Friday 14 May 2010

ग्राफिटी वॉल

ग्राफिटी वॉल

कविता महाजन

राजहंस प्रकाशन, पृष्ठे : २००, मूल्य : २२५ रुपये

लेखकाचा चांगला काळ
केवळ लेखक म्हणून विचार केला तर सध्या माझा फार चांगला काळ आहे. चांगला काळ कशामुळे? एक पुस्तक गाजलं, यशस्वी झालं, त्याची दखल वेगवेगळ्या स्तरांवर घेतली जात आहे, वाचकांची पत्रं-फोन येताहेत, पुरस्कार मिळताहेत म्हणून?
हे सगळं होतय म्हणून हा काळ चांगला आहे, असं नाही.
म्हणजे या सगळ्याचा आनंद आहेच.
पण त्याहूनही मला महत्वाचा वाटणारा आनंद अधिक वेगळा आहे.
लिहिण्यासाठी सुचणं, सुचलेलं लिहिता येणं, लिहिण्यासाठी वेळ आणि मानसिक अवकाश देता येणं, लेखन आपल्या प्रायॉरिटी लिस्टवर सगळ्यात वर ठेवता येणं... हे सगळं मला सध्या जमतय, हा खूप मोठा आनंद आहे. असं जमणा-या लेखकांचा इतकी वर्षं मी किती हेवा करत आलेय, हे आठवलं की आता स्वत:चाही हेवा वाटायला लागतो. एकदम मस्त, चक्क सुखीच वाटायला लागतं. दैनंदिन जगण्यातल्या सगळ्या अपरिहार्य राड्यांना सामोरं जावं लागत असूनही कधी नव्हते इतकी मजेत आहे, असं जाणवतं.
इथं माझ्या लेखी हे देखील महत्वाचं नाहीये की मी आता काय लिहितेय, कसं लिहितेय, कुणासाठी लिहितेय, लिहिलेलं कुणी वाचणार आहे का नाही, ते कुणाला पटेल-रुचेल-पचेल-आवडेल का नाही, मी ते छापायला देईन का नाही, ते कधी छापून येईल का नाही... हे काही काही मला माहिती नाहीये. पण मी लिहितेय, लिहू शकतेय, लिहिताना माझ्या मनात कुठलंही भय नाहीये. कुणाचंही दडपण नाहीये. शंका नाहीत. लालसा तर नाहीतच. पण अपेक्षाही नाहीत. आता माझी जगायलाही हरकत नाही आणि मरून जायलाही हरकत नाही.
काळाचा हा तुकडा एवढासा आहे. थोडा वेळ कोवळ्या उन्हाची तिरीप तळहातावर रेंगाळावी आणि तिच्यानं प्रसन्न, उबदार वाटावं तसं वाटतय.
हे टिकणारं नाही, हे मला आतून कुठून तरी ठाऊक आहे, पण आता ती कठोर जाणीव मला टोचत नाही.
मी माझ्या आनंदात रमू शकते आहे.
परवा एका जुन्या मैत्रिणीचं पत्र आलं. तिनं विचारलं होतं, तुझ्या एवढ्या सगळ्या व्यापतापात, अडचणीत, संकटात, दुखण्या खुपण्यात तू कसं काय लिहू शकतेस? की म्हणूनच लिहिता येतं.
तिच्या प्रश्नाचीही मला गंमत वाटली.
मी म्हटलं, त्यात काय? साधं आहे. संगणकाच्या भाषेत सांगायचं तर एक फाईल क्लोज करायची आणि दुसरी ओपन करायची.
आठवलं, एका पहाटे चहा घेत गप्पा मारताना वीणाताई गव्हाणकरांनी मला सांगितलं होतं, व्यक्तिगत आयुष्यातल्या अपयशांना तुझ्या साहित्यिक यशावर ओव्हरलॅप होऊ देऊ नकोस. नाही तर काहीच सुखाचं होणार नाही.
डोळ्यातलं पाणी परतवत मी होकारार्थी मान हलवली.
आपल्याला हवी ती फाईल ओपन करून जगणं किंवा लिहिणं हे साधं आहे, पण सोपं निश्चित नाही. ते प्रयत्नपूर्वक जमवावं लागलं मला. नाही तर इतके कोलाहल असतात डोक्यात आणि इतकं सतत काहीतरी घडत असतं. एका घटनेतून बाहेर पडेपडेतो दुसरी घटना तुमच्यावर येऊन आदळलेली असते. सगळं काही थेट आपल्या स्वत:च्याच आयुष्यात घडतं असं नाही. इतर कुणाकुणाच्या आयुष्यात घडणा-या गोष्टींची सावटंही आपल्यावर पडत असतातच. प्रचंड गती आहे या मुंबईत सगळ्याच गोष्टींना. भोवंडायला होतं. एकाच वेळी इतक्या चांगल्या आणि इतक्या वाईट गोष्टी घडत असतात की त्या क्षणाला हसायचं की रडायचं याची निवड करणं आपल्यावरच येऊन पडतं. कशालाच नीट न्याय देता येणार नाही की काय असं वाटायला लागतं. आणि या गुंत्यातून सुटायचं की अडकून पडायचं याचा निर्णय घ्यावा लगतो. सुटायचं तर नेटानं प्रयत्न करावा लागतो.

No comments:

Post a Comment