Friday 14 May 2010

मला भावलेले संगीतकार

मला भावलेले संगीतकार

डॉ. अशोक दा. रानडे


राजहंस प्रकाशन, पृष्ठे : २९८, मूल्य : ३०० रूपये

कुमारांच्या गायकीचे परिणाम ज्यांच्यावर झाले त्यांचे दोन वर्ग करता येतील. एक वर्ग गायकांचा व दुसरा श्रोत्यांचा. साधारणत: गेल्या पिढीतले असे ज्यांचे वर्णन करता यावे त्या गायकांना कुमारांचे गाणे सर्वच बाबतीत आपल्या आदर्शांपेक्षा वेगळ्या आदर्शांचा पाठपुरावा करताना आढळले. एखाद्या बाबतीत मेजर डेविएशन चालू शकते. पण सर्व बाबतीत मायनर डेविएशन असेल, तर ते मात्र सहजासहजी रुचत नाही. कारण मग बदललेल्या रूपघटकांची संगती लावण्याची मानसिक प्रक्रिया जास्त व्यापक प्रमाणावर करण्याची आवश्यकता भासू लागते. गेल्या पिढीतल्या ज्या कलाकारांना ही प्रक्रिया जमली त्यांना कुमारांचे गायन केवळ बंड किंवा स्तोम न वाटता नवसंगती लावण्याची अस्सल प्रक्रिया वा पुनरान्वयीकरणाचा मूलभूत प्रयत्न म्हणून एकूण खटाटोप मान्य झाला. जे या वर्गात नाहीत ( आणि त्यांची संख्याही अगदी नगण्य नाही) त्यांना संगीतकला बिघडली व कुमारांचे गायन हे त्याचे ठळक उदाहरण असे वाटले. हा वर्ग एक विषण्ण्ता मनात घेऊन वावरतो. या वर्गात संगीताचा मन:पूर्वक अभ्यास व चिंतन करणारेही बरेच असल्याने कुमारांच्या गायकीचा हा सामाजिक परिणाम मला चिंताजनक वाटतो. अर्थात यात कुमारांचे दायित्व किती असाही प्रश्न विचारता येतो. त्यांच्या संगीतदृष्टीत अथवा सृष्टीत आढळणा-या कमी कसदार वा हिणकस भागाचा कुमारकलेच्या या सामाजिक परिणामाशी संबंध दाखवता आला असता, तर कुमारांना या संदर्भात दोषी धरता आले असते. पण असा संभव कमी हे नमूद केले पाहिजे. एका कर्त्या गायकाची कला अशा प्रकारे इतर गायकांना विन्मुख करू शकते याचा अर्थ सामाजिक अभिरुचीचा अधिक सखोल अभ्यास आवश्यक आहे. असो.

आजच्या पिढीतला गायकवर्ग लक्षात घेतला तर परिणाम संमिश्र असल्याचे जाणवते. सर्वात ढळढळीत परिणाम म्हणजे गायनाचे कलास्वरूप काय याविषयीची जाणीवच कुमारांच्या गायनामुळे बदलली. महाराष्ट्रातील रूढ गायनपद्धती इतक्या चाकोरीबद्ध झाल्या होत्या की कोणत्याही सादरीकरणाचा कलात्म आलेख ऐकताना, सहज व आधीच मांडता येऊ लागला होता. श्रवण व ग्रहण यातले अपेक्षाभंगाचे सुख जवळ जवळ नाहीसे झाले होते. घराण्याची शिस्त, पद्धत इत्यादी भारित वर्णनासह गायनात यांत्रिकता शिरली होती व तीही सवयीने वावरत होती. एकंदर गायनप्रक्रिया गुदमरू लागली होती. या रूढ पद्धतीच्या तुलनेत ऐकता कुमारांच्या गायनाचे आडाखे बांधता येईनात. परिणामत: अभविष्यनीयतेला भूमिका मिळाली. पर्यायाने गाणे ऐकणे आणि गाणे या दोन्ही क्रिया अधिक दक्षतेने होऊ लागल्या. गाणे आपले आपणही कसे वाढते व वाढू द्यावे याचा समकालीन पुरावा कुमारांच्या गायकीने मिळू लागला.

