Friday 14 May 2010

केवळ मैत्रीसाठी

केवळ मैत्रीसाठी

उमेश कदम

मेहता प्रकाशन, पृष्ठे : १६०, मूल्य : १३० रुपये


मी दहशतवादी?
"अहो, मी खरच दहशतवादी नाही, तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर!, मी त्या अधिका-यास पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो. पण तो काही ऐकायलाच तयार नव्हता."
आता ही चित्रफित पाहिल्यावर कोण शहाणा माणूस तुम्ही दहशतवादी नाही यावर विश्वास ठेवेल? त्या अधिका-याने मलाच विचारले.
गेले पाच दिवस मी उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे होतो. ताश्कंद येथील आमच्या कार्यालयातील सर्गी राखीमॉव्ह याची व माझी चांगलीच ओळख होती. जिनिव्हा येथील वार्षिक बैठकांदरम्यान त्याची व माझी भेट व्हायचीच. तसेच पूर्वी श्रीलंकेतील कॅंडी या सुंदर गावी झालेल्या एका प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात सर्गी हजर असताना मी तीन व्याखाने दिली होती. ती त्याला खूप आवडली होती. त्यानेच पुढाकार घेऊन मला ताश्कंदला आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याच्या एका स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बोलवावे, असे आमच्या तेथील कार्यालयाच्या प्रमुखांना सुचवले होते.
तीन-चार दिवसांच्या सततच्या कामानंतर आम्हाला थोडासा मोकळा वेळ होता त्या दिवशी ताश्कंदमधल्या काही महत्वाच्या प्रेक्षणीय स्थळांना आम्ही भेटी द्याव्यात असे सर्गीने सुचवले. त्याने आमच्यासाठी ऑफिसची गाडी आणि ड्रायव्हर यांची सोय केली. सर्गी म्हणाला, "येथे जवळच एक कपड्यांचे मोठे दुकान आहे, एक वस्तुसंग्रहालय आहे व एक छोटासा पार्क आहे. तुम्हा लोकांना कुठे जायचे आहे?"
पीटर म्हणाला, "मला वस्तुसंग्रहालय पाहायचे आहे." फ्रॉन्स्वाज म्हणाली, "मला कपड्यांच्या दुकानात जायचे आहे." तर ऑंत्वान म्हणाला,"मी पार्कमध्ये झाडाखाली बसून पुस्तक वाचत बसेन. "
"उमेश, तू काय करतोस?" सर्गीने मला विचारले.
"मला फोटोग्राफीची आवड आहे, मी या ऑपेरा हाऊसचे वेगवेगळ्या बाजूने फोटो घेईन व काही व्हिडिओ चित्रणही करेन. "
ऑपेरा हाऊसच्या उजव्या बाजूला थोडेसे चित्रण करत असतानाच पोलिसासारखा गणवेष परिधान केलेला एक गृहस्थ माझ्यासमोर आला. त्याने मला चित्रण थांबवण्याचा इशारा केला. त्याला इंग्रजी समजत नव्हते. तो मला त्याच्याबरोबर जायचा इशारा करत होता. मला अर्थातच त्याच्याबरोबर जाणे भाग होते. शेजारच्याच एका इमारतीत प्रवेशद्वारातून आत गेल्या गेल्या एक कार्यालय होते. तेथील एका अधिका-यास त्याने त्यांच्या भाषेत माझ्याविषयी काही तरी सांगितले. ते ऐकून तो अधिकारी आश्चर्यचकीत झाला व माझ्याकडे संशयास्पद नजरेने पाहू लागला. सुदैवाने त्याला इंग्रजी येत होते.
"तुम्ही कोणत्या उद्देशाने या इमारतीचे चित्रण करत होतात?"
मी त्याला माझा उद्देश सांगितला.
"ही इमारत अमेरिकन दूतावास आहे. आम्हाला तुमची कसून तपासणी केली पाहिजे." तो म्हणाला.
