Monday 26 April 2010

इन ब्लॅक ऍंड व्हाईट

इन ब्लॅक ऍंड व्हाईट

मूळ लेखिका : इना पुरी

अनुवाद : स्वाती देशपांडे

मेनका प्रकाशन, पृष्ठे : ३४२, मूल्य : ३२० रुपये

वैयक्तिक आयुष्यात मनजीत एकटे पडत असले तरीही त्यांच्या चित्रकलेकडे त्यांनी कधीही दुर्लक्ष होऊ दिले नाही. अगदी जीव ओतून ते स्वत:च्या कामात झोकून देत आणि त्याची परिणती व्हायची ती बनलेलं प्रत्येक चित्रं विकलं जाण्यात. खरेदीदारांची स्टुडिओत नुसती रीघ लागलेली असायची. त्यात आर्ट गॅलरीचे मालक असायचे, चित्रसंग्राहक आणि चित्रविक्रेतेही हजेरी लावायचे अन हातोहात मनजीतची चित्रं संपून जायची. गढीतल्या मोठ्या कार्यालयातही मनजीतमधला कलाकार मुक्तपणे, खुलेपणे काम करत असायचा... कुठल्याही प्रकारची घुसमट त्यांना कधी अनुभवावी लागली नाही. तिथे नेहेमी समीक्षक, चित्रकार आणि साहित्य क्षेत्रातल्या व्यक्तींचा राबता असायचा आणि अशा मंडळींमुळे गढीतलं वातावरण नेहेमीच हलकंफुलकं आणि गजबजलेलं असायचं.

परंतु, स्वामी भोपाळला स्थलांतरित झाले आणि मनजीतना गढीमध्ये एक प्रकारचं रीतेपण जाणवायला लागलं. एकेकाळच्या गजबजलेल्या गढीतलं वातावरण क्षुद्र, क्षुल्लक मुद्द्यांवरच्या राजकारणामुळं गढूळ व्हायला लागलं. हळूहळू तिथे कलेचं व्यावसायिकीकरण व्हायला लागलं आणि व्यावसायिक लाभाच्या आशेने अनेक कलाकारांची गढीत शिरकाव करण्यासाठी खेचाखेची होऊ लागली. हे वातावरण पचनी न पडल्यामुळे हळूहळू एकामागून एक सगळे ज्येष्ठ चित्रकार गढीतून बाहेर पडले. त्यात मनजीतही होते. मनजीतकरता हा निर्णय घेणं फार सोपं नव्हतं. त्यांच्या आयुष्यात गढीला खूप महत्वाचं स्थान होतं. गढीतच मनजीतचे खूप चांगले स्नेहसंबंध निर्माण झाले होते. मनजीतभोवती बड्या बड्या प्रशंसकांचा गराडा असूनही त्यांना स्वामींची उणीव सतत छळत राहायची. मग त्यांच्यावर अजून एक मोठा आघात झाला. स्वामींचा अचानक मृत्यू. मनजीतला पुन्हा एकदा डोक्यावरचं ममत्वाचं छत्रं हरवल्यागत वाटू लागलं. स्वामींच्या अस्थींची मूठभर रक्षा- आप-अल्या दोस्ताची स्मृतीच जणू - घेऊन मनजीत डलहौसीला परतले... डलहौसीच्या शांत वातावरणात स्वामींना चिरनिद्रा मिळाली.

