Friday 14 May 2010

एडिटर्स चॉईस

एडिटर्स चॉईस


कुमार केतकर


नवचैतन्य प्रकाशन, पृष्ठे : २४८, मूल्य : २४० रुपये



एक न संपणारा प्रवास

ब-याच वर्षांपूर्वी ज्यूलिया नावाचा एक चित्रपट पाहिला होता. चित्रपटाची कथा लिलियन हेलमन या प्रसिध्द लेखिकेच्या आत्मकथनावर आधारलेली. कथेचा काळ १९३२ ते १९३८ चा. कथानक घडते नाझी जर्मनीत. हिटलरी उन्माद सर्वत्र व्यापून राहिलेला. ज्यू विद्यार्थी, प्राध्यापक, लेखक, कवी आणि त्यांच्याबरोबरच उदारमतवादी जर्मन विचारवंत, समाजवादी आणि कम्युनिस्ट कार्यकर्ते यांना वेचून वेचून तुरुंगात टाकले जात होते. ज्यू वस्त्यांवर हल्ले होत होते. रस्त्या रस्त्यावर भीतीचे साम्राज्य होते. ज्यूलियावर देश सोडून जाण्याचा प्रसंग येतो. ती बर्लिनहून रेल्वेने निघते, पण नाझी पहा-यातून सहीसलामत मॉस्कोपर्यंत पोचू का नाही, याची तिला शाश्वती नसते. स्वकीयांना नाझी राक्षसांच्या विळख्यात सोडून तिला तसे जाणे अपरिहार्य असते. कम्युनिस्ट रशिया हा त्या वेळेस नाझींचा मुख्य शत्रू. युरोप-अमेरिकेतील भांडवली सत्ताधा-यांची नाझी राजवटीला सुप्त सहानुभूती असल्यामुळे ज्यूलियाला मॉस्को हे एकच आश्रयस्थान होते. तो चित्रपट पाहिल्यापासून माझ्या मनात ज्यूलियाचा बर्लिन-मॉस्को प्रवास घर करून बसला होता. आपण कधी ना कधी तो प्रवास त्याच मार्गाने करायचा मी ठरवले होते.

त्यानंतर काही वर्षांनी मेरी मॉरिस या एका तरुण पत्रकार-लेखिकेने लिहिलेले वॉल टू वॉल हे पुस्तक वाचनात आले. बर्लिन वॉल ते चीनची ग्रेट वॉल असा प्रवास तिने रेल्वेने केला होता. त्या प्रवासाची ती राजकीय आणि चित्तथरारक कथा वाचूनही मी प्रभावित झालो होतो. खरे तर तिचा बर्लिन वॉलपासूनचा प्रवास हा बर्लिनची भिंत पडल्यानंतर ( १९८९) तीन वर्षांनी सुरू होतो. ज्या वर्षी बर्लिनची भिंत पडली त्याच वर्षी बीजिंग येथे चिनी सैन्याने विद्यार्थ्यांचे बंड रणगाड्यांच्या दहशतीने मोडून काढले होते. म्हणजेच तिचा रेल्वेप्रवास शीतयुध्द संपल्यानंतर आणि आधुनिक चीनची भांडवली दिशा अधिक सुस्पष्ट झाल्यावर सुरू होतो. मेरी मॉरिसही रशिया आणि रशियातून चीनला रेल्वेने गेली आहे. ती बर्लिनहून ज्या रशियाला जाते तो रशियाही कम्युनिस्ट नव्हे. सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतरचा रशिया. तिचे पुस्तक वाचल्यानंतर माझा त्या मार्गाने प्रवास करायचा निर्धार अधिकच बळावत गेला.

रेल्वे प्रवासाचे तसे आकर्षण मला आहेच. विमानाने माणूस एका ठिकाणाहून दुसरीकडे अतिशय वेगाने जातो; पण त्याचा सर्वार्थाने भूमीशी व लोकांशी संपर्क तुटलेला असतो. विमानातील सहप्रवासी अठरा देशांचे अठरापगड. खिडकीतून दिसते ते केवळ अथांग आकाश आणि वेळी-अवेळी होणारे सूर्योदय-सूर्यास्त. एखाद्या देशाशी आणि तेथील लोकांशी खरी ओळख व्हायची असेल तर रेल्वे प्रवासाला पर्याय नाही. मग तो प्रवास कोकण रेल्वेचा असो वा पूर्वांचलात नेणा-या गोहत्ती एक्सप्रेसचा असो. जवळ जवळ सर्वांची रेल्वे प्रवासाची आठवण नेहेमीच रसरशीत असते. विमान प्रवासात तुलनेने नाट्य कमी, अनुभव अगदी मर्यादित आणि निसर्गाचे बदलते चेहेरे आणि मूडही थोडे. रेल्वे प्रवासाने झपाटलेले अनेक लेखक आहेत. पॉल थुरो, जॅन मॉरिस, पिको अयर, दिलीप हिरो असे बरेच जण. अगाथा ख्रिस्तीच्या मर्डर ऑन द ओरिएंट एक्सप्रेसमध्ये (पुढे तो चित्रपटही झाला) रेल्वे प्रवासाबरोबरच रहस्यकथाही उलगडत जाते. अलीकडेच टाइम साप्ताहिकानेही एक रेल्वे प्रवासाचा विलक्षण अनुभवसंपन्न विशेषांक प्रसिध्द केला होता.

एका परिषदेच्या निमित्तानं मला जिनिव्हा येथे जाण्याचा प्रसंग आला तेव्हा परिषदेनंतर (स्वखर्चाने) मी जिनिव्हा म्युनिक-हॅंबर्ग-वॉर्सा-व्हिलनिएस-किव्ह-मॉस्को (म्हणजे स्वित्झर्लंड-जर्मनी-पोलंड-लिथुआनिया-युक्रेन-रशिया) असा माझा मार्ग मुक्रर केला. त्यानंतर मी असे अनेक दीर्घ रेल्वे प्रवास केले. हॉंगकॉंग ते बीजिंग ( जेव्हा हॉंगकॉंग चीनमध्ये नव्हते तेव्हा), हॅनाय ते सायगाव (उर्फ होचिमिन्ह शहर), न्यूयॉर्क ते सॅनफ्रॅन्सिस्को, ब्रिटीश-फ्रेंचांच्या समुद्राखालच्या भल्या मोठ्या बोगद्यातून, जर्मनीच्या एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत इत्यादी. त्या प्रवासात मला जी माणसे भेटली त्यांची नावे-गावे माझ्याकडे नाहीत. आता चेहेरेही विस्मृतीत गेले आहेत. पण त्यांचा सहवास मात्र अगदी ठळकपणे माझ्या मनावर कोरला गेला आहे.

माझ्या त्या रेल्वे प्रवासांमुळे माझे मनोविश्व विस्तारले. गाडीत बसल्यानंतर क्षितिज दूरदूर जाऊ लागले तसेच काहीसे माझ्या मनाचेही झाले. तरी माझे मन विशालही झाले. गैरसमज- मग ते धर्माचे असोत वा देशाचे, भाषेचे वा संस्कृतीचे- कोसळून पडले. आपण एकाच ग्रहावरची माणसे असूनही किती भिन्न तसेच किती समान आहोत याचे नवे भान आले.

आजही मी त्या दूरदूर जाणा-या क्षितिजापर्यंत जायचा प्रयत्न करत असतो.

No comments:

Post a Comment