Friday 14 May 2010

एका स्टुडिओचे आत्मवृत्त

एका स्टुडिओचे आत्मवृत्त

प्रभाकर पेंढारकर

राजेंद्र प्रकाशन, पृष्ठे : १९८, मूल्य : ३५० रुपये

दाहक पर्व


आज तारीख आहे ३० जानेवारी. हे साल आहे १९४८.
स्टुडिओत इतर दिवसांसारखा हा एक दिवस. आणि दुपारी बातमी आली. महात्मा गांधींची दिल्लीत हत्या झाली. ती कोणी केली ते समजलच नव्हतं.
पण सारा देश हादरून गेला.
तसाच दुसरा दिवस उजाडला. त्या भयानक बातमीनं अद्यापही देश बधीर झाल्यासारखा. आणि मग बातमी आली. ही हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका स्वयंसेवकानं केली. हा पुण्यात राहणारा. ब्राह्मण. त्याला तेथेच पकडले होते. त्याची चौकशी होईल. त्याला शिक्षा होईल. पण आपण काही केले पाहिजे. या संघाला धडा शिकवला पाहिजे. ब्राह्मणांवर सूड उगवला पाहिजे. अशी कोल्हापुरात जागोजागी बोलणी होत होती.
दुकाने बंद होती. सर्व बाजार बंद होता. रस्त्यातून हिंडणारे लोक स्टुडिओच्या समोर आले. फाटक बंद होते. ते उघडून आत आले. आणि पाहता पाहता हा जमाव वाढतच गेला. स्टुडिओचा परिसर या सूड घ्यायला आलेल्या माणसांनी भरून गेला. मी पाहतच राहिलो. आता काय होणार याची मला कल्पना येईना. हे लोक कोण आहेत? गांधीभक्त? त्यांच्या पक्षाचे? त्यांच्या विचारांचे?
हा सूड घ्यायचा म्हणजे गांधीजींची हत्या करणा-यांचा नि:पात करायचा. मग हा स्टुडिओ त्यातलाच एक! तो फोडला पाहिजे. बंद दारांना कुलुपे होती. ती काढण्याऐवजी दारेच फोडूया. दगड, काठ्या हाती सापडेल त्याने दारे फोडली गेली. जमाव आत घुसला. कॅमेरा विभागात शिरला. ध्वनीमुद्रण विभागात घुसला. रंगभूषा आणि वेषभूषा, सुतार खातं, आणि मोल्डिंग खातं आणि पुढं काय करायचं? लूट-लुटालूट! ज्याला जे हवं ते उचलावं. या स्टुडिओला ओरबाडून घ्यावं. कोण विचारणार आहे? एकही वस्तू इथं राहता कामा नये.
स्टुडिओतून बाहेर काढता येईल अशी एक गोष्ट होती, मुंबईतून अलीकडेच आणलेला रेकॉर्डिंग ट्रक. आर.ए.सी. कंपनीची अद्ययावत मशिनरी बसवलेला हा ट्रक बाहेर काढता येईल. तो वाचवता येईल. लॅबोरेटरीत काम करणारे सावंत, ट्रकमध्ये चढले. त्यांनी ट्रक सुरु केला. स्टुडिओच्या फाटकाकडे सावंत तो नेऊ लागले, तसे दोन तीनशे लोक ट्रकसमोर आले. ट्रक पुढे नेणं अशक्य झालं.
"कोठे घेऊन चालला आहेस?"
"विचारता कशाला? ओढा त्याला बाहेर!"
"खेचा, मारा त्याला!"
आणि सावंतना जमावाने खाली खेचले. दोन थोबाडीत दिल्या. बाजूला फेकून दिले. जमाव ट्रककडे वळला. ट्रकच्या काचा फोडल्या. दारे उखडली. आणि आतल्या लक्षावधी रुपयांच्या मशिनरीवर दगड घातले. कधी तोंडातून आवाज निघू नये अशी त्या ध्वनीमुद्रण मशिनची अवस्था करून टाकली.
पण या कॅमे-याचं काय करायचं? एवढा जड आणि बोजड पेटीसारखा हा कॅमेरा न्यायचा तरी कसा? तो इथेच फोडा आणि ध्वनीमुद्रणाची ही यंत्रं? ती येथून काढता येणं कठीण आहे. मग आहे तेथेच तोडा, फोडा, उध्वस्त करा.
आणि सुतार खात्यातले हे रथ - कर्ण पिक्चरच्या वेळी तयार केलेले, त्यातून आपल्याला थोडेच हिंडता येणार आहे? ते फोडा. तोडा. ते तर लाकडाचे, इथेच ते पेटवून द्या.
आणि कौरव पांडवांचे मौल्यवान पोशाख, त्यांची किंमती आभूषणे... त्यांचा आपल्याला काय उपयोग? तेव्हा ते पेटवा. त्यांची होळी करा. आणि हजारो सैनिकांची वस्त्रे-ती तेथेच पेटवली गेली. जे नेता येणार नाही, जे आज आपल्याला उपयोगी नाही ते सर्व पेटवून दिलं गेलं.
मी प्रथम फक्त पाहात होतो.
पण पेटत्या ज्वालांचे चटके मला जसे बसू लागले तसा मी कळवळलो. ते मला फक्त विद्रुप करणार नाहीत, कफल्लक आणि दरिद्री करणार नाहीत तर त्यांना मला जिवंत जाळायचे आहे. माणसे पहिल्या आघाताने बेशुध्द होतात. अधिक हाल झाले तर मरतात. मृत्यू माणसाला केवढे मोठे वरदान. सर्व दु:खांचा, यातनांचा शेवट. स्टुडिओलाही मृत्यू असतो काय? मला तो येणार आहे काय? आता? इथं?