अर्थात कुमारांच्या गायनास आराखडा नाही व तो कळू शकत नाही असे मला सुचवायचे नाही. मुद्दा असा की आराखडा बदलण्याची शक्यताही त्यांच्या गायनदृष्टीत अंगभूत असल्या कारणाने यांत्रिकतेला. ठरावीकपणाला मुळातच छेद जाऊ शकतो, याचा प्रत्यय येतो.

पण याहीपेक्षा लक्षणीय बाब अशी की प्रत्येक कलावंताच्या वाढीला जरी केव्हा ना केव्हा मर्यादा पडल्या तरी त्याने केलेल्या कार्याचे महत्व कमी होत नाही. एखाद्या कवीने नवीन प्रतिमा, नवीन शब्दकळा यांची जाणीव करून द्यावी, त्यांचा एक जोरदार नवीन प्रवाह आणून सोडावा आणि नंतर त्याच व तशाच प्रतिमांच्या वा शब्दकळेच्या नवीन संगती लावून दुस-या कवीने नवीन आविष्कार करावा, असे साहित्यात घडते. त्याच चालीवर सांगीत शब्दभांडार, नादप्रतिमा वगैरेची वेधक भर कुमारांच्या प्रयत्नामुळे संगीत व्यवहारात पडली आणि कलाव्यापार अधिक समृद्ध झाला.

गायकवर्गावर झालेला दुसरा परिणाम संगीतस्वरूपविषयक नव्या जाणिवेतूनच संभवला आहे. चाकोरीबंद नसलेली गायनकला कशाकशातून फुलू शकते त्या बाबतीतली म्हणजे पर्यायाने गायनप्रकारांविषयीची जाणीव अधिक समावेशक झाली आहे. लोकसंगीत, भजन, नाट्यसंगीत यांच्या संगीत मैफिलींच्या रंगमंचावरच्या अवताराची कुमारांनी जणू नव्याने ओळख करून दिली आहे.

अपरिहार्यपणे काही परिणामांचे वर्णन अनिष्ट असेही करावयास हवे. त्यांच्या गायकीने प्रभावित गायक अनेक वेळा चमकदारपणा हा गाण्यातील महत्तेचा सारभूत घटक मानू लागले आहेत. खटके, मुरक्या, जोरदार पण प्रमाणशीर नसल्याने तुटक व आकृतीबंध सिद्ध करण्यात अयशस्वी होणा-या तानांचा अतिरिक्त उपयोग ते इष्ट समजू लागले आहेत. राग तपशीलवार मांडण्यातील एक साधन म्हणून सादरीकरणातले वरील वापर यायला हवेत. नाहीतर एखाद्या शब्दबंबाळ कवितेप्रमाणे गायनही अखेर पोकळच अशा शे-याचे धनी होते याचे भान सुटले आहे.

कुमारांचा "ये"कार सुद्धा आदर्श व अनुसरणीय गानोच्चार नव्हे. त्यांच्या गायनाच्या एकंदर कोंदणात तो खपून जातो. पण म्हणजे तो इष्ट ठरतो असे नाही. गानोच्चार "आ"कारयुक्त हवा या भारतीय संगीत पद्धतीतील मूलभूत सिद्धांतास रद्द ठरवू शकेल अशी कोणतीही वैशिष्ट्ये "ये"कारात आढळत नाहीत. खुद्द कुमारांनी "मला उमजलेले बालगंधर्व" या आपल्या कार्यक्रमात निर्मळ "आ"काराचा पाठपुरावा करण्याचा निकराचा प्रयत्न केला होता हे लक्षात घेण्यासारखॆ आहे. कुमारांचा "ये"कार हा संगीतबाह्य (म्हणजे प्रकृतीविषयक इ.) कारणांचे फलित असू शकते, हेही निरीक्षण इथे नोंदवावेसे वाटते.

