Friday 14 May 2010

बाईमाणूस

बाईमाणूस : करूणा गोखले

राजहंस प्रकाशन


पृष्ठे : २२४, मूल्य : २५० रुपये

स्त्रीदेह
स्त्रीचे शरीर या विषयावर स्त्रीमुक्तीवादात जेवढे लेखन झाले तेवढे क्वचितच झाले असेल. याचे एक कारण म्हणजे स्त्रीच्या शरीरावर स्त्रीदास्याच्या समर्थकांनी विपुल लेखन करून ठेवले आहे. अगदी ऍरिस्टॉटलपासून ते भर्तृहरी आणि बायबलपर्यंत सर्वांनी आपापल्या परीने स्त्रीदेहाची नालस्ती केली आहे. स्त्रीची निर्भर्त्सना ही स्त्रीदेहाच्या निर्भर्त्सनेपासून सुरू होते. या निर्भर्त्सनेला कुठलाही पाया नाही. पददलित वर्गाच्या सदस्यांची नालस्ती करण्यासाठी तो लागतही नाही. कृष्णवर्णियांची बुद्धिमत्ता हा सुद्धा गेल्या अनेक शतकांपासून निर्भर्त्सनेचाच विषय आहे. कारण जगात सर्वत्र कृष्णवर्णीय पददलितांचेच जिणॆ जगत आहेत. जे कृष्णवर्णियांचे तेच स्त्रियांचे पण. पृथ्वीच्या पाठीवर प्रत्येक संस्कृतीत स्त्रीचा दर्जा उत्तम असल्यामुळे प्रत्येक संस्कृतीने स्त्रीची बुद्धी, स्त्रीचे चारित्र्य आणि स्त्रीचे शरीर यांविषयी हेटाळणीचा सूर लावला आहे.
Man is a rational being. (माणूस तर्कनिष्ठ प्राणी आहे) असे म्हणणा-या ऍरिस्टॉटलने स्वत: मात्र स्त्रीच्या शरीराविषयी अत्यंत तर्कदुष्ट विधाने केली आहेत. स्त्रीच्या शरीरात पुरुषापेक्षा हाडे कमी असतात, स्त्रीच्या जबड्यात दात कमी असतात, ही विधाने केवळ ऍरिस्टॉटलने केल्यामुळे अनेक शतके ग्राह्य मानली गेली. माणसाच्या तर्कबुद्धीचा आदर करणा-या ऍरिस्टॉटलने कुठल्याही दहा प्रौढ स्त्री-पुरुषांचे जबडे उघडून दात मोजले असते, तरी त्याला आपले विधान मागे घ्यावे लागले असते. परंतु स्त्रीविषयी बोलताना सत्यांशाची अट ऍरिस्टॉटलच्या काळात पाळत नसावेत. सेंट थॉमसने स्त्री देहाला पुरुषाच्या शरीराची बिघडलेली आवृत्ती म्हटले. जे शरीर नऊ महिने गर्भाचे भरणपोषण करते आणि मानवी वंश पुढे सुरू ठेवते ते बिघडलेले कसे असू शकेल, असे आव्हान कुणी त्याला दिले नाही. एकंदरीतच अनादिकालापासून स्त्रीच्या शरीराविषयी कुठल्याही ठोस पुराव्याशिवाय बेधडक विधाने करण्याचा पायंडाच आहे. अगदी विसाव्या शतकातही ‘स्त्रीचा मेंदू हा पुरुषाच्या मेंदूपेक्षा लहान असतो, म्हणून स्त्री पुरुषापेक्षा बुद्धीने कमी असते,’ हे एक जीवशास्त्रीय सत्य म्हणून समाजाच्या गळी उतरवण्याचे बरेच प्रयत्न झाले. परंतु शरीराच्या वजनाच्या प्रमाणात मेंदूचे वजन घेतले तर ते पुरुषांमध्येच कमी असते, हे दुसरे जीवशास्त्रीय सत्य शरीरशास्त्राच्या जाणकारांनी अधोरेखित करून स्त्रीच्या बुद्धीविषयीच्या वरील निष्कर्षास आव्हान दिले.
