दिला की तुम्हाला तुमच्या जागेचा कंटाळा आला असेल तर ती जागा सोडून तुम्हाला आवडेल अशा जागी तुम्ही जाऊन राहावे.

हे ऐकून हिमालयातल्या झाडावरच्या देवांना, वृक्षदेवांना फार आनंद झाला. त्यांचे रान काळोखे होते. या देवांना माणासाच्या वस्तीजवळ जावे असे वाटत असे. तिथे झाडे एकमेकांपासून लांब होती. उन्हात न्हात होती. वा-यात हवी तशी डुलत होती. तेव्हा पुष्कळशा देवांनी ठरवले की हे एकांत, काळोखे थंडगार जंगल सोडून आपण गावाजवळच्या झाडांवर जाऊन राहावं. ते जायला निघाले तरी बोधिसत्व स्वस्थ बसून होता. तो म्हणाला, मी येणार नाही. तुम्हीही हे शालवन सोडून दूर जाऊ नका. थोडीशीच जागापालट करा. पण त्याचे न ऐकता देव निघून गेले.

एकदा काय झाले, मोठी वावटळ उठली. वारा जोरात वाहू लागला. त्याच्या सोसाट्यामुळे मोठमोठाले वृक्ष उपटले गेले. जुने वृक्ष पडले. मोठमोठ्या फांद्यांचा विस्तार असलेले दांडगे वृक्षदेखील उन्मळून पडले. पण या शालवनातला मात्र एकही वृक्ष पडला नाही. कारण तिथे सारी झाडे एकमेकांत फांद्या गुंफून एकमेकांना आधार देतच वाढली होती. माणसाच्या वस्तीजवळ असलेल्या देवदेवता, त्यांची घरे मोडल्यामुळे आता बेघर झाल्या होत्या. पोराबाळांना कडेवर घेऊन आसरा शोधत होत्या. या सा-या देवदेवता हिमालयातल्या शालवनात परत आल्या नि आपली कर्मकथा तिथे जे देव नि देवता होत्या त्यांना ऐकवू लागल्या. त्या देवदेवतांनी त्यांची ही कथा बोधिसत्वाला सांगितली. बोधिसत्व म्हणाला, शहाण्याचं बोलणं न ऐकता निघून गेलेल्यांची अशीच गत व्हायची. रानात राहणारी जात माणसाची असो की वृक्षाची, त्या जातीनं एकत्र वस्ती करूनच राहाणं श्रेयस्कर असतं. एकेकटं झाड मोठं असलं तरी वारा उखडून टाकतो. आमची झाडं रानटी असली तरी दाट आहेत, म्हणून ती वाचली. बाकीचे प्रचंड वृक्ष एकेकटे असल्यामुळे मोडून पडले.

निसर्गायण

निसर्गायण

दिलीप कुलकर्णी

राजहंस प्रकाशन, पाने: १९६, मूल्य : १४० रूपये

आपल्या सदिछ्चांचा वनस्पतींवर किती परिणाम होतो याचं अंगावर रोमांच उभं करणारं एक उदाहरण- आय बी एम या जगप्रसिध्द उद्योगात काम करणार्‍या फ़ोगेलनं संमोहनाचे काही प्रयोग केले होते. आणि त्या शास्त्रातही अशा भावनांची गरज असते हे त्याला ठाऊक होतं. एका वेगळ्याच प्रकारची मानसिक शक्ती अशा बाबतीत आवश्यक असते हे तो जाणत होता. या शक्तीचा प्रत्यय थोडीफ़ार आध्यात्मिक साधना केलेल्या त्याच्या व्हिव्हियन विले या मैत्रिणीनं त्याला आणून दिला. घरामागच्या बागेतल्या साक्सिफ़्रेजची दोन पानं तिनं खुडली. पैकी एक पान तिनं बैठकीच्या खोलीतल्या टेबलावर ठेवलं आणि दुसरं आपल्या उशाजवळच्या टेबलवर. रोज सकाळी उठल्यावर टेबलावरच्या पानाकडे सौहार्दपूर्ण नजरेनं पाही आणि मनोमन प्रार्थनापूर्वक अशी इछ्चा करी की ते पान ताजं, टवटवीत जिवंतच राहावं. बैठकीच्या खोलीतल्या पानाकडे मात्र तिनं पूर्ण दुर्लक्ष केलं. महिन्याभरानंतर तिनं फ़ोगेलला घरी बोलावलं. अन तेव्हा जे पाहिलं त्यामुळे फ़ोगेलचा स्वत:वर विश्वासच बसेना. बाहेरच्या खोलीतलं पान सुकलं होतं. काळं- करडं झालं होतं. पण उशाशी ठेवलेलं पान मात्र अजून हिरवं, सतेज, टवटवीत जणू आताच खुडून आणलं आहे असं होतं. आपल्यालाही असं जमेल का हे पाहायला फ़ोगेलनं आय बी एमच्या प्रयोगशाळेच्या इमारतीबाहेर असणार्‍या एल्मची तीन पानं खुडून आपल्या उशाजवळच्या टेबलावरच्या काचेवर ठेवली. रोज न्याहारी करण्यापूर्वी तो दोन बाजूच्या दोन पानांवर चित्ताची एकाग्रता करून ती जिवंत राहावीत अशी उत्कट इछ्चा व्यक्त करी. मधलं पान मात्र हेतुत: दुर्लक्षी. आठवड्याभरानंतर बाजूची पानं ताजी, सतेज, जिवंत होती. मधलं पान मात्र चुरगळून वाळलं होतं.वनस्पती जर इतक्या संवेदनक्षम असतील तर त्या तोडल्यामुळे त्यांना दु:ख होत नाही का, असा प्रश्न साहजिकच कोणाच्याही मनात येईल. वनस्पतींना दु:ख तर निश्चितच होतं. पण त्यामागे दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे तोडलेला भाग पुन्हा फ़ुटू शकतो. वनस्पती, झाडं यांचं हे वैशिष्ट्य आहे. अन दुसरा भाग असा की "कशासाठी" तोडलं यावर दु:ख बरच अवलंबून आहे. जर दुसर्‍या जीवाला या तोडीमुळे खूप लाभ होणार असेल तर झाडांना तितकंसं दु:ख होणार नाही. रक्त हा मानवी शरीरातला अत्यंत आवश्यक पदार्थ. पण दुसर्‍या एखाद्याला त्याचा उपयोग होणार असेल तर, आपणही रक्तदान करून त्यातला काही भाग आनंदानं दुसर्‍याला देतोच. झाडांमध्येही ही भावना असतेच. संपूर्ण झाड तोदलं तरी एखाद्या वेळी चालेल, फ़क्त अशा वेळी झाड तोडण्याचं कारण योग्य हवं. कुणाचं तरी अन्न त्यामुळे शिजणार असेल, वा कुणाला निवारा मिळणार असेल तर झाड तोडायला हरकत नाही. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी क्रांतिकारक जसं स्वसंमतीनं आनंदानं प्राणार्पण करतो, तसंच झाडंही करतील. फ़क्त तोडलेल्या झाडाचा, वनस्पतीचा त्या बलीदानाला साजेसा उपयोग करण्याचं दायित्व आपल्यावर आहे.

निसर्गवाचन

निसर्गवाचन

मारूती चितमपल्ली

पद्मगंधा प्रकाशन, पुणे. पृष्ठे: १५८, मूल्य: १२० रूपये

संमोहन विद्या माणसाला योगसाधनेने साध्य करून घ्यावी लागते. परंतु वन्य प्राण्यांच्या बाबतीत ती स्वाभाविक क्रिया आहे.
आदिवासी मोराला जंगलातील जागल्या म्हणतात. बिबट्यापासून रात्री संरक्षण मिळावे म्हणून मोरकुल वनातील एखाद्या ठिसूळ फांद्या असलेल्या पर्णहीन झाडावर बसते. तेथे बिबट्याला पोचणे शक्य नसते. मोराला जंगलातील प्रत्येक हालचालीची चाहूल लागते. मानेवर पिसे फुलवून तो आजूबाजूच्यांना धोक्याची सूचना देतो. वाघ आणि बिबट यांच्या अस्तित्वाची माहिती तो भयसूचक आवाज काढून जंगलातील प्राणीजगताला देतो.
जमिनीवर आहारविहार करणारा मोर समोर धोका दिसताच वेगाने पळ काढतांना पंखावर स्वार होऊन एखाद्या झाडाचा आश्रय घेतो. परंतु जमिनीवर बिबट आणि मोर यांची दृष्टादृष्ट झाली की मोर एखाद्या कठपुतळीप्रमाणे जागच्या जागी उभा राहतो. त्याचे सारे लक्ष बिबट्याकडे असते. परंतु या शत्रूपासून सुटून जावे याचे भान त्याला राहात नाही. बिबट त्याच्यावर जणू संमोहनाचे अस्त्र चालवतो. चपळ असूनही मोर त्याला बळी पडतो.
असा संमोहनाचा प्रकार बिबट आणि मोर यांच्या बाबतीतच घडतो असे नाही. जेव्हा कुत्रा सशाचा पाठलाग करतो किंवा पारधी त्याला पकडायला जातो, तेव्हा ससा आपले प्राण वाचवण्यासाठी वेगाने धावतो आणि आपले प्राण वाचवतो. पण जंगलात मुंगूस आणि ससा यांची दृष्टादृष्ट झाली की ससा हताशपणे भयाने किंचाळत अडखळत चालत असतो. मुंगूस त्याचा पाठलाग करते. जणू मृत्यूच आपला पाठलाग करतोय, असे समजून तो विवशतेने त्याच्या तावडीत सापडतो. प्रतिकार करत नाही किंवा धूमही ठोकत नाही. मुंगूस आणि उंदीर समोरासमोर आले तर हीच क्रिया दिसून येते.एकदा मी रात्रीच्या वेळी हुमा घुबड पकडून त्याला मोठ्या पिंजर्‍यात ठेवले. पिंजर्‍यासाठी लोखंडाच्या सलाखी वापरण्यात आल्या होत्या. दोन सलाखींच्या फटीतून घुबडाला बाहेर जाता येत नसे. मात्र लहान पक्षांना त्यात प्रवेश करता येत असे. वाटल्यास पुन्हा बाहेर जाता येई. भर दुपारच्या वेळी सातबहिणींचा एक थवा या पिंजर्‍यात प्रवेश करी. सार्‍याजणी घुबडासमोर बसून त्याला एकटक पाहात. एरवी घुबडाला पाहताच त्या जंगलात केवढा कोलाहल माजवितात. सातबहिणींच्या या आचरणाचे मोठे आश्चर्य वाटे. एरवी या लहान पक्षांचा ग्रास घेण्यास घुबड कमी करणार नाही. पण ते या पक्षांना संमोहित करून नजरेने विजय मिळवते. स्नेहाचे वातावरण निर्माण करण्यात त्याला यश येत असावे काय?
संमोहनाची विद्या माणसाने पहिल्यांदा या वन्य प्राण्याकडून शिकली असावी.

