Monday 23 August 2010

मास्तरांची सावली

मास्तरांची सावली : कृष्णाबाई नारायण सुर्वे

डिंपल प्रकाशन,पृष्ठे - १८४, मूल्य - १८० रुपये

सांताक्रूझला बाबुरावाच्या झोपड्यात असताना माझ्याकडे भांडीकुंडी काहीच नव्हती. मास्तर बाहेर गेले की मी चूल पेटवायला काटक्या, कागद गोळा करायची. चुलीवर तीन भाक-या थापायच्या आणि त्या कागदावर काढून ठेवायच्या. एखाद्या दगडावर मिरच्यांचा ठेचा नाहीतर खर्डा वाटून तो भाकरीवर ठेवायची. एक भाकरी मला, दोन मास्तरांसाठी. कित्येक दिवस हेच जेवण होतं आमचं. पण त्यालाही चव असायची. कारण ती प्रेमाचीच चटणी आणि प्रेमाचीच भाकर होती ना! याच झोपड्यात आम्ही एका भयंकर वादळाचा सामना केला होता. ते वादळ आठवलं की अजूनही अंगावर शहारे येतात.

साल आठवत नाही मला. पण त्या वर्षी भयंकर पाऊस पडला होता. प्रचंड वादळ झालं होतं. आधीच आम्ही पार कंगाल झालो होतो. त्यात झोपडीसकट सगळंच वाहून गेलं होतं. फक्त आमच्या अंगावरचे कपडे तेवढे शाबूत राहिले होते. लग्नाला जेमतेम वर्ष झालं होतं. कुसुम रणदिवेंच्या कृपेनं मला मूलबाळ काही तेव्हा झालं नव्हतं म्हणून बरं. नाहीतर आम्ही काय केलं असतं? या विचारानेच आजही अंगावर काटा येतो. तर त्या वादळी पावसातून कशीबशी वाट काढत, एकमेकांना घट्ट धरून, बिलगून आम्ही चाललो होतो. दूरवर एक मशीद दिसत होती. तिथे तरी पोचावं असा विचार मनात चालला होता. पाणी माझ्य कमरेच्या वर पोचलं होतं. मास्तर माझ्यापेक्षा उंच असल्यामुळे त्यांन तितकीशी भीती वाटत नव्हती. पण मी पडले खुजी. तशी मी सर्वच बाबतीत त्यांच्यापेक्षा खुजीच आहे म्हणा. असो. तर त्या पाण्यातून चालताना खाली खड्डा आहे का विहीर काहीच कळत नव्हतं. माझे पाय खाली खेचल्यासारखे होत होते. कुठे वळावं मागे की पुढे? काहीच कळेना. तिथे जवळ्पास मोठमोठी झाडं होती. त्या झाडांवर म्हणे तडीपार केलेले, हद्दपार केलेले लोक बसायचे आणि रात्री चो-या करायला, मारामा-या करायला बाहेर पडायचे. त्यांनी आम्हाला झाडावरून पाहिलं आणि एकदम ओरडले, ’ओ ताई, दादा थांबा तिथंच. पुढे येऊ नका. इकडे खूप पाणी आहे आणि त्या बाजूला तर पूर आलाय.’ असं म्हणून पटापट झाडावरून त्यांनी उड्या घेतल्या. मी क्षणभर घाबरलेच. मनात आलं, आपल्याला घेऊन तर जाणार नाहीत ना? किंवा ही कुणी पाठवलेली माणसं तर नसतील ना! मास्तर म्हणाले, ’किशा, घाबरू नकोस. बघू तर खरं काय करतात ते!’ ती माणसं जवळ आली तसे मास्तर त्यांना विनवू लागले, ’दादा, आम्ही पाया पडतो तुमच्या. इथलं आम्हाला काहीच माहीत नाहीये. एखाद्या सुरक्षित ठिकाणी आम्हाला घेऊन चलता का?’ त्यांनी आम्हाला मशिदीत अगदी सुरक्षितपणे पोचवलं.

मशिदीत आम्हाला आसरा मिळाला खरा, पण आम्ही पार भिजून गेलो होतो. मास्तरांना तर हळूहळू ताप चढायला लागला. मला मात्र काहीच झालं नव्हतं. मशिदीतले लाईटही गेले होते. नुसता अंधार पसरला होता. आधीच उपाशी तापाशी, त्यात हाताशी काही नाही. जे काही होतं नव्ह्तं तेही वाहून गेलं होतं. काय करावं काहीच सुचत नव्हतं. रात्र झाली. मास्तरांचा ताप अधिकच वाढला. त्यांना थंडी वाजू लागली. अगदी थाडथाड उडत होते. मी तर घाबरलेच होते. मशिदीत सगळे मुसलमान होते. त्यांच्यातला एक मौलवी बाबा पेल्यात पाणी घ्यायचा, काहीतरी मंत्र पुटपुटायचा आणि मास्तरांच्या तोंडात विभूती टाकून ते मंतरलेलं पाणी ह्यांना प्यायला द्यायचा. मला ते पटत नव्हतं. विभूती टाकून का कुणी बरं होतं? पण मी काय बोलणार तेव्हा? तो बाबा आपला अला के नामसे’, ’खुदा के नामसे’, ’उसके नामसेम्हणून सारखा यांच्या तोंडात विभूती टाकयचा. मला भीतीच वाटत होती. मनात यायचं, हा माणूस बहुधा ही विभूती खाऊन खाऊनच खलास होणार. शेवटी न राहवून मी त्या बाबाला विचारलं, ’तुम्ही यांच्या तोंडात सारखी सारखी ही विभूती का टाकता?’ तसा तो म्हणाला, ’बहेन, इसको विभूती मत बोलो. ये खुदाका प्रशाद है. ये खाके तुम्हारा जल्दी अच्छा हो जायेगा, चिंता मत करो.’ मी मनातून खचूनच गेले होते, पण परस्वाधीन असल्यामुळे काही बोलता येत नव्हतं.पावसापाण्यातून, अशा अवस्थेत मास्तरांना कुठे घेऊन जाणार होते? शेवटी तिस-या दिवशी पाऊसही उतरला आणि मास्तरांचा तापही. इकडॆ तिकडॆ बघायला लागले, मला खूप बरं वाटलं. मनातून मी त्या बाबाचे आभार मानले. मास्तर हळू आवाजात विचारत होते, ’किशा, कुठे आहोत ग आपण?’ ते तसे ग्लानीतच होते. त्यांना काही आठवत नव्ह्तं. चेहरा अगदी कसानुसा झाला होता. मी बाबांना म्हटलं, ’यांना खूप भूक लागलीय. तीन दिवस पोटात काहीच नाहीये. काही खायला मिळेला का?’ मग मशिदीतल्या माणसांनी रोटी आणि थोडीशी चटणी आणून दिली. मास्तरांनी ती खाल्ल्यावर त्यांना थोडी तरतरी आली. ’भुकेला कोंडा आणि नीजेला धोंडाम्हणतात तसं झालं होतं. जरा भानावर आल्यावर मास्तर म्हणाले, ’किशा, काय खालं असेल ग आपल्या घराचं?’

