Friday 14 May 2010

कटिंग फ्री

कटिंग फ्री

सलमा अहमद

अनुवाद : सुप्रिया वकील

मेहता प्रकाशन, पृष्ठे : २६२, मूल्य : २६० रुपये

चीमीच्या आणि माझ्या नात्यातली वीण उसवत चाललीय हे मला कळून चुकलं होतं. बिना फार हुशार होती. आता ती बोलायला लागली होती. पण तिची सुद्धा माझ्या बाबतीत विचित्र वृत्ती तयार झाली होती. ती आरशासमोर मुरकत म्हणायची, बिना वा वा, ममी छीछी. म्हणजे बिना छान छान आहे आणि ममी वाईट आहे. कशामुळं कोण जाणे पण ती माझ्याशी स्पर्धा करत असायची. आपाजी आणि बिना यांचं चीमीच्या ह्रुदयात खास आणि स्वतंत्र स्थान होतं... मी असेन कुठे तरी दुस-या किंवा तिस-या क्रमांकावर. पण मला या गोष्टीचा त्रास होत नव्हता. मला त्रास व्हायचा तो चीमीच्या संतापाचा. मला त्याच्या संतापाची आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून आकांडतांडव करण्याची भीती वाटायची. मग मी अहमदचा आधार शोधायची. त्यांच्याशी बोलायची आणि तेही मला धीर द्यायचे. माझ्या दु:खावर फुंकर घालायचे.
एके दिवशी मी अहमदना घ्यायला फॅलेट्टी हॉटेलमध्ये गेले होते. अकस्मात चीमीची कार मागून येताना दिसली. तो माझ्या मागं फॅलेट्टीत आला होता. त्याची गाडी माझ्या गाडीला ओलांडून पुढं नेत म्हणाला, ‘घरी चल.’
अहमद नवाज त्यांच्या खोलीत बूट घालत होते. त्यांनी खिडकीतून हा तमाशा पाहिला आणि आता गोंधळ होणार हे त्यांच्या लक्षात आलं. ते अनवाणी पायांनीच हॉटेलमधून धावत बाहेर पडले आणि चीमीच्या मागोमाग गाडी घेऊन आले. भयानक अवस्था झाली होती. मला तर काय घडलय तेच कळलं नव्हतं. नंतर मला समजलं की तसनीमनं आपाजींना मी फॅलेट्टीमध्ये निघालेय आणि चीमी ‘भाईजान’ना ही गोष्ट ताबडतोब कळवली पाहिजे. फॅलेट्टीमध्ये जाण्याच्या आधी मी तसनीमकडे गेले होते.

आम्ही घरी गेलो. चीमीने माझे केस धरून दरादरा ओढत मला माझ्या खोलीत नेलं. अहमद नवाजही आमच्या मागोमाग आलेच. चीमीनं खोलीचं दार त्यांच्या तोंडावरच धाड्कन बंद केलं. आता मी आणि चीमी दोघंच होतो. चीमी एक शब्दही बोलला नाही. त्यानं कात्री घेतली... मी भयानं बेशुद्ध पडायची बाकी होते... आणि त्यानं माझे केस कापायला सुरुवात केली. माझ्या मनात आलं, आता हा फक्त केसच नाही तर कदाचित नाकसुद्धा कापेल... ‘पापी’ महिलेला शिक्षा करण्याचा पारंपरिक मार्ग. माझे केस कापून झाल्यानंतर त्यानं मला त्याच्या गाडीत घातलं आणि गाडी जिमखाना क्लबकडे घेतली... त्या परिसराभोवती चकरा मारल्या आणि गाडी परत वळवली.
मग आम्ही घरी आलो. चीमीची शांतता भयावह होती. आम्ही आमच्या खोलीत बसलो होतो. वातावरण एकदम शांत आणि धडकी भरवणारं होतं. त्यानंतर चीमी बिछान्यावर आडवा झाला आणि गाढ झोपी गेला. चीमीला झोप येत नसली की तो बेन्झेड्रिनच्या गोळ्या घेत असे. ‘पॉयझन’ असं लिहिलेली ती बाटली मला माहीत होती. मी ती बाटली शोधून काढली. त्यात जवळ जवळ दोनशे गोळ्या मिळाल्या. माझी जगण्याची इच्छाच नाहीशी झाली होती. मी कसलाही विचार न करता गोळ्या गिळत राहिले. मग मला झोप आली असावी किंवा मूर्च्छा.... कारण त्यानंतर मी आपाजींचा आरडाओरडा ऐकला.
‘चीमी, तिला गंगाराम हॉस्पिटलमध्ये घेऊन चल. आपण तिला इथं घरात मरू द्यायचं नाही. चल, पटकन चल.’
चीमीनं माझ्या अंगावर ब्लॅंकेट घातलं. दरम्यान मी जागी झाले होते.
‘चीमी, माझ्या हातून काहीही चूक घडली नाहीये. मी अहमदना फक्त गोल्फसाठी घ्यायला गेले होते.’ मी पुन्हा पुन्हा सांगत होते.
त्यावर चीमी म्हणत होता, ‘सगळं काही ठीक होईल. बोलू नकोस.’
आमच्या सोबत आपाजीही हॉस्पिटलमध्ये आल्या. माझ्या पोटात ‘पंपिंग’ करण्यात आलं. ते अतिशय त्रासदायक होतं. पण अखेर त्यांनी पोट स्वच्छ केलं. माझ्या दृष्टीनं सुदैवाची गोष्ट म्हणजे मला अगदी वेळेवर दवाखान्यात नेलं होतं. डॉक्टर रात्रभर प्रयत्न करत होते.
दुस-या दिवशी पहाट फुटण्याआधी चीमीनं मला घरी आणलं.
त्या पुढच्याच आठवड्यात ममी आणि नय्यर मुमानी मला भेटायला येणार होत्या. त्या रावळपिंडीला राष्ट्राध्यक्ष अयुब यांच्या पत्नीला भेटायला जाणार होत्या. मला बिछान्यात आडवी, क्षीण आणि प्रेतवत पाहून ममीला धक्काच बसला. माझं वजन जवळ जवळ वीस पौंडांनी उतरलं होतं. मी ममीला पाहून खूप रडले. मला घरी घेऊन चल म्हणाले. मला लाहोरची चीड आली होती. इथून पुढं तिथं राहाणं मला शक्यच नव्हतं. डॅडींची इराणमध्ये नियुक्ती झाली होती. आईनं मला घेऊन जाण्यासाठी चीमी आणि आपाजींपुढं पदर पसरला. पण त्या दोघांनाही पाझर फुटला नाही.
चीमी म्हणाला, ‘लग्न झालेल्या बायका पुन्हा आईवडिलांकडे जात नाहीत. आम्ही त्यास परवानगी देणार नाही.’
ममी माझ्या काळजीचा भुंगा बरोबर घेऊन गेली.

No comments:

Post a Comment