नापास मुलांची गोष्ट

नापास मुलांची गोष्ट


संपादन अरूण शेवते


ऋतुरंग प्रकाशन, पृष्ठे : २२८, मूल्य : २२५ रूपये


सरगम : सी। रामचंद्र


मी तसा सगळ्याच विषयात कच्चा होतो. सगळेच विषय मला जड जायचे. त्यातही शब्दांची स्पेलिंग पाठ करनं मला फारच जड जायचे. अंब्रेला शब्दाचं स्पेलिंग कधीच पाठ होत नव्हतं. स्पेलिंग पाठ करण्यावरून मी मारही फार खाल्ला होता. एकदा-दोनदा-अनेकदा मार. आणि तरीही स्पेलिंग काही पाठ होत नव्हतं. मग मला डोंगरगडचा आमच्या शेजारचा म्हातारा आठवला. तो रोज सकाळी आपल्या नातवाची उजळणी घ्यायचा. तो त्यावेळी शिकवायचा.
...म्हशीची शिंगे चार
उभा माणूस पाच...
अशीच पुढं तो गाण्यातून उजळणी शिकवत होता. मग मलाही असं वातलं की आपनही शब्दांचं स्पेलिंग गाण्यासारखं म्हटलं तर ते अधिक चांगलं लक्षात राहील. मग मी अंब्रेला शब्दाच्या स्पेलिंगला चाल दिली ती अशी.
U M B R E L L A - अंब्रेला - छतरी
सा रे ग सा रे गा सा सा - ध सा रे सा - रे ग रे
मग मात्र ते स्पेलिंग आजही माझ्या लक्षात आहे. तर काय, बालवर्गापासून कुठल्याही वर्गात मी पास झालो नाही. प्रत्येक वेळी मला पुढे ढकलावे लागले. हे ढकलवून पुढे नेण्याचे काम वडिलच परस्पर करीत असत. ते असिस्टंट स्टेशन मास्तर होते. सायडिंगला पडलेला डबा चालत्या गाडीला जोडून देणे हा त्यांचा नित्याचा उद्योग होता.

आम्ही नागपूरला राहायला आलो. वडिलांची बदली इतवारी स्टेशनवर झाली होती. वडिलांच्या माझ्याविषयी काही आकांक्षा होत्या. मी शिकून शहाणा होईन. घराण्याचे नाव गाजवीन असे त्यांना वाटत होते. बरोबरीच्या मित्रांजवळ ते तसे बोलूनही दाखवत. मला गाणे म्हणावेसे वाटे. नागपूरसारख्या मोठ्या शहरात माझ्या शिक्षणाची सोय चांगली होईल असे वडील म्हणाले होते. पण मला शिक्षणाविषयी फारशी आस्था नव्हती. ढकलगाडीच्या गतीने मी चौथी ओलांडली होती. पाचवीपासून आता वाघिणीच्या दुधाचा रतीब सुरू होणार होता. मायमाऊली मराठीचे दूधच मला पिववत नव्हते, आता वाघिणीच्या दुधाचा खुराक कसा मानवणार होता देव जाणे. नागपुरात आल्या आल्या मी विचार करीत बसायला एक जागा शोधून काढली. ती जागा म्हणजे संगमाकाठचा एक धोंडा. एका संध्याकाळी मी संगमावर बसलो होतो. अगदी गप्प होतो. बाहेर अंधारू लागले आणि मनातही कसली तरी काळजी जमू लागली. मी एकटाच असल्याची जाणीव झाली आणि उगीचच भडभडून आले. मागचा पुढचा धागा न सांधताच एक घटना मला जशीच्या तशी आठवली. तेव्हाही आम्ही नागपुरातच राहात असू. माझी सख्खी आई बाळंतपणासाठी इस्पितळात गेली होती. अर्धांध अवस्थेतील मोठी आई घरात होती. मी परीक्षेत साफ नापास झालो होतो. वडील अजून कामावरून येणार होते. मी त्यांच्या येण्याची वाट पाहात होतो. ते आले, दोन-चार धपाटे दिले म्हणजे ते परीक्षापर्व संपून जाणार होते.

दिवस मावळतीला गेला आणि वडील आले. मी चोरासारखा उभा राहिलो. ते फार संतापलेले दिसले. माझ्या अपयशाची वार्ता बहुतेक त्यांना समजलेली होती. एखादा वादाडा मिळणार, या तयारीने मी पापण्या झुकवून, माझ्या गालफडांकडे पाहून घेतले. मग नंतर एकाएकी धमकावणीच्या स्वरात ओरडले, "अंगातला सदरा काढ."
मी सद्रा काढून टाकला.
"गंजीफ्रॉक काढ." वडील ओरडले. मी गंजीफॉक काढला.
मी गंजीफ्रॉकही काढला.
"विजार काढ."
नाही, होय म्हणायची सोय नव्हती. मी विजार उतरू लागलो. तेव्हा मुंज झालेली नव्हती. वडील नुसते धुमसत होते. मी ठार घाबरलो होतो.
मोठी आई दरवाजापाशी येऊन उभी राहिली. मी पूर्ण अवधूत उभा होतो. मी काही हालचाल करण्याच्या आत त्यांनी माजघराबाहेर लोटले. त्यांनी खाडकन दार बंद करून टाकले. मी नागडाउघडा रस्त्यावर आलो. कुठे जाणार मी? चुकलेल्या कुत्र्याच्या पोरासारखा दिशाहीन चालू लागलो. एकाएकी मला आठवण झाली की आपली आई इस्पितळात आहे. इस्पितळ खूप दूर होते, पण ठावठिकाणा मला माहीत होता. मी तिकडे निघालो. नागडा उघडा, वडिलांनी हाकलून दिलेला, असा एक मुलगा आपल्या जन्मदेकडे निघाला. आईची माझ्यावर माया नाही, असे मला नेहेमी वाटत होते, पण तरीही मी तिच्याकडे निघालो होतो. रडत रडत निघालो. किती चाललो, कुणास ठाऊक. शहरातले दिवे लागले, रात्र झाली. मी चालतच होतो. एकाएकी कुणीतरी मागल्या बाजूने माझ्या उघड्या खांद्याला स्पर्श केला. मी झटक्याने मागे वळून पाहिले. आणि मला केवढा तरी हुंदका आला. ज्यांनी संतापाच्या भरात मला घरातून हाकलून दिले होते, ते माझे वडीलच सायकलवरून माझा शोध घेत घेत माझ्या पाठीमागे आले होते. त्यांनी मला आपल्या पुढ्यात सायकलवर बसवले आणि आम्ही घरी आलो. मोठ्या आईने प्रेमाचा वर्षाव केला.