मी म्हटलं, ’मरू दे ते घर. जाऊ दे. तुम्ही ठीक झालात ना, यातच मला आनंद आहे. घर काय पुन्हा बघू कुठेतरी.’ असं म्हणून मी त्यांना घेऊन मशिदीबाहेर पडले. पुन्हा एकदा उघड्यावरचा संसार नशिबी येतोय का काय असं वाटत होतं. पुन्हा एकदा नव्या घराचा प्रश्न या वादळाने उभा केला होता.

बिलंदर टोपी बहाद्दर

बिलंदर टोपी बहाद्दर : निरंजन घाटे
रोहन प्रकाशन, पृष्ठे : १७६, मूल्य : १०० रुपये

राष्ट्रीय स्मारके विकणारे महाभाग
लोक फसतात म्हणून आम्ही त्यांना फसवतो, असं ब-याच टोपी घालणा-य़ांचं म्हणणं असतं. ’दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये’, ही म्हण आपण बरेचदा वापरतो. लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं कौशल्य असल्याशिवाय झुकानेवाला दुनियेस झुकवू शकत नाही, हे मात्र इथं लक्षात ठेवायला हवं. नाहीतर बिगबेन स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा किंवा आयफेल टॉवर यांच्यासारख्या वस्तू विकल्याच गेल्या नसत्या.
आर्थर फर्ग्युसन हा असाच एक स्कॉटसमन होता. तो एक उत्कृष्ट ’झुकानेवाला’ होता. आपण लोकांना झुकवू शकतो याची त्याला कल्पना नव्हती. पण जेव्हा आपल्या या गुणांचा त्याला साक्षात्कार झाला तेव्हा त्यानं जगाला थक्क करून सोडलं. १९२०च्या सुमारास तो ट्राफल्गार चौकात उभा असताना आर्थरला त्याच्यातील सुप्त गुणांची जाणीव झाली. एक अमेरिकन माणूस नेल्सनच्या पुतळ्याकडं अनिमिष नेत्रांनी एकटक बघत असताना आर्थरनं बघितला. आर्थर त्या अमेरिकन व्यक्तीजवळ गेला. आपण या लंडनमधल्या सर्व पुतळ्यांचे नि स्मारकांचे अभ्यासक आहोत, अशी स्वत:ची ओळख करून देत त्या अमेरिकन व्यक्तीस त्याने नेल्सनच्या पुतळ्याची माहिती द्यायला सुरुवात केली. ’हा पुतळा इंग्लंडचा राष्ट्रपुरुष मानल्या जाणा-या लॉर्ड नेल्सनचा आहे.’ आर्थर त्या अमेरिकनास माहिती देऊ लागला. ’या देशाचं दुर्दैव असं की आमच्या शासनानं हा पुतळा, हे सिंह, हे कारंजं, तो चौथरा हे सगळं विकायला काढलय. पाच वर्षे चाललेल्या युद्धामुळं आमचा देश कर्जबाजारी झालाय ना,’ चेहरा दु:खी करत आर्थर बोलत होता. त्या अमेरिकन माणसाला आर्थरची कीव आली. ’तुम्हाला खोटं वाटेल, केवळ सहा ह्जार पौंडाला हे स्मारक विकलं जातय आणि दुर्दैव असं की हे काम माझ्यावर सोपविण्यात आलय. कुणातरी जाणकार व्यक्तीच्या पदरी पडायला हवं. या स्मारकाची महती ज्याला कळते त्याने हे घेतलं तर ठीक आहे. नाही तर सगळाच बट्ट्याबोळ.’ आर्थरनं अगदी पडल्या चेहे-यानं त्या अमेरिकनास सांगितलं.
’काय म्हणताय काय, पण तुम्हाला गि-हाईक आलय का?’ त्या अमेरिकन माणसानं विचारलं.
’हो. दोन - तीन गि-हाईकं आलीत खरी, पण त्यातला एकजण तर फ्रेंच आहे. त्याला नेल्सन कसा काय विकणार?’
’तुम्ही मला थोडा वेळ द्याल का? मी माझ्या वरिष्ठांना विचारतो.’ तो अमेरिकन म्हणाला.
’अहो, खरं तर हे सगळं शासकीय गुपित आहे. तुम्ही तुमच्या वरिष्ठांना विचारणार, ते आणखी कुणाला सांगणार, माझी नोकरी जाईल.’ असा संवाद घडला. अखेरीस आर्थरनं त्या अमेरिकन व्यक्तीस एक फोन करायला हरकत नाही असं सांगितलं. त्या माणसानं फोन केला. मग आर्थरनं फोन केला. जर सहा ह्जार पौंडाचा चेक लगेच मिळाला तर व्यवहार पूर्ण करावा, असा आदेश राष्ट्रीय स्मारक समितीच्या अध्यक्षांनी आर्थरला दिल्याची माहिती आर्थरनं त्या अमेरिकनास दिली. त्याचबरोबर हा पुतळा, त्याचा चौथरा, भोवतालचे सिंह, कारंजे वगैरे सुटे करून पेटा-यात बांधून जहाजातून अमेरिकेला पाठवू शकेल, अशा शासनमान्य संस्थेचा पत्ताही आर्थरनं त्या अमेरिकनास दिला.
