Friday 14 May 2010

हिरावलेले आवाज

हिरावलेले आवाज


संपादन - इलाटा फिलिपोविच / मेलनी चॅलेंजर


अनुवाद : करुणा गोखले


राजहंस प्रकाशन, पृष्ठे : २७६, मूल्य : २०० रुपये

(जगातला चौदा देशातला युद्धकाळ आणि मरणाच्या दारात उभी असलेली मुलं. त्यांच्या घुसमटलेल्या बाल्याच्या अन दबलेल्या मनस्थितीच्या साक्षी अशा डाय-यातले हे काही दिवस.)

शीला ऍलन (दुसरं महायुद्ध, ऑस्ट्रेलिया / सिंगापूर
१९ जानेवारी, १९४२
मत्यूच्या दाढेतून बाहेर खेचून काढणं म्हणजे काय याचा काल प्रत्यय आला. वरती जात असताना मला विमानांची घरघर ऐकू आली. मला आता बॉंबहल्ले करणा-या विमानांचा आवाज चांगलाच ओळखीचा झाला आहे. घरघर हळूहळू जवळ येत होती. हल्ल्यच्या इशा-याची शिटी झाली नाही. कदाचित झालीही असेल, पण आम्हाला ऐकू आली नाही. पण कशी कोण जाणे मी परत जिन्याखाली निवा-याला आले. आई-बाबांनाही ओरडून खाली बोलावलं.
जेमतेम जिन्याखाली पोचलो आणि पहिला बॉंब फुटला. आम्ही घाईघाईनं जमिनीवर उताणे पडलो. स्स्स... धम... एकापाठोपाठ एक बॉंब आदळू लागले. प्रत्येक बॉंब खाली येताना त्याची शिटी ऐकू येत होती. खाली आल्यावर थोडं थांबून बॉंब धम्मकन फुटत होता. खिडकीबाहेरून जाताना जळणा-या बॉंबची ज्वाळा प्रकाशरेषेसारखी वरून खाली उमटताना दिसत होती. आमचा खालचा मजला धक्क्यंनी थरथरत होता. बॉंबच्या दणाणत्या आवाजाला भेदून, लोकांच्या भीतीनं आणि वेदनेनं मारलेल्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. फुटलेल्या आणि धक्क्यानं उघडलेल्या खिडक्यांमधून धूर आणि कसला तरी तीक्ष्ण दर्प येत होता. त्यानं आम्हाला गुदमरायला होत होतं. सगळीकडे धूळ झाली होती. आई हातात डोकं खुपसून रड्त होती. विमानांचा किंवा गोळीबाराचा आवाज थांबला होता. बधिर अवस्थेत जमिनीवर उताणे पडलो असतानाच "सगळं ठीकठाक" चा भोंगा वाजला. आम्ही भीतीनं थरथरत होतो. चेहरे पांढरे फटक पडले होते. हवाई हल्ला थांबला आणि आम्ही अजून जिवंत होतो.
हेलपांडत उठलो. कुठे काही जखमा तर नाही ना झाल्या ते पाहण्यासाठी अंगभर चाचपडत अंगावरची धूळ झटकली. आम्हाला काहीही झालं नव्हतं. हात-पाय सगळं शाबूत होतं. मानसिक आणि भावनिक दृष्ट्या ठीक होतो का नाही हे मात्र सांगता आलं नसतं. त्या थोड्याशा कालावधीत, जमिनीला नाक लावून पडलेली असताना मी वयानं एकदम मोठी झाले, खूप मोठी, खूप भयभीत.
सिमेंट-प्लास्टिकचे ढिगारे, फुटलेल्या दगड-विटांचे तुकडे, तुटलेल्या टेबल-खुर्च्या आणि मृतदेह, यांच्यामधून वाट काढत आम्ही बाहेर पडायला लागलो. बिचारे! ते वेळेवर आस-याला येऊ शकले नाहीत. हवेत सगळीकडे धूळ, धूर, घाणेरडा वास ओकणा-या ज्वाळा दिसत होत्या. शुद्ध हवा कुठे उरलीच नव्हती. त्यामुळे श्वास घेताना गुदमरायला होत होतं.
हे सगळं आईच्या आवाक्याबाहेरचं होतं. तिला हाताला धरून वरती नेताना ती जवळ जवळ बेशुद्ध पडायच्या बेतात होती. बीच रोड बंद केला होत्या, म्हणून आम्ही नॉर्थ बीच रोडनं जायचं ठरवलं. सगळीकडे मृतदेह आणि शेवटची घटका मोजणारेच दिसत होते. अनेक जणांना गंभीर जखमा झाल्या होत्या. अजूनही गरम असलेल्या रक्तात लोळणारी ती शरीरं, अनेकांमधून संथपणे वाहणारे रक्ताचे ओहळ, त्यांच्याभोवती जमलेली रक्ताची डबकी हे सगळं बघून अंगावर काटा येत होता. सर्वत्र लाल रंगाचं प्राबल्य झालं होतं. कुठेही बघा, सगळीकडे मृतदेह आणि मरणासन्न माणसंच दिसत होती. बायका, पुरुष, लहान मुलं. त्यातल्या अनेकांना महाभयानक जखमा झालेल्या. त्या दृश्याचं वर्णन करायचं तरी कसं? मानवी जीव क्षणाक्षणानं विझून जातानाचं ते करुण दृश्य वर्णायला माझ्याकडे शब्दच नाहीत. ती निरर्थक जीवितहानी, वेदनेनं, भीतीनं किंवा काहीतरी गमावलं म्हणून रडणारी लहान मुलं, अनेकांनी अनुभवलेल्या आणि अजूनही भोगत असलेल्या मरणप्राय यातना! काय ही दु:खान्तिका!
याला युद्ध म्हणतात तर! हे आहेत युद्धाचे परिणाम! किती हे जीवनाचं नुकसान! केवढा हा विध्वंस! तरुण आणि वृद्ध, नवे आणि जुने या दोघांचाही विनाश. आजूबाजूचं दृश्य पाहताना माझ्या डोक्यात विचारांचं काहूर माजतं. मी आता स्वच्छंदी मुलगी राहिलेली नाही. यापूर्वी शांत, निरागस, आनंदी जीवन जगणारी. पण आता भेदरलेली, अनिश्चिततेचं सावट असणारी सतरा वर्षीय किशोरी झाले आहे. माझ्या भोवतीचं संवेदनशीलतेचं आवरण कुणीतरी खेचून काढलय, मला उघडं नागडं झाल्यासारखं वाटतय. ज्या जगात माझा जन्म झाला, त्या जगात दुष्ट प्रवृत्तींचा भडका उडालाय, आणि ते आता मला माहीत झालय. मला या सगळ्यापासून दूर पळून जायचय. जगात इतकं काही वाईट घडतय हे वास्तव मला नजरेआड करायचय.
अचानक एक म्हातारी बाई मला दिसली आणि माझं आतडं बाहेर येतय की काय असं मला झालं. ती अगदी शेवटचे आचके देत होती. तिच्या डोक्यातून आणि तोंडातून रक्त येत होतं. एक पाय मुडपून तिच्याच अंगाखाली तुटून पडला होता. कोथळा उघड्यावर पसरला होता आणि त्यावर माशा घोंघावत होत्या. एक हात गायब होता. तिचे डोळे माझ्याकडे रोखून बघत होते. मी ते बंद करण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा ते उघडायचे. ते दृश्य बघून मी थरथरायला लागले. जळालेल्या त्वचेचा वास मला असह्य होत होता.






No comments:

Post a Comment