नर्मदा परिक्रमा : एक अंतर्यात्रा

नर्मदा परिक्रमा : एक अंतर्यात्रा


भारती ठाकूर


गौतमी प्रकाशन, पृष्ठे : २६२, मूल्य : २०० रूपये

स्वामी कृष्णस्वरूपानंद नावाच्या संन्यासाशी एक दिवस विवेकानंद केंद्रात ऒळख झाली. ते उत्तर काशीहून आले होते. आणि भारत भ्रमणासाठी निघाले होते. मराठीत बोलत होते म्हणून जरा अधिक आपलेपणा वाटला. त्यांना ग्रंथालय दाखविण्याची जबाबदारी मी स्वत:वर घेतली. स्वामीजींशी बोलताना जाणवलं, त्यांचं वाचन प्रचंड असावं. त्यांच्या बोलण्यातून विचारांची स्पष्टता जाणवत होती. त्या दिवशी संध्याकाळी मी समुद्र किना-यावर बसून विवेकानंद शिला स्मारकाकडे बघत होते. मनात रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंदांबद्दलचे विचार चालू होते. तेवढ्यात स्वामी कृष्णस्वरूपानंद तिथे आले.
"नमस्कार स्वामीजी", मी त्यांना अभिवादन केले.
"एवढ्या कुठल्या गहन विचारात हरवली आहेस बेटा?" स्वामीजींनी आपुलकीनं विचारलं. इतके दिवस मनात खदखदणा-या प्रश्नांची उत्तरे स्वामीजी देऊ शकतील असा विश्वास वाटला.
"स्वामीजी, काही शंका - प्रश्न मनात आहेत. कन्याकुमारीला आल्यापासून अनेक क्षेत्रातल्या माणसांच्या गाठीभेटी होत असतात. भोळे भाबडे, अशिक्षित, पण देवावर पूर्ण भरोसा ठेवून जगणारे, साधू-संन्यासी, विद्वान-अभ्यासू, बुद्धीवादी माणसं तर कधी उच्चशिक्षित असूनही गुरूंच्या मागे लागणारे, बुवाबाजीच्या आहारी गेलेले असे अनेक लोक या ठिकाणी येत असतात. रामकृष्ण-विवेकानंदांसारखे गुरू-शिष्य विरळाच. "आजकालचे गुरू आणि त्यांचे आश्रम म्हणजे संस्थानं आणि सत्ताकेंद्र झाली आहेत. रामकृष्ण-विवेकानंदांसारखे नि:स्पृह- ज्ञानी गुरू-शिष्य आजच्या जगातही आढळतात का? आध्यात्मिक गुरूशिवाय ज्ञानप्राप्ती होतच नाही का? मंत्रांचं एवढं अवडंबर का माजवलं जातय? मंत्रांमध्ये खरच एवढी शक्ती असते का? "
स्वामीजी हसले. म्हणाले, " मला वाटलं इथं बसून तू घरचा, नातेवाईकांचा आणि मित्रमैत्रिणींचा विचार करते आहेस. पण तुझ्या डोक्यात वेगळ्याच विचारांचा दंगा चालला आहे. असे विचार तुझ्या डोक्यात येताहेत ही चांगली गोष्ट आहे. तुझा पहिला प्रश्न रामकृष्ण-विवेकानंदांसारखे गुरू-शिष्य आजकाल आहेत का? त्याचं उत्तर होकारार्थीच आहे. त्यांच्या समाजोपयोगी कार्याच्या पध्द्ती वेगळ्या असतील, पण ज्ञान, वैराग्य आणि नि:स्पृहतेच्या बाबतीत ते कुठंही कमी नाहीत. बुवाबाजी, भोंदुगिरी याबद्दल तुला जो संताप होतोय, वाईट वाटतय, ते अगदी स्वाभाविक आहे. असे लोक म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे. त्यासाठी समाजामध्येच जागृती व्हायला हवी. खरी धर्मग्लानी तर हे बुवाबाजी करणारे लोकच समाजाला आणतात. तुमच्यासारख्या तरूण पिढीनं यासाठी समाजप्रबोधन करायला हवं. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजावून सांगायला हवा.
"स्वामीजी, अंधश्रद्धा ठाऊक आहे, पण श्रद्धा म्हणजे नेमकं काय?"
"चांगला प्रश्न विचारलास. श्रद्धा म्हणजे काय? तर "सत्ये प्रतिष्ठिता धारणा सा श्रद्धा" ! सत्य काय आहे, हे जाणून घेऊन आचरण करणे म्हणजे श्रद्धा. आध्यात्मिकच नाही तर प्रत्येकच क्षेत्रात गुरूची आवश्यकता असते. लहान मूल मुळाक्षरं शिकतं तेव्हा त्याचे गुरूजी या बालकाचा हात स्वत:च्या हातात धरून ती अक्षरं गिरवतात. थोडा मोठा झाला की त्याला गणिताची सूत्र शिकवतात. पण याचा अर्थ असा नाही की एम.ए. चा पेपर लिहितानाही ते त्याचा हात हातात धरून पेपर लिहितील, किंवा आयुष्यभर त्याची गणितं सोडवून देतील. आपल्या शिष्याचं ज्ञान आतून उमलून येईल, हे पाहाणं गुरूचं काम. गरज भासेल तेव्हा त्यानं मार्गदर्शन करावं. रामकृष्णांनी विवेकानंदांच्या आयुष्यात केला का काही हस्तक्षेप? हस्तक्षेप न करताही त्यांनी परिपूर्ण शिष्य घडवला. सतत गुरूच्या मार्गदर्शनानं अथवा आदेशाप्रमाणे जगायचं ठरवलं तर मग शिष्याची अंत:शक्ती वाढणार कधी? त्यामुळे तुझा दुसरा प्रश्न -आध्यात्मिक गुरूची गरज आहे का? याचं उत्तर हेच की गरज आहे. पण मार्गदर्शन करणं एवढीच गुरूची जबाबदारी. कायमच शिष्याचं बोट धरून ठेवणं योग्य नाही. गुरूनं मार्ग दाखविला की मार्गक्रमण करणं शिष्याची जबाबदारी.
तुझा तिसरा प्रश्न मंत्रशक्तीबद्दलचा आहे. मुळात मंत्र या शब्दाचा अर्थ काय? मननात त्रायते इती मंत्र:. ज्याच्या मनन-विचारांनी आपण तारले जातो तो मंत्र. तारले जाणं याचा शब्दश: अर्थ घेऊ नकोस. मला म्हणायचं आहे ते अशा अर्थानं की ज्यामुळे तुमचे विचार प्रगल्भ होतात, आयुष्याचा अर्थ उमगू लागतो, जाणिवांचा स्तर उंचावू लागतो, असं काही. मंत्राचे उच्चार किंवा नामस्मरण, जप हेसुद्धा शास्त्र आहे. आपण मोठमोठ्याने आरडाओरडा केला तर आपल्या छातीत धडधडायला लागतं. शरीर थरथर कापतं. ओठ, जीभ कोरडी पडते. या उलट शांत स्वरातलं गाणं गुणगुणलं ऐकलं की आपल्याला स्वत:लाच शांत वाटतं. शरीर, मनावरचे ताण दूर होतात. तेच काम मंत्रांचं असतं. त्यांच्या उच्चारांमुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो. विशेष करून बीजमंत्राचा, म्हणजे ज्यात -हीं, क्लीं असे शब्द आहेत. त्यांच्या उच्चारणामध्ये नादाची स्पंदनं अधिक आहेत. त्यांची वारंवारता आणि सामर्थ्य (Frequency and Potency)अधिक आहे. अशा मंत्रामुळे शक्ती संचार फार लवकर होतो. त्यात गुरूंनी सिद्ध करून तो मंत्र तुम्हाला दिला असेल तर दुधात साखर. नादाच्या स्पंदनाचं एक स्वत:चं शास्त्र असतं. नामजप अथवा मंत्रजप करताना नादस्पंदनाची वलयं आपल्याभोवती निर्माण होतात. वातावरणाची शुद्धी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आजकाल गायत्री मंत्राचा शेतात अधिक धान्य यावं म्हणून उपयोग करतात, हे तुला ठाऊक आहे का? अशा मंत्र जपामुळे सिध्दी फार लवकर प्राप्त होतात. अनुभूती येतात पण सिध्दी किंवा अनुभूती हे साधकांचं ध्येय कधीच नसावं. मंत्र, जप, नामजप हे एक शास्त्र आहे. नादाचं शास्त्र. त्यावर बरीच काही पुस्तकं उपलब्ध आहेत. मिळाला कधी वेळ तर नक्कीच अभ्यास कर. मंत्र शास्त्र काही थोतांड नाही. आपल्या ऋषी मुनींनी भरपूर अभ्यास आणि चिंतन करून मंत्रांची निर्मिती केलीय."

तेजशलाका इरेना सेंडलर

तेजशलाका इरेना सेंडलर


अभिजीत थिटे


अमेय प्रकाशन, पृष्ठे : ११६, मूल्य : १५० रुपये



होलोकास्ट, अर्थात ज्यूंचा वंशविच्छेद हा मानवी जीवनातला अत्यंत कलंकित भाग आहे. त्या वेळची क्रूरता केवळ अतर्क्य. कोण एक हिटलर नावाचा माणूस उठतो. सबंध राष्ट्राला एका वंशाविषयी चिथावतो. देश शुद्ध करण्याचं विचित्र स्वप्न पाहतो. ते देशाच्या गळी उतरवतो आणि चार वर्षांच्या अवधीत साठ लाख लोकांचा मृत्यू घडवून आणतो. हा कलंक नाही तर काय आहे? हिंस्त्र म्हणून प्रसिद्ध असणारे वाघ-सिंहासारखे प्राणी भूक नसेल तर उगाचच शिकार करत नाहीत. माणसाचं हे "कर्तृत्व" पाहिलं की तेही शरमेनं माना खाली घालतील. महायुद्ध संपून सत्तर वर्ष होत आली तरी या जखमा भरत नाहीत. भरणं शक्यही नाही. आपल्या देशाच्या फाळणीच्या जखमा भरल्यात अजून? मग अत्यंत क्रूरतेनं झालेल्या वंशविच्छेदाच्या जखमा कशा बुजतील? ज्यूंची आजची पिढीही या जखमा बाळगते आहे. अशा वेळी इरेनासारख्या व्यक्ती दिलासा देतात. माणूस नावाच्या प्राण्यात माणुसकी असते, हे त्या दाखवून देतात. आपण आशेचा किरण म्हणतो तो हाच असतो. घेटोतल्या लहान मुलांना मृत्यूच्या खाईत ढकलणा-यांत काही स्त्रियाही होत्या. लहान मुलांना फसवून वेगवेगळ्या प्रयोगांसाठी फूस लावून पळवून नेणा-यातही काही स्त्रिया होत्या. आणि त्याच वेळी त्यांना पदराखाली दडवणारी, मायेची पखरण घालणारी इरेना नावाची एक आईही होती.
अणुरेणूया थोकडा, तुका आकाशाएवढा, हे संत वचन आपोआपच ठ्सठ्शीतपणे सामोरं येतं. मानवी मनाच्या या दोन अवस्था या कालावधीचा विचार करताना प्रकर्षानं जाणवतात. स्वत:च्या घरातील वडीलधा-यांची अगदी मनापासून काळजी घेणारा एक माणूस दुस-याबाबत कल्पनातीत क्रूर होऊ शकतो, हे इथंच तर दिसतं. आपल्या बाळाला साधा ठसका लागला, तर धावाधाव करणारा एक डॉक्टरी पेशाचा माणूस केवळ ज्यू आहेत, या कारणासाठी लहान लहान मुलांवर विविध प्रयोग करतो, त्यांचा गिनीपिग म्हणून वापर करतो, तोही कोणत्याही प्रकारची भूल न देता, या क्रूरतेला काय म्हणावं? घरातील ज्येष्ठांचा आदरसत्कार करणारा एखादा अधिकारी केवळ धर्म ज्यू आहे, म्हणून एखाद्या आजोबांची दाढी हिसडून काढतो. वेदनेनं कळवळले, या "गुन्ह्या" ची शिक्षा म्हणून बेदम मारहाण करतो. मजा म्हणून संगिनीच्या धाकानं एका आजीबाईंना भर रस्त्यात नाचायला लावलं जातं. आपल्या बाळाला फुलासारखं जपणारा एक सैनिक एका आईकडून तिचं बाळ हिसकावून घेतो. उंच उडवतॊ आणि दुसरा सैनिक त्या उडवलेल्या बाळावर गोळी झाडतो आणि या नेमबाजीचं बाकीचे कौतुक करतात, या सा-याची संगती लावायची तरी कशी? अणूपेक्षा लहान, कोतं आणि क्रूर मन वेगळं काय असणार?
हे सारं पाहून दुसरी स्त्री कळवळते. तिचं कळवळणं घरापुरतंच मर्यादित राहात नाही. काही तरी केलं पाहिजे, कोणी तरी पुढं झालं पाहिजे, अशी फक्त दिवाणाखान्यापुरती चर्चा राहात नाही. ती स्वत: पुढे होते. वॉर्सामधील ज्यूंसाठी गुप्तपणे काम करण-या एका संघटनेसाठी काम करू लागते. लहान लहान मुलांना घेटोतून बाहेर काढण्याचं, त्यांचा जीव वाचवण्याचं स्वप्न पाहते. ते प्रत्यक्षातही आणते. काम करताना पकडली जाते. प्रचंड शारीरिक आणि मानसिक वेदना सोसते. आपण बोललो तर आतापर्यंत वाचवलेली मुलं आणि त्यांना आश्रय देणा-या शेकडो, हजारो पोलिश कुटुंबांवर नाझी अत्याचारांचा नांगर फिरेल, याची तिला जाणीव असते. हजारोंचा जीव का एक जीव... तिच्यासमोर अगदी साधा, सरळ प्रश्न असतो. ती एका जीवाची निवड करते. तो जीव तिचा स्वत:चा असतो तरीही! इतका छळ सोसूनही ती तोंड उघडत नाही, हे पाहून संतापलेले नाझी तिला मृत्यूदंडाची शिक्षा फर्मावतात. बातमी समजल्यावर ती गुप्त संघटना तातडीनं हालचाली करते आणि गोळ्या घालण्याआधी काही मिनिटं तिची सुटका होते. तिला मृत्यूदंड देण्यात आला, अशी बातमी सगळीकडे पसरते. त्या संघटनेला ती सापडते, ती एका निर्जन स्थळी. संघटना तिची काळजी घेते. ती बरी होते आणि युद्ध संपेपर्यंत लपून राहून काम करतच राहते. "आकाशाएवढा..." हे याहून वेगळं असतं? त्या तरूण मुलीचं नाव होतं इरेना सेंडलर; पण तिची कहाणी इथेच संपत नाही. युद्ध संपल्यानंतर स्वत:कडची यादी बाहेर काढून त्या वाचवलेल्या ज्यू बाळांना त्यांची ओळख मिळवून देण्याचं काम ती त्या संघटनेमार्फत करत राहते. अडीच हजार मुलांपैकी चारशे मुलांचा शोध लागत नाही म्हणून हळहळत राहते. तिचं पोलंडच्या संसदेत कौतुक झालं, "राइटस अमंग द नेशन्स ( सर्व देशातील सर्वोत्तम)", " व्हाइट ईगल" यासारखे मानसन्मान मिळाले, तरी " मी विशेष काहीच केलं नाही" या मतावर ती ठाम राहते. "आम्ही तीस जण हे काम करत होतो, कौतुक सा-यांचच आहे. आमच्या एका सहका-यानं मृत्यूदंड स्वीकारला आहे. मी हयात आहे, म्हणून हा मान मला मिळतो आहे" असं तिला प्रामाणिकपणे वाटत राहातं. पोलंडच्या पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्राला उत्तर देताना ती म्हणते, " आपण सारेच या भूतलावर काही ना काही कारणासाठी जन्माला येतो. मी जे केलं असं सांगण्यात येतय, कदाचित माझ्या जन्माला येण्यामागचं तेच कारण असेल..."
------------------------------------------------------------------------------------------------
इरेना सेंडलर. पोलंडमधील वॉर्सापासून साधारण पंधरा मैलांवरील ओटवाक गावात १५ फेब्रुवारी, १९१० रोजी जन्म. इरेना यांनी थोड्याथोडक्या नाही तर तब्बल २५०० ज्यू मुलांना नाझींच्या तावडीतून सोडवलं. १२ मे, २००८ रोजी वयाच्या ९८व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