मागच्याच महिन्यात वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटॅगॉन या ठिकाणांवरील हल्ल्यांपासून अमेरिकन सरकारने आपल्या दूतावासांच्या सुरक्षा व्यवस्थेत आमूलाग्र बदल करून ती अतिशय कडक केली होती. या अधिका-याने आता माझी चौकशी करायची म्हटल्यावर मी मनातल्या मनात स्वत:लाच दोष दिला. छायाचित्रणाच्या हौसेखातर मी विनाकारण अडचणीत आलो होतो. त्यात गेल्या वर्षीपासून मी दाढी वाढवलेली. ब-याच वेळा लोक मला अरब समजायचे.
त्या अधिका-याने माझी व्हिडिओ टेप मागे फिरवून पहिल्यापासून दाखवायला सांगितले. टेप मागे फिरवून कॅमे-राच्या छोट्या पॅनलवर दाखवायला सुरुवात केली.
"हे काय? ताश्कंदचा विमानतळ?"
"हो. परवा इथे पोचल्यानंतर अन्यत्र क्वचितच दिसणारी रशियन बनावटीची टुपॉलोव्ह व अंतोनॉव्ह विमानं पाहायला मिळाली. मला विमानं बनवायला आवडतं." मी खुलासा केला.
"विमान अपहरण करायचा विचार दिसतोय. आताच तर तुम्ही म्हणालात की तुम्ही आंतरराष्ट्रीय कायद्याचे सल्लागार आहात म्हणून. मग एकदम एरॉनॉटीकल इंजिनियर झालात की काय विमानं बनवायला?"
"छे, छे, मला विमानांची छोटी छोटी मॉडेल्स बनवायचा छंद आहे."
"माझा तुमच्यावर मुळीच विश्वास नाही. नक्कीच एखादं विमान अपहरण करायचा किंवा विमानात स्फोटकं ठेवण्याचा तुमचा इरादा असणार! बरं पुढे पाहू काय आहे ते!"
मी पॉज केलेली टेप पुढे चालू केली. काल संध्याकाळी आम्ही सर्वजणं मिळून एका अरेबियन उपाहारगृहात जेवायला गेलो होतो. तिथे वैशिट्यपूर्ण अरेबियन बेली डान्स चालला होता. त्याचेही काही चित्रण मी केले होते.
"अरेबियन उपाहारगृह दिसतेय. तिथे नक्कीच तुमची आणि तुमच्या सहका-यांची गुप्त बैठक झाली असणार. ओसामा बिन लादेनचा सौदी अरेबियात खूप मोठा तळ आहे म्हणे. कित्येक अरेबियन राष्ट्र दहशतवाद्यांना आर्थिक मदत करतात, हे आता सिध्द झालेलं आहे. तुमचा आणि अरेबियन लोकांचा संबंध मला आता स्पष्टपणे दिसून येतो आहे."
आता त्याचा गैर्समज कसा दूर करावा, या संभ्रमात मी पडलो. तो कलुषित नजरेनेच माझ्याकडे पाहत होता. त्याने टेप पुढे चालू करायला सांगितली.
"हे काय? ताश्कंदचा गोल बाजार? गर्दीच्या ठिकाणी बॉंबस्फोट करण्यात दहशतवादी तरबेज असतात, हे जगजाहीर आहे. त्याचीच तयारी दिसतेय." तो म्हणाला.
"अहो, येथील संस्कृती लक्षात राहावी म्हणून हे चित्रण केलं आहे." मी माझा हेतू सांगितला.
"संस्कृती कसली? तुमची दहशतवादी विकृतीच मला यात दिसतेय. पुढे सुरू करा टेप."
नंतर संसद आणि महापौरांचे कार्यालय पाहिल्यावर तो म्हणाला, "पाहा, ताश्कंदमधील अतिमहत्वाच्या ठिकाणांना लक्ष्य बनवायच्या उद्देशानेच तुम्ही हे चित्रण केलेलं आहे, यात शंकाच नाही."
यावर काय बोलावे मला सुचेना. मी टेप पुढे चालू केली. सर्गी आम्हाला एक मदरसा दाखवायला घेऊन गेला होता. तिथे हस्तकलेचे पारंपरिक शिक्षण तरूण मुलांना दिले जायचे. आतमध्ये चित्रण करायला परवानगी नव्हती. मी मदरशाचे बाहेरूनच चित्रण केले होते.
"हे पाहा, तुम्ही मदरशांना भेटी देता म्हणजे तुमचा आणि दहशतवाद्यांचा घनिष्ट संबंध सिद्ध करायला आणखी कसला पुरावा हवा?"
