Friday, 14 May 2010

व्हाया...वस्त्रहरण

व्हाया...वस्त्रहरण


गंगाराम गवाणकर


डिंपल प्रकाशन, पृष्ठे : २५६, मूल्य : २५० रुपये


पूर्वी कोकणात बोटीने प्रवास करताना आम्ही नाळीवर बसून प्रवास करीत असू। योगायोग असा की विमानातसुद्धा आम्हाला नाळीवरील (विमानाच्या शेपटीकडील) जागा मिळाली होती. पहाटेचे दोन वाजले होते. सर्वांनीच कसेबसे दोन घास खाऊन रात्री नऊ वाजता घर सोडलं होतं. त्यामुळे सर्वांच्याच पोटात कावळे ओरडत होते. आमचं विमान अध्ये मध्ये कुठेही न थांबता थेट लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उतरणार होतं. "विमान कुठेही थांबणार नाही" म्हटल्यानंतर आम्हा कोकण प्रांतियांमध्ये चुळबुळ सुरु झाली. कारण आम्हा कोकणवासीयांना धुळीनं माखलेल्या, कुबट वासाच्या, लाल डब्याच्या एसटीतून खाचखळग्यातून धडपडत प्रवास करण्याची सवय. शिवाय तासागणिक "येथे एसटी फक्त पाच मिनिटे थांबेल" असा कंडक्टरचा पत्रा कापल्यासारखा आवाज कानावर पडल्याशिवाय प्रवासही सुखकर होत नसे. पण विमानात खाण्यापिण्याची सर्व सोय आहे, हे कळल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला. तरीही "रेड वाईन अजून कशी येना नाय?" अशी काही जणांची चुळबुळ चालू होती.


काही वेळाने, पण अगदी वेळेवर आम्हाला लंडनला सुखरूप नेण्यासाठी विमानाची घरघर सुरू झाली. थोडंसं चुकल्यासारखं वाटलं. कारण आम्हाला बॉम्बे सेंट्रलच्या एसटी आगारातला ड्रायव्हर बघण्याची सवय. तो तंबाखू मळत एसटीभोवती आरामात फिरून मागील आणि पुढील टायर्सवर लाथा घालणार. स्वत:च्या सीटवर बसल्यावर पाचकन तंबाखूची पिचकारी खिडकीतून बाहेर टाकणार. कधीकधी ही पिचकारी एखाद्या प्रवाशाच्या मस्तकावर मारून झाल्यावर कंडक्टरने बॉम्बस्फोट झाल्यासारखा दरवाजा लावून घंटी वाजवली की ड्रायव्हर एखादी दरड कोसळल्यासारखी एसटी सुरू करायचा. हे सर्व आवाज कानात फिक्स असल्यानं कोकणात निघालोय असं मनापासून वाटायचं.

पण इथं तसं काहीच नव्हतं. सर्व कसं शांत शांत. फक्त विमानाच्या पंख्याची कानावर पडणारी घरघर... विमानातून प्रवास करायची बहुतेक जणांची पहिलीच वेळ होती. सर्वांनीच क्षणभर डोळे मिटून आपापल्या देवाचा धावा सुरू केला. पण त्या अगोदर म्हणजे विमान धावपट्टी सोडण्यापूर्वी रोबोसारखा दिसणारा एक माणूस समोर आला. त्याने कमरेला पट्टा कसा बांधावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. शिवाय देखण्या हवाई सुंद-या लगबगीने काहीजणांना कमरेला पट्टा बांधायला मदत करू लागल्या. खरं म्हणजे, अगदी सोपी कृती होती ती! पण इतरांनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा आपणाला कमरेला पट्टा बांधता येत नाही, असा अभिनय करायला सुरुवात केली. कारण त्यांना हवाई सुंदरीच्या नाजूक हाताने कमरपट्टा लावून घ्यायचा होता. सर्वांचे कमरपट्ट्याचे काम सुरू असतांना मोंडकरबाई खुर्चीतल्या खुर्चीत चुळबुळ करीत होत्या. सुलोचनाबाई त्यांच्या शारीरिक क्षेत्रफळाच्या मानाने खुर्चीत अगदी फीट बसल्या होत्या. त्यांना पट्ट्याचे टोक सापडत नव्हते. सुलोचनाबाईंच्या शेजारीच संजीवनी जाधव ( नाटकातील मंजुळाबाई) बसल्या होत्या. सुलोचनाबाईंची चुळबुळ पाहून हवाईसुंदरी आपलं नेहेमीचं झेरॉक्स हास्य करीत त्यांच्याजवळ आली आणि आपल्या मंजुळ आवाजात विचारती झाली, " शाल आय हेल्प यू?" तिचे अस्पष्ट उच्चार सुलोचनाबाईंना नीटसे कळले नाहीत. त्यांनी मग जवळच बसलेल्या संजीवनी जाधवना विचारलं, " संजीवनी, ह्या दात विचकून घुडग्या काय इचारताहा गो? " संजीवनीने हवाई सुंदरीच्याच पद्धतीने अगदी मृदू आवाजात तिला समजावून सांगितले, " अगो, तुझ्या कमरेक पट्टा बांधूक मदत करू काय, असं इचारता हा."