आर्थरनं ब्रिटीश शासनाच्या वतीने चेक स्वीकारला. पावती पाठवायचा पत्ता लिहून घेतला. त्या माणसाच्या डायरीत कच्ची पावती लिहून दिली. मग आर्थर फर्ग्युसननं लगेच तो चेक वटवला. इकडे तो अमेरिकन आर्थरनं दिलेल्या पत्त्यावर गेला. तिथं त्याचं काम स्वीकारायला त्या कंपनीनं अर्थातच नकार दिला. नेल्सनचं स्मारक ब्रिटीश सरकार कुठल्याही परिस्थितीत विकणं शक्य नाही, हे सांगून त्याला पटेना. मग तो अमेरिकन स्कॉट्लंड यार्डमध्ये पोहोचला. तेव्हा आपण फसलोय हे त्याच्या लक्षात अलं. आर्थर फर्ग्युसनला हे घबाड लाभलं त्यामुळे त्याची तहान वाढली. त्या वर्षीच त्यानं आणखी एका अमेरिकन व्यक्तीस एक हजार पौंडाला ’बिगबेन’ हे घड्याळ विकले. त्याही पुढची गंमत म्हणजे बंकिंगहॅम राजवाड्याच्या खरेदीचा विसार म्हणून त्याने दोन हजार पौंड मिळवले. या तक्रारी अर्थातच पोलिसात नोंदवल्या गेल्या. लंडनमध्ये हा उद्योग करीत राह्यलो तर पोलीस पकडतीलच, पण जर हे अमेरिकन इतके खुळे आहेत तर त्यांच्याच देशात आपण गेलो तर आपल्याला आणखी पैसा मिळेल अशी खूण गाठ बांधून आर्थर फर्ग्युसन १९२५मध्ये अमेरिकेत पोहोचला. अमेरिकेत तर विकण्यासारख्या खूपच गोष्टी उपलब्ध होत्या.
वॉशिंग्टनला पोहोचल्या पोहोचल्या आर्थरनं पहिलं गि-हाईक मिळवलं. एका गुरांच्या व्यावसायिकाला - कॅट्ल रांचरला - त्यानं दरवर्षी एक लाख डॉलर भाड्यानं ९९ वर्षांच्या करारानं व्हाईट हाऊस भाड्यानं दिलं. पहिल्या वर्षीचं भाडं त्यानं आगाऊ घेतलं होतं. एवढा पैसा मिळाल्यानंतर फर्ग्युसनच्या मनात निवृत्तीचे विचार येऊ लागले. पण निवृत्तीपूर्वी एक दणका द्यावा आणि मगच निवृत्त व्हावं. तेव्हा काही तरी धमाल उडवायलाच हवी, असा निश्चय करून तो निवृत्तीपूर्व दणकेबाज कामाची योजना करू लागला.
कसायाला गाय धार्जिणी, या उक्तीनुसार आर्थरकडं या वेळात बळीचा बकरा चालत आला. हा एक धनिक ऑस्ट्रेलियन होता. त्याला आर्थरच्या जाळ्यात फसायला वेळ लागला नव्हता. एका भोजन समारंभात दोघांची ओळख झाली. बोलण्याच्या ओघात आर्थरनं न्यूयॉर्क बंदराच्या रूंदीकरणाच्या कामात त्याचा स्वत:चा मोठा सहभाग असल्याचं या ऑस्ट्रेलियन महाभागास सुनावलं. या रूंदीकरणाच्या आड स्वातंत्र्य देवतेचा पुतळा येत होता. प्रगतीच्या आड भावना येऊ देणं अमेरिकन जनतेस मान्य नव्हतं. मात्र या पुतळ्याला भंगार माल म्हणून विकायलाही शासन तयार नव्हतं. जर योग्य त्या सन्मानासह या पुतळ्याची पुर्स्थापना करायला कुणी तयार असेल अमेरिकन शासन त्या व्यक्तीस किंवा संस्थेस हा पुतळा विकायला तयार होते. मात्र हा व्यवहार आधी उघड करणं म्हणजे जनतेचा प्रक्षोभ ओढून घेणं असल्यानं हा व्यवहार गुप्ततेनं करायला हवा होता, हेही आर्थरनं या ऑस्ट्रेलियन व्यक्तीच्या मनावर ठसवलं. जर हा पुतळा विकत घ्यायचा असेल तर आधी एक लाख डॉलरची अनामत रक्कम जमा करावी लागेल, असंही आर्थरनं त्या ऑस्ट्रेलियन माणसाला सांगितलं. या ऑस्ट्रेलियनानं पुढचे काही दिवस सिडनीशी संपर्क साधून एक लक्ष डॉलर मिळवायची धडपड केली. फर्ग्युसन कायम त्याच्याबरोबर राहात असे. ’चुकून तू हे गुपित फोडशील आणि हा व्यवहार रद्द होईल’, असं तो त्या ऑस्ट्रेलियन गृहस्थाच्या मनावर ठसवीत होता. या दोघांनी स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यासमोर आपलं छायचित्रंही काढून घेतलं होतं.
ऑस्ट्रेलियातून पैसे यायला वेळ लागला. त्यामुळं फर्ग्युसन अस्वस्थ झाला. त्याच्या अस्वस्थतेमुळे त्या ऑस्ट्रेलियन माणसाचा संशय वाढला. त्यानं एक दिवस ते छायाचित्र पोलिसांकडे दिलं. पोलिसांकडे या व्यक्तीविरूद्ध वेगवेगळ्या नावनं लोकांना राष्ट्रीय स्मारकं विकल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्याच. त्यांना आता ठोस पुरावा मिळाला. त्या ऑस्ट्रेलियन व्यक्तीच्या मदतीनं पोलिसांनी अखेरीस आर्थर फर्ग्युसनला पकडलं. त्याला पाच वर्षाच्या साध्या कैदेची शिक्षा झाली. लक्षावधी डॉलर बॅंकेत ठेऊन आर्थर आत गेला. पाच वर्षांनी त्या रकमेच्या व्याजासह ती संपत्ती घेऊन तो लॉस एंजेलीसला गेला. मग तुरुंगात न जाता लोकांना टोप्या घालत १९३८ पर्यंत राजेशाही जीवन जगला. १९३८ मध्ये स्वत:च्या प्रासादात झोपेतच मरण पावला.