टू द लास्ट बुलेट

टू द लास्ट बुलेट

विनीता कामटे-विनीता देशमुख

अनुवाद : भगवान दातार

अमेय प्रकाशन, पृष्ठे : २२८, मूल्य : १९२ रूपये


सायंकाळी ६ वाजता : जिम. अशोकच्या दिनक्रमातली ही ओळ कधीही बदलली नाही. तो कुठेही असो, रोजच्या कार्यक्रमाच्या यादीत सहा वाजताची अपॉईंट्मेंट ठरलेली असायची. सायंकाळी बरोबर सहा वाजता तो मैदानावर किंवा जिममध्ये हजर असायचा. तो अतिशय तंदुरुस्त असा बॉडी बिल्डर होता. त्याचे रुंद खांदे आणि पोलादी मनगटं गुन्हेगारांच्या मनात धडकी भरवणारी होती. वेट लिफ्टिंगमध्ये त्याने तीन वेळा राष्ट्रीय विक्रम मोडला होता. या प्रकारात त्याने सुवर्ण आणि रौप्य अशी बरीच पदकं जिंकलेली होती. शंभर किंवा दोनशे मीटर्स धावण्यातली चपळता, गोळाफेक, थाळीफेक किंवा उंच उडी यातल्या त्याच्या पारंगततेने शाळेत त्याला अनेक पारितोषिकं मिळवून दिली होती. कॉलेजमध्ये आणि पोलीस दलाच्या स्पर्धांमध्ये तो नेहेमीच चमकायचा. तो चांगला क्रिकेटपटू होता. खेळाडूचं कौशल्य त्याच्यात होतंच, पण चांगल्या खेळाडूसाठी आवश्यक असलेली प्रचंड ताकद त्याच्यात होती.

लहानपणापासूनच त्याच्या मनात खेळाची आणि शरीरसंपदा कमविण्याची ओढ मनात निर्माण झाली होती. लहानपणी सडपातळ असलेला अशोक किशोरवयात एवढा बलदंड कसा झाला हे कळलंही नाही, असं त्याच्या आई सांगत. त्या वेळी तो सेंट स्टीफन कॉलेजमध्ये होता. संध्याकाळचा व्यायाम झाल्यानंतर त्याला सुमारे दोन लीटर दूध, बारा कच्ची अंडी, सहा केळी लागत असत. दुधात अंडी आणि केळी मिक्स करून तो दूध पीत असे. हा प्रकार तो स्वत:च बनवायचा. पण त्यामुळे त्याच्या कपड्यालासुद्धा अंड्याचा वास येत असे. प्लीज माझ्यासमोर तरी हे असलं काही पिऊ नकोस, त्याची आई त्याला परोपरीनं सांगे. पण त्याचं हे दूध पिणं थांबलं नाही की बॉडी बिल्डर बनण्याचं त्याच्या मनातलं स्वप्नं संपलं नाही. आईची कुरकुर नको म्हणून तो गच्चीवर जाऊन तो ते दूध पीत असे, पण शेवटी ते तो स्वयंपाकघरातच बनवत असल्याने सारे घर त्या अंड्याच्या वासाने भरून जाई आणि त्यामुळे आईचं ओरडणं सुरू होई. शेवटी अशोकनं असं दूध आवडणारा एक मित्र गाठला. त्याच्या घरी तसं दूध बनवायला कुणाचीच हरकत नव्हती. तेव्हापासून हा दूध पिण्याचा कार्यक्रम त्या मित्राच्या घरी सुरू झाला.

त्याच्या ताकदीचा एक किस्सा त्याच्या आईनीच एकदा सांगितला. कॉलेजात शिकत असताना तो दिल्लीतल्या प्रसिद्ध खान मार्केटमध्ये संध्याकाळी हमखास जात असे. त्या वेळी पार्किंगमध्ये तो स्कूटर लावत असे. एकदा एका कारवाल्याला त्याची कार तिथे लावायची होती. त्याने खाली उतरून अशोकची स्कूटर वेडीवाकडी सरकवली. त्या प्रयत्नात ती स्कूटर पडली. ती तशीच टाकून कारवाल्याने आपली कार लावली व तो सरळ निघून गेला. थोड्या वेळाने अशोक तिथे आला तेव्हा आपली स्कूटर पडल्याचे त्याला दिसले. त्याने आजूबाजूला चौकशी केली तेव्हा त्याला खरा प्रकार समजला. तो एवढा चिडला की एका क्षणात त्याने ती कार एकट्यानेच उचलून ढकलून दिली. त्याची ती अचाट ताकद पाहून आजूबाजूचे लोक बघतच राहिले. त्या दिवसापासून तिथले सगळे लोक त्याला ओळखायला लागले. त्या घटनेला दहा वर्षाहून अधिक काळ उलटला, पण अजूनही त्या भागात गेले तर तिथले दुकानदार मला ओळखतात व नमस्कार करतात, असे त्याच्या आई अभिमानाने सांगतात. "तिथे गेले की सारेजण, विशेषत: तो ज्या दुकानातून नियमित खरेदी करायचा तो दुकानदार त्याची नेहेमी चौकशी करत असे. पण २६ / ११ च्या घटनेनंतर मात्र ते नुसता नमस्कार करतात. काय बोलावं तेच त्यांना कळत नाही."

