Friday 14 May 2010

...आणि दोन हात

...आणि दोन हात


डॉ. वि.ना. श्रीखंडे


पॉप्युलर प्रकाशन, पृष्ठे : ३५८, मूल्य : ३२५ रूपये


माझ्या आयुष्यातील मोठी अडचण व दु:ख म्हणजे तोतरेपणाचं व्यंग. न अडखळता बोलता येणं ही किती मोठी देणगी आहे याची जाणीव मला रोज येते. मुंबईला आलो तेव्हा ट्राम, बस किंवा रेल्वे स्टेशनवर तिकिट मागणं म्हणजे पोटात गोळा उभा राहायचा. काही विशिष्ट शब्दांना मी अडखळतो... ते टाळण्याकरता मी भलत्याच स्टॉपची तिकिटे खरेदी केली आहेत. तोंडी परीक्षेत गुण कमी मिळायचे. उत्तर माहीत असून शब्द बाहेर पडायला वेळ लागायचा. चर्चेत भाग घेता येत नाही, गोष्टी-विनोद सांगता येत नाहीत, स्टेजवर बोलणं अशक्य. नीट सुरू न होणार्या किंवा वाहतुकीच्या मार्गावर पुन्हा पुन्हा बंद पडणार्‍या मोटारगाडीच्या ड्रायव्हरला जसं लाजल्यासारखं होतं, तसं मला रोज व्हायचं.
माझी चेष्टा खूप चालायची. मनामध्ये आलेले विचार योग्य वेळी व्यक्त करता येत नाहीत याचा किती मोठा अडसर असतो, हे फक्त व्यंग असलेल्या माणसालाच कळतं. आपले सर्व व्यवहार चालतात, ते बोलण्याच्या माध्यमातून आणि हे माध्यमच पंगू असेल तर बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवणं अतिशय कठीण व काही प्रसंगी अशक्य होतं. एमबीबीएसच्या परीक्षेत उत्तर देताना मला त्रास झाला त्याबद्दल परीक्षकांनी चेष्टादेखील केली व महत्वाच्या सर्जरी विषयामध्ये गुण कमी मिळाले. पण लेखी परीक्षेत उत्तम गुण मिळाल्याने कशीबशी सर्जरीची पोस्ट मिळू शकली.
मला कित्येक वर्षांनंतर परीक्षक झाल्यानंतर कळलं की, बोलण्यामध्ये दोष असलेल्या विद्यार्थ्याला परदेशात खास सवलती असतात. हा त्यांचा हक्क आहे. आंधळ्या माणसाला काठी लागते, बहिर्‍याला कानयंत्र लागतं, पायाला मार लागला असेल तर बॅट्समनला रनर देतात. त्यांच्याकडे समाज थोडा सहानुभूतीनं बघतो. हा फायदा, ही संधी मात्र बोलताना अडखळणार्‍या व्यक्तीला विशेष मिळत नाही. बसमध्ये तिकिट मागताना, रेल्वेचं तिकिट काढटाना, फोनवर बोलताना, मुलाखतीच्या वेळी नीट बोलता येत नाही हा एक मोठा शाप असतो.
अशा परिस्थितीत मी डॉक्टर झालो, इंग्लंडला गेलो, आणि मला जो फरक मोठा फरक जाणवला तो म्हणजे माझ्या चार वर्षांच्या वास्तव्यात माझ्या व्यंगाबद्दल कुणी एक चकार शब्द काढला नाही किंवा कुठल्याही व्यक्तीचे हावभाव बदलले नाहीत. हा इंग्लिश समाज इतका समंजस आणि संवेदनशील कसा? त्यांच्याकडे देखील खूप विनोद असतात. पण त्यांचे विनोद कुठल्याही व्यक्तीच्या व्यंगावर आधारलेले नसतात, हीच त्यांची सहिष्णुता.
मी बोलण्यामध्ये दोष असूनसुध्दा व्याखान द्यायला कशी सुरुवात केली - टर्निंग पॉईंट- याचा मुद्दाम उल्लेख केला पाहिजे. मी एकदा बिर्ला मातोश्री सभागृहामध्ये चर्चासत्राला गेलो होतो. मुंबईतील सहा सर्जन्सनी व्याखाने दिली. अध्यक्ष म्हणून भारतामध्ये नावाजलेले सर्जन डॉ. बालिगा होते. शेवटी त्यांचं भाषण झालं. ते फक्त आठ किंवा दहा मिनिटं बोलले आसवे. परंतु इतकं सुंदर व्याखान मी कधीही ऐकलं नव्हतं. मी भारावून गेलो. त्याच दिवशी यश मिळवण्याकरता चांगलं बोलता आलं पाहिजे हे ठरवलं.
इंग्लंडमध्ये १९५९ साली मी ज्या हॉस्पिटलमध्ये काम केलं होतं, त्याच ठिकाणी १९७३ मध्ये माझं व्याखान आयोजित करण्यात आलं होतं. चौदा वर्षांपूर्वी मी ज्या सर्जनच्या हाताखाली काम केलं, त्यांचा माझ्या बोलण्यावर विश्वासच बसेना. ते मला इतकच म्हणाले की, I never knew you can talk so well. You should start a school for public speaking, like Dale Carnegie.

No comments:

Post a Comment