"अहो, एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून त्याचं चित्रण केलं आहे. आयुष्यात पुन्हा कधी ताश्कंदला यायची संधी मिळेल असं वाटत नाही. म्हणून इथल्या आठवणींसाठीच केवळ हे चित्रण केलं आहे. " मी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होतो.
"एकदा इथे दहशतवादी कारवाया करून येथून पळ काढल्यानंतर तुम्ही परत कशाला इकडे याल?"
मी टेप पुढे चालू केली. नंतर ऑपेरा हाऊसचे व त्याच्या परिसरातील इमारातींचे चित्रण होते. ते बारकाईने पाहिल्यानंतर तो म्हणाला, "हे काय, दूतावासाच्या इमारतीचं अगदी सगळ्या बाजूंनी व्यवस्थित चित्रण केलेलं दिसतय. कोणत्या खिडकीतून आत घुसायचं, सुरक्षा कर्मचा-यांना कसं चकवायचं, स्फोटकं कुठे लावायची या तयारीशिवाय दुसरा कसला उद्देश असणार तुमचा? बरं, इतर प्रेक्षणीय स्थळांच्या बाबतीत मी समजू शकतो. पण या इमारतीत तसं पाहण्यासारखं आहेच काय? चित्रण करून जतन करण्याजोगं यात काहीच नाही. दिसायला अगदीच साधी आणि अनाकर्षक अशीच ही इमारत आहे. आता तर माझी खात्रीच पटली आहे. आता पुढच्या चौकशीसाठी आम्ही तुम्हाला ताब्यात घेणार आहोत." तो थंडपणे म्हणाला.
"अहो, दुपारी शिक्षणमंत्र्यांची भेट घ्यायची आहे"
"म्हणजे मंत्रालायालाही लक्ष्य करण्याचा इरादा दिसतोय. बरं झालं, कसलंही दहशतवादी कृत्य करायच्या आधीच तुम्ही आमच्या तावडीत सापडलात. मी आता माझ्या वरिष्ठांना फोन करतोय. कित्येक दिवस एखादी सनसनाटी कामगिरी पार पाडायची वाट्च पाहात होतो. तो योग आज आला. "
"अहो, कृपा करून जाऊ द्या. हवं तर ही टेप तुम्ही ठेवून घ्या."
"छे,छे, आता जायचं ते पोलीस कोठडीतच."
"बरं, माझे सहकारी आता मला भेटण्यासाठी ऑपेरा हाऊससमोर उभे असतील. त्यांच्यात एक स्थानिक सहकारी आहे. तो सगळा खुलासा करेल. तुम्ही चला माझ्याबरोबर." मी त्याला विनंती केली. त्यावर एक मिनिट विचार करून तो म्हणाला, "ठिक आहे. चला तर मग. आणखी काही दहशतवादी माझ्या तावडीत येतील."
माझ्या दोन्ही बाजूला बंदूकधारी पोलीस आणि तो पुढे अशी आमची वरात निघाली. आम्हाला पाहताच माझे सहकारी आश्चर्य चकीत झाले. त्यावर सर्गी उझबेकी भाषेत त्या अधिका-यांशी बोलाला. "उमेश, मी या साहेबांचा गैरसमज दूर केला आहे. पण हे म्हणतात की तुझ्या टेपमधील अमेरिकन दूतावासाचं चित्रण पुसून टाकलं पाहिजे."
हे ऐकल्यावर मी सुटकेचा नि:श्वास टाकला. मनातल्या मनात मी म्हटलं," हवं तर टेप किंवा टेपसहीत कॅमेराही जप्त करा म्हणावं. पण मला दहशतवादी असल्याच्या संशयावरून डांबून ठेवू नका. नाही तर यथावकाश माझी रवानगी ग्वांतानामो-बे कडे व्हायची.
सर्गी, तो अधिकारी, त्याचे बंदूकधारी सहकारी आणि मी त्याच्या कार्यालयात पुन्हा आलो. टेप पुन्हा रिवाईंड करून त्याला दाखवली. ते पाहिल्यावर त्याने मला जाऊ दिले.
"बरं झालं सर्गी तू होतास म्हणून, नाहीतर माझी काही धडगत नव्हती."
एवढ्यात पीटर मला म्हणाला, " माझा आणि ऑंत्वान व फ्रॉन्स्वाजबरोबर एक फोटो काढ." पीटरने आपला कॅमेरा माझ्याकडे दिला.
तो नाकारत मी म्हणालो, "माफ कर पीटर. तू अमेरिकन नागरिक आहेस. आता कोणत्याही अमेरिकन सजीव अथवा निर्जीव गोष्टींचं चित्रण करायचं नाही असा ठाम निर्णय मी घेतला आहे."










No comments:

Post a Comment