जीएंची कथा : परिसरयात्रा

जीएंची कथा : परिसरयात्रा


अ. रा. यार्दी / वि.गो. वडेर


राजहंस प्रकाशन, पृष्ठे : १८४, मूल्य : ४०० रुपये

मानवी जीवनात दडलेले द्वंद्व हा जीएंच्या चिंतनाचा मुख्य गाभा असावा. माणूस जगताना प्रत्येक क्षणी बुरखा पांघरून जगत असतो. त्याला जसे जगावेसे वाटते, तसे जगता येत नाही, कारण समाजाचे बुभुक्षित डोळे त्याच्यावर श्वापदांसारखे टपून बसलेले असतात. जीवनातले द्वंद्व हे एकाच वेळी कोवळीक आणि क्रौर्य, काठिण्य आणि पाशवी वृत्ती अशा प्रकारच्या जीवनदर्शनाने समोर उभे राहते. मानवाच्या मनाशी - त्याच्या तळाशी - दडून राहिलेल्या आदिम प्रवृत्ती कोणत्या क्षणी कशा रीतीने प्रकट होतात, आणि सुखी जीवनाला चूड लावतात हे सांगता येत नाही. नेमका हाच तिढा सोडविण्याचा प्रयत्न जीएंनी आपल्या आयुष्यभरच्या कथालेखनातून केला आहे.
नियतीला आतून बाहेरून तपासण्याचे, त्या नियतीचे धागेदोरे उसवून त्यांच्यातले शून्य ओळखण्याचे व्रत जीएंनी आयुष्यभर पाळले. आपल्या आयुष्यात आपल्याला जे प्रिय असते, त्याचा त्याग करण्यातच मानवाची खरी कसोटी लागते आणि त्या कसोटीला उतरत असताना आतड्याचे धागे तुटल्याच्या दु:खद संवेदना अनुभवून पलीकडे जायचे असते. नेमके हेच जीएंनी अखंडपणे कथेच्या माध्यमातून केलेले आहे. म्हणूनच त्यांच्या कथा या एकमेकांत गुंतलेल्या आतड्याच्या धाग्यांसारख्या वाटतात. त्यांच्या कथेचे प्रत्येक खेपेचे वाचन हे नवा प्रकाश दाखवते आणि मग प्रकाशाची दारे उघडी होत असल्याचा आनंद मिळतो.
आम्ही ज्या ज्या वेळी जीएंच्या कथा वाचल्या, त्या त्या वेळी आम्हाला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवत गेली; ती ही की जीएंनी आपले कथालेखन हे त्यांना वाटणा-या त्या त्या व्यक्तीबद्दलच्या कृतद्न्यतेपोटी केले आहे. ज्या परिसराने त्यांना भरभरून दिले, त्या परिसराला त्यांनी आपल्या कथांचे अर्घ्यदान केले आहे. जीएंच्या आयुष्यात आलेल्या अनेक व्यक्तींचे ॠण त्यांनी मान्य केलेच आहे. त्या व्यक्ती कधी दु:खाला सामोरे जाण्यातून, तर कधी दु:खाला कवटाळण्यातूनच असे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर भार टाकत गेल्या आहेत. विशेषत: आजोळच्या व्यक्तींनी जीएंचे भावविश्व समृध्द केले आहे. तो आपल्या मनावरचा भार कमी करण्यासाठी म्हणून जीएंनी कथालेखनाची कास पकडली.
लेखक आपल्या आयुष्याच्या कोवळ्या कालखंडात ज्या घटना पाहतो, अनुभवतो, पचवतो, आणि त्यांना कोणत्या प्रकारे प्रतिसाद देत असतो, यावर त्याचे व्यक्तीमत्व ठरत असावे आणि तेच त्याच्या लेखनातून पल्लवित होत असावे.
जीएंच्या कथा वाचताना त्यातला परिसर नेमकेपणाने डोळ्यांसमोर उभा राहतो. विशेषत: जीए ज्या दोन गावात (धारवाड आणि बेळगाव) वास्तव्य करून होते, त्या गावातल्या वाचकांना तरी हा परिसर खुणावत असतो आणि मग त्या परिसराच्या दिशेने आमच्यासारख्यांची पावले वळू लागतात. जीए ज्या घरात राहात होते, ते "कडेमनी कंपौंड, माळमड्डी, धारवाड," हे ठिकाण पाहण्यासाठी येणा-या जीएप्रेमींची संख्या कमी नाही. जीएंच्या घराच्या उंबरठ्याला डोके लावून नमस्कार करणारी, तिथल्या मातीचा टिळा आपल्या भाळी लावून कृतार्थ होणारी माणसे आम्ही पाहिली आहेत. याच परिसरात बहरलेल्या त्यांच्या कथा, त्यांच्या कथांमुळे उजळून निघालेला परिसर हा प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट, या स्वरूपाचा आहे. त्यांच्या कथांमधून येणा-या परिसराची ओळख वाचकांना झाली, तर त्यांच्या कथांच्या आस्वादनाला एक वेगळीच उंची लाभेल असे आम्हाला वाटले. त्यांच्या कथांचे आकलन होण्याच्या दृष्टीने या परिसराचा उपयोग व्हावा, होईल- अशी आमची अपेक्षा नाही. कारण कोणत्याही कलाकृतीचे आकलन हे वाचकांच्या पूर्वार्जितावर अवलंबून असते. पण आस्वादन हे नयनमनोहर निसर्गामुळे अधिक सोपे होते. कारण तिथे " ये ह्र्दयीचे ते ह्र्दयी घातले" असा प्रकार असतो. म्हणून जीएंच्या कथांमधील परिसराचा धांडोळा घेताना आमचा भर कथेच्या आस्वादनावर अधिक होता. आकलनाशिवाय आस्वादन कसे शक्य आहे, असा रास्त प्रश्न वाचकांच्या मनात उभा राहील, पण आईच्या स्पर्शाचा अस्वाद तिच्या बाळाच्या रक्तारक्तात घुंगरतो ना, अगदी तसाच जीएंच्या कथांचा थेट घुंगुरनाद वाचकांच्या मनात निनादत राहावा, या प्रामाणिक इच्छेपोटी आम्ही एवढे प्रयत्न केले आहेत. रसिक आणि जिद्न्यासू वाचकांना ही परिसर यात्रा निश्चित आवडेल, असा आम्हाला विश्वास वाटतो.
अ.रा. यार्दी, वि.गो. वडेर

खबर

खबर


जयदेव डोळे


जनशक्ती वाचक चळवळ, पृष्ठे : १५२, मूल्य : १२० रूपये


तें, ती आणि तो
१९ मेस विजय तेंडुलकर वारले. साहजिकच मराठी वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रे यांना दु:ख झाले. तॆंडुलकरांचं मोठेपण सर्वांनी सार्थपणे दाखवलं. त्याच वेळी हिंदी आणि इंग्रजी वृत्तवाहिन्यांना तेंडुलकरांच्या निधनापेक्षा एका तरूणीच्या खुनाचं जास्त महत्व वाटलं. इतकं की विजय तेंडुलकर अब नही रहे, अशी सरकती ओळही कोणीही दाखवली नाही. संध्याकाळी केव्हा तरी त्यांची छोटीशी बातमी कशीबशी नाइलाजास्तव झळ्कली. ती आरूषी तलवार मात्र अजूनही माघार घ्यायला तयार नाही. तिचा भयंकर मृत्यू दुप्पट वेगानं जिवंत होऊन नोईडाचे पोलिस आणि सरकारी यंत्रणा यांचा समाचार घेतो आहे. मृत्यू साधा व विनात्रास असला की त्याची नोंद घ्यायची नाही. तो क्रूर, हिंस्त्र आणि अचानक असेल तर मात्र त्याची खबर सर्वाना द्यायची असा जणू सा-या माध्यमांचा रिवाज झाला आहे. तेंडुलकर वृद्ध होते. मृत्यूची वाट पाहात होते. तें जाणारच होते, तरीही त्यांचा मृत्यू इतकी अवहेलना करण्याएवढा मामुली नव्हता. आरूषी तर तेरा वर्षांची कोवळी पोर. तिनं भरभरून जगणं अपेक्षित होतं, तिचं जीवन सुखी होतं, ददात कशाचीही नव्हती. तिचा मृत्यू मात्र फार निर्घृण आणि हकनाक झाला. त्याचं रहस्य अजून उलगडत नाही. तिच्या मृत्यूनं तेंडुलकरांच्या मृत्यूवर प्रसिद्धीच्या बाबतीत मात केली. हिंदी वृत्त वाहिन्यांना आरूषीच्या मृत्यूनं मोहवलं. हेलावलं नाही. टीव्हीसाठी सगळा मसाला असलेला तिचा मृत्यू तेंडुलकरांच्या अगदीच नीरस, पूर्णपणे अपेक्षित व नाट्यशून्य मृत्यूपुढं उजळला. चमकला. पराभूत माणसांच्या लढायांचा लेखक असे म्हणवले जाणारे तॆंडुलकर त्यांच्या मृत्यूच्या प्रसिद्धीच्या लढाईत पराभूत झाले. सरळसोट जिंदगीत काही नाट्य नसतं, म्हणून हिंसा व जंगलीपणा यामध्ये तेंडुलकर आपल्या मरणात कसलंही नाट्य ओतू शकले नाहीत. ते अस्सल पत्रकार व नाटककार होते. नाट्यमय घटना किंवा घटनांनी भरलेलं जगणं ते टिपायचे आणि समाजाला सादर करायचे. लोकांनाही तो हिंस्त्रपणा, भडक व बटबटीत जंगलीपणा पाहायला आवडू लागला. टीव्ही नेमकं हेच करतो. किंबहुना घटना, त्यातील क्रौर्य, अमानुषता, मूल्यहीनता या सा-या बाजू टीव्ही दाखवतो व त्यावरच इतर माध्यमांवर बाजी मारतो. सिनेमातही हे सारं असतं. ते कृत्रिम, सुरचित, व वारंवार प्रयत्नांतून साकारलेलं असतं याची जाणीव प्रेक्षकांना असते. टीव्हीचं तसं नाही. तो घरात असल्यानं व त्यानं वास्तवता, प्रत्यक्षता, समक्षता यांच्याशी आपलं नातं जोडल्यानं त्याचं हिंस्त्रपण दाखवणं अधिक आकर्षक असतं. त्याला जिवंततेचा स्पर्श झालेला असतो. ३५-३० वर्षांपूर्वी तेंडुलकर असाच अमानुषपणा व मानवी बेभानपणा बघायला कुठंही जायचे. तेव्हा त्यांच्याजवळ टीव्हीचा कॅमेरा असता तर जे आज पाहून लोकं खिळून जातात, ते त्यांना तेव्हाच बघायला मिळालं असतं. टीव्ही माध्यमाचं मर्म तेंडुलकरांनीच ओळखलं होतं; म्हणून त्यांनी माणसाचं अध:पतन किंवा जंगलीपण रंगमंचावर आणून ठेवलं. याचा अर्थ आजच्या टीव्हीचा पाया त्यांनी रचला. सेक्स, क्राईम, सिनेमा, व्हायलन्स या चार गोष्टी टीव्हीला फार म्हणजे फार जिव्हाळ्याच्या. आरुषीच्या मरणात पोलिसांनी यातल्या तीन गोष्टी आणून सादर केल्या. पहिल्या दिवसापासूनच सारी हिंदी चॅनल्स त्या दिशेनच चालत होती. त्यांना भरपूर मसाला त्यात सापडला.
हे एवढं जिवंत क्रौर्य बघत असताना सखाराम बाईंडर, घाशीराम कोतवाल, गिधाडे, आक्रोश, अनकही, सामना, सिंहासन आदी तेंडुलकर लिखित कलाकृतींमधलं जंगलीपण जुनं व थंड वाटणं साहजिक आहे. नाटकामधलं हिंस्त्रपण जुनाट आणि टीव्हीमधलं ताजंतवानं, नवं वाटतं यात तेंडुलकरांच्या लेखनाचा पराभव झाला. त्यांच्या दृष्टीचा नाही.