आपल्या मित्राच्या निधनाचं दु:ख, शोक मनजीतनी अगदी वेगळ्या प्रकाराने व्यक्त केला. पुढच्या डलहौसीवारीत स्वामींच्या स्मृतीप्रित्यर्थ एका संगीत मैफीलीचं आयोजन करण्याचा बेत करून मनजीत कामाला लागले. सर्वप्रथम काम होतं ते म्हणजे योग्य कलाकार शोधण्याचं. त्यांना एकदम बीबी नूरा या गायिकेची आठवण आली. बीबी नूरांचा आवाज अगदी पहिल्यांदा ऐकला होता, तेव्हापासूनच या आवाजाने मनजीतच्या मनावर गारूड केलेलं होतं. बीबी नूरा जालंधरच्या रहिवासी म्हणून मनजीतनं ताबडतोब जालंधरकडे कूच केलं. मोठ्या मुश्किलीने त्यांना बीबींचा पत्ता मिळाला अन एका जुन्याशा बोळकांडीतलं ते घर शोधून काढण्यात अखेर मनजीतना यश आलं. घर अतिशय गलिच्छ, ओंगळ वस्तीत होतं. तिथलं ते अस्वच्छ, दुर्गंधी वातावरण पाहून मनजीतना तिथे नेणा-या रिक्षावाल्याने दुप्पट भाडं मागून घेतलं इतका तो परिसर किळसवाणा होता. परंतु मनजीत मागे हटणा-यातले नव्हते. त्यांनी ताबडतोब बीबींचं घर गाठलं. बीबींचे पती हुक्का ओढत खाटेवर बसले होते. मनजीतनी बीबींची चौकशी केल्यानंतर काहीशा संदिग्धपणे बीबींच्या पतींनी त्या मझारवर किंवा बहिणीकडे गेल्या असतील अशी माहिती दिली. मनजीतनी आशा सोडली नाही. काही वेळाने ते पुन्हा बीबींच्या घरी पोचले. नूरा बीबी त्यावेळी मात्र घरात सापडल्या. मनजीतनी बीबींना डलहौसीत कार्यक्रम करण्याची गळ घातली आणि त्यांचा होकार घेऊनच ते बाहेर पडले.

बीबींच्या डलहौसीमधील मैफलीच्या वेऴची गोष्ट. जेरोम पटेल हे बडोदास्थित चित्रकार तेव्हा मनजीतबरोबर सुट्टीला म्हणून डलहौसीत आले होते. बीबी मैफलीच्या तयारीत होत्या. जेरोमनी त्यांना पाहिलं आणि ते स्तिमितच झाले. ठिकठिकाणी शिवलेला, जीर्ण झालेला सलवार कमीझ घातलेली ही बाई गाण्याचा कार्यक्रम करणार? छे! ती ही नसेल... काही तरी गडबड आहे. जेरोमच्या मनात विचारचक्र चालू होतं. त्यांनी ताबडतोब मनजॊतला गाठलं. "ही बाई गायिका, कलाकार असेल असं तिच्याकडे पाहून वाटतसुद्धा नाही. ही रे काय श्रोत्यांना प्रेक्षकांना खिळवून ठेवणार?" आपल्या मित्राची शंका ऐकूनही मनजीत विचलित झाले नाहीत. मनजीतनी पूर्वी एक्झिबिशन ग्राऊंडवर बीबींचं गाणं ऐकलं होतं आणि या जवाहि-याने बीबींमधल्या हि-याची पारख तेव्हाच केली होती. डलहौसीच्या कार्यक्रामाचं मानधन ठरलं होतं. ते बेतास बात होतं. मनजीतनी ते बीबींनी आगाऊ देऊनही टाकलं होतं. आघाडीच्या गायिकेचे कुठलेही नखरे, तोरा बीबींनी दाखवला नाही. मैफलीच्या आधी त्यांनी मनजीतकडे एकच मागणी केली,.. थोडीशी अफू मिळवून देण्याची. या काहीशा विचित्र मागणीने मनजीत गडबडून गेले. अफूऐवजी इतर काही.. व्हिस्की, रम, देशी दारू... काही चालू शकेल का याची चाचपणी केली पण बीबींची मागणी एकच होती- अफू... इतर काही त्यांना चालण्यातलं नव्हतं. शोध शोध शोधूनही अफू सापडेना, तेव्हा मनजीतनी अखेरचा उपाय म्हणून हकीमजींकडे धाव घेतली. काहीसं बिचकत, नाखुशीनेच हकीमजींनी अफू पुरवली.

