Friday 14 May 2010

एन्स्लेव्ह्ड - नव्या प्रकारची ब्रिटिश गुलामगिरी

एन्स्लेव्ह्ड - नव्या प्रकारची ब्रिटिश गुलामगिरी

राहिला गुप्ता

अनुवाद - सुनीति काणे

मेहता प्रकाशन, पृष्ठे - ३००, मूल्य - ३०० रुपये

गुलामांच्या व्यापारावर बंदी घातल्याला २००७ साली दोनशे वर्षे झाली. त्या घटनेच्या स्मरणोत्सवांनी हे वर्ष ओसंडून वाहात आहे. विल्यम विल्बरफोर्सनं गुलामांच्या व्यापाराचा अंत घडवून आणला, असं मानणा-यांमध्ये आणि गुलामांनी केलेली बंडं आणि कृष्ण्वर्णीयांनी केलेल्या प्रतिकारांचा अंधारात राहिलेला इतिहास उचलून धरणा-यांमध्ये विवाद पेटले आहेत.

गुलामगिरी आणि पाश्चिमात्य संस्कृती पूर्वापारपासून एकत्र नांदत आल्या आहेत. पूर्वीच्या ग्रीस आणि रोमपासून चालू असलेली गुलामगिरी आणि सतराव्या शतकातील अपकीर्तीकारक अटलांटिक महासागरावरचा गुलामांचा व्यापार ही सर्वश्रृत उदाहरणं आहेत. गुलामगिरी ही भूतकाळातील गोष्ट झाली आणि फार तर ती अविकसित देशात अजून चालू असेल असं मानणं आपल्या पथ्यावर पडेल. पण वस्तुत: आपणा सर्वांच्या आयुष्याला गुलामगिरी स्पर्श करते आणि आपल्या गरजा तिला चालू ठेवते. कमी किमतीची मागणी करणारी गि-हाईकं या नात्यानं आपण आंतरराष्ट्रीय कंपन्यांना, त्यांचा नफा अबाधित राहावा यासाठी जगभर स्वस्त मजुरांचा शोध घेणं भाग पाडतो. जरी कंपन्या त्यांच्या कामगारांना उपजीविकेइतका पगार देत असल्या तरी तो पगार नियंत्रणात राहतो. कारण या शृंखलेच्या एका टोकाला जे अन्न खातात ते गुलामांनी पिकवलेलं असू शकतं. केव्हिन बेल्स -फ्री द स्लेव्हज (गुलामांना मुक्त करा) या संस्थेचे अध्यक्ष - म्हणतात त्याप्रमाणे "ब्राझिलमध्ये गुलामांनी कोळसा बनवला, तो वापरून पोलाद घडवलं गेलं, ते पोलाद वापरून तुमच्या कारच्या स्प्रिंग आणि तुमच्या लॉनमूव्हरची पाती बनली. " किंवा आपण जो चहा पितो, तो भारतातील वेठबिगारांनी पिकवला असणं शक्य आहे.

बिनसरकारी पातळीवर फक्त केव्हिन बेल्स यांनी डोकं वर काढून जगभरात आज २७० लाख गुलाम असल्याचा अंदाज बांधण्याचं धारिष्ट्य दाखवलं आहे. त्यांच्यापैकी १५० ते २०० लाख वेठबिगार आहेत. ते त्यांचं कर्ज चुकवण्यासाठी फुकट काम करत आहेत. अपेक्षेप्रमाणे या आकड्यांबाबत एकमत नाही. द इंटरनॅशनल लेबर ऑफिस, यू. एन. ओ. ची एजन्सी अंदाज बांधते की १२३ लाख लोकं जबरदस्तीच्या कामाला जुंपले गेले आहेत. पण हा अंदाज सरकारी आकड्यांवर बांधला गेला असल्यामुळे सरकारकडूनदेखील सर्वसाधारणपणे मान्य होतं की हे आकडे वस्तुस्थितीपेक्षा कमी आहेत. वस्तुस्थितीची जाणिव झाली की धक्का बसतो की आजचा गुलामांचा आकडा, अटलांटिक समुद्रापार पूर्ण ३०० वर्षातल्या गुलामांच्या व्यापाराच्या १५० ते २७० लाखांच्या आकड्यांहूनही जास्त आहे.