शहाण्यांचा सायकिऍट्रिस्ट

शहाण्यांचा सायकिऍट्रिस्ट : डॉ. आनंद नाडकर्णी
समकालीन प्रकाशन
पृष्ठे - २८०, मूल्य - २५० रूपये

समाजापर्यंत जाऊन भिडायची प्रक्रिया चालू तर झाली होती. तशी एकही संधी आम्ही वाया घालवत नव्हतो. परंतु खर्च वाढत होते. क्लायंटकडून जे शुल्क घेतलं जात असे, ते अतिशय माफक असे. कारण या सेवा नवीन होत्या. ’बोलायच्या’ ट्रीटमेंटसाठी पैसे देणं अनेकांना जड जायचं. संस्थेवर पूर्ण वेळ अवलंबून असणारे कार्यकर्ते कर्मचारी आता चौदापर्यंत पोचले होते. त्यांचं मानधन दर महिन्याला तयार ठेवावं लागत होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर माझी गाठ पडली ज्यो अल्वारिस नावाच्या एका व्यक्तीबरोबर. ज्यो अल्वारिस ठाण्यालाच राहणारा. पाश्चात्य संगीतातला दर्दी. स्वत: उत्तम गायक.
’आपण तुझ्या संस्थेसाठी असा एक अफलातून शो करू या, जो आजवर कुणीही या शहरात केला नसेल.’ ज्यो म्हणाला.
रेमो फर्नांडिस, रॉक मशिन, शेरॉन प्रभाकर (आणि ज्यो अल्वारिस स्वत:) असे कलाकार आणायचे. म्हणजे नावीन्य या फूटपट्टीवर हा कार्यक्रम जोरदार होता. नाव ठरलं यूथ २००० एडी. दादोजी कोंडदेव स्टेडियमची तारीख मिळाली १० डिसेंबर १९९२. या त्या तारखेपासून मागे मागे येत संपूर्ण इव्हेंटचं वेळापत्रक तयार झालं. प्रमुख स्पॉन्सरशिपसाठी लागणारी सर्व कागदपत्र घेऊन मी सुनुबेन गोदरेजना भेटायला गेलो. सुनुबेनचा माझ्यावर (का कोण जाणे) पहिल्यापासून लोभ. ’तू गोदरेज सोपला जा. मी आदीशी बोलते.’ आदी म्हणजे गोदरेज. गोदरेज सोपचे सर्वेसर्वा. चार दिवसांनी मी पोचलो त्यांच्या ऑफिसमध्ये. मला फारच छान ट्रीटमेंट मिळाली. आदी गोदरेजनेही माझं म्हणणं छान ऐकलं. माझ्याकडचे स्पॉन्सरशिपचे सगळे कागद त्यांनी नजरेखालून घातले. ’माझी सेक्रेटरी तुला सॅम बलसाराच्या ऑफिसचा नंबर देईल. त्याला जाऊन भेट. तोवर मी हे कागद त्याला फॉरवर्ड करतो. सॅम बलसाराची कंपनी आमच्या जाहिराती आणि प्रसिद्धीचं काम पाहते.’
मी ते नंबर घेऊन बाहेर पडलो. दुस-याच दिवशी सॅम बलसाराच्या एजन्सीमधून फोन... ’धिस इज रिगार्डिंग स्पॉन्सरशिप ऑफ युवर इव्हेंट...’
चक्क पाच लाख रुपयांची स्पॉन्सरशिप सुनुबेनच्या शब्दांनी पक्की झाली होती. इतका मोठा इव्हेंट मॅनेज करायला अनेकजण आपापल्या परीनं झटत होते. नोव्हेंबरच्या दुस-या आठवड्यात सर्वत्र पोस्टर्स झळकली. मोठी होर्डिंग्ज लागली. लोकलच्या डब्यांमध्ये स्टिकर्स लागले. वर्तमानपत्रांमध्य्ये बातम्या-फोटो आले. स्टेशनांवर पत्रकं वाटली जाऊ लागली. तिकिटविक्रीला प्रारंभ झाला. चार डिसेंबरपर्यंत सगळीकडे झालेल्या तिकिटविक्रीचा आकडा सत्तर हजाराच्या घरात गेला होता. आमच्या टीन क्लब, यूथ क्लबची मुलंही तिकिटं खपवण्याचा जोरदार प्रयत्न करत होती. आम्हाला तीन ते पाच लाखांची तिकिट्विक्री अपेक्षित होती. दहा डिसेंबरला कार्यक्रम, तर सहा डिसेंबरपासून स्टेडियम ताब्यात येणार होतं. प्रचंड मोठं स्टेज बांधण्याचं सामान पाचला रात्रीच ट्र्कमधून येऊन पडलं. लाइटस, साऊंडची उपकरणं सहा किंवा सातला येणार. आठला स्टेज सेट कारायचं. नऊला रिहर्सल. दहाला कार्यक्रम.
सहा डिसेंबर एकोणिसशे ब्याण्णव हा दिवस सा-या देशाच्याच इतिहासात एक चक्री वादळ घेऊन आला. अयोध्येच्या बातम्यांकडे लक्ष द्यायला आम्हाला ना वेळ होता, ना वृत्ती.
़़़़़
बाबरी मशीद पडल्याचं वृत्त सर्वत्र पसरलं आणि त्याचा परिणाम जाणवू लागला. तोवर दुपार उलटली होती. आम्ही सारेच सुन्न. शिवनेरी हॉस्पिटलमधल्या आमच्या डे-केअर सेंटरमध्ये या कार्यक्रमाची कंट्रोल रूम होती. रस्त्यावरची रहदारीही संध्याकाळपर्यंत पार आटली. सगळ्या वातावरणात प्रचंड टेन्शन. पुढचे काही दिवस सगळीकडे ’एकशे चव्वेचाळीस’ कलम म्हणजे जमावबंदी लागू होणार अशी बातमी आली. पोलिस स्टेशनवर चौकशी केली. तिथून होकार मिळाला. रात्री पोलिस कमिशनर कार्यालयातून फोन-निरोप, की कार्यक्रमाला दिलेली परवानगी राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात येत आहे. कलाकारांचे ऍडव्हान्सेस, स्टेजवाल्यांचे पैसे, प्रसिद्धीवर झालेला खर्च... सगळंच एका क्षणात धुतलं गेलं होतं. होत्याचं नव्हतं झालं होतं.
सगळ्या वर्तमानपत्रांसाठी घाईघाईनं बातमी तयार केली. यूथ २००० एडी लांबणीवर टाकण्यात येत आहे. कार्यक्रम लांबणीवर... जीव टांगणीवर... एकटा, अगदी एकटा... सुन्न बसून राहिलो. सगळ्यांची मेहनत मातीमोल. जीवतोड मेहनतीचे सात महिने कोसळले. बाबरी मशिदीबरोबरच राष्ट्राच्या शोकांतिकेला मिळालेली आमच्या शोकांतिकेची ही बारीक किनार. पुढील दोन दिवसात देशात हिंसक उद्रेक सुरू झाले. अंधारच अंधार... देशापुढे. सगळ्यांपुढे.. आमच्यापुढे... माझ्यापुढे..
