Sunday 17 October 2010

तमाशा विठाबाईच्या आयुष्याचा

तमाशा विठाबाईच्या आयुष्याचा - योगिराज बागूल
राजहंस प्रकाशन
पृष्ठे - २००, मूल्य - १७५ रुपये

भर पावसाळ्याचे दिवस होते. पाऊस ये म्हटलं की, बदबद येई. पण थांब म्हटल्यावर थांबत नसे. ज्येष्ठ जाऊन अर्धा आषाढ संपत आला होता. तमाशांची फिरती बंद होती. पण पोटातली भूक थोडीच थांबणार होती? पिल्लांच्या चोचीत भरविण्यासाठी विठाला हातपाय हलवणं भागच होतं. अशा दिवसात फडातल्या निवडक आणि आवश्यक तेवढ्याच कलाकारांना घेऊन ती पुण्याच्या, कोल्हापूरच्या, जालन्याच्या किंवा मुंबईच्या थिएटर्समधून बारी करीत फिरत असे.
विठासाठी तो पाणकळा तसा जडच होता. ती पाच महिन्यांची गरवार होती. जीव जड वाटत असे. हिंडणं फिरणं खूप जीवावर येई. बोर्डावर पाय ठेवण्यास नकोसं वाटे. अशातच ’आमच्या थिएटरसाठी तुमचा संच पाठवा,’ म्हणून जालन्याच्या बन्सीकाकानं भाऊ-बापूच्या ठेकेदाराला निरोप पाठवला. ठेकेदारानं बापू आणि विठासह बारा पंधरा कलाकारांचा संच बन्सीकाकाच्या थिएटरमध्ये जालन्याला पाठवला. बन्सीकाकाच्या थिएटरमध्ये प्रत्येक कलावंतीण रसिकांच्या आवडीची लावणी गवळण गोड आवाजात गाऊन आणि अंगातून पाणी निचरूपर्यंत नाचून सादर करी. बन्सीकाकानं सा-या शहरात आणि आजूबाजूच्या खेड्यापाड्यात ’आज रात्री विठा आपल्या अदाचाअनोखा चमत्कार दाखविणार... आजची बारी पाहण्यास विसरू नका...’ अशी जाहिरात केली होती.
विठा साजशृंगार कारत होती. आज विठा गर्द आकाशी रंगाचा छानसा शालू नेसली होती. आता फक्त पायात चाळ बांधायचे बाकी होते... आणि अचानक विठाच्या ओटीत दुखू लागलं. कळा उठू लागल्या. त्या कळांच्या वेदनांनी विठाच्या अंगाचा दाह होऊ लागला. घशाला कोरड पडू लागली. किटिही पाणी प्यायली तरी घसा सुकू लागला. अशातच ओटीत एक जोराची कळ आली आणि विठा खालीच कोसळली. पोटातल्या गर्भाला धक्का बसला. ओटीतून रक्तस्त्राव सुरू झाला. शरीरातलं एवढं सारं रक्त गेल्यामुळे विठाचा चेहरा पार कोमेजून गेला होता. शरीर क्षीण झालं. हातपाय गळून गेले.
बोर्डावर हंसा-मंजुळाची बारी संपली. त्यांनी रसिकांना खूष केलं होतं. त्यानंतर भाऊ-बापूचे कलाकार बोर्डावर आले. नमन झाल्यावर गवळण झाली आणि बारीतल्या लावण्या सुरू झाल्या. एक कलावती छानशी लावणी म्हणू लागली. नाचू लागली. पण रसिकांना विठा हवी होती. त्यामुळे त्यांच्यात चुळबूळ सुरू झाली. नृत्यांगनांची लावणी अर्ध्यावर असतानाच एक प्रौढ मध्येच उठून उभा राहिला.
’ए बाई, बस कर तुझं यीवळणं. आमी विठ्याची लावणी ऐकायला आलोय. असं आलतूफालतू कायबी नही. आम्हाला विठाचं गाणं ऐकायचय.’ तो म्हणाला आणि त्याच्या पाठोपाठ सारेच गोंधळ करू लागले. विठाला ऐकण्यासाठी - पाहण्यासाठी आलेला साराच रसिक उभा राहिला. कालवा वाढला.
’राव, विठाला ऐकायला पेरतं औत सोडून आठ मैलांवरून आलो.’ एकजण शेजारच्याला म्हणाला.