याहूनही वाईट गोष्ट म्हणजे आपल्या देशातच आपल्याला गुलामगिरी दिसते. आजच्या इंग्लंडमध्ये ती जिवंत आहे आणि फोफावते आहे. इथे गुलाम बनलेल्यांचे आकडे ५००० ते २५००० च्या मध्ये सांगितले जातात. अनेकजण उपाशी ठेवले जातात, कैदेत असतात त्यांना मार दिला जातो, त्यांचं लैंगिक शोषण केलं जातं, त्यांची शारीरिक पिळवणूक केली जाते, त्यांना आठवड्याचे सातही दिवस दररोज अठरा तास काम करायला लावलं जातं. ही दृश्य अनेक आणि वेगवेगळ्या प्रकारची असतात. तुमच्या गावातल्या मुख्य रस्त्यावरच्या मसाज पार्लरमध्ये पळवून आणलेली स्त्री देहविक्रय करत असते. समुद्रकिना-यावर मध्यरात्री मजूर कालवं पकडत असतात. मध्यमवर्गीय कुटुंबाच्या स्वयंपाकघरात नोकर झोपतो. किंवा बेडरूममध्ये माणूस त्याच्या परदेशातून आलेल्या पत्नीला कैदेत ठेवतो. जे आधुनिक ब्रिटनचे कोपरे अस्तित्वात असल्याचं आपल्याला माहीत असतं, पण त्यात डोकावून बघणं फार अस्वस्थ करणारं असतं, अशा कोप-यांमध्ये डोकावून पाहणारं हे पुस्तक आहे.

हे अंधारे कोपरे पाच गुलामांच्या जीवनकहाण्यांनी उजेडात आणले आहेत. या गुलामांचं आयुष्य जरी गरीबीनं गांजलेलं असलं तरी त्यांनी थोडंसं स्वातंत्र्य मिळवलं आहे. सोमाली स्त्री - फरिया नूर - हिचा आश्रयाचा अर्ज नाकारला गेला. ती कायद्यानं काम करू शकत नाही किंवा सरकारी मदत मागू शकत नाही. तिनं डोक्यावरच्या निवा-यासाठी बेकायदेशीरपणे अनेक तास कष्टाची कामं केली. नताशा बुलोव्हा, सतरा वर्षाची रशियन मुलगी. तिला लैंगिक शोषणासाठी बळजबरीनं आणलं गेलं होतं. निओमी कॉन्टे, सिएरा - लिओनमधलं निराश्रित मूल - तिला पंधराव्या वर्षी घरकामासाठी गुलाम म्हणून आणलं गेलं होतं. लिउ बाओ रेन, चिनी मनुष्य. चीनमधल्या छळापासून वाचायला इथं पळून आला. त्याला बेकायदेशीरपणे ब्रिटनमध्ये चोरून आणलं गेलं. वाटेतला प्रवास भीषण होता. इथे येऊन तो फक्त अन्न आणि निवा-यासाठी धोक्याची बांधकामाची कामं करू लागला. अंबर लोबप्रीत, सक्तीच्या विवाहाला बळी पडलेली मुलगी. तिला उपाशी ठेवलं गेलं. कैदेत ठेवलं गेलं, मारहाण केली गेली. ते जगाच्या विविध भागातून आले. गरिबी, युद्ध, लैंगिक शोषण, छळ यापैकी कशापासून तरी पळून आले. आपापली घरं सोडून. इंग्लंडमध्ये गुलाम म्हणून जगणा-यांचं हे प्रातिनिधिक स्वरूप आहे.
राहिला गुप्ता

No comments:

Post a Comment