Friday 14 May 2010

स्वत:विषयी

स्वत:विषयी

अनिल अवचट

मौज प्रकाशन, पृष्ठे : १५४, मूल्य : १०० रुपये

एकदा नागपूरहून कविमित्र ग्रेस आला होता. आम्ही पुढच्या खोलीत गप्पा मारत होतो. बाहेरून मुलींनी हाका मारल्या. ‘बाबा, लवकर बाहेर बघ. तुझी स्कूटर आम्ही रंगवलीय.’ आम्ही दोघंही बाहेर गेलो. बघितलं, तर मुक्ती आणि यशो डबक्यात उघड्याबंब उभ्या राहून जवळच उभी असलेली माझी स्कूटर चिखलानं सारवून काढत होत्या. मी म्हणालो, ‘वा! मस्त दिसतेय आता स्कूटर.’ ग्रेसने कपाळाला हातच लावला. अजूनही नागपूरला त्याच्याकडे गेलो की तो या प्रसंगाची आठवण काढतो. इतरांनीही सांगतो.
यशो सात आठ महिन्यांची असताना सारखी माझा चष्मा ओढायला बघायची. मी जरा तोंड चुकवायचो. पण नंतर विचार केला की ती काय करतेय ते करू द्यावं. काय जास्तीत जास्त करील, तर फोडील. तसा तिनं चष्मा ओढला. आधी चष्म्याची काडी ताणून ती मोडली. मग एक काडी हातात धरून वरखाली करून चष्मा आपटू लागली. तो फुटला तशी ती माझ्याकडे पाहू लागली. मी रागावेन अशी तिची अपेक्षा होती की काय कोण जाणे, पण मी काहीच बोललो नाही. उलट हसून म्हटलं, ‘छान. आपट आणखी.’ तसा तिनं तो आणखी एकदोनदा आपटला. मग हात वर करून माझ्या हातात दिला. नंतर मी नवा चष्मा घेतला. पण तिनं परत कधी चष्मा ओढायचा प्रयत्न केला नाही. नंतर ओळखीच्या एका चष्मेवाल्याकडं गेलो व म्हटलं, तुमच्याकडं लोकांनी टाकून दिलेली एखादी जुनी फ्रेम आहे का? त्यावर तो म्हणाला, ‘एक काय, भरपूर आहेत. घेऊन जा.’ जुन्या, कुठंतरी तुटलेल्या फ्रेम्सचं डबडंच त्याने माझ्यासमोर ठेवलं. मी त्यातल्या ब-या स्थितीतल्या दोन चार फ्रेम्स घरी आणून मुलींना खेळायला दिल्या. बरेच दिवस त्या फ्रेम्सशी त्या खेळल्या.
कोणी मित्र आले की चहा व्हायचा. मुक्ती लहान असताना लुटूलुटू यायची आणि रिकामी झालेली एकेक कपबशी घेऊन आत जायची. आलेला माणूस दचकून म्हणायचा, ‘बाळ, ठेव ती खाली. तू फोडशील.’ मी म्हणायचॊ, ‘नाही ती व्यवस्थित नेते.’ मुक्ती अगदी सांभाळून कपबशी न्यायची. आणि दारात गेल्यावर कपातला उरलेला चमचा अर्धा चमचा चहा कप वर करून पिऊन टाकायची. हेही लोकांना ऑकवर्ड व्हायचं, पण आम्हाला गंमत वाटायची.
मुंबईचा एक नातेवाईक मित्र आणि त्याची बायको आमच्याकडे भेटायला आली होती. त्यांच्याशी बोलताना यशो माझ्या खांद्यावर चढून डोक्यावर बसायची, तोंड फिरवायची आणि माझ्या पाठीवरून घसरगुंडी करून खाली यायची. मीही तिला तसं करायला सोपं पडेल अशा पोझिशनमध्ये बसलो होतो आणि एकीकडे या पाव्हण्यांशी बोलत होतो. त्याच्या बायकोला शेवटी राहावलं नाही. ती नव-याला म्हणाली, ‘बघा, बघा, इतकी ती मुलगी सतावतेय तरी हे रागावत नाहीत. नाही तर तुम्ही!’ आम्ही सगळेच हसलो. तो मित्र म्हणाला, ‘मी माझ्या मुलाला एकदा सांगतो. ऐकलं नाही तर दुस-यांदा सांगतो. तरीही नाही ऐकलं तर असा सटकावतो की कायम आठवण राहिली पाहिजे.’
लोक मुलांना अशा त-हेने कसं काय मारू शकतात, हे मला आजपर्यंत समजलेलं नाही. एखादा माणूस एरवी वागायला चांगला असला, त्याची मतं, विचार पुरोगामी असले तरी तो मुलांना मारतो असं कळलं किंवा दिसलं की माझ्या मनातून तो संपूर्ण उतरून जातो. यावरून कुणाशी बोलणं निघालं की लोक म्हणायचे, मुलांना धाक हा पाहिजेच. नाही तर ती डोक्यावर बसतात. मी वाद घालायचो नाही. पण वाटायचं, मुलांना एखाद्या गोष्टीपासून धोकाच असेल तर रोखावं. ती विस्तवात हात घालत असतील तर ओढावं. पण तोपर्यंतच्या गोष्टी करू द्यायला काही हरकत नाही. आणि विस्तवाची किंवा सुरी कात्रीची ओळख हळूहळू करून देता येते.