’अहो, माझं पाच वर्षाचं एकुलतं एक पोरगं घरात तापानं फणफणत व्हतं. बायकू म्हणी डॉक्टरकडं जाऊ. नही गेलो अन विठाबाईचा खेळ पाह्यला आलो.’ दुसरा.
’अहो राव, तुमी तर पोराचं सांगताय... घरी माझा बाप शीक हाय. जीव राहतो का जातो असं झाल्यालं. हिथून त्याला दवा न्यायला आलो अन विठाचा खेळ म्हणताना तसाच घुसलो. आता बोला.’ आणखी एक मध्येच म्हणाला.
बन्सीकाकाच्या थिएटरमध्ये प्रेक्षकांचा कालवा खूपच वाढला होता. कोण कोणाला बोलतय, काहीच ऐकण्यास येत नव्हतं. मधूनच एखाद्याचं पागोटं सुटत होतं. ते सावरता सावरता त्याचं कोपर दुस-याच्या टोपीला लागून ती खाली नळकत होती. गोंगाट वाढतच चालला होता. थिएटर गच्च भरलं होतं. बन्सीकाका रसिकांना वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न करत होता. पण गोंधळ इतका होता की, चार माणसांच्या पलीकडे त्याचा आवाज जात नव्हता. बोर्डावरील सर्व कलाकार स्तब्ध उभे होते. थिएटरच्या हौद्यात रसिकांचा गोंधळ शिगेला पोहोचला होता. त्यांचा कालवा विठाच्या कानापर्यंत येऊ लागला. आडवी झालेली विठा तटकन उठली. शृंगाराच्या खोलीत गेली. एका मोठ्या उपरण्यानं पोट आणि ओटी करकचून आवळून बांधली. रक्तानं माखलेलं पातळ बदललं. पुन्हा साज चढवला. बापू, शंकरनं, बन्सीकाकानं विठाला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण तिनं कुणाचच ऐकलं नाही.
पायात चाळ बांधून विठा जशी बोर्डावर आली, तसे रसिकांचे पागोटे आणि शेले हवेत उडू लागले. वाकून पायरीच्या पाय पडत विठा बोर्डावर आली.हात लावून ढोलकी-तुणतुण्याच्या आणि पेटीच्याही पाया पडली. समोर येऊन डोक्यावरून पदर घेऊन रसिकांना नमस्कार केला. तसं सारं शांत झालं. काही सेकंद थिएटरमध्ये कमालीची शांतता पसरली.
... आणि मग ढोलक्याची चाटी-बायांवर जशी थाप पडली, तशी ढोलकीच्या तालावर विठाचे पाय थिरकू लागले. तिच्या पायातली घुंगरं बोलू लागली. विठा धुंद होऊन नाचू लागली. नृत्याचा एकेक आविष्कार सादर करू लागली. रसिक खूष होऊन हाळ्या-शिट्या मारू लागली. एक रुपयाच्या नोटेपासून शंभरीच्या नोटीपर्यंत बोर्डावर नोटांचा जणू सडा पडला होता. विठाला पाय ठेवण्यास जागा नव्हती. रसिकांकडून मिळालेली दाद पाहून विठा पोटातलं दु:ख विसरून गेली. विठाच्या टिपेच्या आवाजातले बोल सा-या थिएटरमध्ये घुमू लागले. शेवटचा अंतरा गायल्यावर पुन्हा मुखडा गाऊन जोरदार झटक्यावर विठाची पावलं स्थिर झाली. तसा नख-यानं हलक्याच पुढं येऊन तिनं रसिकांना मुजरा केला आणि गर्रकन पाठीमागं फिरून विंगेत निघून गेली. विठा बोर्डावरून निघून गेली तरी रसिक टाळ्या वाजवतच होते.
पाठीमागं येताच विठा पटकन खाली बसली. तिच्या अंगाला दरदरून घाम फुटला होता. ओटीपोटाला आवळलेली उपरण्याची गाठ तिनं ढिली केली. नाचून गाऊन थकल्यामुळं कोरडा पडलेला घसा पाण्याचा एक मोठा घोट घेऊन ओला केला. थकवा तर कमालीचा आला होता. हातापायांसह सारं शरीर निस्तेज निस्तेज झाल्यासारखं वाटत होतं. बराच वेळ विठा तशीच पडून राहिली.

