Friday 14 May 2010

तेजशलाका इरेना सेंडलर

तेजशलाका इरेना सेंडलर


अभिजीत थिटे


अमेय प्रकाशन, पृष्ठे : ११६, मूल्य : १५० रुपये



होलोकास्ट, अर्थात ज्यूंचा वंशविच्छेद हा मानवी जीवनातला अत्यंत कलंकित भाग आहे. त्या वेळची क्रूरता केवळ अतर्क्य. कोण एक हिटलर नावाचा माणूस उठतो. सबंध राष्ट्राला एका वंशाविषयी चिथावतो. देश शुद्ध करण्याचं विचित्र स्वप्न पाहतो. ते देशाच्या गळी उतरवतो आणि चार वर्षांच्या अवधीत साठ लाख लोकांचा मृत्यू घडवून आणतो. हा कलंक नाही तर काय आहे? हिंस्त्र म्हणून प्रसिद्ध असणारे वाघ-सिंहासारखे प्राणी भूक नसेल तर उगाचच शिकार करत नाहीत. माणसाचं हे "कर्तृत्व" पाहिलं की तेही शरमेनं माना खाली घालतील. महायुद्ध संपून सत्तर वर्ष होत आली तरी या जखमा भरत नाहीत. भरणं शक्यही नाही. आपल्या देशाच्या फाळणीच्या जखमा भरल्यात अजून? मग अत्यंत क्रूरतेनं झालेल्या वंशविच्छेदाच्या जखमा कशा बुजतील? ज्यूंची आजची पिढीही या जखमा बाळगते आहे. अशा वेळी इरेनासारख्या व्यक्ती दिलासा देतात. माणूस नावाच्या प्राण्यात माणुसकी असते, हे त्या दाखवून देतात. आपण आशेचा किरण म्हणतो तो हाच असतो. घेटोतल्या लहान मुलांना मृत्यूच्या खाईत ढकलणा-यांत काही स्त्रियाही होत्या. लहान मुलांना फसवून वेगवेगळ्या प्रयोगांसाठी फूस लावून पळवून नेणा-यातही काही स्त्रिया होत्या. आणि त्याच वेळी त्यांना पदराखाली दडवणारी, मायेची पखरण घालणारी इरेना नावाची एक आईही होती.
अणुरेणूया थोकडा, तुका आकाशाएवढा, हे संत वचन आपोआपच ठ्सठ्शीतपणे सामोरं येतं. मानवी मनाच्या या दोन अवस्था या कालावधीचा विचार करताना प्रकर्षानं जाणवतात. स्वत:च्या घरातील वडीलधा-यांची अगदी मनापासून काळजी घेणारा एक माणूस दुस-याबाबत कल्पनातीत क्रूर होऊ शकतो, हे इथंच तर दिसतं. आपल्या बाळाला साधा ठसका लागला, तर धावाधाव करणारा एक डॉक्टरी पेशाचा माणूस केवळ ज्यू आहेत, या कारणासाठी लहान लहान मुलांवर विविध प्रयोग करतो, त्यांचा गिनीपिग म्हणून वापर करतो, तोही कोणत्याही प्रकारची भूल न देता, या क्रूरतेला काय म्हणावं? घरातील ज्येष्ठांचा आदरसत्कार करणारा एखादा अधिकारी केवळ धर्म ज्यू आहे, म्हणून एखाद्या आजोबांची दाढी हिसडून काढतो. वेदनेनं कळवळले, या "गुन्ह्या" ची शिक्षा म्हणून बेदम मारहाण करतो. मजा म्हणून संगिनीच्या धाकानं एका आजीबाईंना भर रस्त्यात नाचायला लावलं जातं. आपल्या बाळाला फुलासारखं जपणारा एक सैनिक एका आईकडून तिचं बाळ हिसकावून घेतो. उंच उडवतॊ आणि दुसरा सैनिक त्या उडवलेल्या बाळावर गोळी झाडतो आणि या नेमबाजीचं बाकीचे कौतुक करतात, या सा-याची संगती लावायची तरी कशी? अणूपेक्षा लहान, कोतं आणि क्रूर मन वेगळं काय असणार?