कुमारप्रभावित गायक इतक्या तीव्रतेने प्रभावित झालेले दिसतात की, दुस-या प्रकारची गाणी ते ऐकू शकत नाहीत, ते असहिष्णु असतात असेही विधान केले जाते. आपल्याला एक विशिष्ट गाणे इत्यादी पटले तरी दुस-या प्रकारचे ते गाणेच नव्हे असा अर्थ सांगीत व्यवहारात लावणे अयोग्य म्हणता येईल. कुमारांच्या सारग्रहित्वाचे सार कुमारप्रभावितांना कळू नये व सांगीत कडवेपणामुळे दुसरी गाणी त्यांना पोचू नयेत, ही घटना खेदकारक आहे.

या असहिष्णुतेचा उदभव क्रिया-प्रतिक्रिया न्यायाने झाला आहे असे एक स्पष्टीकरण या संदर्भात संभवते. दुसरे एक उत्तर असे की या सर्व प्रतिक्रियांची तीव्रता तात्कालिक आहे. विशिष्ट कलासंबद्ध दृष्टीकोनाची तीव्रता जितकी अधिक, संबंधित कलाकर अनुयायांचा कडवेपणा जितका धारदार तितके त्यांचे अल्पजिवित्व खात्रीचे. कोणत्याही कलाव्यापारात एकांगी, एकपदरी, एकसुरी प्रतिक्रिया मुळातच भुसभुशीत पायांची ठरते. अनेकांगी आणि बहुविध कलाव्यापार आज ना उद्या अशा चौकटीतून यशस्वीपणे बाहेर पडल्याशिवाय राहात नाहीत, अशी इतिहासाची साक्ष आहे.

आता राहिले श्रोते. फॅशन म्हणून कुमारगंधर्व ऐकणारा एक श्रोतृवर्ग आजही आहे. कृष्ण्मूर्तींचे भाषण, क्रिकेटची मॅच, कुमारांचे गाणे इ. अनेक प्रसंगांना आवर्जून हजर राहणारा श्रोता असतोच. विशिष्ट क्षेत्रात सध्या ज्यांचे नाव तिकडे हा श्रोता असतो. कुतूहलाने जायचे, लक्ष वेधेल अशा प्रकारे प्रशंसा वा निंदा करावयाची व परतायचे असा क्रम असतो. कोणाच्याही सांगीत मूल्यमापनात या श्रोत्याचा विचार करावयाचे कारण नाही. पण प्रथमत: केवळ कुतूहलाने जाणारा व मग फारसे समजले नाही पण वेगळे वाटले अशी प्रतिक्रिया नोंदवणाराही श्रोता असतो. हाही श्रोता हळूहळू बदलू शकतो. पण न बदलल्यास सर्वच अपरिचिताला सरसकट दाद देणारा हा श्रोता कलाव्यापारास फारसा पोषक नाही. आपल्या सादरीकरणातील फक्त वेगळेपणाला दाद देणारा श्रोता हा तितकासा महत्वाचा नाही याची जाणीव कलाकाराने ठेवणे गरजेचे असते. कारण नाहीतर अशा श्रोत्यांची घाऊक दाद कलाकारावरही परिणाम करू शकते व तो इष्ट असेलच असे नाही. श्रोत्यांना कलेच्या गाभ्याकडे नेण्याची जबाबदारी कलाकारानेसुद्धा आपली मानली पाहिजे. कुमार आपले राग व आपल्या बंदिशी लोकांच्या गळी उतरवण्यासाठी गात, तेव्हा ता संदर्भातले प्रश्न निर्माण होत. परिचित राग व बंदिशी कुमारांनी आपल्या शैलीने अधिक प्रमाणात मांडळ्या असत्या तर श्रोता तयार करण्यात अधिक भरीव कामगिरी झाली असती असे वाटते.

No comments:

Post a Comment