गुलाम

गुलाम : अच्युत गोडबोले, अतुल कहाते
मनोविकास प्रकाशन, पृष्ठे : ३७६, मूल्य : ३७० रुपये

गुलामगिरीच्या विरोधातील चळवळी

गुलामगिरीच्या विरोधात संघटना आणि चळवळी एकोणिसाव्या शतकात जोर धरायला लागल्या. ’अमेरिकन ऍंटी स्लेव्हरी सोसायटी (एएएस)’ या समतावादी विचारांच्या गो-या लोकांनी उभ्या केलेल्या भूमिगत संघटनेची स्थापना १८३२-३३ साली फिलाडेल्फियामध्ये झाली. पुढची काही वर्ष एएएसनं गुलामगिरीच्या विरोधात लाखो पुस्तकं, पत्रकं, नियतकालिकं वितरित केली. विल्यम लॉईड गॅरिसन आणि इतर काही जण या संघटनेच्या प्रमुख लोकांपैकी होते. १७९० सालापासून अमेरिकन कॉंग्रेसकडे देशभरातून गुलामगिरीचा निषेध करणारी पत्रकं पाठवली गेली. एएएसचा उदय होण्यापूर्वी तॊ २०-३० च्या संख्येनं असायची. आता तब्बल चार लाख पत्रकं कॉंग्रेसकडे पोचवली जायला लागली. पण त्यांच्याकडे अजिबात लक्ष दिलं जाऊ नये असं दक्षिणेकडॆच्या राज्यातल्या सीनेटर्सनी सुचवलं. १८३६ साली गुलामगिरीच्या विरोधात छापलेलं सगळं साहित्य एकत्र करून फेकून दिलं जावं असं काही जणांनी कॉंग्रेसच्या बैठकीत म्हटलं.
दुर्दैव म्हणजे जरी या संघटनेची निर्मिती चांगल्या उद्देशानं झाली असली तरी अनेक मुद्द्यांवरून तिच्या संचालक मंडळतल्या लोकांचीच जुंपे, उदाहरणार्थ आपल्या संघटनेत आफ्रिकन बायकांना स्थान दिलं जावं का नाही, हा वादाचा मुद्दा ठरला. मग या संघटनेत १८४० साली फूट पडून एक वेगळीच संघटना तयार झाली. गॅरिसनला पकडून देणा-याला जॉर्जिया सरकारनं ४,००० डॉलर्सचं बक्षीस जाहीर केलं. ’लिबरेटर’ किंवा ’अपील’ या नावाच्या भूमिगत संघट्नांची गुलामगिरी विरोधातली नियतकालिकं वितरित करत असताना कुणी पकडलं गेलं तर त्या माणसाला नॉर्थ कॅरोलिना राज्यात १,५०० रुपयांचा दंड केला जायचा. या नियतकालिकांच्या जॉर्जिया राज्यातल्या एका वर्गणीदाराला त्याच्या घरातून खेचून काढण्यात आलं. मग ओढत नेऊन त्याला चाबकानं फोडून काढलं गेलं, नदीत बुडवलं गेलं आणि जिवंत जाळण्यात आलं. गॅरिसन सापडला तेव्हा त्याच्या गळ्यात दोरी बांधून त्याची बॉस्टनमध्ये रस्त्यात जाहीरपणे धिंड काढण्यात आली. एलिजा लव्हजॉय नावाच्या समतावादी गो-या माणसावरही काळ्यांच्या बाजूनं लिहिल्याबद्दल अनेकदा हल्ले करण्यात आले. शेवटी तर त्याचा खून करण्यात आला. नंतर गॅरिसनवादी लोकांनी शांततामय मार्गानं काळ्या लोकांच्या बाजूनं लढा देत राहण्याचा मार्ग निवडला. पण त्याला फ्रेडरिक डग्लस (१८१८ - १८९५) नावाच्या माणसानं विरोध दर्शवून आपली आक्रमक मार्ग अवलंबणारी एक स्वतंत्र चळवळ उभी केली आणि काळ्यांसाठी एक वर्तमानपत्रंही सुरू केलं.