बीबींची मागणी पूर्ण झाली. मैफल सुरू झाली. त्या दिवशी बीबींचा आवाज असा काही लागला, इतका वर चढत गेला की प्रेक्षकांनी त्यांचं गाणं डोक्यावर घेतलं. एकदा सादर केलेलं गाणं पुन्हा पुन्हा सादर करण्याची फर्माईश होत गेली. श्रोते अक्षरश: बीबींच्या आवाजाने वेडॆ झाले. त्यामध्ये जेरोम पटेलही होते. बीबींचा आवाज ऐकून त्यांचा सुरुवातीच्या विरोध, साशंकता सगळं गळून पडलं आणि ते बसल्या जागी खिळून राहिले. बीबींचे जीर्ण झालेले कपडे, तुटकी पेटी सगळं काही विसरून जेरोम त्या आवाजाच्या जादूने मंत्रमुग्ध होऊन गेले होते. बीबींच्या आवाजाची जादूच अशी होती.

मेंदूतला माणूस

मेंदूतला माणूस

डॉ.आनंद जोशी, सुबोध जावडेकर

राजहंस प्रकाशन, पृष्ठे २३३, मूल्य : २२५ रुपये

लिंडा सिड्नी ही स्वित्झर्लंड्मध्ये राहणारी एक वृद्ध महिला. त्र्याहत्तराव्या वर्षी तिला पक्षाघाताचा झटका आला. त्याचा एक परिणाम म्हणून तिला कमी दिसायला लागलं. आजीबाईंच्या मेंदूच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यात आढळलं की मेंदूच्या मागच्या बाजूचा ऑक्सीपिटल लोब नावाचा जो भाग असतो, त्याला होणारा रक्तपुरवठा कमी झालाय. ऑक्सीपिटल लोब हे दृष्टीचं महत्वाचं केंद्र. त्यामध्ये बिघाड झाल्यामुळे दृष्टी कमी होणं साहजिकच होतं. औषधोपचार सुरू झाल्यावर हळूहळू दृष्टी सुधारली. पण एक वेगळाच त्रास आजीबाईंना होऊ लागला. त्यांच्यावर उपचार करणा-या त्या म्हणाल्या, ’डॉक्टर, मला छान दिसायला लागलय आता. पण एक मात्र झालय, मला हल्ली स्वप्नं पडायची अजिबात बंद झाली आहेत. हे काही चांगलं नाही झालं.’
डॉक्टरांना गंमत वाटली. ते हसून म्हणाले, ’वय झालं तुमचं, आजीबाई, आता कोण परीकथेतला राजकुमार तुमच्या स्वप्नात येणार आहे?’
लिंडाबाई चांगल्या खमक्या होत्या, त्यांनी डॉक्टरांवरच बाजी उलटवली.
’तुम्हाला कळत कसं नाही डॉक्टर? आता या वयात प्रत्यक्ष कुणी राजकुमार येणार नाही, हे मला माहीत आहे. म्हणून तर स्वप्नात यायला हवाय. काय? बरोबर आहे ना?’
डॉक्टरांनी हार मान्य केली. त्यांना डॉक्टरांनी झुरिकच्या विद्यापीठातील हॉस्पिटलमधील क्लडिओ बसेटी या मेंदूतज्ञकडे पाठवलं. त्यांनी मेंदूची एमाआरआय चाचणी घेतली. ऑक्सीपिटल लोबला इजा झाली आहे, हे निदान बरोबर होतं. ऑक्सीपिटल लोब या भागात दृष्टीसंवेदनांचं संस्करण होतं. म्हणजे माणूस जे पाहतो, त्याला जे काही दिसतं, त्याला इथं अर्थ प्राप्त होतो. माणसांचे चेहरे, आजूबाजूच्या वस्तू, स्थळे यांच्या डोळ्याकडून आलेल्या प्रतिमा इथं पूर्वस्मृतींशी ताडून पाहिल्या जातात. त्यांची ओळख पटते. दृष्टीशी संबंधित भावना आणि आठवणी याही ऑक्सीपिटल लोबमध्येच साठवल्या जातात.