त्यावर सर्वांना ऐकू जाईल अशा मालवणी कचक्यात सुलोचनाबाई म्हणाल्या, " शिरा घाल या नकटीच्या तोंडार. अगो, बसल्याजागेर ह्या खुर्चेत मी इतक्या गच्च बसल्याला असय की, तुमचा ईमान जरी उलटा पालटा झाला तरी ह्या खुर्चेतून मी काय पडूचच नाय. माका तुमच्या टीचभर पट्ट्याची गरजच काय?" आणि मग स्वत:च सात मजली हसत सुटल्या. त्याबरोबर आम्ही एकाच वेळी बावीस जण ढग गडगडल्यासारखे हसत सुटलो. तशी विमानाची नाळ गदगदली आणि ब्रिटिश प्रवासी वर्गाच्या काळजाचे ठोके चुकले. त्यांनी बायबल वाचन सुरु ठेवलं.

काही जणांनी लाल शर्टस घातले होते. त्या लाल शर्टाकडे पाहून आणि अंगठा तोंडाकडे नेऊन रेड वाईन कधी येतली, असे एकमेकांना खाणाखुणा करून विचारीत होते. त्यांच्या खाणाखुणा सुरू असताना शिरस्त्यानुसार "संकटकाळी बाहेर पडनेका मार्ग" ची प्रात्यक्षिके एक जिवंत माणूस यंत्रमानवासारखा दाखवायला लागला. त्याच्या हालचाली इतक्या यंत्रवत होत्या की तो खरोखरच जिवंत माणूस आहे का नाही, अशी शंका येत होती.

यंत्रमानवाची प्रात्यक्षिके संपतात ना संपतात तोच फुलपाखरांसारख्या त्या सुंदर हवाईसुंद-यांनी प्रत्येकाच्या हातात आपल्या नाजूक हातांनी एकेक ट्रे द्यायला सुरुवात केली. त्या ट्रेमध्ये तेवढ्याच नाजूक चिमट्यांनी त्या एक हिरवी सुरळी ठेवत गेल्या. आमच्या दिलीप कांबळीची (गोप्या) चुळबुळ सुरू झाली. त्याला त्या हिरव्या सुरळीचं काय करावं ते कळत नव्हतं. तो माझ्या पाठीमागेच बसला होता. "गवाणकरानूं, या हिरव्या सुरळीचा फाटफाटी दोन वाजता काय करूचा?" असं विचारू लागला. ब्रिटिश वर्गाचा एक डोळा बायबलवर आणि दुसरा डोळा आमच्या कृतीवर होता. मी दिलीपला मागं वळून काही सांगणार तोच ब्रिटिश प्रवासी जो क्षणभरापूर्वी घाबरलेला होता, तो फिदीफिदी हसत होता. मी मागं वळून पाहिलं तर आमच्या दिलीपने ती हिरवी सुरळी काही तरी खाद्य पदार्थ आहे असं समजून त्याचा लचका तोडला होता. ब्रिटिश प्रवाशांना हसू फुटणं साहजिक होतं. कारण ती सुरळी म्हणजे चेहरा स्वच्छ पुसण्याचा जंतूनाशक रुमाल होता. दिलीपच्या कृतीने ब्रिटिश प्रवासी थोडे रेलॅक्स झाल्यासारखे वाटले. त्यांनी मनात विचार केला असेल, की ज्या माणसांना हातरुमालाचा उपयोग कसा करायचा हे कळत नाही ते रिव्हॉव्हरचा कसा काय उपयोग करणार?

No comments:

Post a Comment