Friday 14 May 2010

अमृता इमरोझ : एक प्रेमकहाणी

अमृता इमरोझ : एक प्रेमकहाणी


उमा त्रिलोक ( अनुवाद : अनुराधा पुनर्वसु)


पद्मगंधा प्रकाशन, पाने : १२३, मूल्य : १०० रूपये


खरं सांगायचं तर अमृतानी पाखंडीपणा तर केलाच, पण बरंच काही अधिक केलं, विवाहित असूनही त्या अशा दुसर्‍याच पुरुषाबरोबर - ज्याच्यावर त्यांचं प्रेम होतं, आणि जो त्यांच्यावर प्रेम करत होता - राहिल्या, तेही समाजाला मान्य नसतांना। अमृता आणि इमरोझ दोघांनाही कुठल्याही प्रकारच्या सामाजिक शिक्कामोर्तबाची गरजच वाटली नाही. दोघांनीही ती गोष्ट निग्रहाने नाकारली.


इमरोझना एकदा याबद्दल मी स्पष्टच विचारलं, तेव्हा ते म्हणाले, ' ज्या जोडप्यांना परस्परांच्या प्रेमाची खात्री नसते, त्यांनाच समाजाच्या मान्यतेची गरज भासते. आम्ही आमची मनं पूर्णपणे जाणतो आहोत; मग समाजाची लुडबूड हवीच कशाला? आमच्या या प्रकरणात समाजाला काही स्थानच नाही. ' त्यांनी पुढे ठासून सांगितलं, ' आम्ही एकमेकांशी वचनबध्द आहोत, याची समाजापुढे कबुली द्यायची गरजच काय? तुम्ही एकमेकांना बांधील असा वा नसा, कुठल्याच बाबतीत समाज तुम्हाला काहीच मदत करू शकत नाही. स्वत:च्या मर्जीप्रमाणे वागायची तयारी नसेल अथवा स्वत:च्या करणीची जबाबदारी घ्यायची तयारी नसेल, तेव्हाच समाजाने आपल्या वतीने काही निर्णय घ्यावा अथवा आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करावं, अशी आपली अपेक्षा असते. जे निर्णय आपले आपण घेत असतो, ते चुकीचे ठरले, तरी त्याचं खापर आपण दुसर्‍या कोणावर फोडता कामा नये.' ते पुढे म्हणाले,' खरं तर अशा वेळीच आपल्याला समाजाची गरज वाटते. एक आधार म्हणून. म्हणजेच आपल्या सोयीसाठी. अमृता आणि मी - आम्हाला दोघांनाही अशा सोयीची गरज नव्हती. '

त्यांना थांबवत मी अमृताजींना विचारलं, एक सामाजिक नियम मोडून एक वाईट उदाहरण तुम्ही समाजापुढे ठेवलं आहे, असं नाही का तुम्हाला वाटत?'

काही वेळ त्या काहीच बोलल्या नाहीत. नंतर मध्ये थांबत, जणू स्वत:शीच बोलल्याप्रमाणे त्या म्हणाल्या, 'नाही, उलट आम्ही दोघांनी हे प्रेमाचे बंध अधिक घट्ट केले आहेत. प्रेम हा लग्नाचा मुख्य आधार असतो. आम्ही सामाजिक नियम तोडला असं तरी का म्हणायचं? तन, मन, करणी, वचन या सार्‍यांद्वारा आम्ही एक्मेकांशी अत्यंत एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहिलो आहोत. इतर जोडप्यांना इतकं जमलं असेलच असं नाही. प्रत्येक समस्येशी आम्ही एकत्रपणे सामना केला आहे. आणि अत्यंत सच्चेपणाने आमच्यातलं नातं जपलं आहे, जोपासलं आहे.'

जराही न कचरता अत्यंत अभिमानाने त्या पुढे म्हणाल्या, 'खरं तर समाजापुढे आम्ही एक अत्यंत ठाशीव, परिणामकारक उदाहरण ठेवलंय. समाजाला आम्ही बळकट केलंय. आम्ही काय म्हणून या गोष्टीची लाज बाळगावी? उलट, आमच्याबद्दल चुकीचा समज करून घेतल्याबद्दल समाजालाच लाज वाटायला हवी.'

एका प्रख्यात हिंदी लेखकाने त्यांना विचारलं होतं की, त्यांच्या सर्व नायिका सत्याच्या शोधात घर सोडून निघाल्या, हे समाजाला घा्तक ठरणार नाही का? अमृतानी शांतपणे उत्तर दिलं होतं, ' चुकीच्या सामाजिक मूल्यांमुळे घरं मोडली असतील, तर सत्याच्या आग्रहासाठी आणखीही घरांची मोडतोड झाली पाहिजे.'

No comments:

Post a Comment