क्लाडिओ बसेटींनी लिंडाच्या झोपेतील मेंदूलहरींचा सखोल अभ्यास केला. आपल्या झोपेचं एक चक्र असतं. कुणाची झोप सावध असते, कुणाची नसते. पण सगळ्यांच्या झोपेच्या चार अवस्था असतात. त्या आळीपाळीनं चालू असतात. त्या त्या वेळी मेंदूतून ज्या लहरी निघतात, त्यांचा पॅटर्न प्रत्येक अवस्थेत वेगळा असतो. या लहरीचा वेध घेऊन शात्रज्ञांना झोपेची कोणती अवस्था चालू आहे, ते समजू शकतं. क्लाडिओ बसेटींना दिसून आलं की लिंडाबाईंचं हे निद्राचक्र भंग पावलेलं नाहीये. त्यात कुठलाही व्यत्यय आलेला नाही, येतही नाहीये, मग काय झालय? स्वप्नं पडायची का थांबली?
माणसाला झोप नक्की कशासाठी आवश्यक आहे, यावर अजूनही शास्त्रज्ञांचं एकमत झालेलं नाही. पण झोप या विषयावर संशोधन मात्र भरपूर झालेलं आहे. आपल्याला जेव्हा गाढ झोप लागते, तेव्हा डोळ्यातल्या बुबुळांची सतत हालचाल होत असते. त्यामुळे झोपेच्या या अवस्थेला रॅपिड आय मूव्हमेंट स्लीप, रेम झोप, असं नाव आहे. रेम झोपेच्या काळात माणसाचा मेंदू अतिशय क्रियाशील असतो. अगदी जागृतावस्थेप्रमाणेच पूर्णपणे सजग असतो. पण माणसाची झोप मात्र गाढ असते. हे कसं हे कोडंसुद्धा अजून उलगडलेलं नाही.
या रेम झोपेच्या काळातच माणासाला स्वप्नं पडतात. रेम झोप आणि स्व्प्नं पडणं या गोष्टी जोडीजोडीनं होतात. जुन्या मराठीतला शब्द वापरायचा तर एकसमयावच्छेदेकरून घडतात. त्यामुळे या दोन्हीसाठी असलेली मेंदूतील यंत्रणा एकच आहे, असे शात्रज्ञांना वाटत होते. किंबहुना रेम झोपेतली डोळ्यांची हालचाल हा स्वप्नावस्थेचा दृष्य आविष्कार आहे अशी एक थिअरीही मांडण्यात आली होती. लिंडाबाईंची ही रेम झोप व्यवस्थित होती, पण त्यांना स्वप्नं मात्र पडत नव्हती. हे काही तरी वेगळंच होतं. शास्त्रज्ञांची झोप उडवणारं होतं. कारण आजवर त्यांचा जो समज होता, त्याला त्यामुळे जोरदार धक्का बसला होता.
डॉक्टर मार्क ब्लग्रोव्ह यांच्या मते स्वप्न पडणं हा उत्क्रांतीवादाचाच एक आविष्कार आहे. उत्क्रांतीत स्वप्नांचं काहीतरी कार्य आहे हे नक्की. ते काय हे अजून आपल्यालोआ माहीत झालेलं नाही. किंवा असं असू शकेल की दुसरी कुठलीतरी यंत्रणा उत्क्रांत होत असताना त्याचा एक सहाअविष्कार, एक बायप्रॉडक्ट म्हणून हे स्वप्नांचं प्रकरण निर्माण झालं असेल. लोबासे विद्यापीठातले डॉक्टर जिम हॉर्न म्हणतात, ’स्वप्नं हा मनाचा सिनेमा आहे. झोपेसारख्या कंटाळवाण्या अवस्थेत मेंदूचं मनोरंजन करण्यासाठी स्वप्नं पडत असावीत.’ वेस्ट इंग्लंड विश्वविद्यालयातल्या मनोविज्ञान संशोधिका जेनी पार्कर यांच्या मते स्वप्नांना निव्वळ मनोरंजन मानणं चुकीचं आहे. स्वप्नं हा माणसाच्या जाणिवेचाच आवर्ती प्रकार आहे. झोपेत जाणिवांची आवर्तनं होतात, पुन:पुन्हा होत राहातात. माणसाला स्वप्नं पडतात, याचा अर्थ झोपेतही माणसाचा मेंदू जागा असतो. काहीतरी करत असतो. निजलेलं असतानाही माणसाच्या जाणिवा जाग्या असतात. आपल्याला स्वप्नं का पडतात ते कळलं तर मानवी जाणिवेच्या इतर अंगांवरही प्रकाश पडेल.