Friday 14 May 2010

एक ‘इझम' निरागस

एक ‘इझम' निरागस


सुहासिनी मालदे


राजहंस प्रकाशन, पृष्ठे : १८२, मूल्य : २०० रूपये

आयेषाची आई एक मोठा पुठ्ठ्याचा खोका घेऊन आली. आयेषा खूपच गोड, सुंदर मुलगी आहे. अगदी एखाद्या बाहुलीसारखी! आम्ही सगळे आश्चर्यानं बघत होतो की आता या खोक्याचं काय करणार? आयेषाच्या आईनं तो खोका उभा करून ठेवला आणि बार्बी डॉलच्या वेषात असलेल्या आयेषाला त्या खोक्यात उभं केलं. समोर बाहुलीच्या डब्याला असतं तसं झाकण लावलं. ती बनली होती बार्बी डॉल! एरवी खूप हायपर असलेली आयेषा, त्या खोक्यामध्ये अगदी शांत, काहीही हालचाल न करता उभी होती. अगदी खरी, सुंदर बाहुलीच वाटत होती. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. असे एक एक वेगवेगळे पोशाख करून मुलांनी सगळ्यांना मोहवून टाकलं.
'आयेषाला असं बार्बी डॉल बनवून खोक्यामध्ये उभं करण्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली?' स्पर्धा संपल्यावर मी आयेषाच्या आईला विचारलं.
त्यांनी सांगितलं, ' लहानपणापासूनच आयेषाला अडगळीच्या ठिकाणी लपून बसायला आवडतं. एक दिवस आमच्याकडे मोठा रंगीत टीव्ही आणला. तो जागेवर ठेवला आणि त्याचा रिकामा खोका बाल्कनीत ठेवून दिला. एक दिवस आयेषा खूप हायपर ऍक्टीव्ह झाली होती. ती घरभर वस्तूंची फेकाफेक करत होती. अचानक ती धावत बाहेर आली. तिनं तो खोका पाहिला. तो उघडून ती त्यात जाऊन बसली. वरून झाकण बंद करून घेतलं. आम्ही तिला बाहेर काढायचा प्रयत्न केला. परोपरीनं समजावलं, पण ती बाहेर यायलाच तयार नाही, नंतर ती रोजच त्या खोक्यात जाऊन बसायला लागली. कदाचिअत तिला तिथे सुरक्षित वाटत असेल.
पुढे पुढे हे प्रकरण फारच वाढलं. आयेषा सतत त्या खोक्यामध्येचसून राहायला लागली. काही हवं असेल तर झाकण किलकिलं करून, त्या फटीतून बघून आरडाअओरड करायची. मग त्या खोक्यासकट तिला फिरवायला लागायचं. या ऑटिझम असलेल्या मुलांचं वागणं विक्षिप्तच असतं. एखादी गोष्ट एखाद्या पध्द्तीनं करायची त्यांच्या मनानं घेतलं की ते तसच करत राहातात. घरातल्यांना खूप त्रास होतो, पण त्यांना खूप सांभाळून, समजून घेऊन, हुशारीनं त्या सवयी सोडवायला लागतात. एक दिवस मी कुठल्या तरी पुस्तकात वाचलं की या मुलांना काही प्रकारचे वास आवडत नाहीत. काही मुलांना आवाज आवडत नाहीत, किंवा काहीना स्पर्श आवडत नाही. त्यानंतर मी लक्ष ठेवलं तेव्हा लक्षात आलं की आयेषाला सेंट, अत्तर, खूप सुगंधित फुलं वगैरेंचा वास तिला अजिबात आवडत नसे. मग आम्ही त्या बॉक्समध्ये सेंट स्प्रे करून ठेवायचो. तो वास आला की ती आत जायची नाही. असं करता करता तिची सवय मोडली. '
मी म्हटलं, बापरे किती भयंकर ! आणि तरीही आयेषाच्या आईनं तिला खोक्यामध्ये कसं काय उभं केलं?
तर त्या म्हणाल्या, आता तिला खोक्यामध्ये उभं राहिलं तरी काही फरक पडत नाही. निदान हे प्रकरण तरी संपलय. पण अजून खूप गोष्टी सुधारायच्या आहेत. ती इतकी सुंदर दिसते की मोठी झाल्यावर काय होईल या काळजीनं मला आताच उच्च रक्तदाबाचा त्रास झालाय.
साधी वेशभूषा स्पर्धा! किती शिकायला मिळालं त्यातून!

No comments:

Post a Comment