Friday 14 May 2010

झुळूक अमेरिकन तो-याची

झुळूक अमेरिकन तो-याची


शरद वर्दे


मॅजेस्टिक प्रकाशन, पृष्ठे : १९५, मूल्य : २०० रुपये

अमेरिकेतल्या हॉटेलांची नावं मोठी घोळ घालणारी असतात. दोनच दिवसांपूर्वी शुक्रवारी संध्याकाळी सिनेमा बघायला म्हणून आम्ही सगळे बाहेर पडलो होतो. फिरता फिरता बोर्ड दिसला " थॅंक गॉड, इटस फ्रायडे". मी म्हटलं, चला अनायासे आजच्या वाराचंच नाव असलेला सिनेमा लागलाय. तोच बघून टाकूया. अखिल एस बडे कुटुंब भांग चढल्यासारखं हसतच राहिलं. अर्धाएक तास. मग कळलं की ते एका रेस्टॉरंट चेनचं नाव आहे. आता मी निर्ढावलोय. जंगल बुक, जॉज, क्रोकोडाईल डंडी ही सिनेमाची नावं नसून खाद्यगृहांची नावं आहेत असं जर का एखाद्या अमेरिकावासी भारतीयानं सांगितलं तर मी खुशाल त्याच्यावर विश्वास टाकेन आणि ऒशियन्स एलेव्हन नावाच्या पाटीखालून आत शिरून बिनदिक्कत नवरत्न कुरम्यासारखं महासागरातल्या अकरा माशांचं कालवण मागवीन.
सगळीच अमेरिकन मंडळी खाण्यात अगदी बकासुरासारखी तगडी. अगदी पूर्वीपासून म्हणजे एकोणिसाव्या शतकातही अमेरिकन घराघरातून हात सोडून वाढलं जायचं. तीच प्रथा मग अमेरिकन खानावळींनी उचलली आणि आजतागायत जपलीय. मंडळी सढळ हाताने वाढतात आणि तब्येतीत खातात. जगाच्या पाठीवर कुठेही जन्मलेल्यांची अमेरिकन प्रजा तर या बाबतीत अग्रगण्य. मॅक्डोनाल्डमध्ये जा. तिथे पाव किलोचा बिग मॅक. त्यानं पोट भरणार नसेल तर त्याच्या दीडपट आकाराचा भरपूर चीज घातलेला डबल क्वार्टर पाउंडर कार्य सिद्धीस नेण्यास हजर आहे. सबवेत गेला तर एक फूट लांबीचं सॅंडविच. इतर कुठे अर्ध्या किलोच्या नुसत्या चिकनपट्ट्या, पिझ्झा चौदा इंच व्यासाचा. मिल्क शेक एक लिटर जारमध्ये, चॉकलेट ट्रिपल शेक या नावाने. सगळाच मामला भव्य. परिणाम काय? तर नवी पिढीही भव्य.
अमेरिकनांना खाद्य विभागात हार जात नाहीत ते केवळ चिनी. चिनी बकासूर दिवसातून जितक्या वेळा चरू शकतात, तितक्या वेळा अमेरिकन माणसंच काय पण अमेरिकन म्हशीसुद्धा चरू शकत नाहीत. कधीही बघा, चिनी आपले खा खा सुटल्यासारखे खातच असतात. अखंड बडबडणे आणि अखंड गिळणे. जिभेला उसंत नाही. तरीपण मंडळी नाजूक चणीचीच राहतात. चिन्यांनी खाल्लेलं जातं कुठे ते कन्फ्यूशियसच जाणे.
बिचा-या अमेरिकनांचं तसं नाही. खाल्लेलं मुद्दल व्याजासकट अंगावर चढतं. उंची कमीत कमी सहा फूट, मॅचिंग रूंदी आणि वजन सव्वाशे किलोच्या वर हे अमेरिकन प्रजाजनांचं नॅशनल ऍव्हरेज. परदेशातून नव्याने आयात केलेले प्रौढ स्त्री पुरुष ते खाली खेचतात. कालांतराने अमेरिकेत उत्पन्न झालेली त्यांची पिढी वर खेचते. म्हणजे तुर्कस्तानापासून ते जपानपर्यंतच्या मुळात पाठपोट सपाट असणा-या माताश्री पिताश्रींची अमेरिकेतल्या मराठी मातीतून उगवलेली रोपटी बोल बोल म्हणता कवेत न मावणा-या डेरेदार वृक्षांसारखी फोफावतात.
लठ्ठपणाचा म्हणजे बघा, अमेरिकेत कहरच आहे. तिकडची मांजरंसुद्धा पाहा. भयानक गुबगुबीत असतात. हा एकेक बोका दहा पंधरा किलोंचा. मानवजातीसारखीच त्याची मादी त्याच्याहीपेक्षा वजनदार असते. ही मांजरं ऊन पडलं की घराबाहेर कट्ट्यावर आणि थंडी पडली की घरातल्या सोफ्यावर आळशासारखी लोळत पडलेली असतात. शिवाय त्यांना आयतं कॅटफूड मिळत असल्यामुळे उंदरांना त्यांच्याकडून अभय असतं. उंदीरपण जाड. जवळजवळ आपल्याइथल्या मांजरांच्या पिल्लांच्या आकाराचे. आकस्मिक मृत्यूचं भय नसल्यामुळे तेही निश्चिंतपणे खा खा खातात. न्यूयॉर्कची झुरळंसुद्धा बोट बोट लांबीची. अमेरिकन लोक त्यांना कॉकरोच न म्हणता लाडाने रोच म्हणतात. इतकं रोचक संबोधन अमेरिकन झुरळांच्या नशिबी आहे याची नुसती कुणकुण जरी आपल्या इथं लागली तरी देशी झुरळांचे तांडेच्या तांडे अमेरिकन कॉन्स्युलेटसमोर पर्मनंट इमिग्रेशनसाठी उभे ठाकतील. अमेरिकन बायाबापड्या पण आपापल्या पोरांचेच नाही तर घरातल्या आणि घराबाहेरच्या प्राण्यांचेही खाण्यापिण्याचे अतोनात लाड करतात. सुपरमार्केटमध्ये तर डॉगफूड, कॅटफूड, फिशफूडच काय पण कासवफूड, ससेफूड असल्या अगणित चक्रम वस्तूंनी शेल्फंच्या शेल्फं भरलेली असतात.
एकूण खाण्यापिण्याच्या बाबतीत अमेरिकन्स भलतेच उत्साही. त्यांच्या उत्साहाला उधाण आणण्यासाठी पायाभूत सुविधाही मुबलक. "खा आणि लठ्ठ व्हा" या सरकारी योजनेखाली असंख्य प्रकारची खाद्यगृह पावसाळ्यातल्या शेवाळाप्रमाणे जागोजागी उगवलेली आहेत. इटालियन, मेक्सिकन, चायनीज या ऑल टाईम फेवरीटसबरोबर व्हिएतनामीज, इथिओपियन, लेबनीज अशा एरवी दुर्लक्षित उपप्रांतातल्या भोजनप्रकारांचीही लज्जत चाखू देणारी उपाहारगृहं मोठ्या दिमाखात धंदा करताहेत. फास्ट फूड चेन्स तर अगणित. इतका सगळा खजिना समोर उघडून ठेवल्यावर बिचा-या अमेरिकनांनी करावं तरी काय? मग ते करायचं तेच करतात. खातात आणि लठ्ठ होतात. आणखी खातात आणि आणखी लठ्ठ होतात.

No comments:

Post a Comment