Friday 14 May 2010

अमरगीत

अमरगीत


निशा मीरचंदानी


अनुवाद : लीना सोहोनी, मेहता प्रकाशन, पृष्ठे : २४०, मूल्य : २०० रुपये


एक पावसाळ्यातील रात्र होती. बाबा आमटे गा्वाची शौचालयं साफ करून घरी परतत होते. पावसाची भुरभूर चालू होती. ते आपल्या डोक्यावर मैल्याची टोपली वाहून नेत होते. अचानक त्यांना रस्त्यातील खड्ड्यात काही तरी हालचाल जाणवली. आधी त्यांना वाटलं, ते चिंध्यांचं गाठोडं असावं. पण मग त्यांच्या लक्षात आलं, तो एक माणूस होता. बाबा तुळशीरामाचं वर्णन करताना म्हणाले, कुष्ठरोगाच्या शेवटच्या स्टेजमधला माणूस होता तो. नुसतं सडलेलं मांस. नाकाच्या जागी केवळ दोन भोकं, हातांच्या आणि पायांच्या बोटांचा तर पत्ताच नव्हता. जिथे डोळे असायला हवे, तिथे अळ्या - किडे वळवळत होते.

बाबा घाबरून निघून गेले. आपल्याला कुष्ठरोगाचा संसर्ग झाला तर काय - या भीतीनं. एका गोष्टीची त्यांना जेव्हा जाणीव झाली, तेव्हा मात्र त्यांना फार मोठा धक्का बसला- आयुष्यात पहिल्यांदाच भीतीनं त्यांच्या मनाचा ताबा घेतला होता. बाबा परत मागे फिरले आणि तुळशीरामाचं पावसापासून संरक्षण करण्यासाठी त्याच्या अंगावर गोणपाटाचा एक तुकडा पांघरला. कुष्ठरोगाविषयी त्यांच्या मनात भीतीनं जे ठाण मांडलं होतं, त्याचा मुकाबला करत असताना त्यांच्या मनाला अत्यंत क्लेश झाले. त्याविषयी नंतर त्यांनी लिहिलं आहे, मला या आधी कधीच कोणत्याच गोष्टीची भीती वाटली नव्हती. एका भारतीय स्त्रीच्या आत्मसन्मानाचं रक्षण करण्यासाठी मी ब्रिटिश सोजिरांचा मुकाबला केला होता, त्यानंतर गांधीजींनी अभय साधक असं माझं नामकरण केलं होतं. वरोड्याच्या झाडूवाल्यांनी मला गटारं साफ करून दाखवण्याचं आव्हान दिल्यानंतर मी तेही केलं. पण गुंडांचा आणि ब्रिटिश सैनिकांचा निर्भयपणे सामना करणारा हा माणूस तुळशीराम नावाच्या जिवंत प्रेताच्या दर्शनानं थरथर कापू लागला. हातापायांची बोटं झडलेली, अंगात कपडा नाही, अंगावरच्या जखमांमध्ये अळ्या झालेल्या...अशा त्या कुष्ठरोगाच्या नुसत्या दर्शनानं तो घाबरला. म्हणूनच मी कुष्ठरोग्यांसाठी काम करायचं ठरवलं. कोणाला मदत करण्यासाठी म्हणून नाही तर स्वत:च्या आयुष्यातील या भीतीवर विजय मिळवण्यासाठी. या गोष्टीमुळे इतर चार लोकांचं भलं झालं, ही गोष्ट वेगळी. पण महत्वाचा मुद्दा असा की, मी या भीतीवर विजय मिळवला.

या अनुभवाविषयी बाबा ताईंशी बोलले. कुष्ठरोगानं ग्रस्त झालेल्या लोकांसाठी भरीव कार्य करण्याची आपली इच्छा त्यांनी ताईंपाशी व्यक्त केली. यात धोका होता. पण तरीही ताईंनी बाबांना मनापासून पाठिंबा दिला. त्या काळी कुष्ठरोगावर काहीच इलाज नव्हता. या रोगानं ग्रस्त झालेल्या लोकांच्या पदरी एकाकीपणा आणि अवहेलना येई. आज एडसग्रस्त रुग्णांच्या वाट्याला जी वागणूक येते, अगदी तशीच. जी.के. चेस्टरटन यांच्या उदगारांची आठवण काढत बाबा म्हणाले, अजंता-वेरूळच्या लेण्यांमधील भग्नावशेषांमध्ये आपण सौंदर्य बघतो. मग माणसाच्या भग्नावशेषांमध्ये हे सौंदर्य का बघू शकत नाही आपण? कुष्ठरोग, त्यातून येणारं अपंगत्व... याची भीती का वाटते आपल्याला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी कुष्ठरोग्यांसाठी काम करण्यास सुरुवात केली.

कुष्ठरोग्यांसाठी जी काही माहिती मिळवता येईल ती मिळवून बाबांनी ती आत्मसात केली. या विषयावर जेवढी पुस्तकं मिळवून वाचता येतील, तेवढी वाचली. सरकारी रुग्णालयात कुष्ठरोग्यांसाठी बाबांनी स्वेच्छेनं काम करायला सुरुवात केली. गांधीजींचे सुप्रसिध्द शिष्य मनोहर दिवाण यांचं दत्तपूर येथे कुष्ठरोग्यांसाठी रूग्णालय होतं. बाबांना आठवड्यातून दोन दिवस तिथे जाता यावं, अशी विनोबा भावॆ यांनी व्यवस्था केली. कलकत्ता स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थेत बाबा कोर्स करीत असताना या रोगावर उपाय निघालेला नव्हताच. १८७३ मध्ये आर्मोर हान्सन याने कुष्ठरोगाला कारणीभूत होणारे जंतू शोधून काढण्यात यश मिळवले होते. डॉ. धर्मेंद्र हे एक विद्वान नामांकित संशोधक होते. प्राण्यांवर प्रयोगशाळेत चालू असलेले प्रयोग अयशस्वी झाल्याचं त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलं. ते जाता जाता सहज म्हणाले, खरं तर या प्रयोगासाठी कोणी माणूस आला तर उपयोग होईल. आपले विद्यार्थी या गोष्टीची गंभीरपणे दखल घेतील असं खुद्द डॉ. धर्मेंद्र यांना वाटलं नव्ह्तं. पण औषधांची चाचणी स्वत:वर करून घेण्यासाठी बाबा तयार झाले. बाबांना मुद्दाम कुष्ठरोगाच्या जिवंत आणि मृत जंतूंची लागण करण्यात आली. पण तरीही बाबांना कुष्ठरोग झाला नाही. त्यामुळे या चाचणीतून काहीच निष्कर्ष काढता आला नाही. पण बाबांच्या दृष्टीनं हा प्रयोग यशस्वी झाला. कारण अखेर त्यांनी आपल्या मनातील कुष्ठरोगाच्या भीतीवर विजय मिळवला होता.

No comments:

Post a Comment