या डग्लसचं बालपण अंगावर काटाच आणतं. डग्लसला आपण कधी, कुठे जन्मलो, आपले आई-वडील कोण याविषयी काही माहीत नव्हतं. आपण गुलामगिरीत जन्मलो आहोत एवढंच त्याला थोडा मोठा झाल्यावर उमगलं. त्याला त्याच्या मालकाच्या घरी त्याची आजी इतर अनेक मुलांबरोबर सांभाळे. तो १२ वर्षांचा असताना आजी त्याला त्याच्या मालकाच्या दुस-या लांब असलेल्या घरी कायमचंच सोडून गेली. या दुस-या घरी राहयचं नाही हा त्याचा आक्रोश अर्थातच फोल ठरला. तिथे त्याला सांभाळायला असलेली मावशी अतिशय कठोर होती. अतिशय क्षुल्लक कारणांवरून ती तिथल्या मुलांना शिक्षा करायची आणि मारायचीसुद्धा. हताश झालेला डग्लस बरेचदा अर्धपोटीच राही. मग पावाचा तुकडा तोंडात घेतलेल्या कुत्र्याच्या मागे फिरे. न जाणो तो तुकडा त्याच्या तोंडातून चुकून पडला तर आपल्याला खायला मिळेल असं त्या लहानग्याला वाटे. मावशीनं टेबलावरचं कापड साफसफाईच्या वेळी झटकलं की तेव्हा खाली पडणारे अन्नाचे बारीक सारीक तुकडे खाऊन तो पोटातली आग कमी करायचा प्रयत्न करे. पुरेसे कपडे नसल्यानं प्रचंड थंडीपासून बचाव करण्यासाठी तो मक्याची कणसं गोळा करण्यासाठीच्या पोत्यांमध्ये किंवा कपाटांमध्ये शिरून बसून राही.
थोडा मोठा झाल्यावर डग्लसनं गुलामगिरीविरूद्ध बंड करायचा आणि लिहिणं - वाच्णं शिकायचा प्रयत्न केल्यावर त्याला ४० मैल दूरवरच्या शेतावर शिक्षा म्हणून दुस-या मालकाकडे पाठवलं गेलं. तिथे तीन दिवस त्याला चाबकानं फोडून काढण्यात आलं. दिवसभर काम, प्रचंड थंडीत अंगात घालायला कपडे नाहीत, झोपताना बिछाना - अंथरूणाचा पत्ता नाही, अन्न म्हणजे जनावरंसुद्धा खाणार नाहीत असा कसला तरी लगदा आणि हे सगळं कमी म्हणून का काय खूप मारहाण या सगळ्या प्रकारांमुळे डग्लस मनानं पूर्णपणे खचून गेला. रविवारी सुट्टी असताना कसलीही हालचाल न करता हताशपणॆ पडून राही. त्याच्या नव्या मालकानं एका काळ्या बाईला आपली भूक भागवण्यासाठी विकत घेतल्याचं डग्लस बघत होता. मालक रोजच तिच्यावर अत्याचार करायचा. त्यातून तिला मुलं होणार आणि आपल्याला आणखी गुलाम मिळणार याविषयी तो मालक जाहीरपणे अतिशय गुर्मीनं फुशारक्या मारत सांगायचा आणि तसं झालंही. हे सगळं बघून डग्लस अजूनच खिन्न झाला.
एके दिवशी डग्लसला आपल्या आयुष्याची इतकी घृणा आली की त्यानं या सगळ्या व्यवस्थेशी लढा द्यायचं ठरवलं. आपल्या मालकानं मारहाण केली की प्रतिकार करायचा, असा मनोनिग्रह त्यानं केला. त्यानं नव्या मालकाकडून पळ काढून पुन्हा जुन्या मालकाचा आश्रय घेतला. जुना मालक जरा बरा होता. त्यानं डग्लसला पुन्हा वेगळ्या ठिकाणी गुलामगिरीसाठी पाठवलं. तिथे चार धट्ट्याकट्ट्या गो-या कामगारांनी डग्लसला बेदम मारहाण केली. तो तळमळत असताना कुणाचीही त्याला सोडवण्यासाठी पुढे यायची हिंमत झाली* नाही. या सगळ्यामुळे गुलामगिरीतून सुटका करून घ्यायचा डग्लसचा निश्चय अधिकाधिक पक्का होत गेला. शेवटी १८३८ साली त्यानं तिथून कसाबसा पळ काढून न्यूयॉर्कचा आश्रय घेतला. तिथेही पळून आलेल्या गुलामांना हुडकून काढून त्यांच्या मालकांकडे परत पाठवण्यासाठी अनेक हेर फिरतच होते. त्यातून कशीबशी सुटका करून एका जहाज बांधणीचं काम करणा-या गो-या मालकाकडे डग्लस काम करण्यासाठी गेला. तिथे इतर सगळे कामगार गोरे असल्यानं मालकानं डग्लसला कामवर घ्यायला नकार दिला. मग डग्लस मिळॆल ते काम करायला लागला.