डिसेंबरचा तिसरा आठवडा उजाडला. या आठवड्यातला माझा वाढदिवस उसनं अवसान आणून कसाबसा साजरा केला. संस्थेचे हात दगडाखाली अडकले होते. कार्यक्रमाच्या जाहिरातीवर खर्च झालेला पैसा फुकट गेला होता. ठिकठिकाणी जे ऍडव्हान्सेस दिले होते, ते परत घेण्यापेक्षा जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा कार्यक्रम का घडवून आणू नये? प्रसिद्धीसाठी थोडे कमी पैसे खर्च केले तर चालेल या वेळेला. हा निर्णय होतोय तर गोदरेज सोप्सकडून पत्र आलं की पाच लाखांची स्पॉन्सरशिप आम्ही मागे घेत आहोत. पायाखालची वाळू सरकणं हा अनुभव नवा राहिला नव्हता. तरीही डोकं भणभणलच. मलबार हिलवरच्या बंगल्यावर सुनुबेनना फोन लावला. त्यांना सगळी हकीकत सांगितली. ’वुई कॅन नॉट गो बॅक ऑन अवर वर्ड.’ त्या ठामपणे म्हणाल्या. ’मला दोन दिवसानी फोन कर. मी आदीशी बोलते.’ सगळेच दिवस टेन्शनचे. त्यात पुढच्या दिवसांची फोडणी. तिस-या दिवशी सॅम बलसाराच्या सहीचं पत्र- वुई आर रिस्टोअरिंग द स्पॉन्सरशिप.
एक तिढा सुटला. इतर अनेक कायम होते. आम्ही जानेवारी महिन्याची तारीख ठरवली. स्टेडियम मिळवण्याच्या कागदपत्रांची पूर्तता केली. स्टार चॅनलकडून नवा होकार मिळवला.
... आणि मुंबईत दंगलींचा दोंब उसळला. पुन्हा एकदा सर्व पूर्वतयारी पाण्यामध्ये. प्रत्येक आपत्तीबरोबर आर्थिक खड्डा वाढत होता. दहावी-बारावीच्या परीक्षा झाल्यावर मार्चच्या अखेरीला करून टाकू या आता कार्यक्रम... असा निर्णय घेणंही यांत्रिक होऊन गेलं होतं.
मार्च महिन्यातल्या त्या शुक्रवारी मी दादरला क्लिनिकला जाण्यासाठी ठाणे स्टेशनला आलो, तर पुन्हा वेगळा सन्नाटा. मुंबईत ठिकठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. कार्यक्रम पुन्हा गचकलाच... आणि जिथे प्रॅक्टीस करायचो त्या जागेचा विध्वंस झालेला. या सगळ्या कालखंडात माझा पूर्ण रोबोट बनून गेला होता. आता कोणत्याच अनपेक्षित भावना त्या सुन्नपणाला छेदून आत जाऊ शकत नव्हत्या.
’आता सोडून द्या या अपशकुनी कार्यक्रमाचा नाद.’ एक हितचिंतक म्हणाले. हट्टी मनाने पुन्हा उचल खाल्ली. एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात कार्यक्रम करायचं ठरलं.
माझ्या कौटुंबिक जीवनाची वाताहत जाणवायला लागली होती. कुटुंबासाठी ना अवसर ना धीर. एप्रिलच्या उन्हात शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी माझी पराभवगाथा मनात आकार घेत होती. प्रॅक्टीसवरचं लक्ष कमी झालं होतं. आयपीएचमधल्या कुठल्याही उपक्रमावर मी भर देऊ शकत नव्हतो. सगळीकडे निर्नायकी अवस्था होती. आजवर संस्थेच्या प्रवासात काय किंवा प्रॅक्टीसमध्ये काय, नाट्यलेखनात काय किंवा पुस्तक लिखाणात काय- हात लावला की सोनं अशी परिस्थिती होती. आपला मिडास ट्च गेलाय तरी कुठे कळेना. स्वत:च्या चुकलेल्या गणितांची जबाबदारी दुस-यांवर लोटण्याची प्रवृत्ती या वेळी माझ्यामध्ये अतिशय वरचढ होती.
प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी प्रेक्षकांचे जथे स्टेडियमकडे येताना दिसले तशी थोडी उभारी आली. आधी पंचवीस हजार, त्यानंतर पंधरा, दहा असं होता होता (तरीही) पाच हजारांचा प्रेक्षकवर्ग जमला होता. सर्वांचं स्वागत करण्याचं माझ्या आयुष्यातलं सर्वात कृत्रिम भाषण मी केलं. स्मरणिकेचं प्रकाशन झालं. रेमो फर्नांडिसचा जादुई प्रवेश झाला रंगमंचावर. मी काही काळ पाहत राहिलो. रेमो गात होता. मला जाणवलं, मला ध्वनी लहरी जाणवताहेत, पण संगीत म्हणून नाही तर नुसते आवाज म्हणून. मी बॅकस्टेजला आलो. पुन्हा भुतासारखा फिरायला लागलो. रेमो, ज्यो, शेरॉन, रॉक मशिन... सा-यांचे कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमानंतर सुन्या सुन्या झालेल्या रंगमंचावर मी गेलो. प्रखर प्रकाशानंतर आता आवराआवरीचा ’वर्किंग लाइट’ म्हणजे जवळ जवळ अंधारच होता.
प्रचंड एकटेपण झाकोळून येत होतं. स्टेडियमच्या एका कोप-यात एक गाडी थांबली. पांढरे कपडे घातलेली एक आकृती माझ्य्या बाजूने चालत आली. ते आनंद दिघे होते. ’खूप श्रम केलेत डॉक्टर... वेळ वाईट होती, तरीसुद्धा.’ आनंद दिघे तुटक बोलायचे. ’आता थोडी विश्रांती घ्या. दमलात.’ त्यांनी माझ्या खांद्यावर थोपटलं आणि ते निघून गेले.
त्या एकट्या रात्री एवढा एकच अनपेक्षित हात माझं सांत्वन करून गेला.