अगदी साध्या साध्या बाबतीत लोक मुलांच्या मनाची हिंसा करतात. मुलानं पेन हातात धरलं की लागलच ते हिसकवलं जातं. आम्ही मुलींना त्यांच्या नावाची, त्यांच्या रंगाची बॉलपेनं आणून दिली होती. तरीही आमच्या पेनांना त्यांनी हात लावला तरी हिसकावत नव्हतो. मी माझ्या टेबलावर लेख लिहीत बसायचो. कागद, पेन तसंच ठेऊन जरा फ्रेश होण्यासाठी बाहेर चक्कर मारून यायचॊ. तेवढ्यात मुक्ती माझ्या खुर्चीत चढून बसायची आणि मी लिहिलेल्या ओळींपुढं, खाली माझ्या पेननं नुसती गुटुळी गुटुळी काढून ठेवायची आणि मला म्हणायची, ‘बाबा, मी बघ लेख लिवला.’ मीही हसून ते पान तसंच सोडून दुस-या पानापासून सुरुवात करायचो.
आपल्या वडिलांना ‘अहोजाहो’ म्हणणारी मुलं पाहिली की मला आश्चर्य वाटतं. (गंमत म्हणजे मीही माझ्या वडिलांना ‘अहो’च म्हणतो). मुलींनी मला ‘अनिल’ म्हणावं असं मला वाटे. काही दिवस त्या तसं म्हणत होत्या. पण प्लोमिना-लक्षीनं त्यांना ‘बाबा’ म्हणायला शिकवलं. पुढं त्या नावाची त्यांनी बरीच रूपांतरं केली. ‘बुबड्या’ म्हणायच्या. माझी दाढी असल्यानं ‘दाढीवाला’ ही म्हणत. मुक्तीनं एकदा ‘तिनति-या’ नाव काढलं होतं. यशो ‘मकड्या’ म्हणे. स्कूटरवरून येतो म्हणून ‘श्रूट-या’ नाव ठेवलं होतं. दोघी आजारी असताना औषध, गोळ्या द्यायचं काम मी करायचो, म्हणून ‘गोळीबाबा’ म्हणायच्या. मला या सगळ्याची गंमत वाटे. त्यांनी मला जास्तीत जास्त आपल्यातलं समजावं अशी माझी धडपड चालू असायची.
त्यांचा मी दोस्त बनल्यानं त्यांच्या मित्रमंडळींचाही मी दोस्त झालो होतो. रात्री गाद्या घातल्यावर आमचे खेळ सुरू व्हायचे. पाठीवर दोन दोन चारचार पोरांना बसवून फेरी मारायचो. गुडघ्याला जमीन रुतायची. पोरांना पाठीवर जागा उरली नाही की एखादं पोर मानेवरही बसे. मग ही वरात गाद्यांवर आणली की अंग घुसळून सगळ्यांना पाडायचं. ती खदाखदा हसत एकमेकांच्या अंगावर पडत. समजा, कुणाला लागलं तरी कुणी तक्रार करत नसे. त्या गडबडीतही परत उठून पाठीवर बसायची धडपड करीत. मग मी पाठीवर पालथा झोपून राही. ही सगळी पोरं पाठीवर बसत आणि अचानक काही तरी ओरडत मी उठे आणि पोरं आधीसारखीच पडत.
कॉलनीतली मुलं आमच्याकडंच जास्त करून असत. आमच्या घरात कशालाही लावायला त्यांना मुभा असे. समजा, फुटलंतुटलंच तर कुणी ओरडत नसे. शेजारी एका भिंतीपलीकडे राहणा-या नटराजांची राजश्री आणि रघू ही दोन मुलं तर कायम आमच्याकडंच असत. रघूला आम्ही ‘घूघू’ म्हणायचो. राजश्री म्हणायची, ‘आपण या भिंतीला भोक पाडू, म्हणजे आमच्याकडनं एकदम तुमच्याकडं येता येईल.’ तिच्या वडलांना सुरुवातीला त्यांच्या मुलांनी आमच्याकडं येण्याचं कौतुक वाटत होतं. पण ती मुलं मला इतकी ऍटॅच्ड होऊ लागली की ते फार अस्वस्थ व्हायला लागले. एक तर त्यांचा स्वभाव कडक, मारकुटा म्हणून मुलं त्यांना भ्यायची. त्यात आमच्याकडं माती मऊ. ते मोठे अधिकारी होते. ऑफिसातनं मुलं घरी आली आणि मुलं घरी नसले की संतापायचे. कामवाल्या बाईला मुलांना आणायला पाठवायचे. एकदा तर त्यांनी स्वत:च्या हातानं राजश्रीला कुत्र्यासारखं उचलून दुस-या हातानं मारत घरी नेलं. या परिस्थितीत काय करावं ते मला कळेना. शेवटी त्यांच्या धाकानं ती मुलं हळूहळू यायची कमी झाली.
समोर माझा मित्र डॉ.उल्हास लुकतुके राहायचा. त्याची मुलगी अदिती हीसुद्धा मला खूप चिकटलेली असे. अनेकदा झोपत नसली की तो तिला आमच्याकडं आणत असे व मी तिला झोपवून देई. कधीही तो तिला घेऊन फिरायला बाहेर पडला की ती हातानं आमच्या घराकडं खूण करत असे. त्यानं दुर्लक्ष करून दुसरीकडं पावलं वळवली तरी ती परत इकडंच हात करून त्याला आमच्याकडं यायला भाग पाडत असे. पण नटराजच्या अनुभवावरून मीही काही शिकलो होतो. दुस-याच्या मुलाला किती लळा लावायचा याला मर्यादा घालत होतो. त्या मुलाच्या मनात त्याच्या वडलांचं स्थान हे माझ्यापेक्षा जास्त जवळचं राहाणं सगळ्यांच्या हिताचं आहे, हे मला पटलं होतं.















No comments:

Post a Comment