Friday 14 May 2010

जीएंची कथा : परिसरयात्रा

जीएंची कथा : परिसरयात्रा


अ. रा. यार्दी / वि.गो. वडेर


राजहंस प्रकाशन, पृष्ठे : १८४, मूल्य : ४०० रुपये

मानवी जीवनात दडलेले द्वंद्व हा जीएंच्या चिंतनाचा मुख्य गाभा असावा. माणूस जगताना प्रत्येक क्षणी बुरखा पांघरून जगत असतो. त्याला जसे जगावेसे वाटते, तसे जगता येत नाही, कारण समाजाचे बुभुक्षित डोळे त्याच्यावर श्वापदांसारखे टपून बसलेले असतात. जीवनातले द्वंद्व हे एकाच वेळी कोवळीक आणि क्रौर्य, काठिण्य आणि पाशवी वृत्ती अशा प्रकारच्या जीवनदर्शनाने समोर उभे राहते. मानवाच्या मनाशी - त्याच्या तळाशी - दडून राहिलेल्या आदिम प्रवृत्ती कोणत्या क्षणी कशा रीतीने प्रकट होतात, आणि सुखी जीवनाला चूड लावतात हे सांगता येत नाही. नेमका हाच तिढा सोडविण्याचा प्रयत्न जीएंनी आपल्या आयुष्यभरच्या कथालेखनातून केला आहे.
नियतीला आतून बाहेरून तपासण्याचे, त्या नियतीचे धागेदोरे उसवून त्यांच्यातले शून्य ओळखण्याचे व्रत जीएंनी आयुष्यभर पाळले. आपल्या आयुष्यात आपल्याला जे प्रिय असते, त्याचा त्याग करण्यातच मानवाची खरी कसोटी लागते आणि त्या कसोटीला उतरत असताना आतड्याचे धागे तुटल्याच्या दु:खद संवेदना अनुभवून पलीकडे जायचे असते. नेमके हेच जीएंनी अखंडपणे कथेच्या माध्यमातून केलेले आहे. म्हणूनच त्यांच्या कथा या एकमेकांत गुंतलेल्या आतड्याच्या धाग्यांसारख्या वाटतात. त्यांच्या कथेचे प्रत्येक खेपेचे वाचन हे नवा प्रकाश दाखवते आणि मग प्रकाशाची दारे उघडी होत असल्याचा आनंद मिळतो.
आम्ही ज्या ज्या वेळी जीएंच्या कथा वाचल्या, त्या त्या वेळी आम्हाला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवत गेली; ती ही की जीएंनी आपले कथालेखन हे त्यांना वाटणा-या त्या त्या व्यक्तीबद्दलच्या कृतद्न्यतेपोटी केले आहे. ज्या परिसराने त्यांना भरभरून दिले, त्या परिसराला त्यांनी आपल्या कथांचे अर्घ्यदान केले आहे. जीएंच्या आयुष्यात आलेल्या अनेक व्यक्तींचे ॠण त्यांनी मान्य केलेच आहे. त्या व्यक्ती कधी दु:खाला सामोरे जाण्यातून, तर कधी दु:खाला कवटाळण्यातूनच असे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर भार टाकत गेल्या आहेत. विशेषत: आजोळच्या व्यक्तींनी जीएंचे भावविश्व समृध्द केले आहे. तो आपल्या मनावरचा भार कमी करण्यासाठी म्हणून जीएंनी कथालेखनाची कास पकडली.
लेखक आपल्या आयुष्याच्या कोवळ्या कालखंडात ज्या घटना पाहतो, अनुभवतो, पचवतो, आणि त्यांना कोणत्या प्रकारे प्रतिसाद देत असतो, यावर त्याचे व्यक्तीमत्व ठरत असावे आणि तेच त्याच्या लेखनातून पल्लवित होत असावे.
जीएंच्या कथा वाचताना त्यातला परिसर नेमकेपणाने डोळ्यांसमोर उभा राहतो. विशेषत: जीए ज्या दोन गावात (धारवाड आणि बेळगाव) वास्तव्य करून होते, त्या गावातल्या वाचकांना तरी हा परिसर खुणावत असतो आणि मग त्या परिसराच्या दिशेने आमच्यासारख्यांची पावले वळू लागतात. जीए ज्या घरात राहात होते, ते "कडेमनी कंपौंड, माळमड्डी, धारवाड," हे ठिकाण पाहण्यासाठी येणा-या जीएप्रेमींची संख्या कमी नाही. जीएंच्या घराच्या उंबरठ्याला डोके लावून नमस्कार करणारी, तिथल्या मातीचा टिळा आपल्या भाळी लावून कृतार्थ होणारी माणसे आम्ही पाहिली आहेत. याच परिसरात बहरलेल्या त्यांच्या कथा, त्यांच्या कथांमुळे उजळून निघालेला परिसर हा प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट, या स्वरूपाचा आहे. त्यांच्या कथांमधून येणा-या परिसराची ओळख वाचकांना झाली, तर त्यांच्या कथांच्या आस्वादनाला एक वेगळीच उंची लाभेल असे आम्हाला वाटले. त्यांच्या कथांचे आकलन होण्याच्या दृष्टीने या परिसराचा उपयोग व्हावा, होईल- अशी आमची अपेक्षा नाही. कारण कोणत्याही कलाकृतीचे आकलन हे वाचकांच्या पूर्वार्जितावर अवलंबून असते. पण आस्वादन हे नयनमनोहर निसर्गामुळे अधिक सोपे होते. कारण तिथे " ये ह्र्दयीचे ते ह्र्दयी घातले" असा प्रकार असतो. म्हणून जीएंच्या कथांमधील परिसराचा धांडोळा घेताना आमचा भर कथेच्या आस्वादनावर अधिक होता. आकलनाशिवाय आस्वादन कसे शक्य आहे, असा रास्त प्रश्न वाचकांच्या मनात उभा राहील, पण आईच्या स्पर्शाचा अस्वाद तिच्या बाळाच्या रक्तारक्तात घुंगरतो ना, अगदी तसाच जीएंच्या कथांचा थेट घुंगुरनाद वाचकांच्या मनात निनादत राहावा, या प्रामाणिक इच्छेपोटी आम्ही एवढे प्रयत्न केले आहेत. रसिक आणि जिद्न्यासू वाचकांना ही परिसर यात्रा निश्चित आवडेल, असा आम्हाला विश्वास वाटतो.
अ.रा. यार्दी, वि.गो. वडेर

No comments:

Post a Comment