Friday 14 May 2010

केशवराव कोठावळे पारितोषिक ग्रंथ

केशवराव कोठावळे पारितोषिक ग्रंथ


संपादक : विलास खोले


मॅजेस्टिक प्रकाशन, पृष्ठे : २३८, मूल्य : २५० रूपये



केशवराव कोठावळे ( २१ मे, १९२३-५ मे, १९८३) व त्यांचे मॅजेस्टिक प्रकाशन ही मराठी प्रकाशनव्यवसायावरील अमिट मुद्रा आहे. स्वत:च्या कल्पकतेने, संयोजनकौशल्याने व एकहाती नियंत्रणपद्धतीने केशवरावांनी ती उमटवली आहे. त्यांचे नाव आणि त्यांचे वाडमयीन क्षेत्रातील कार्य सगळ्यांना सुपरिचित आहे. मॅट्रिक होण्यापूर्वीच शाळा सोडलेल्या केशवरावांनी फूटपाथवरच्या पुस्तकविक्रीपासून आपला व्यवसाय सुरू केला, हे सर्वांना ठाऊक आहे. सिनेमाची तिकिटे विकण्यासारखे फुटकळ प्रकार करूनही त्यांनी काही दिवस अल्प प्रमाणात अर्थार्जन केले. काही काळ रोज झोपण्यासाठी मौज प्रेसच्या जागेचा आश्रय त्यांना घ्यावा लागला. परंतु यातून बाहेर पडायचेच असे निश्चयपूर्वक ठरवून त्यानुसार एकेक पाऊल पुढे टाकीत केशवरावांनी स्वत:ची बादशाही मिळकत उभी केली. औदुंबराच्या झाडाखालच्या मॅजेस्टिक सिनेमाजवळच्या लहानशा दुकानापासून गिरगावातील प्रसाद चेंबर्समधल्या अद्ययावत कार्यालयापर्यंत आणि पुण्यातल्या तीनमजली भव्य इमारतीपर्यंत आपल्या प्रकाशनव्यवसायाचा विस्तार घडवून आणला. दारिद्र्याचे चटके आणि समृद्धीचे वैभव दोन्ही अनुभवले. त्यांचे बहुतेक निर्णय अचूक ठरले आणि दैवयोगाच्या भरवशावर व ग्राहकांविषयीच्या अंदाजावर प्रकाशन व्यवसायात त्यांनी मोठी मजल मारली.
१९६४ मध्ये त्यांनी ललित मासिकाचा प्रारंभ केला आणि साहित्यिक चर्चाविनिमयाचे व वृत्तविशेषाचे एक विश्वासार्ह माध्यम त्यातून त्यांनी निर्माण केले. १९६९ मध्ये त्यांनी लॉटरीच्या तिकिटांचा व्यवसाय सुरू केला. लॉटरीच्या तिकिटांवरील कोठावळ्यांचा शिक्का इतका लोकप्रिय झाला की हे तिकीट घेतले की लॉटरी लागणारच असा विश्वास ग्राहकांच्या मनात निर्माण झाला. यातून मिळालेल्या उत्पन्नाचा काही भाग मॅजेस्टिक प्रकाशनाच्या वाट्याला येत राहिला. मौज, पॉप्युलर, कॉन्टिनेन्टल यांसारख्या नामांकित प्रकाशनसंस्था प्रभावीपणे कार्यरत असताना मॅजेस्टिक हे नाव त्यांच्या जोडीला आणून ठेवणे ही अवघड कामगिरी केशवरावांनी तुलनेने अल्पावधीत पार पाडली.
यशस्वी प्रकाशक म्हणून प्रस्थापित झाल्यानंतर साहित्यसंस्थांच्या कारभारात आणि साहित्य संमेलनांच्या उलाढालीत त्यांनी लक्ष घातले. आवश्यक ती मेहनत करून तेथेही अपेक्षित असे यश त्यांनी मिळवले. एव्हाना त्यांच्या वयाची साठी जवळ आली होती. २१ मे १९८३ या दिवशी त्यांच्या साठीचा कार्यक्रम करायचा असे त्यांच्या कुटुंबियांनी व मित्रांनी ठरवले. पण दुर्दैवाने तो योग यावयाचा नव्हता. त्या काळात पुण्यात चालत असलेला मॅजेस्टिक गप्पांचा कार्यक्रम १ मे १९८३ रोजी सुरू झाला होता आणि ५ मे रोजी केशवराव हे जग सोडून गेले. मधुमेहाचा आणि ह्र्दयविकाराचा आजार त्यांना जडला होता. परंतु त्यांच्या अविरत काम करत राहाण्याच्या सवयीमुळे आणि एकापाठोपाठ एक नवनव्या योजना, नवनवे प्रकल्प हाती घेण्याच्या आणि मार्गी लावण्याच्या स्वभावामुळे त्यांच्या आजाराची तीव्रता इतर कोणाला किंवा त्याना स्वत:लाही कितपत जाणवली होती, हे सांगणे कठीण आहे. साठीचा कार्यक्रम होण्याआधीच मृत्यूने त्यांना गाठले.
त्यांच्या साठीच्या निमित्ताने दहा हजार रूपयांचे एक ग्रंथपारितोषिक ठेवावे असे त्यांचा मुलगा अशोक कोठावळे याच्या मनात होते असा उल्लेख जयवंत दळवी यांनी केशवराव गेल्यानंतर त्यांच्यासंबंधी जो लेख लिहिला त्यात केलेला आहे. केशवराव असते तर या ग्रंथपारितोषिकाचे स्वरूप अंतिमत: कोणत्या प्रकारचे झाले असते, त्याची व्यवस्था कशा प्रकारे केली गेली असती, हे आज सांगणे अवघड आहे. परंतु केशवरावांचे देहावसान झाल्यामुळे केशवराव कोठावळे ग्रंथ पारितोषिकाची योजना त्वरेने मार्गी लागली. आणि ५ मे १९८५ रोजी केशवरावांच्या स्मृतीदिनी अकरा हजार एकशे रुपयांचे पहिले पारितोषिक मी एस. एम. या ग्रंथास दिले गेले. जे पारितोषिक केशवरावांच्या हयातीत त्यांच्या गौरवार्थ दिले जावयाचे ते त्यांच्या स्मृतीदिनी देण्याचा प्रसंग आला. तेव्हापासून आजपर्यंत ही योजना अखंडपणे चालू आहे. २००९ हे या योजनेचे पंचविसावे वर्ष.
पंचवीस वर्षातील पंचवीस पुस्तकांवरील पंचवीस लेख, या पुस्तकात एकत्रित वाचता येतील. सर्व पुस्तके वेगवेगळ्या प्रकृतीधर्माच्या लेखकांच्या प्रतिभाशक्तीचा रूपसंपन्न आविष्कार घडवणारी आहेत. यापैकी प्रत्येक पुस्तक अंतर्बाह्य स्वरूपात स्वतंत्र गुणवैशिष्ट्यांनी समृद्ध आहे. अंतरंग सामर्थ्यामुळे खोलवर नेणारे आहे आणि आशयव्याप्तीमुळे मराठी साहित्याचे क्षेत्र विस्तारणारे आहे. वाचकांची वैचारिकता, तर्कशक्ती, सामाजिक जाणीव, मानसिकता, भावनिकता यांना आवाहन करणारे आहे.
विलास खोले

No comments:

Post a Comment