केशवराव कोठावळे पारितोषिक ग्रंथ

केशवराव कोठावळे पारितोषिक ग्रंथ


संपादक : विलास खोले


मॅजेस्टिक प्रकाशन, पृष्ठे : २३८, मूल्य : २५० रूपये



केशवराव कोठावळे ( २१ मे, १९२३-५ मे, १९८३) व त्यांचे मॅजेस्टिक प्रकाशन ही मराठी प्रकाशनव्यवसायावरील अमिट मुद्रा आहे. स्वत:च्या कल्पकतेने, संयोजनकौशल्याने व एकहाती नियंत्रणपद्धतीने केशवरावांनी ती उमटवली आहे. त्यांचे नाव आणि त्यांचे वाडमयीन क्षेत्रातील कार्य सगळ्यांना सुपरिचित आहे. मॅट्रिक होण्यापूर्वीच शाळा सोडलेल्या केशवरावांनी फूटपाथवरच्या पुस्तकविक्रीपासून आपला व्यवसाय सुरू केला, हे सर्वांना ठाऊक आहे. सिनेमाची तिकिटे विकण्यासारखे फुटकळ प्रकार करूनही त्यांनी काही दिवस अल्प प्रमाणात अर्थार्जन केले. काही काळ रोज झोपण्यासाठी मौज प्रेसच्या जागेचा आश्रय त्यांना घ्यावा लागला. परंतु यातून बाहेर पडायचेच असे निश्चयपूर्वक ठरवून त्यानुसार एकेक पाऊल पुढे टाकीत केशवरावांनी स्वत:ची बादशाही मिळकत उभी केली. औदुंबराच्या झाडाखालच्या मॅजेस्टिक सिनेमाजवळच्या लहानशा दुकानापासून गिरगावातील प्रसाद चेंबर्समधल्या अद्ययावत कार्यालयापर्यंत आणि पुण्यातल्या तीनमजली भव्य इमारतीपर्यंत आपल्या प्रकाशनव्यवसायाचा विस्तार घडवून आणला. दारिद्र्याचे चटके आणि समृद्धीचे वैभव दोन्ही अनुभवले. त्यांचे बहुतेक निर्णय अचूक ठरले आणि दैवयोगाच्या भरवशावर व ग्राहकांविषयीच्या अंदाजावर प्रकाशन व्यवसायात त्यांनी मोठी मजल मारली.
१९६४ मध्ये त्यांनी ललित मासिकाचा प्रारंभ केला आणि साहित्यिक चर्चाविनिमयाचे व वृत्तविशेषाचे एक विश्वासार्ह माध्यम त्यातून त्यांनी निर्माण केले. १९६९ मध्ये त्यांनी लॉटरीच्या तिकिटांचा व्यवसाय सुरू केला. लॉटरीच्या तिकिटांवरील कोठावळ्यांचा शिक्का इतका लोकप्रिय झाला की हे तिकीट घेतले की लॉटरी लागणारच असा विश्वास ग्राहकांच्या मनात निर्माण झाला. यातून मिळालेल्या उत्पन्नाचा काही भाग मॅजेस्टिक प्रकाशनाच्या वाट्याला येत राहिला. मौज, पॉप्युलर, कॉन्टिनेन्टल यांसारख्या नामांकित प्रकाशनसंस्था प्रभावीपणे कार्यरत असताना मॅजेस्टिक हे नाव त्यांच्या जोडीला आणून ठेवणे ही अवघड कामगिरी केशवरावांनी तुलनेने अल्पावधीत पार पाडली.
यशस्वी प्रकाशक म्हणून प्रस्थापित झाल्यानंतर साहित्यसंस्थांच्या कारभारात आणि साहित्य संमेलनांच्या उलाढालीत त्यांनी लक्ष घातले. आवश्यक ती मेहनत करून तेथेही अपेक्षित असे यश त्यांनी मिळवले. एव्हाना त्यांच्या वयाची साठी जवळ आली होती. २१ मे १९८३ या दिवशी त्यांच्या साठीचा कार्यक्रम करायचा असे त्यांच्या कुटुंबियांनी व मित्रांनी ठरवले. पण दुर्दैवाने तो योग यावयाचा नव्हता. त्या काळात पुण्यात चालत असलेला मॅजेस्टिक गप्पांचा कार्यक्रम १ मे १९८३ रोजी सुरू झाला होता आणि ५ मे रोजी केशवराव हे जग सोडून गेले. मधुमेहाचा आणि ह्र्दयविकाराचा आजार त्यांना जडला होता. परंतु त्यांच्या अविरत काम करत राहाण्याच्या सवयीमुळे आणि एकापाठोपाठ एक नवनव्या योजना, नवनवे प्रकल्प हाती घेण्याच्या आणि मार्गी लावण्याच्या स्वभावामुळे त्यांच्या आजाराची तीव्रता इतर कोणाला किंवा त्याना स्वत:लाही कितपत जाणवली होती, हे सांगणे कठीण आहे. साठीचा कार्यक्रम होण्याआधीच मृत्यूने त्यांना गाठले.
त्यांच्या साठीच्या निमित्ताने दहा हजार रूपयांचे एक ग्रंथपारितोषिक ठेवावे असे त्यांचा मुलगा अशोक कोठावळे याच्या मनात होते असा उल्लेख जयवंत दळवी यांनी केशवराव गेल्यानंतर त्यांच्यासंबंधी जो लेख लिहिला त्यात केलेला आहे. केशवराव असते तर या ग्रंथपारितोषिकाचे स्वरूप अंतिमत: कोणत्या प्रकारचे झाले असते, त्याची व्यवस्था कशा प्रकारे केली गेली असती, हे आज सांगणे अवघड आहे. परंतु केशवरावांचे देहावसान झाल्यामुळे केशवराव कोठावळे ग्रंथ पारितोषिकाची योजना त्वरेने मार्गी लागली. आणि ५ मे १९८५ रोजी केशवरावांच्या स्मृतीदिनी अकरा हजार एकशे रुपयांचे पहिले पारितोषिक मी एस. एम. या ग्रंथास दिले गेले. जे पारितोषिक केशवरावांच्या हयातीत त्यांच्या गौरवार्थ दिले जावयाचे ते त्यांच्या स्मृतीदिनी देण्याचा प्रसंग आला. तेव्हापासून आजपर्यंत ही योजना अखंडपणे चालू आहे. २००९ हे या योजनेचे पंचविसावे वर्ष.
पंचवीस वर्षातील पंचवीस पुस्तकांवरील पंचवीस लेख, या पुस्तकात एकत्रित वाचता येतील. सर्व पुस्तके वेगवेगळ्या प्रकृतीधर्माच्या लेखकांच्या प्रतिभाशक्तीचा रूपसंपन्न आविष्कार घडवणारी आहेत. यापैकी प्रत्येक पुस्तक अंतर्बाह्य स्वरूपात स्वतंत्र गुणवैशिष्ट्यांनी समृद्ध आहे. अंतरंग सामर्थ्यामुळे खोलवर नेणारे आहे आणि आशयव्याप्तीमुळे मराठी साहित्याचे क्षेत्र विस्तारणारे आहे. वाचकांची वैचारिकता, तर्कशक्ती, सामाजिक जाणीव, मानसिकता, भावनिकता यांना आवाहन करणारे आहे.
विलास खोले

एडिटर्स चॉईस

एडिटर्स चॉईस


कुमार केतकर


नवचैतन्य प्रकाशन, पृष्ठे : २४८, मूल्य : २४० रुपये



एक न संपणारा प्रवास

ब-याच वर्षांपूर्वी ज्यूलिया नावाचा एक चित्रपट पाहिला होता. चित्रपटाची कथा लिलियन हेलमन या प्रसिध्द लेखिकेच्या आत्मकथनावर आधारलेली. कथेचा काळ १९३२ ते १९३८ चा. कथानक घडते नाझी जर्मनीत. हिटलरी उन्माद सर्वत्र व्यापून राहिलेला. ज्यू विद्यार्थी, प्राध्यापक, लेखक, कवी आणि त्यांच्याबरोबरच उदारमतवादी जर्मन विचारवंत, समाजवादी आणि कम्युनिस्ट कार्यकर्ते यांना वेचून वेचून तुरुंगात टाकले जात होते. ज्यू वस्त्यांवर हल्ले होत होते. रस्त्या रस्त्यावर भीतीचे साम्राज्य होते. ज्यूलियावर देश सोडून जाण्याचा प्रसंग येतो. ती बर्लिनहून रेल्वेने निघते, पण नाझी पहा-यातून सहीसलामत मॉस्कोपर्यंत पोचू का नाही, याची तिला शाश्वती नसते. स्वकीयांना नाझी राक्षसांच्या विळख्यात सोडून तिला तसे जाणे अपरिहार्य असते. कम्युनिस्ट रशिया हा त्या वेळेस नाझींचा मुख्य शत्रू. युरोप-अमेरिकेतील भांडवली सत्ताधा-यांची नाझी राजवटीला सुप्त सहानुभूती असल्यामुळे ज्यूलियाला मॉस्को हे एकच आश्रयस्थान होते. तो चित्रपट पाहिल्यापासून माझ्या मनात ज्यूलियाचा बर्लिन-मॉस्को प्रवास घर करून बसला होता. आपण कधी ना कधी तो प्रवास त्याच मार्गाने करायचा मी ठरवले होते.

त्यानंतर काही वर्षांनी मेरी मॉरिस या एका तरुण पत्रकार-लेखिकेने लिहिलेले वॉल टू वॉल हे पुस्तक वाचनात आले. बर्लिन वॉल ते चीनची ग्रेट वॉल असा प्रवास तिने रेल्वेने केला होता. त्या प्रवासाची ती राजकीय आणि चित्तथरारक कथा वाचूनही मी प्रभावित झालो होतो. खरे तर तिचा बर्लिन वॉलपासूनचा प्रवास हा बर्लिनची भिंत पडल्यानंतर ( १९८९) तीन वर्षांनी सुरू होतो. ज्या वर्षी बर्लिनची भिंत पडली त्याच वर्षी बीजिंग येथे चिनी सैन्याने विद्यार्थ्यांचे बंड रणगाड्यांच्या दहशतीने मोडून काढले होते. म्हणजेच तिचा रेल्वेप्रवास शीतयुध्द संपल्यानंतर आणि आधुनिक चीनची भांडवली दिशा अधिक सुस्पष्ट झाल्यावर सुरू होतो. मेरी मॉरिसही रशिया आणि रशियातून चीनला रेल्वेने गेली आहे. ती बर्लिनहून ज्या रशियाला जाते तो रशियाही कम्युनिस्ट नव्हे. सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतरचा रशिया. तिचे पुस्तक वाचल्यानंतर माझा त्या मार्गाने प्रवास करायचा निर्धार अधिकच बळावत गेला.

रेल्वे प्रवासाचे तसे आकर्षण मला आहेच. विमानाने माणूस एका ठिकाणाहून दुसरीकडे अतिशय वेगाने जातो; पण त्याचा सर्वार्थाने भूमीशी व लोकांशी संपर्क तुटलेला असतो. विमानातील सहप्रवासी अठरा देशांचे अठरापगड. खिडकीतून दिसते ते केवळ अथांग आकाश आणि वेळी-अवेळी होणारे सूर्योदय-सूर्यास्त. एखाद्या देशाशी आणि तेथील लोकांशी खरी ओळख व्हायची असेल तर रेल्वे प्रवासाला पर्याय नाही. मग तो प्रवास कोकण रेल्वेचा असो वा पूर्वांचलात नेणा-या गोहत्ती एक्सप्रेसचा असो. जवळ जवळ सर्वांची रेल्वे प्रवासाची आठवण नेहेमीच रसरशीत असते. विमान प्रवासात तुलनेने नाट्य कमी, अनुभव अगदी मर्यादित आणि निसर्गाचे बदलते चेहेरे आणि मूडही थोडे. रेल्वे प्रवासाने झपाटलेले अनेक लेखक आहेत. पॉल थुरो, जॅन मॉरिस, पिको अयर, दिलीप हिरो असे बरेच जण. अगाथा ख्रिस्तीच्या मर्डर ऑन द ओरिएंट एक्सप्रेसमध्ये (पुढे तो चित्रपटही झाला) रेल्वे प्रवासाबरोबरच रहस्यकथाही उलगडत जाते. अलीकडेच टाइम साप्ताहिकानेही एक रेल्वे प्रवासाचा विलक्षण अनुभवसंपन्न विशेषांक प्रसिध्द केला होता.