पुरुषाच्या शारीर वैशिष्ट्यांना प्रमाणभूत मानल्यामुळे पुरुषाचे शरीर हा नियम आणि स्त्रीचे शरीर म्हणजे नियमभंग किंवा नियमास अपवाद हा विचार खूप खोल रुजला. इतका खोल की अगदी एकविसाव्या शतकातही तो झटकून टाकता येत नाही. शरीरशास्त्राचा गाढा अभ्यास असलेले डॉक्टरही नकळत हा प्रमाद करतात. एकदा एका अमेरिकन लेखिकेला कसल्याशा संशोधनासाठी ४०-५० वर्षे या वयोगटातील व्यक्तींचे निरोगी ह्रुदयांचे इसीजी बघायचे होते. त्यासाठी ती एका ह्रुदयरोग तज्ञाकडे गेली. या तज्ञाने तिला मदत करायचे आनंदाने मान्य केले व त्याच्याकडील इसीजीचा गठ्ठा बाहेर काढला. इसीजीची एक एक प्रत तिच्या हातात देत माहिती सांगताना तो अधून मधून काही इसीजी बाजूला काढून ठेवत होता. त्यावर ‘हे इसीजी आजारी व्यक्तींचे आहेत का?’ असे लेखिकेने विचारल्यावर तो अगदी सहजपणे म्हणाला, ‘ नाही नाही पण ते बायकांचे आहेत.’ पुरुषांच्या ह्रुदयाचे कार्य हा निसर्गनियम असून कुठल्याही प्रकारच्या अभ्यासाला पुरुषाचेच ह्रुदयच ग्राह्य असणार, बाईचे ह्रुदय म्हणजे काहीतरी तात्कालिक, प्रसंगोपात वैविध्य होय हा समज ह्रुदयरोग तज्ञाच्याही डोक्यातून जात नाही यावरून स्त्रीदेहाबाबतीतील बुद्धिभेद किती सखोल आहे, हे लक्षात येतं.
स्त्रीच्या शारीरिक शक्तीचे मूल्यमापनही पुरुषाच्या शरीराच्या तुलनेत झाल्यामुळे स्त्रीवर अबला हा शिक्का कायम बसला. ज्या काळात यंत्रे नव्हती, सर्व अवजड कामे माणसाला शारीरिक शक्तीच्या जोरावर करावी लागत होती, त्या काळी स्नायूंमधील ताकद, अवजड सामान उचलण्याची क्षमता, दीर्घकाळ सतत चालण्याची कुवत हे शक्तीचे निकष होते. या निष्कर्षानुसार पुरुषाच्या तुलनेत स्त्रीवर अबला हा शिक्का बसला. परंतु कालमानपरत्वे खूपशा कामांचे यांत्रिकीकरण झाले. पुरुषांनासुद्धा अवजड ओझी उचलण्याचे प्रसंग कमी येऊ लागले. दळणवळ्णाच्या साधनांमुळे तासनतास चालण्याची गरज कमी झाली. अशा वेळी स्त्री पुरुषापेक्षा कमी ओझी उचलते, किंवा कमी अंतर चालू शकते, या वास्तवाला फारसा अर्थ उरला नाही. आज केवळ एक बटन दाबून रॉकेटसारखे अवजड साधन अवकाशात सोडता येत असेल आणि केवळ स्टिअरिंग व्हीलच्या साहाय्याने महाकाय क्रेन पुढे मागे करता येत असेल तर शारीरिक शक्तीतील थोडाफार गौणच मानायला हवा. यंत्राशी नाते जोडले की दोन व्यक्तींच्या शारीरिक शक्तीतील फरकाला फारसा अर्थ उरत नाही. शिवाय ओझी उचलणे हा शारीरिक शक्तीचा एकमेव निकष होऊ शकत नाही.