द सेकंड सेक्स

सेकंड सेक्स
सिमोन द बोव्हुआर
अनुवाद ; करुणा गोखले
पद्मगंधा प्रकाशन
पृष्ठे : ५५८, मूल्य : ४५०


सिमोन द बोव्हुआर - संक्षिप्त चरित्र
पुरुषात रुजवल्या जाणा-या स्वातंत्र्य, निर्णयक्षमता, तर्कनिष्ठता, आत्मविश्वास या गुणांचे सिमोनला अतोनात कौतुक होते. स्त्रीमध्ये हे गुण रुजवले जात नाहीत व त्यामुळे स्त्री दैनंदिन रहाट्गाडग्यात अडकून पडते. याउलट पुरुष मात्र रोजच्या दिनचर्येपेक्षा व शारीरधर्मापेक्षा उदात्त असे काही तरी भरीव कार्य तडीस नेऊन ’स्व"चे प्रकटीकरण साधतो हा सिमोनच्या ’सेकंड सेक्स’ मधील वारंवार प्रतिपादला जाणारा मुद्दा होता. ’सेकंड सेक्स’ प्रकाशित झाल्यानंतर स्त्री दास्याविषयीचे तिचे सिद्धांत स्त्रीविषयक भान जागृत होण्यास खूप उपयुक्त ठरले. मुलगा व मुलगी यांना वाढवण्यात केला जाणारा भेदभाव, त्याचे स्त्री व पुरुष दोघांच्याही मानसिकतेवर होणारे दूरगामी परिणाम, स्त्रीच्या मानसिक दौर्बल्यामागची तिच्यावरील कुसंस्कारांची परंपरा यांचे विस्तृत
विश्लेषण सिमोनने केल्यामुळे स्त्री समस्यांविषयी झोपी गेलेला समाज थप्पड बसून जाग यावी त्याप्रमाणे खडबडून जागा झाला. ’सेकंड सेक्स’ वाचून अनेक स्त्रियांना स्वत:च्या दुय्यमपणाची कारणे कळली. अनेक आयांना मुली वाढवताना काय टाळले पाहिजे याचे भान आले. तरुण मुलींना स्वत:च्या शरीराची, पर्यायाने स्त्रीत्वाची लाज वाटणे बंद होऊन ताठ मानेने आयुष्याला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास आला. थोडक्यात, सिमोनच्या पुस्तकाने स्त्रियांची एक संपूर्ण पिढीच स्वत:कडे अधिक डोळसपणे बघून स्वत:शी संवाद साधू लागली. या पुस्तकाने स्त्रीच्या मानसिकतेत आमूलाग्र क्रांती केली. त्याचा फायदा व्यक्तिगत पातळीवर स्त्रियांना झालाच, पण पुढच्या पिढीतील मुलीचं संगोपन अधिक जाणीवपूर्वक करण्यासाठी, त्यांना माणूसपण देण्यासाठी सुजाण मातांची एक फळीच या पुस्तकाने तयार केली. ’स्त्री जन्मत नाही, तर घडवली जाते’, या सिमोनच्या गाजलेल्या विधानाचे दूरगामी परिणाम लक्षात घेऊन अनेक स्त्रियांनी आपल्या मुली चुकीच्या पद्धतीने घडू नयेत याची खबरदारी घेतली.