एका परिषदेच्या निमित्तानं मला जिनिव्हा येथे जाण्याचा प्रसंग आला तेव्हा परिषदेनंतर (स्वखर्चाने) मी जिनिव्हा म्युनिक-हॅंबर्ग-वॉर्सा-व्हिलनिएस-किव्ह-मॉस्को (म्हणजे स्वित्झर्लंड-जर्मनी-पोलंड-लिथुआनिया-युक्रेन-रशिया) असा माझा मार्ग मुक्रर केला. त्यानंतर मी असे अनेक दीर्घ रेल्वे प्रवास केले. हॉंगकॉंग ते बीजिंग ( जेव्हा हॉंगकॉंग चीनमध्ये नव्हते तेव्हा), हॅनाय ते सायगाव (उर्फ होचिमिन्ह शहर), न्यूयॉर्क ते सॅनफ्रॅन्सिस्को, ब्रिटीश-फ्रेंचांच्या समुद्राखालच्या भल्या मोठ्या बोगद्यातून, जर्मनीच्या एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत इत्यादी. त्या प्रवासात मला जी माणसे भेटली त्यांची नावे-गावे माझ्याकडे नाहीत. आता चेहेरेही विस्मृतीत गेले आहेत. पण त्यांचा सहवास मात्र अगदी ठळकपणे माझ्या मनावर कोरला गेला आहे.

माझ्या त्या रेल्वे प्रवासांमुळे माझे मनोविश्व विस्तारले. गाडीत बसल्यानंतर क्षितिज दूरदूर जाऊ लागले तसेच काहीसे माझ्या मनाचेही झाले. तरी माझे मन विशालही झाले. गैरसमज- मग ते धर्माचे असोत वा देशाचे, भाषेचे वा संस्कृतीचे- कोसळून पडले. आपण एकाच ग्रहावरची माणसे असूनही किती भिन्न तसेच किती समान आहोत याचे नवे भान आले.

आजही मी त्या दूरदूर जाणा-या क्षितिजापर्यंत जायचा प्रयत्न करत असतो.

एका स्टुडिओचे आत्मवृत्त

एका स्टुडिओचे आत्मवृत्त

प्रभाकर पेंढारकर

राजेंद्र प्रकाशन, पृष्ठे : १९८, मूल्य : ३५० रुपये

दाहक पर्व


आज तारीख आहे ३० जानेवारी. हे साल आहे १९४८.
स्टुडिओत इतर दिवसांसारखा हा एक दिवस. आणि दुपारी बातमी आली. महात्मा गांधींची दिल्लीत हत्या झाली. ती कोणी केली ते समजलच नव्हतं.
पण सारा देश हादरून गेला.
तसाच दुसरा दिवस उजाडला. त्या भयानक बातमीनं अद्यापही देश बधीर झाल्यासारखा. आणि मग बातमी आली. ही हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका स्वयंसेवकानं केली. हा पुण्यात राहणारा. ब्राह्मण. त्याला तेथेच पकडले होते. त्याची चौकशी होईल. त्याला शिक्षा होईल. पण आपण काही केले पाहिजे. या संघाला धडा शिकवला पाहिजे. ब्राह्मणांवर सूड उगवला पाहिजे. अशी कोल्हापुरात जागोजागी बोलणी होत होती.
दुकाने बंद होती. सर्व बाजार बंद होता. रस्त्यातून हिंडणारे लोक स्टुडिओच्या समोर आले. फाटक बंद होते. ते उघडून आत आले. आणि पाहता पाहता हा जमाव वाढतच गेला. स्टुडिओचा परिसर या सूड घ्यायला आलेल्या माणसांनी भरून गेला. मी पाहतच राहिलो. आता काय होणार याची मला कल्पना येईना. हे लोक कोण आहेत? गांधीभक्त? त्यांच्या पक्षाचे? त्यांच्या विचारांचे?
हा सूड घ्यायचा म्हणजे गांधीजींची हत्या करणा-यांचा नि:पात करायचा. मग हा स्टुडिओ त्यातलाच एक! तो फोडला पाहिजे. बंद दारांना कुलुपे होती. ती काढण्याऐवजी दारेच फोडूया. दगड, काठ्या हाती सापडेल त्याने दारे फोडली गेली. जमाव आत घुसला. कॅमेरा विभागात शिरला. ध्वनीमुद्रण विभागात घुसला. रंगभूषा आणि वेषभूषा, सुतार खातं, आणि मोल्डिंग खातं आणि पुढं काय करायचं? लूट-लुटालूट! ज्याला जे हवं ते उचलावं. या स्टुडिओला ओरबाडून घ्यावं. कोण विचारणार आहे? एकही वस्तू इथं राहता कामा नये.
स्टुडिओतून बाहेर काढता येईल अशी एक गोष्ट होती, मुंबईतून अलीकडेच आणलेला रेकॉर्डिंग ट्रक. आर.ए.सी. कंपनीची अद्ययावत मशिनरी बसवलेला हा ट्रक बाहेर काढता येईल. तो वाचवता येईल. लॅबोरेटरीत काम करणारे सावंत, ट्रकमध्ये चढले. त्यांनी ट्रक सुरु केला. स्टुडिओच्या फाटकाकडे सावंत तो नेऊ लागले, तसे दोन तीनशे लोक ट्रकसमोर आले. ट्रक पुढे नेणं अशक्य झालं.
"कोठे घेऊन चालला आहेस?"
"विचारता कशाला? ओढा त्याला बाहेर!"
"खेचा, मारा त्याला!"
आणि सावंतना जमावाने खाली खेचले. दोन थोबाडीत दिल्या. बाजूला फेकून दिले. जमाव ट्रककडे वळला. ट्रकच्या काचा फोडल्या. दारे उखडली. आणि आतल्या लक्षावधी रुपयांच्या मशिनरीवर दगड घातले. कधी तोंडातून आवाज निघू नये अशी त्या ध्वनीमुद्रण मशिनची अवस्था करून टाकली.
पण या कॅमे-याचं काय करायचं? एवढा जड आणि बोजड पेटीसारखा हा कॅमेरा न्यायचा तरी कसा? तो इथेच फोडा आणि ध्वनीमुद्रणाची ही यंत्रं? ती येथून काढता येणं कठीण आहे. मग आहे तेथेच तोडा, फोडा, उध्वस्त करा.
आणि सुतार खात्यातले हे रथ - कर्ण पिक्चरच्या वेळी तयार केलेले, त्यातून आपल्याला थोडेच हिंडता येणार आहे? ते फोडा. तोडा. ते तर लाकडाचे, इथेच ते पेटवून द्या.
आणि कौरव पांडवांचे मौल्यवान पोशाख, त्यांची किंमती आभूषणे... त्यांचा आपल्याला काय उपयोग? तेव्हा ते पेटवा. त्यांची होळी करा. आणि हजारो सैनिकांची वस्त्रे-ती तेथेच पेटवली गेली. जे नेता येणार नाही, जे आज आपल्याला उपयोगी नाही ते सर्व पेटवून दिलं गेलं.
मी प्रथम फक्त पाहात होतो.
पण पेटत्या ज्वालांचे चटके मला जसे बसू लागले तसा मी कळवळलो. ते मला फक्त विद्रुप करणार नाहीत, कफल्लक आणि दरिद्री करणार नाहीत तर त्यांना मला जिवंत जाळायचे आहे. माणसे पहिल्या आघाताने बेशुध्द होतात. अधिक हाल झाले तर मरतात. मृत्यू माणसाला केवढे मोठे वरदान. सर्व दु:खांचा, यातनांचा शेवट. स्टुडिओलाही मृत्यू असतो काय? मला तो येणार आहे काय? आता? इथं?

- आता लोक जेथे चित्रीकरण होई त्या स्टुडिओत घुसले. स्टुडिओत सेट मांडण्यासाठी कापडाची आणि लाकडाची फलाटे - ज्यातून राजमहाल, दरबार आणि विविध देखावे तयार केले जात ती सर्व सामुग्री, त्यावर रॉकेल ओतण्यात आले. त्यांनी तर क्षणात पेट घेतला. इथल्या दोन्ही स्टुडिओंना खिडक्या नाहीत. धूर आणि धग आतच कोंदटली. लोक बाहेर पडले. ही प्रचंड होळी पाहू लागले.
ज्यांच्यावर स्टुडिओ उभे केले होते, ते लोखंडी गर्डर्स तापून लाल झाले. छताशी लाईट चढवण्यासाठी लाकडी पायाडे होती. फळ्या होत्या. लाईटस होते. गेल्या वीस-पंचवीस वर्षात इथे तयार झालेली सामुग्री, सगळेच धगधगू लागले आणि कल्पनाही नव्हती अशी भयानक गोष्ट घडली. हे गर्डर्स उष्णतेने वाकले. जमिनीशी त्यांना रोवून ठेवणारे मोठाले स्क्रू वितळले, उखडले गेले आणि प्रचंड मोठा आवाज होऊन स्टुडिओ कोसळला. ही भलीमोठी इमारत आतल्या आत निर्माण झालेल्या पोकळीच्या विलक्षण शक्तीनं खेचून घेतली. त्याचा कानठळ्या बसवणारा आवाज झाला-

जेव्हा जाळण्याजोगं, विध्वंस करण्याजोगं काहीच उरलं नाही, धगधगत्या सामानाची राख झाली तेव्हा ही माणसं तिथून निघाली. विजयाचा, सूडाचा उन्माद त्यांच्या चेह-यावर होता. त्यांना अडवण्याचे, थांबवण्याचे पोलीस आणि सरकारी यंत्रणांनी प्रयत्नही केले नव्हते. आता इथं करण्याजोगं काहीच राहीलं नव्हतं. अद्यापही धगधगती यंत्रसामुग्री आणि जागोजागी राखेचे ढीग... त्याबरोबर एकाकी असलेला मी!