हे सारं पाहून दुसरी स्त्री कळवळते. तिचं कळवळणं घरापुरतंच मर्यादित राहात नाही. काही तरी केलं पाहिजे, कोणी तरी पुढं झालं पाहिजे, अशी फक्त दिवाणाखान्यापुरती चर्चा राहात नाही. ती स्वत: पुढे होते. वॉर्सामधील ज्यूंसाठी गुप्तपणे काम करण-या एका संघटनेसाठी काम करू लागते. लहान लहान मुलांना घेटोतून बाहेर काढण्याचं, त्यांचा जीव वाचवण्याचं स्वप्न पाहते. ते प्रत्यक्षातही आणते. काम करताना पकडली जाते. प्रचंड शारीरिक आणि मानसिक वेदना सोसते. आपण बोललो तर आतापर्यंत वाचवलेली मुलं आणि त्यांना आश्रय देणा-या शेकडो, हजारो पोलिश कुटुंबांवर नाझी अत्याचारांचा नांगर फिरेल, याची तिला जाणीव असते. हजारोंचा जीव का एक जीव... तिच्यासमोर अगदी साधा, सरळ प्रश्न असतो. ती एका जीवाची निवड करते. तो जीव तिचा स्वत:चा असतो तरीही! इतका छळ सोसूनही ती तोंड उघडत नाही, हे पाहून संतापलेले नाझी तिला मृत्यूदंडाची शिक्षा फर्मावतात. बातमी समजल्यावर ती गुप्त संघटना तातडीनं हालचाली करते आणि गोळ्या घालण्याआधी काही मिनिटं तिची सुटका होते. तिला मृत्यूदंड देण्यात आला, अशी बातमी सगळीकडे पसरते. त्या संघटनेला ती सापडते, ती एका निर्जन स्थळी. संघटना तिची काळजी घेते. ती बरी होते आणि युद्ध संपेपर्यंत लपून राहून काम करतच राहते. "आकाशाएवढा..." हे याहून वेगळं असतं? त्या तरूण मुलीचं नाव होतं इरेना सेंडलर; पण तिची कहाणी इथेच संपत नाही. युद्ध संपल्यानंतर स्वत:कडची यादी बाहेर काढून त्या वाचवलेल्या ज्यू बाळांना त्यांची ओळख मिळवून देण्याचं काम ती त्या संघटनेमार्फत करत राहते. अडीच हजार मुलांपैकी चारशे मुलांचा शोध लागत नाही म्हणून हळहळत राहते. तिचं पोलंडच्या संसदेत कौतुक झालं, "राइटस अमंग द नेशन्स ( सर्व देशातील सर्वोत्तम)", " व्हाइट ईगल" यासारखे मानसन्मान मिळाले, तरी " मी विशेष काहीच केलं नाही" या मतावर ती ठाम राहते. "आम्ही तीस जण हे काम करत होतो, कौतुक सा-यांचच आहे. आमच्या एका सहका-यानं मृत्यूदंड स्वीकारला आहे. मी हयात आहे, म्हणून हा मान मला मिळतो आहे" असं तिला प्रामाणिकपणे वाटत राहातं. पोलंडच्या पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्राला उत्तर देताना ती म्हणते, " आपण सारेच या भूतलावर काही ना काही कारणासाठी जन्माला येतो. मी जे केलं असं सांगण्यात येतय, कदाचित माझ्या जन्माला येण्यामागचं तेच कारण असेल..."
------------------------------------------------------------------------------------------------
इरेना सेंडलर. पोलंडमधील वॉर्सापासून साधारण पंधरा मैलांवरील ओटवाक गावात १५ फेब्रुवारी, १९१० रोजी जन्म. इरेना यांनी थोड्याथोडक्या नाही तर तब्बल २५०० ज्यू मुलांना नाझींच्या तावडीतून सोडवलं. १२ मे, २००८ रोजी वयाच्या ९८व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

No comments:

Post a Comment