’सेकंड सेक्स’ या पुस्तकावर विचार विनिमय करण्यास तिने १९४६ मध्ये सुरुवात केली. त्या वेळेला स्त्रीवादी साहित्य ही कल्पनाही अस्तित्वात नव्हती. 'Vindication of Rights of Women' यासारख्या पुस्तकांचे लेखन झाले असले तरी स्त्रीविषयक अभ्यासग्रंथ तर अजिबात अस्तित्वात नव्हते. स्त्रियांच्या सामाजिक व आर्थिक दृष्टीकोनातून विचार करणारे तत्वचिंतक म्हणजे जॉन स्टुअर्ट मिल, मार्क्स व एंगल्स. विशेषत: मिलचे 'Subjections of Women' (1869), एंगल्सचे Origin of the Family, Private Property and the State (1888), व एलिस हॅवलॉकचे लैंगिक संदर्भात विश्लेषण करणारे Man and Women (1894) ही ख-या अर्थाने स्त्री विषयाचा ऊहापोह करणारी प्रसिद्ध पुस्तके होत. एकोणिसाव्या व विसाव्या शतकात स्त्रियांच्या हक्कांविषयी ज्या चळवळी झाल्या, त्या मुख्यत्वेकरून वाढत्या औद्योगिकरणाशी संबंधित होत्या. समान कामासाठी समान वेतन, कामाचे तास १२ न ठेवता १०, कामाच्या जागा आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित करणे, बाळंतपणाची व आजारपणाची रजा यांसारख्या स्त्रीच्या अर्थार्जनाशी निगडित मागण्या घेऊन चळवळी होत होत्या. स्त्रियांच्या लढण्याचा दुसरा मुद्दा होता मतदानाच्या हक्काचा.

’सेकंड सेक्स’ मध्ये सिमोनने स्त्रीचा अगदी कृषीसंस्कृतीच्या उगमापासून ते फ्रेंच राज्यक्रांतीचा काळ व तेथून पुन्हा आधुनिक काळापर्यंतचा जो राजकीय व सामाजिक इतिहास विस्तृतपणे नोंदला आहे. स्त्रीच्या सामाजिक दर्जाची एवढी सखोल कारणमीमांसा याआधी कोणीही केली नव्हती. सिमोनच्या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिने स्त्रीची मानसिक जडणघडण, तिच्यावरील कौटुंबिक व धार्मिक संस्कार, बालपणापासून तिच्यात निर्माण केली जाणारी परावलंबित्वाची, असहायतेची भावना, तिच्या शारीरिक सौंदर्याला दिले जाणारे अवास्तव महत्व, आणि त्याच वेळी तिच्या शारीरिक क्षमतांकडे केले जाणारे दुर्लक्ष, तिच्या बौद्धिक विकासाचा उपहास करून तिची तिच्या लैंगिक देहधर्मात केलेली स्थानबद्धता याचा सविस्तर उहापोह केला. त्यातून सिमोनने सप्रमाण दाखवून दिले की स्त्री निसर्गत: अबला नसते, तर ती बनवली जाते. स्त्री व पुरुषांमधील नैसर्गिक घटकांना अवास्तव प्रमाणत भडक करून त्यांच्या मानसिक व शारीरिक क्षमतांमध्ये व पर्यायाने त्यांच्या सामाजिक स्तरांमध्ये जी खोल दरी निर्माण केली जाते, ती निसर्गसुलभ नसून मानवनिर्मित आहे. या संदर्भात तिने केलेले ’स्त्री जन्मत नाही, तर घडवली जाते’ हे वाक्य अजरामर झाले.

हेडहंटर

हेडहंटर : गिरीश टिळक
राजहंस प्रकाशन
पृष्ठे : १९९, मूल्य : २०० रुपये

देहाला खरोखरच विश्रांती हवी होती. पण मनाला काय हवं होतं कुणास ठाऊक? आठवडाभरातलं ते झोपणं कंटाळवाणं होतं खरं. पण मनाला आल्हाद मिळण्याऐवजी उद्विग्नताच भरून आली. विचित्र हिशेब मन मांडू लागलं. ’सिग्मा’नं अनपेक्षित वेतनवाढी दिल्या ख-या, पण आपण ’सिग्मा’चा काही कोटींचा फायदा करून दिला आहे. तो फायदा, आपण पुरवठादारांकडे पैसे न खाल्ल्यामुळेच केवळ मिळाला आहे असं नाही, तर आपले गृप्समधले वा अन्यत्रचेही संपर्कमैत्र वापरून कंपनीला सुयोग्य पुरवठादार मिळवून देऊनही करून दिला आहे. ’हेडहंटिंग’ नव्हे ’पुरवठादारांचं हंटिंग’ मिळवून दिलेला फायदा हा प्रचंड आणि चिरस्थायी आहे. ’सिग्मा’सारख्या आधी सुस्थापित असलेल्या कंपनीला आपल्या संपर्कमैत्रांमुळे फायदा करून देण्यात जिंदगी घालवण्यापेक्षा ’रिझ्युमे’सारख्या सुस्थापित होऊ घातलेल्या कंपनीला वर आणण्यासाठी ते वापरणं हे अधिक आनंदाचं आहे. ’पुरवठादारांचं हंटिंग’ नव्हे, तर हेड हंटिंग’! त्यासाठी आपल्याला भागीदारी द्यायलाही उत्सुक असल्याचं उदय जर खुलेपणानं म्हणाला होता...तर सोडावी का नोकरी? पत्करावा का धोका? ’रिझ्युमे’त काम किती सुखात असायचो आपण! आणि जातीनं खुद्द आपणच राबत असूनही किती कमी वेळात कामं व्हायची तिथली! इथल्या इतकं पूर्ण वेळ तिथेच राबलो तर ’नोकर’ म्हणून जिंदगी काढण्यापेक्षा ’मालक’ म्हणून सहभागी होण्याची उदयनं देऊ केलेली संधी नाकारण्याचा करंटेपणा का म्हणून दाखवावा आपण? हे आणि असे प्रश्न घेऊनच दहा - बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर मी ’सिग्मा’त हजर झालो.
त्या पूर्ण दिवसभर मी माझ्या नेहेमीच्या शिस्तीनं, क्षमतेनं मनापासून काम करत होतो खरं, पण हेही खरं आहे की अधून मधून ’रिझ्युमे’चं पुण्याचं ऑफिस मला आठवत राहायचं. ’बोरिंघर’ला मी मिळवून दिलेला मटेरियल्स मॅनेजरही आठवत राहायचा आणि असं काहीबाही कित्येक! अखेर संध्याकाळी मी उदयच्या कार्यालयात गेलो. त्या दिवशीचं माझं सात वाजताचं निघणं ’आजारातून नुकताच उठलाय’ या कारणावर खपून गेलं. मी म्हणालो, ’उदय, मी जर ’सिग्मा’तली नोकरी सोडली तर... पूर्वी जी संधी तू मला देऊ केली होतीस, ती मी आजही कायम आहे असं गृहीत धरू का?’
’निश्चितच. दिलेला शब्द हा तारीख न घातलेला बेअरर चेकच असतो. तुझं इथे केव्हाही स्वागतच आहे. कधी सोडतोयस नोकरी?’
’लगेचच सोडायचा विचार आहे माझा.’
’लगेचच रुजू हो आपल्याकडे. पहिल्या महिन्यापासून तुला आणि मला मिळणारा पगार सारखाच असेल. आपल्या दोघांच्याही पगाराखेरीजच्या सुखसोयी सारख्या असतील. भागीदारी किती टक्के असेल ते थोड्या काळानंतर सांगेन मी. एवढं नक्की, ’रिझ्युमे’त तू रुजू होशील तो एम्प्लॉयी म्हणून नाही तर भागीदार म्हणूनच.’
त्यानंतर दुस-याच दिवशी मी ’सिग्मा’चा राजीनामा दिला. एक महिन्याची पूर्वसूचना देणं आवश्यक होतं. त्या महिनाभर मी ’सिग्मा’त जात होतो. मोडकसाहेब-कौलगीसाहेब, दोघांनीही माझं मन वळवायचा खूप प्रयत्न केला, पण माझा निर्णय पक्का होता. राजीनामा त्यांना स्वीकारावा लागला. तो सहजासहजी स्वीकारला गेला नाही तो आमच्या घरातून. मी राजीनामा देणार असल्याचं घरात जाहीर केलं, म्हणजे तो देऊन टाकला असल्याचं लपवून ठेऊन ’देण्या’चा विचार असल्याचं सांगितलं. तेव्हा तो अविचारच कसा आहे, हे पटवून देण्याची घरात अहमहमिकाच लागली. ’अर्धवेळ काम करत होतास तसं पुन्हा करू लाग’, ’मागे एकदा ’शेअर्स’च्या व्यवसायात धिंडवडे निघाले होते ते आठवत नाहीत का’, उत्तम नोकरी सोडून धंद्यात ’पडण्याचा’ हा कसला दळभद्री विचार’, ’अरे, तुझं बालपण आठव. कसलीच अपेक्षा नव्हती आम्हाला तुझ्याकडून. आता स्वत:च्या पायावर उभा आहेस, तर करंटेपणानं कशाला निमंत्रण द्यावं’, ’आता तू एकटा नाहीस, संसार आहे तुझ्या खांद्यावर’, अशी नाना परींनी ’भवति न भवति’ झाली. कोण काय बोललं याला महत्व नसून घरातून उमटलेली एकूण प्रतिक्रिया महत्वाची नोती.
ती एवढी दाहक होती की घरात त्या काळात पूर्ण अबोला पसरला. त्या काळात घरात मी एक नगण्य, बेजबाबदार, हेकेखोर असा घटक ठरून गेलो. अशा घरात हे घडलं होतं की परस्पर आस्था आणि एकोपा हे जिथले स्थायीभाव होते. नारळाच्या ताटभर वड्या केल्या गेल्या तर ते कापलेले चौकोन ठेवण्यासाठी आईला डब्याची कधीच नेमणूक करावी लागली नाही. वड्या सुकण्यापूर्वीच उभं घर जुगलबंदी लागावी तसं खाऊन टाकायचं. वडीइतकाच तो सहस्वादाचा सोहळा मधुर, रसाळ असायचा. मऊ, ओलसर पोटातून गरम असणा-या त्या वड्या ताटातून खाताना, वड्या बनवताना घरात कोंडून राहिलेला वेलचीचा वासही ओसरून गेलेला नसायचा, तो साथीला असायचा... त्या अस्वस्थ - अशांत पर्वकाळात कुणीतरी कोवळे नारळ आणून दिले, म्हणून असावं, आईनं वड्यांचा घाट घातला. नेहेमीप्रमाणे ताट आणून बाहेर हॉलमध्ये पंख्याखाली ठेवलं. वेलचीचा गोड वास तर तोच आणि नेहेमीप्रमाणे दरवळत होता. तिथेच अवती भवती सगळी माणसं बसलेली होती. पण ताटापाशी जाऊन वड्यांना स्पर्श करण्याची कुणालाच इच्छा झाली नाही. जणू वड्यांची गोडी हरवली होती. वास्तवात घरातलीच गोडी हरबून गेली होती. या भयकारी स्थितीला आपणच कारण आहोत, असं मला वाटत राहिलं. मात्र आपला निर्णय अचूक आहे याची खात्री मला सावरत राहिली.

