Friday 14 May 2010

मातोश्री

मातोश्री

डॉ.विजय ढवळे


नवचैतन्य प्रकाशन, पृष्ठे : २१६, मूल्य : २०० रुपये

सर्वात स्मरणात राहिलेला आईचा कार्यक्रम हा ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केला होता. तेव्हा तिच्या योगप्रात्यक्षिकांना तर भरभरून दाद मिळालीच, पण नंतर संयोजकांनी आग्रह केल्यामुळे तिने ज्येष्ठत्वाविषयी जे तर्कशुद्ध विचार प्रकट केले त्याचा जास्त बोलबाला वृत्तपत्रातून झाला. आपल्या भाषणात आईने सांगितले, उगवताना काय किंवा मावळताना काय सूर्य हा लालच असतो. त्याप्रमाणे वैभव येवो अथवा संकट, थोर व ज्येष्ठ माणसे एकसारखी वृत्ती बाळगतात. कारण माणसाच्या जीवनात येणारा प्रत्येक विजय हा त्रिमित आहे. तिन्ही बाजू समप्रमाणात राहिल्या पाहिजेत. तरच जीवन संतुलित होते. लांबी म्हणजे वय, रूंदी म्हणजे आरोग्य आणि खोली म्हणजे समर्पण किंवा संपूर्ण केलेले अर्पण. हास्य हे चेहे-याची शोभा वाढवतेच, पण मूल्यदेखील वाढवते. स्मितहास्य करण्यासाठी फक्त १४ शिरा एकत्र कराव्या लागतात. तर राग व्यक्त करण्याकरता ८४ शिरा एकत्र कराव्या लागतात. संसारात डोके असावे पण डोक्यात संसार नसावा.

रात्रीच्या वेळी नदीच्या पाण्यावर सोडलेले दिवे पाहा. भोवताली काळाकुट्ट अंधार असतो. खळाळत्या पाण्याखेरीज कोणताही आधार नसतो. कोणत्याही क्षणी आपले अस्तित्व नाहीसे होईल, याची जाणीव असूनही दिवे पुढे जातच राहातात. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचा आदर्श ठेवावा आणि क्रोधापासून शतयोजने दूर जातच राहावे. कारण क्रोध हा असा अग्नी आहे की ज्या व्यक्तीत तो उत्पन्न होतो, त्यालाच तो जाळतो. घरदार हा शब्द घ्या. घर हे स्त्रीचे असते आणि दार हे पुरुषाचे. कारण घराचा स्वर्ग बनवण्याची किमया फक्त स्त्रीच करू शकते. आपण नेहेमी भविष्याचा वेध घेत वर्तमानकाळात जगायचा प्रयत्न केला तरी भूतकाळ आपली पाठ सोडत नाही. म्हातारपण हे दुसरे बालपण म्हणतात, पण या बालपणाला आई कुठून आणायची? कायदा करून मुले आईबाबांना सांभाळतील अशी शक्यता कमीच. स्वावलंबन आणि स्वतंत्र बाणा ठेवला तर ज्येष्ठ नागरिक सुखी जीवन जगू शकतो. चेहरा कधी सुंदर असतो, तर त्या शरीरात सुंदर मन असते. म्हणून मन नेहेमी कशात तरी गुंतवून ठेवावे. नपेक्षा रिकामे मन हे सैतानाचे घर असते. पाण्यात राहून रडणारा मासा कधी कोणी पाहिला आहे का? ज्येष्ठ नागरिक हे आनंदाचे झाड असते, हे विसरू नका. आशावादाला तिलांजली देता कामा नये. कारण आशेच्या तेलावरच जीवनाची ज्योत तेवत असते.

भाषा हा ह्रुदयाचा हुंकार असतो. कोणाही माणसाच्या ह्रुदयाचा तळ गाठायचा असेल तर त्याच्याबरोबर त्याच्या भाषेतून संवाद साधला पाहिजे, याची आईला पूर्ण जाणीव होती. त्याकरता ती नेहेमी ज्यू जमातीला आदर्शवत मानत असे. हिब्रू भाषा ही शंभर वर्षांपूर्वी पूर्णपणे मृत झाली होती. पण स्वत:चे राष्ट्र हवे या स्वप्नाने भारून गेलेल्या, ८४ देशातून विखुरलेल्या ज्यू समाजधुरिणांनी भाषेतली बोजडता काढून टाकली आणि हिब्रूचा सर्वत्र अंगिकार केला. कडव्या इस्लामी अशा बावीस देशांच्या वेटॊळ्यात सापडलेल्या इस्राईल देशाला १४ मे १९४८ साली संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार मान्यता मिळाली. तेव्हा राष्ट्र, वंश, धर्म, भाषा यांच्या तीव्र अभिमानी असलेल्या ज्यू समाजाने आपल्या नवराष्ट्राचे सर्व व्यवहार हिब्रूमधून होतील असे ठरवले आणि आज तिकडचे सर्व व्हवहार त्याच भाषेतून होतात. त्यांच्या आधी अवघ्या नऊ महिने स्वतंत्र झालेल्या भारतात मात्र हिंदी राष्ट्रभाषा न मानणारी चार दाक्षिणात्य राज्ये आहेत. इंग्लिशचे स्तोम माजलेले आहेच.

जर्मनीतील एका हॉलमध्ये तिचा योगासनांच्या प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम होता. सुमारे पाचशे लोक उपस्थित होते. अशा वेळी आई नेहमी सुरुवातीला शीर्षासन करून दाखवत असे. डोक्यावर भार टाकून उभे राहिले की टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत असे. पण जर्मनीत एकही टाळी वाजली नाही.

आईला वाटले की हा श्रोतृवर्ग पाहुण्यांचे स्वगत करण्यास फारसा तत्पर वा उत्सुक नसावा. तरी तिने रेटून आपला ४५ मिनिटांचा कार्यक्रम योगावरील इंग्रजी भाष्यासह ( ज्याचे जर्मन भाषेत एक तरूणी भाषांतर करत होती.) पूर्ण केला. शेवटी निरोपाचे जर्मन भाषेत आउफ विडरजेहेन हे दोन शब्द उच्चारले खरे आणि सर्व प्रेक्षागार एकदम उठून उभा राहिला आणि सतत पाच मिनिटे टाळ्या वाजवत राहिला. आईला अशी मानवंदना अपेक्षित नव्हती. कारण हा श्रोतृगण उदासिन आहे अशी तिची (चुकीची) भावना झाली होती. शेवटी सर्वजण उठून गेल्यानंतर आईने संयोजकांना विचारले, लोकांना जर माझी प्रात्यक्षिके एवढी आवडली होती तर त्यांनी मुळीच टाळ्या का वाजवल्या नाहीत? त्यावर संयोजकांनी चेह-याची घडी न मोडता खास जर्मन पद्धतीने उत्तर दिले, कारण त्यामुळे तुमचे तादात्म्य भंग पावले असते. म्हणून जर्मनीत आम्ही लोक कधी परफॉर्मन्स चालू असताना कोणताही आवाज न करता चूप राहून कार्यक्रम पाहतो.


No comments:

Post a Comment