एके दिवशी डग्लसच्या हातात विल्यम लॉईड गॅरिसन चालवत असलेलं ’लिबरेटर’ नावाचं वर्तमानपत्र पडलं आणी त्याच्या आयुष्यात एकदम क्रांतीच घडली. मग गॅरिसनचं भाषण ऐकायला डग्लस गेला. या सगळ्यातून डग्लसची वैचारिक जडणघडण निर्मूलनवादी आणि क्रांतिकारी झाली. त्यातूनच तो काळ्यांच्या चळवळीत पूर्ण वेळ पडला.

मार्क इंग्लिस

मार्क इंग्लिस : डॉ. संदीप श्रोत्री
राजहंस प्रकाशन, पृष्ठे - १६५, मूल्य - २०० रुपये

१५ नोव्हेंबर, १९८२ रोजी सकाळी एका स्की विमानात बसून मार्क आणि फिल यांनी ’ग्रॅंड प्लेटो’ या हिमनदीकडॆ झेप घेतली. त्या अफाट बर्फाळ प्रदेशात छोट्या स्की विमानाने या दोघांना सोडले आणि विमान दिसेनासे झाले. आता वर अथांग निळे आकाश, खाली चारही बाजूला क्षितिजापर्यंत पसरलेले बर्फाळ पठार आणि शेजारी माउंट कुकसहित आओराकीची पांढरी शुभ्र पर्वत रांग. दोघांना फक्त एकच्य दिशा दिसत होती - माउंट कुकची. त्या विस्तीर्ण हिमनदीच्या कडॆवर हिमघळी पसरलेल्या होत्या. त्याच्या डोक्यावरील पर्वत शिखरांच्या द-यातून ओघळणारे भयावह हिमधबधबे, क्वचित त्या हिमधबधब्यांच्या डोक्यावर तयार झालेली तरंगती हिमसरोवरे किंवा हिमनदी आणि त्या संपूर्ण पांढ-या पार्श्वभूमीवर अगदी मुंग्यांप्रमाणे दिसणारे दोघेजण. दोघांनी तत्परतेने समोरील हिमघळी पलीकडे धाव घेतली. एक तात्पुरता झोपडीवजा तंबू आडोसा म्हणून तयार केला आणि त्यापुढील मुक्काम ’बिव्हॉक’ करायचे असे ठरवले. बिव्हॉक म्हणजे वाटेतील बर्फामध्ये गुहा खोदायची किंवा एखाद्या हिमघळीमध्ये किंवा दगडाच्या आडोशाने मुक्काम करायचा. पायथ्यापाशी थोडा स्वयंपाक शिजवला, पोटपूजा केली आणि फारसे काही सामान न घेता दुस-या दिवशी पहाटे वर चढायचे असे ठरवले.
सोळा नोव्हेंबरच्या पहाटे पाच वाजता दोघे बाहेर पडले. उभ्या कडक झालेल्या बर्फामध्ये आईस स्क्रू, कॅम्पॉन, बिले देणे फार अवघड झाले होते. तापमान शून्याखाली वीस अंश सेल्शियस होते. एकदा सूर्य उगवला की त्या उष्ण्तेने बर्फ वितळू लागते आणि हिमकडे कोसळण्याची धोके वाढतात. त्यामुळे कठीण कडे नेहेमी रात्री किंवा पहाटे चढायचे असतात. क्वचित प्रसंगी आदल्या दिवशी उष्णतेने पाघळलेले बर्फ पुन्हा रात्री कडक होते आणि त्यावेळी आकारमानाने फुगते. फ्रिजमधील पाण्याने भरलेल्या बाटलीचे टोपण ज्याप्रमाणे फुटते, त्याप्रमाणे त्यावरील हिमकडे सुटतात आणि खाली कोसळतात. हे सर्व धोके त्या दोघांना माहीत होते. अगदी हळूहळू त्यांची प्रगती होत होती. ६०० मीटर्स उंच चढाई करत पूर्व धारेच्या कडेवर येईपर्यंत दुपार झाली होती. पश्चिमेकडे ढग जमा झाले होते. वारा वेगाने वाहात होता. मार्क आणि फिलने ’मिडल पीक’च्या धारेवरच गुहा खोदून मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. एका बाजूला १००० मीटर्स खोल कॅरोलीन बाजू, तर दुस-या बाजूला ६०० मीटर्स खोल पूर्व बाजू होती. अंग गोठवणा-या वा-याशी युद्ध खेळत त्यांनी ’मिडल पीक’ गाठले तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते. दोघांनी तातडीने गुहा खोदायला सुरुवात केली आणि तात्पुरता निवारा तयार केला. नियतीच्या मनाच्या अंदाज येणे शक्यच नव्हते. हाच निवारा म्हणजे त्यांचे पुढील चौदा दिवसांचे ’मिडल पीक’ हॉटेल.
