Friday 14 May 2010

ऊर्जेच्या शोधात

ऊर्जेच्या शोधात


डॉ.प्रियदर्शिनी कर्वे


राजहंस प्रकाशन, पृष्ठे : १७०, मूल्य : १६० रूपये


औद्योगिक प्रदूषकांमुळे वातावरणातल्या ओझोनच्या थराला छिद्र पडत आहेत. यामुळे सूर्याचे अतिनील प्रकाशकिरण वातावरणाकडून अडवले न जाता थेट पृथ्वीवर येत आहेत. यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे. हे परिणाम थांबवायचे असतील तर ओझोन थराला छिद्र पाडणार्‍या कार्बन डायॉक्साईडसारख्या प्रदूषकांच्या निर्मितीचा दर विशिष्ट मर्यादेच्या आत यायला हवाय. अर्थात हा केवळ एक सिध्दांत आहे. खरोखरच तापमान वाढत आहे का, हवामानातल्या बदलांचे परिणाम खरोखरच घातक आहेत का, याबद्दल वैज्ञानिकांत बरेच मतभेद आहेत; पण हरितगृह परिणाम हे एक अनिष्ट वास्तव आहे, असं मानणार्‍याची संख्या जास्त आहे, आणि त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर राजकीय मान्यताही मिळालेली आहे. हे संकट टाळायचं असेल तर ही कुणा एकट्यादुकट्याची नाही, तर संपूर्ण मानव समाजाची जबाबदारी आहे. या विचारातून 'क्योटो करारा'द्वारे प्रत्येक देशाला प्रदूषणाची एक किमान पातळी ठरवून दिली आहे. विकसित देशात अतिऔद्योगिकीकरणामुळे आणि विलासी जीवनशैलीमुळे प्रत्यक्षात होणारं प्रदूषण या पातळीपेक्षा किती तरी जास्त आहे. तर अविकसित देशात ते किती तरी कमी आहे. तेव्हा विकसित देश अविकसित देशांतून पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचा हा फरक विकत घेऊ शकतात. याला कार्बनचा व्यापार असं म्हणतात. वातावरणात सोडल्या न गेलेल्या कार्बन डायॉक्साईडच्या बदल्यात डॉलर्स, अशी ही योजना आहे. याला अनेक वादग्रस्त पैलू आहेत, पण या मार्गानं भारतातल्या काही उद्योगांनी आणि संस्थांनी पैसे कमवायला सुरुवातही केली होती.

असा व्यापार करण्याचा एक साधा आणि सर्वमान्य पर्याय म्हणजे वृक्ष संवर्धन. झाडं हवेतून कार्बन डायॉक्साईड काढून घेतात. त्यामुळे एक झाड लावल्यास ते आपल्या आयुष्यातून जितका कार्बन डायॉक्साईड हवेतून काढून घेईल, तितकं प्रदूषण करण्याची मुभा झाड लावून वाढवणार्‍याला मिळते. अमेरिकेसारख्या देशात एक झाड लावून ते जगवण्यापेक्षा भारतासारख्या विकसनशील देशात झाड लावून जगवणं स्वस्त पडतं. त्यामुळे ' क्योटो प्रोटोकॉल'च्या तरतुदींचा वापर करून मी भारतातल्या माझ्या अंगणात झाडं लावण्यासाठी अमेरिकेतल्या एखाद्या कंपनीकडून पैसे मिळवू शकते. अर्थात झाडाचं लाकूड मी कशासाठी वापरणार आहे, आणि त्या वापरातून किती कार्बन डायॉक्साईड परत वातावरणात सोडला जाणार आहे, ही गोष्टही माझा मोबदला ठरवण्यासाठी महत्वाची आहे. उदा. मी हे झाड पारंपरिक चुलीत जाळणार असेन, तर माझा मोबदला कमी होईल. याउलट मी जर ते प्रदूषण कमी करणार्‍या सुधारित चुलीत जाळलं तर माझा मोबदला वाढेल. सुधारित चुलीकडे एकाएकी जगाचं लक्ष का खेचलं गेलं होतं, याची या उदाहरणावरून कल्पना येईल. त्याचबरोबर सुधारित चुलीमुळे प्रत्यक्ष वापरात नेमकं किती प्रदूषण कमी होतं, याच्या मोजणीचं महत्वही जागतिक पातळीवरच्या या सर्व घडामोडींमुळे वाढलं होतं

No comments:

Post a Comment