सतत आणि दीर्घकाळ काम करण्यासाठी लागणारा चिवटपणा, एकावेळी अनेक कामं करण्यासाठी अवधान ठेवते वेळी पणास लागणारी मानसिक शक्ती ही सुद्धा ताकदीचीच रुपे आहेत. कुटुंबाच्या जबाबदा-या निभावत असताना स्त्री जवळ जवळ सोळा तास काम करत असते. अठराव्या शतकात औद्योगिक क्रांतीच्या काळात युरोप-अमेरिकेतील स्त्रिया १० ते १२ तास नोकरीच्या जागी काम करत आणि त्या व्यतिरिक्त ३-४ तास घरात काम करत. हा काळ यांत्रिकीकरण होण्याच्या आधीचा होता. एवढे कष्ट करणा-या स्त्रीला अबला कसे म्हणायचे?
गंमतीची बाब म्हणजे एकीकडे समाज स्त्रियांना अबला म्हणून हिणवत असला तरी, त्याच वेळी तिच्यावरचे शारीरिक ओझे कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करताना दिसत नाही. विशेषत: ज्या अवजड कामांसाठी तात्काळ पैशात मोबदला मिळत नाही त्या कामांपासून पुरुष लांब राहतात. लांबलांबून पाणी भरण्याचे दमछाकीचे काम सर्व गरीब राष्ट्रात स्त्रियाच करतात. घरात पुरुष किंवा कुमारवयीन मुलगे रिकामे बसले असले तरी या कामात बाईला हातभार लावत नाहीत. अगदी पुण्या-मुंबईत सुद्धा गरीब वस्त्यांमध्ये स्त्रियांच्या उजव्या हातात दहा लिटरचा केरोसिनचा डबा, डोक्यावर दहा किलोचा दळणाचा डबा आणि कधी कधी डाव्या कडेवर मूल हे नेहेमीचे दिसणारे दृश्य असते. या सामाजिक स्तरांत पाणी भरणे पुरुषासाठी जेवढे लांच्छनास्पद मानले जाते, तेवढेच हातात दळणाचा डबा म्हणजे शरमेची बाब मानली जाते. त्यामुळे बारा-तेरा वर्षाचे मुलगेही गिरणीत फिरकत नाहीत. अखेरीस आईला शक्य नसेल तर आठ-नऊ वर्षाच्या मुलीची दळणासाठी पिटाळणी होते. मुलीला वजन पेलणार नाही, या सबबीखाली तिला घरातल्या लूनाला हात लावू न देणारे भाऊ तिच्या उरावर सात-आठ किलोचे दळणाचे डबे अगदी नि:संकोचपणे देताना दिसतात.
ग्रामीण भागात अगदी आता आतापर्यंत पेरणीच्या वेळी छोट्या शेतक-याच्या शेतात स्त्री नांगर ओढत असे आणि पुरुष फक्त दाणे पेरायचे काम करत असे. एकंदरीतच ग्रामीण असो वा शहरी, एका बाजूला स्त्रीला अबला म्हणायचे आणि दुसरीकडे तिच्याकडून कसून शारीरिक मेहनत करून घ्यायची असा विरोधाभास दिसतो. शहरी, शिक्षित किंवा सुखवस्तू वर्गामध्ये पुरुषांच्या उपस्थितीत स्त्रीला अवजड कामे कारावी लागत नाहीत हे खरे. मात्र या स्तरातील स्त्रीसुद्धा काम करणारी असेल तर ती दिवसाचे जवळ जवळ सोळा तास काम करते. म्हणजे तिच्याच घरातील पुरुषापेक्षा जवळ जवळ सहा तास जास्त. कारण अशा घरातील पुरुषांचा घरकामातील सहभाग दिवसाला जवळपास १५-२० मिनिटेसुद्धा भरत नाही. अर्थात याला काही सामान्य अपवाद असतात. पण ते नियम सिद्ध करण्यापुरतेच असतात. फक्त सुखवस्तू घरातील नोकरी न करणा-या स्त्रियाच अशा अतिरेकी श्रमातून वाचतात.

No comments:

Post a Comment