रविवार, २१ नोव्हेंबर, त्यांचा गुहेतील सहावा दिवस. त्यांनी हिशोब केला. त्यांच्यापाशी आता जगण्याचे केवळ ३६ ते ४८ तास उरले होते. आता अन्न संपून चार दिवस झाले होते. शरीर आता स्वत:चीच साठवलेली उर्जा वापरू लागले होते. त्यांचे वजन झपाट्याने कमी होत होते. त्यांच्या पायातील संवेदना नष्ट झाल्या होत्या. मार्क त्याच्या कुटुंबीयांच्या, लहानग्या ल्यूसीच्या आठवणी फिलला सांगत होता. त्या शांततेचा, त्या एकटेपणाचा, त्या समाधीअवस्थेचा भंग करण्यासाठी मार्क सर्व मार्ग अवलंबत होता. फिल मात्र शांत असायचा. इतका की, ब-याच्य वेळेला मार्क त्याच्यावर चिडायचा.
इकडे खाली पार्क मुख्यालायामध्ये हलकल्लोळ माजला होता. दोघांचे नातेवाईक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, राजकीय नेते, देशपरदेशातील गिर्यारोहक, आदी सर्वांनी भंडावून सोडले होते. दोघे पर्वतावर गेले, ते सर्वात महत्वाच्या झोपायच्या पिशव्यादेखील न घेता, याचेच सर्वांना आश्चर्य वाटत होते. वादळ सहाव्या दिवशीसुद्धा शमले नव्हते. प्रचंड हिमवर्षाव चालू होता. माऊंट कुककडे जाणारे सर्व रस्ते हिम वर्षावामुळे आणि हिम कोसळ्यांच्या शक्यतेमुळे बंद केले होते. हेलीकॉप्टर उडण्याचा तर प्रश्नच नव्हता. टास्मान हिमनदीवरील वातमापक येंत्र त्या अफाट वा-याने उडून गेले होते. शतकातील ते सर्वात दिर्घ चाललेले हिमवादळ ठरले होते आणि त्याचे बळी मार्क आणी फिल होते. बॉब मुन्रो हा पार्कचा प्रमुख, त्याने डॉ. डिक प्राइसला सातव्या दिवशी चर्चेला बोलावले. मुद्दा हा की स्लीपिंग बॅगशिवाय ते दोघेजण किती तग धरू शकतील, म्हणजे त्यांच्या सुटकेची आशा किती दिवस धरायची? डॉ. डिक, हा त्यातील तज्ञ, त्याने स्पष्ट सांगितले की जास्तीत जास्त दहा दिवस जिवंत राहण्याची आशा! बॉब मुन्रोने बोटे मोजली आणि अंदाज केला की, आणखी तीन-चार दिवस सुटकेचे प्रयत्न करायला हरकत नाही.
मार्कची मानसिक स्थिती आता दोलायमान होत होती. त्याला रात्री जास्त त्रास होत होता. कधी स्वच्छ पाणी पिण्याचे स्वप्न पडायचे, तर कधी पुस्तकातील स्वयंपाकाचे विविध पदार्थ करण्याचे स्वप्नात दिसायचे. तो जाणीवपूर्वक मागील भूतकाळाचा एक एक दिवस आठवू लागला आणि घड्याळाचा काटा पुढे ढकलू लागला. त्या वेळीच त्याने ठरवले की समजा जिवंत सुटका झालीच तर पुढे आयुष्यभर रोज एक ग्लास्व भरून थंडगार पाणी पिईन.
अद्यापपर्यंत मार्कने तो नेम सोडलेला नाही. रोज सकाळी न चुकता ग्लास भरून बर्फाचे थंडगार पाणी पित असतो.
--------------------------------------------
मार्क इंग्लिस या माणसानं हिमदंशामुळे आपले दोन्ही पाय गमावले. त्यानंतर तब्बल चोवीस वर्षानंतर दोन कृत्रिम पाय लावून तो एव्हरेस्ट शिखरावर चढला. ही आहे मानवाच्या जिद्दीची आणि दुर्दम्य इच्छाशक्तीची एक प्रेरणादायी साहसकथा.