Friday 14 May 2010

वेताळाच्या आरोग्यकथा

रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ


मनोविकास प्रकाशन, पृष्ठे : १७२, मूल्य : १५० रुपये

अशी ही बनवाबनवी
झाडावरील प्रेत राजाने खांद्यावर टाकताच वेताळ वेळ न दवडता बोलू लागला. "राजा, टॉनिक्सच्या सुरस आणि चमत्कारिक कथा संपता संपणार नाहीत. जीवनसत्वांच्या नावाने होणारी लूटमार मी तुला सांगितली. पण जीवनसत्वांच्या सोबतीने खनिज पदार्थांच्या नावाने जी टॉनिक्स विकली जातात, तो सरळ सरळ बनवाबनवीचाच प्रकार आहे.

या औषध कंपन्यांचा विक्रीविभाग मोठा हुषार. सत्य कसे दडवावे, अर्धसत्ये लोकांच्या आणि डॉक्टरांच्या मनावर कशी ठसवावीत, कपोलकल्पित कथांमधून सत्याचा आभास कसा निर्माण करावा हे त्यांच्याकडून शिकावे. त्यासाठी कधी जाहिरातीत ऑफिसातून थकून घरी परतणारा पुरुष दाखवतील. कामाच्या रगाड्याने आंबलेली गृहिणी दाखवतील. सुस्त, निस्तेज मुले दाखवतील, चैतन्य हरवलेला युवक दाखवतील. ही सारी मंडळी निव्वळ टॉनिक घेतल्याने हरणाच्या पाडसाप्रमाणे टणाटणा उड्या मारू लागतात, हे मिथक जाहिरातींद्वारे लोकांच्या मनावर बिंबवले जाते. जाहिरातीतला टॉनिक घेणारा साठ वर्षांचा गृहस्थ मग तरुणाला लाजवणा-या उत्साहाने वावराताना दिसतो. मुलांचा अभ्यासात, खेळात पहिला नंबर येतो. थोडक्यात पैशांच्या मोबदल्यात आपण विकत घेतो ते फक्त स्वप्न, हे ग्राहकाला कळतच नाही. उत्पादनाच्या उपयुक्ततेची शहानिशा करण्याची गरजच त्याला भासत नाही. कारण त्यासाठी काही गोष्टी मुळातून समजून घ्याच्या लागतात. प्रश्न विचारावे लागतात. पाच सेकंदांच्या जिंगल्सच्या युगात एवढा वेळ आणि मनाची तयारी आहे कुणाजवळ?

सर्वसामान्य माणसे स्वप्नांना भुलून टॉनिक्स घेतात, तर डॉक्टर मंडळींना पटविण्यासाठी काही वेगळे प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी शास्त्रीय परिभाषा आणि अर्धसत्यांचा वापर उपयुक्त ठरतो. मी माझ्या पदरचे सांगत नाही. अमेरिकेचे औषध नियंत्रण प्रशासन सा-या जगात अग्रगण्य मानले जाते. त्याचा अहवाल सांगतो की लोह, कॅल्शियम व झिंकशिवाय कोणतीही खनिज द्रव्ये औषधांच्या रुपाने देणे अशास्त्रीय आणि अनावश्यक असते. त्यांचा स्वत:हून वापर करण्यामुळे आरोग्याची हानी होऊ शकते. तुझ्या देशात मात्र खनिज द्रव्ये कोणत्याही प्रमाणात कशासोबतही मिसळून विकली जातात.

औषध कंपन्या डॉक्टरांना सांगतात की कॅल्शियम हा सर्व पेशींचा घटक आहे. विशेषत: हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम हवेच. अगदी बरोबर. पण यासोबत काही महत्वाची माहिती दिली जात नाही. उदा. आपल्या आहारातील कॅल्शियमचे प्रमाण कमी असले तरी आतडी जास्तीत जास्त कॅल्शियम शोषून शरीराची गरज भागवण्याचा प्रयत्न करतात. बहुसंख्य टॉनिक्समध्ये कॅल्शियमचे प्रमाण इतके कमी असते की शरीराच्या गरजेच्या निम्मे कॅल्शियम औषधांद्वारे हवे असेल तर रोज अर्धी-पाऊण बाटली ( सुमारे १०० -१५० मि.ली.) टॉनिक घ्यावे लागेल. कुणी हाडे बळ्कट करण्यासाठी टॉनिक, गोळ्या, इंजेक्शनचा वापर भरमसाठ प्रमाणात केला तर मूत्रपिंडे, ह्रुदय, व रक्तवाहिन्यांवर विपरीत परिणाम होतो, हेही सांगितले जात नाही. आमच्या टॉनिकमधील कॅल्शियम शरीरात अधिक प्रमाणात शोषले जाते, असा दावा करताना कॅल्शियमची आठ संयुगे शरीराला कॅल्शियमसारख्याच प्रमाणात पुरवितात, ही माहिती सोयिस्कररीत्या दडवली जाते.

तुझ्या देशातील टॉनिक्समध्ये तांबे, मॅंगनीज, आयोडीन, फॉस्फरस, पोटॅशियम, क्लोराईड, मॉलिब्लेडनम असे काय वाटॆल ते मिसळलेले असते. आहाराव्यतिरिक्त ही द्रव्ये घेण्याची शरीराला काहीही आवश्यकता नसते. तांब्याचेच उदाहरण घेऊ. पूर्वी एक जाहिरात लोकप्रिय झाली होती. " मी रोज नाश्त्याबरोबर तांबे खातो." म्हणणा-या या जाहिरातीमुळे लोकांना उगीचच वाटू लागले की तांबे घातलेल्या त्या औषधाशिवाय त्यांचा आहार अपूर्ण आहे. मुळात तांब्याची गरज आहारातून पूर्णपणे भागते. कमतरता आढळली तर त्याचे कारण मुळात पोटभर खायला न मिळणे किंवा अर्भकांना सदोष शिशूआहारावर वाढवणे हे असते. तांब्याच्या भांड्यात अन्न शिजवणे, त्यात साठवलेले पाणी पिणे अशा सोप्या उपायांनी तांब्याची कमतरता दूर करणे शक्य आहे. याउलट तांबे शरीरात साठून राहात असल्यामुळे शरीरावर तांब्याचा मारा केल्यास उलट्या, अतिसार, डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. पोटॅशियमचे प्रमाण वाजवीपेक्षा जास्त झाल्यास त्याचे पर्यवसान ह्रुदयक्रिया बंद पडण्यात व मृत्यूत होऊ शकते. अतिरिक्त आयोडिनमुळे गॉईटर होऊ शकतो. जीवनसत्वांसोबत जादा प्रमाणात फ्लोराईड घेतल्यास त्वचा खाजणे, उलणे, सूज येणे, यासारखा त्रास होऊ शकतो. या खनिजद्रव्यांचा शरीराला कोणत्या ना कोणत्या रुपाने उपयोग होत असला तरी औषधांद्वारे ती देण्याचे कोणतेही शात्रीय कारण नाही.

राजा, एकीकडे टॉनिक्समध्ये होणारा खनिज पदार्थांचा वारेमाप वापर आणि दुसरीकडे त्यांच्या कमतरतेमुळे कोट्यावधी स्त्रियांना होणारा ऍनिमिया, अतिसारामुळे शरीराचा खनिज साठा संपल्यावर होणारे मृत्यू, या दोन्ही टोकांची सांगड तू कशी घालणार? या प्रश्नाचे योग्य उतार न मिळाल्यास तू खनिजांच्या अत्याधिक मा-यामुळे हालहाल होऊन मरशील असा मी तुला शाप देईन.

No comments:

Post a Comment