धाकट्या नजरेतून

धाकट्या नजरेतून : अलका गोडे
राजहंस प्रकाशन
पृष्ठे - १५५, मूल्य - २०० रुपये

दिलीपच्या छोट्या मोठ्या नोक-या चालू असतानाच ’डोंगरे बालामृत’मधली नोकरी चक्क आफ्रिकेलाच चला म्हणत होती. दिलीप आता महत्वाच्या टप्प्यावर उभा होता. एका बाजूला घरातलीच ध्येयवेडी माणसं सामाजिक बांधिलकीला अनुसरून एका निष्ठेभोवती फिरत होती. अनेक बाबींमधला तोकडेपणा, पण जोडीला कमालीची जिद्द या दोहोंमधला मेळ महत्प्रयासानं सांभाळत होती. या प्रवासात त्यांची झालेली मानसिक, आर्थिक कुचंबणा, लहान लहान स्वप्नांची गळचेपी, न पेलणारं नुकसान, सगळंच दिलीपला पचायला जड जात होतं. या सगळ्यात स्थैर्य आणि सुरक्षितता यासाठी लागणारी महत्वाची आर्थिक बाजू पा-याप्रमाणे चंचल राहणार होती. रस्ते खडबडीत वाटत होते. अशा वेळी त्याची मानसिकता कशी काम करत होती, मला माहीत नाही. या पार्श्वभूमीवर विचार करावयाचा झाला तर आलेली संधी म्हणजे एक परदेशी नोकरी, लठ्ठ पगार, बढती, उच्चपदी वर्णी, संसार, ऐषाराम, असा निळ्या झाकणाच्या बाटलीतल्या जंतुविरहित पाण्याप्रमाणे नितळ, गुळगुळीत प्रवासही मोह पाडणारा होता. पण का कुणास ठाऊक, दिलीपनं काही निश्चित विचार करून ती मोहक नोकरी नाकारली. ठाम निर्णय घेऊन कंपनीलाही तसं कळवलं.
लहान वयात दिलीपच्या अंगात तरुणाईची रग होती. ’हा काम ऐकणार नाही,’ याची बाकीच्यांना सवय झालेली. पण वेळ आलीच तर हे सगळं जागच्या जागी रोखून धरण्याची ताकद एकट्या भाऊच्या नजरेत आणि आवाजाच्या टीपेत असायची. भाऊ दिलीपमधल्या सूक्ष्म बदलांकडे लक्ष ठेऊन असायाचा, तसाच दिलीपही भाऊच्या सामाजिक प्रभावानं त्याच्याकडे आतल्या आत आकर्षित होत असावा. थोडीशी खोडसाळ बंडखोरी सोडली तर याच्यात काही तरी वेगळी ठिणगी आहे, हे भाऊला जाणवत होतं. त्याला ते आव्हान वाटायचं, हेही भाऊनं मला मोठेपणी गप्पांमध्ये सांगितलं आहे.
बाबासाहेब (पुरंदरे), भाऊ (श्री. ग. माजगावकर), कुमुद (निर्मला पुरंदरे), यांचं सामाजिक काम आपापल्या मार्गानं पुढं सरकत होतंच. एखाद्या नवख्या वाटसरूला एकाच वेळी, अनेक रस्त्यांचं आकर्षण वाटावं, अशी परिस्थिती रोजच दिलीपसमोर तयार होत होती. त्याचा थोडासा बेदरकार, बंडखोर स्वभाव बिघडायचं म्हटलं, तरी या तीनही रस्त्यांना चुकवू शकत नव्हता. आज, उद्या, नाहीतर परवा दिलीपच्या कर्तृत्वसंपन्न अशा प्रवासाची गाडी या तीनही भक्कम पुलांवरून धावणार, हे बहुधा तेव्हाच निश्चित झालं ह्योतं. दोनही भावांचं एक अनोखं नातं आकाराला येत होतं. कोणत्याही नात्यांच्या कोष्टकात ते बसणारं नव्ह्तं. खरं तर पाच-दहा मिनिटांच्यावर दोघंही एकमेकांच्या समोर थांबत नसत. कबूल करत नसेल, पण दिलीपला भाऊबद्दल एक आदरयुक्त भीती वाटायची. म्हणूनच दोघांच्या मध्ये संकोचाचा एक पडदा निर्माण झाला होता. त्यांना संवादासाठी तिस-या व्यक्तीची गरज भासायची. मी पण ब-याच वेळा ही भूमिका निभवायची. भाऊ गंमतीनं मला बफर म्हणायचा. मध्ये कोणी तरी बफर असल्यावर दोघंही खुलायचे. जे इतर तिथे हजर असायचे, त्यांना दोघांमधली बौद्धिक चमक जाणवल्याखेरीज राहायची नाही. शेरेबाजीसह बोलणं अनेक विषयांना स्पर्शून जायचं. घरातला सासू-सुनेचा कळीचा मुद्दा असो, कधी व्यवसायातली देणीघेणी असोत, कधी माणूस अंकावर आलेली कायदेशीर नोटीस असो, तर कधी डॉक्टरी इलाजासाठी पैशाची जमवाजमव असो, कितीही गंभीर ताण असला तरी, दोघांच्या बोलण्यातून हलका होत असे. प्रश्न मिटलेला नसे, पण तात्पुरती वाट शोधली जात असे.
एकूण दोघंही एकमेकांशिवाय हरवल्यासारखे असायचे. दिलीपचं नुसतं जवळपास असणं भाऊला पुरेसं असायचं. तर भाऊचं नसणं म्हणजे दिलीपला सूर सापडत नसल्याचं जाणवायचं. इतर वेळी एकमेकांचा अभ्यास करणं, एकमेकांना नकळत न्याहाळणं, न सांगताच दुस-याची अडचण ओळखणं, पहिल्याची काळजी करणं, असं गुंतागुंतीचं नातं दोघांमध्ये एकाच वेळी विणलं जात असावं. दिलीपचं वाचन, हुषारी, निरीक्षण या सगळ्या बाबींचा भाऊ मनापासून अंदाज घेत होता, आपल्याबरोबर पुढच्या वाटचालीत दिलीप असावा, ही त्याची इच्छा होती, स्वप्नं होतं. पण ते दिलीपच्या पुढाकारानंच प्रत्यक्षात येणं त्याला अभिप्रेत असावं. त्यासाठी भाऊनं आपला एकही शब्द खर्ची घातलेला नसावा. आपल्यापेक्षा जास तडफेनं दिलीप या क्षेत्रात काम करेल, याबद्दल भाऊला ठाम खात्री होती. दिलीपचा निवडक मित्र परिवार, उत्तम आणि दर्जेदार वाचनाकडे कल, आपलं म्हणणं विचारपूर्वक पटवून देण्याची हातोटी, मत मांडण्याची पद्धत, हे सर्व आपल्या व्यवसायाशी, ध्येयवादाशी कुठे तरी निगडित आहे, असं भाऊला वाटायचं. मात्र दिलीपच्या स्वागतासाठी उत्सुक असलेला भाऊ त्याच्या बाबतीत निमंत्रणाचा धोका पत्करायला तयार नव्हता. ’सावध’पणा हा स्वभाव विशेष आमच्या आईनं दोन्ही भावांमध्ये खुबीनं पेरलेला असावा. पुढील सहप्रवासात दोघाही भावांनी तो अतिशय कौशल्यानं हाताळलेला दिसतो.
सरतेशेवटी साधारण १९६६ साली दिलीप ख-या अर्थानं भाऊचा साहाय्यक म्हणून ’माणूस’ मध्ये प्रवेशकर्ता झाला. शेवटी काळाची, वेळेची म्हणून काही मागणी असतेच. तसा ’माणूस’ला आलेला ’एकसुरीपणा’ बदलायला हवा होता. याच बाजूवर दिलीपनं काम करणं अपेक्षित होतं. एकमेकांना समजून घेण्याची क्षमता दोघाही भावांमध्ये पूर्णपणे असल्यामुळे ’निर्णयस्वातंत्र्य’ ही दिलीपची गरज भाऊनं ओळखली होतीच. दिलीप स्वत:च्या पद्धतीनंच काम करणार होता. जाहिरातींना आपल्याकडे वळवण्यासाठी ’माणूस’चं दृश्यरूप बदलायला हवं होतं. रंगीत मुखपृष्ठाबरोबर हाताला गुळगुळीत स्पर्शही हवा होता. चित्रपट विषयांचा अंतर्भाव करून थोडासा चटपटीत मजकूरही भुरभुरायला पाहिजे होता. गंभीर मजकुराबरोबर हलकं फुलकं विनोदी लिखाण, कागदाचा दर्जा आणि पृष्ठसंख्या अशा अनेक बाबींवर दिलीपनं परिश्रम घ्यायला हवे होते. सर्वात महत्वाचं म्हणजे यासाठी लागणारं आर्थिक धाडस पेलायला हवं होतं.
भाऊला नेहेमीच नशिबाशी खेळ करत जगणं आवडायचं. आपल्याला प्राक्तन प्रतिकूल होतय असं वाटलं की तो जास्तच इरेला पेटायचा. सतत टोकाची भूमिका घ्यायचा. परिणाम आणि निर्णय चुकले तरी त्याला पर्वा नसायची. घरगुती असो, वैयक्तिक असो वा व्यावसायिक असो, त्याचा हट्टीपणा अवेळी आणि त्रासदायक आहे, असं जाणवत असे. कोणतीही तडजोड करणं म्हणजे आपण हार पत्करली, असंच त्याला वाटायचं. याउलट दिलीपनं स्वत:ला समजायला लागल्यापासून केलेली वाटचाल ही नशिबाचा कौल लक्षात घेऊन केलेली दिसते. स्वत:चा निर्णय कृतीत आणताना त्यानं नियतीचा कौल प्रमाण मानलेला आहे. प्रसंगी तशीच वेळ आली, तर पांढरं निशाण दाखवून तो मोकळादेखील होतो.
हा मूळ वृत्तीतला फरक, की मोठ्याच्या अनुभवातून धाकट्यात झालेला बदल आहे, कुणास ठाऊक! काहीही असो, पण एकमेकांच्या नातेसंबंधात किंवा व्यवसाय प्रवासात हा फरक कधीही आड आलेला नाही.
दिलीप मनात म्हणायचा, ’मी करायचं ठरवतोय, बघूया उद्या श्रीभाऊ काय म्हणतोय ते’, तर भाऊ म्हणायचा, ’हे धाडस बहुधा दिलीपच्या अंगावर येणारसं दिसतय, पण करू देत. तयारी तर दिसतेय! आणि आपण आहोतच.’
असं कौतुक आणि आदर दोघांकडूनही सांभाळला जायचा.