एका तेलियाने

एका तेलियाने


गिरीश कुबेर


राजहंस प्रकाशन, पृष्ठे : २४८, मूल्य : २०० रुपये


१९८५ च्या उत्तरार्धात सौदीनं इंग्लंड आणि अमेरिकेबरोबर दोन भले मोठे बार्टर डील्स ठरवले। इंग्लंबरोबरच्या व्यवहारात तेलाच्या बदल्यात सौदीला तब्बल १३२ लष्करी विमानं, १२ पाणसुरूंगविरोधी बोटी, ३६ हॉक जातीची लढाऊ विमानं आणि प्रशिक्षणासाठीची २४ विमानं दिली जाणार होती. या सगळ्या व्यवहारातलं साधारण ४०० कोटी पौंडाचं बिल तेलाच्या रूपात दिलं जाणार होतं. दुस-या अशाच एका व्यवहारात अमेरिकेकडून सौदी एकाच फटक्यात दहा बोईंग ७४७.३०० ही अलिशान विमानं घेणार होता. तीही शक्तिशाली अशी रोल्स रॉईसचं इंजिन असलेली. या व्यवहाराचा नक्की आकार गुलदस्त्यात होता. पण दोन्हींच्या बदल्यात सौदी तेवढ्या किंमतीचं तेल अमेरिकेला देणार होता.



वरकरणी यात वावगं किंवा हरकत घेण्यासारखं काही नव्हतं. पण यामानींना यात वेगळा वास आला. त्यांनी अधिक चौकशी केली. त्यात धक्कादायक माहिती पुढे आली. ती म्हणजे इंग्लंडबरोबरच्या व्यवहारात राजे फहाद यांच्या मुलाला १५ टक्के मलिदा मिळणार होता. म्हणजे जवळपास ६० कोटी पौंड. आणि बोईंगकडून १० कोटी पौंड आणि वर एक भेट. अत्यंत श्रीमंती, जणू तरंगता राजवादाच वाटावा, अशी एक बोट बोईंगतर्फे या राजपुत्राला भेट दिली जाणार होती. पण राजे फाहद यांना त्याचं काहीच वाटत नव्हतं. त्यांनी यामानींना सांगितलं, " आपले तेलाचे नळ जरा जास्त उघडा. तेलाचं उत्पादन जोमानं करा आणि ते अतिरिक्त तेल द्या इंग्लंडला पाठवून... आहे काय नि नाही काय!" याबरोबरच यामानींसाठी स्पष्ट सूचना होती, " यातलं काहीही "ओपेक"ला सांगू नका म्हणजे झालं."

हे भीषण होतं. वास्तविक सौदी राजकारणात आणि सत्तेत इतका काळ घालवलेल्या यामानींना लाच, दलाली माहीत नव्हती, असं नाही. अनेक व्यवहारात सौदी राजघराण्यानं मोठमोठी दलाली खाल्ली होती. अनेकदा मोठमोठी कामं राजाच्या गोतावळ्यातल्याच कुणाकुणाला दिली गेली होती. अनेकांनी यासाठी बनावट कंपन्या काढल्या होत्या... हे सगळं यामानींच्या डोळ्यादेखतच चाललं होतं. पण आताचा मामला वेगळा होता. पहिल्यांदाच सौदी सरकार आपल्या देशाला मिळालेला नैसर्गिक प्रसाद असा चोरट्यासारखा विकणार होतं आणि त्यातली गंभीर बाब अशी की, या व्यवहारातून येणारी एक कपर्दिकही देशाच्या खजिन्यात जाणार नव्हती. यामानींचा विरोध होता तो याला. त्याचबरोबर या व्यवहाराचा दुसरा धोका होता. अन्य कोणालाही न सांगता सौदी या व्यवहारासाठी जवळपास सहा कोटी बॅरल्स इतकं तेल ओतणार होता. कुठलाही हिशेब न लागता इतकं प्रचंड तेल जगाच्या बाजारात आल्यामुळे तेलाचे भाव आणखी कोसळणार होते आणि इतरांना त्याचा फटका बसणार होता. त्यामुळे मंदीची लाट अधिकच चेवणार होती. हे वाईट होतं. एका कुटुंबाच्या फायद्यासाठी इतक्या सगळ्यांना संकटात टाकणं यामानींना मान्य नव्हतं. देशाचं इमान विकणं त्यांना पटणारं नव्हतं.

त्यांनी या सगळ्याला विरोध केला. कोणत्याही देशात सर्वसत्ताधीशाला मोडता घालायचा, तर मोठी छाती आणि शुभ्र चारित्र्य लागतं. राजाच्या विरोधात असं उभं राहाणं कुठेच सोपं नसतं. सौदीसारख्या देशात तर नाहीच नाही. हे करताना यामानींची कुठेही भूमिका आपण काही जगावेगळं करतोय, अशी नव्हती. एरवी त्याग करणा-यांना खूप दर्प येतो. नकोसा होतो तो. पण यामानींचं म्हणणं साधं होतं. जगाच्या तेलबाजाराचा तराजू सौदीच्या वाळूत दडलाय. तेल असलेल्या आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे तेल नसलेल्यांच्या हिताचं रक्षण करणं, ही आपली जबाबदारी आहे. आसपासची बेजबाबदार मंडळी डोक्यावरचं कमरेला नेसू लागली म्हणून आपणही तसच करायचं नसतं.
....पण हे सगळं शहाणपण वाळू ओली करण्यासारखं होतं. ओल दिसते, पण ओलावा नसतो.

तेलाची घसरण चालूच होती. यामानी ती रोखण्यासाठी जाणूनबुजून काही करत नाहीयेत, असं राजघराण्यातल्यांना वाटत होतं. त्यातून १९८६ सालच्या ऑक्टोबर महिन्यात जिनिव्हात ओपेकची बैठक भरली. त्यासाठी जावं की न जावं, हे यामानींना कळत नव्ह्तं. पण अजून तरी ते सौदीचे तेलमंत्री होते. तेव्हा जाणं भाग होतं. ते बैठकीला गेले. पुन्हा तेच, चर्चेचं दळण. त्यातून काहीही निष्पन्न न होणं. मतभेद. वादविवाद आणि आरोप प्रत्यारोप. जवळपास आठवडा झाला. तरी चर्चा तिथेच. शेवटी राजे फाहद यांनी ही कोंडी फोडायची ठरवलं. त्यांच्या मनात आता इतर देशांनाही धडा शिकवायची खुमखुमी दाटून आली. त्यांनी रियाधमधून जिनिव्हात असलेल्या यामानींना आदेश दिला. तेलाचे भाव १८ डॉलर्सवर स्थिर ठेवायचे आणि सौदीला तेलकोट्यातून मुक्त करायचं. सौदीला हवं तेवढं तेल काढायची मुभा ओपेकनं द्यायची.

"जमणार नाही," यामानींनी थंडपणे आपल्या राजाला सांगितलं.

दुस-याच दिवशी राजे फाहद यांच्या शाही सही-शिक्क्यानिशी यामानींच्या नावे ओपेक कार्यालयात याबाबतचा आदेश आला. दस्तुरखुद्द राजाचा फॅक्स होता. आपल्या मंत्र्यांनी काय करावं, याचा आदेश देणारा. पण यामानी बधायला तयार नव्हते. त्या दिवशीच्या बैठकीत इराणचे मंत्री जाहीरपणे म्हणाले, " सौदी राजाला कसलीही ताकद नाही... त्यांचा मंत्रीच त्यांचं ऐकत नाही." यामानींनी यावरही काही प्रतिक्रिया दिली नाही. पण एवढं मात्र त्यांना मनोमन कळून चुकलं की पुढल्या ओपेक बैठकीला यायचा प्रसंग आपल्यावर येणार नाही. रियाधमधून राजे फाहद यांची भुणभुण सुरूच होती. त्यावर आता यामानींनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी राजाला स्वच्छ सांगितलं, " जे काही तुम्हाला करायचय, ते मी जरूर करीन. पण त्याबाबतच्या कोणत्याही करारावर वा कागदपत्रावर माझी स्वाक्षरी असणार नाही. हा सगळा व्यवहार तुम्ही तुमच्या सहीनं करा."

फाहद यांना हे अपेक्षित नव्हतं. आपला मंत्री आपल्या इतका विरोधात जाईल. याचा अंदाज त्यांना आला नाही. परिस्थिती इतकी ताणली गेल्यानंतर काही मार्ग सापडणं शक्य नव्हतच. बैठकीचाही बो-या वाजला. २२ ऑक्टोबरला ओपेकची आणखी एक अपयशी बैठक सरली. यामानी परत आले. आल्यावर ते रिवाज चुकले नाहीत. राजाला भेटून आपला सलाम अदा केला. रितीप्रमाणे सगळा अहवाल सादर केला. त्यानंतर आठवडाभरात दोनदा त्यांची राजाशी भेट झाली, पण सगळ्यांनाच जाणवत होतं. त्यात ओलावा नाही. मृतदेहाचा थंडावा आहे. पण जिवंत ओलावा नाही.

यामानी आता शिणले होते. जराही पुढे न सरणा-या या खेळाचा त्यांना आता कंटाळा आला होता. त्या दिवशी संध्याकाळी विरंगुळा म्हणून मित्रांकडे पत्त्याचा डाव मांडला, पण त्यातही पानं मनासारखी येत नव्हती. हुकमाचा पत्ता चुकत होता. डावामागून डाव हरत होते ते. पराभावाचं चक्र मोडावं म्हणून मित्रानं सहज टीव्ही लावला. बातम्या सुरू होत्या. त्या मध्येच थांबवून राजकीय आदेश वाचून दाखवला गेला.

यामानींना तेलमंत्रीपदावरून काढून टाकण्यात आलं होतं.

हे असं काही होईल, असं अनेकांना वाटत होतंच. त्यामुळे ज्यांना यातलं काहीच माहीत नव्हतं, अशांना या बातमीचा धक्का बसला. यामानी मात्र शांत होते. ही घटना घडल्यावर जणू दुस-याच कुणाच्या तरी बाबतीत आपण काही ऐकतोय, असा यामानींचा चेहरा होता. त्यांची प्रतिक्रिया होती फक्त एक मोठा नि:श्वास. पण तोही छातीवरनं कसलं तरी वजन, दडपण दूर झाल्यासारखा. मोठ्या काळजीतून दूर झाल्यावर एखाद्याची भावना व्यक्त होते, तशीच यामानींची प्रतिक्रिया होती.

एका क्षणात ते सगळं त्यांनी झटकून टाकलं.
मित्राला सांगितलं, पत्ते पीस.
खेळ नव्यानं सुरू झाला.
आणि डाव त्यांच्या मनासारखा पडायला लागला.
ते जिंकायला लागले.