- आता लोक जेथे चित्रीकरण होई त्या स्टुडिओत घुसले. स्टुडिओत सेट मांडण्यासाठी कापडाची आणि लाकडाची फलाटे - ज्यातून राजमहाल, दरबार आणि विविध देखावे तयार केले जात ती सर्व सामुग्री, त्यावर रॉकेल ओतण्यात आले. त्यांनी तर क्षणात पेट घेतला. इथल्या दोन्ही स्टुडिओंना खिडक्या नाहीत. धूर आणि धग आतच कोंदटली. लोक बाहेर पडले. ही प्रचंड होळी पाहू लागले.
ज्यांच्यावर स्टुडिओ उभे केले होते, ते लोखंडी गर्डर्स तापून लाल झाले. छताशी लाईट चढवण्यासाठी लाकडी पायाडे होती. फळ्या होत्या. लाईटस होते. गेल्या वीस-पंचवीस वर्षात इथे तयार झालेली सामुग्री, सगळेच धगधगू लागले आणि कल्पनाही नव्हती अशी भयानक गोष्ट घडली. हे गर्डर्स उष्णतेने वाकले. जमिनीशी त्यांना रोवून ठेवणारे मोठाले स्क्रू वितळले, उखडले गेले आणि प्रचंड मोठा आवाज होऊन स्टुडिओ कोसळला. ही भलीमोठी इमारत आतल्या आत निर्माण झालेल्या पोकळीच्या विलक्षण शक्तीनं खेचून घेतली. त्याचा कानठळ्या बसवणारा आवाज झाला-

जेव्हा जाळण्याजोगं, विध्वंस करण्याजोगं काहीच उरलं नाही, धगधगत्या सामानाची राख झाली तेव्हा ही माणसं तिथून निघाली. विजयाचा, सूडाचा उन्माद त्यांच्या चेह-यावर होता. त्यांना अडवण्याचे, थांबवण्याचे पोलीस आणि सरकारी यंत्रणांनी प्रयत्नही केले नव्हते. आता इथं करण्याजोगं काहीच राहीलं नव्हतं. अद्यापही धगधगती यंत्रसामुग्री आणि जागोजागी राखेचे ढीग... त्याबरोबर एकाकी असलेला मी!

No comments:

Post a Comment