Friday 14 May 2010

कथा आधुनिक दंडकारण्याची

कथा आधुनिक दंडकारण्याची :

पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ

अरूणा अंतरकर

अमेय प्रकाशन, पृष्ठे : ५८, मूल्य : ९५ रूपये

बीज रुजलं
पुस्तकं आवडीनं वाचणारे खूपजण आहेत. मात्र पुस्तकापासून धडा घेणारे कितीजण आहेत, प्रश्नच आहे. ग्रंथांना गुरु, सोबती आणि मार्गदर्शक म्हणून मान असला तरी पुष्कळदा ग्रंथातले शब्द ग्रंथातच राहतात. मनोरंजन किंवा विरंगुळा यांच्या पलीकडे जाऊन पुस्तकं वाचणारेदेखील गंभीर आशयाचं किंवा सामाजिक विषयावरचं पुस्तक वाचणं हेच सत्कार्य समजून स्वस्थ राहतात; पण अपवाद आहेत. पुस्तकातली शिकवण मानणारे आणि ती आचरणात आणणारे हातांच्या बोटावर मोजता येतील इतके असतील, पण आहेत ही गोष्ट महत्वाची.
भाऊसाहेब थोरात हे या छोटेखानी वर्गाचे एक आदर्श सदस्य. पुस्तकाचं सामर्थ्य काय असतं याचं ते जितं जागतं उदाहरण आहेत. आल्प्स पर्वातच्या कुशीत राहणा-या बुफिए नावाच्या निसर्गप्रेमी माणसानं झाडं लावण्याचं व्रत घेतलं त्याची गोष्ट भाऊसाहेबांनी वाचली आणि अवघं चौ-याऎंशी वयोमान असलेल्या या माणसानं एका महिन्यात एक कोटी बिया लावण्याचं मनावर घेतलं आणि संगमनेर तालुक्यातल्या मंडळींना हाताशी धरून हा संकल्प चौपटीच्या संख्येनं सिद्धीस नेला.
आल्प्स पर्वताच्या प्रदेशात, एका ओसाड व निर्जन गावात राहणा-या एलझिअर्ड बुफिए नावाच्या एका सामान्य मेंढपाळानं एक हाती एक लाख झाडं लावली. १९१० ते १९४५ या पस्तीस वर्षांच्या अवधीत हा माणूस कोणताही गाजावाजा न करता जाईल तिथे निरनिराळं बी लावत होता. त्याच्या या अबोल आणि अथक प्रयत्नानं व्हेरंग नावाच्या ओसाड, मृतप्राय आडगावात ११ किलोमीटर्स लांबीचा झाडाझुडपांनी भरलेला हिरवागर्द पट्टा निर्माण केला. आणि त्याचबरोबर, अखेरचा श्वास घेत असलेला तो जीव औदासिन्याच्या आजारातून उभा राहिला. माणसात परत आला. नुसता श्वासोच्छ्वास करण्याऐवजी जगू लागला. कामधंद्याला लागला. त्याची ती कथा होती.
वन आर्मी मॅन म्हणावं अशा त्या एकट्या माणसाच्या - बुफिएच्या- भीम पराक्रमानं भाऊसाहेब भारावून गेले. त्यांच्या भागाची स्थिती बुफिएच्या व्हेरंगपेक्षा दसपटीनं बरी होती. पण शेतक-याचं रक्त नसानसांतून वाहत असलेल्या भाऊसाहेबांना इथली हिरव्या रंगाची गैरहजेरी नेहेमी खुपत आली होती. माणसाला जेवढी शक्य आहे, तेवढी समृद्धी त्यांनी या गावात आणली होती. पण वर्तमानकाळात डोळसपणे वावरताना भविष्याचा सतत वेध घेत राहणा-या त्यांच्या दूरदर्शी नजरेला आपल्या विभागावरचं आणि सबंध मनुष्यजातीवरचं विनाशकारी संकट दिसत होतं. भौतिक प्रगतीच्या नावाखाली चाललेल्या माणसांच्या कर्मांनी पर्यावरणाची वाट लावली होती. सर्वत्र पाऊस कमी झाला होता. जंगलं नाहीशी झाली होती. जलाशय आटले होते. पशुपक्ष्यांची संख्या रोडावली होती. भविष्यकाळात रिमोट कंट्रोलमुळे माणूस प्रत्येक गोष्ट बसल्या जागेवरून करणार होता, पण शुद्ध हवा आणि पाणी यांच्याअभावी तो कसा तग धरून राहाणार, हा अक्राळविक्राळ प्रश्न वाटेत आ वासून उभा होता...या विनाशकारी संकटावर एकच उपाय होता. बुफिएनं सांगितलेला-झाडं लावण्याचा. तो तातडीनं करायला हवा होता. त्याच्या अभावी आजपर्यंत या भागाच्या विकासासाठी जे कार्य केलं, त्याला अर्थ राहणार होता.
बुफिएपासून प्रेरणा घेणा-या भाऊसाहेबांचं काम मात्र सोपं नव्हतं. वय आणि प्रकृतीमान या दोन्हींची त्यांना साथ नव्हती. ऎंशीच्या पुढे तीन घरं गेलेलं वय, आणि मधुमेहानं तब्येत पोखरलेली. बुफिएच्या मानानं त्यांच्या हातात वेळॊ कमी होता आणि शरीरात बळ फारच कमी होतं. कठोर तार्किक विचार करणा-या भाऊसाहेबांना हा अड्सर लक्षात आला होता, पण ते पाऊल मागे घेणार नव्हते. बुफिएला मदत आणि सोबत करायला कुटुंबीय, मित्र वा सहकारी नव्हते. आपल्या पाठीशी उभा संगमनेर तालुका आहे, ही जाणीव भाऊसाहेबांना प्रकृतीचा विचार मागं टाकण्याचं बळ देणारी होती. या तालुक्यातल्या हजारो हातांच्या बळावर त्यांना बुफिएनं आयुष्यभर केलेलं काम निम्म्या अवधीत करता येणार होतं. त्यांची बुफिएशी स्पर्धा नव्हती. बुफिए ही तर त्यांची प्रेरणा होती. त्याच्याइतकं काम आपल्यालाही करता आलं पाहिजे, ही इच्छादेखील त्या प्रेरणेतूनच उत्पन्न झाली होती. भाऊसाहेबांची स्पर्धा असलीच तर ती काळाशी होती. पण तिचाही बाऊ न करता त्यांनी मनात आलेल्या विचारांची ताबडतोब आखणी सुरु केली...

No comments:

Post a Comment