Friday 14 May 2010

एका तेलियाने

एका तेलियाने


गिरीश कुबेर


राजहंस प्रकाशन, पृष्ठे : २४८, मूल्य : २०० रुपये


१९८५ च्या उत्तरार्धात सौदीनं इंग्लंड आणि अमेरिकेबरोबर दोन भले मोठे बार्टर डील्स ठरवले। इंग्लंबरोबरच्या व्यवहारात तेलाच्या बदल्यात सौदीला तब्बल १३२ लष्करी विमानं, १२ पाणसुरूंगविरोधी बोटी, ३६ हॉक जातीची लढाऊ विमानं आणि प्रशिक्षणासाठीची २४ विमानं दिली जाणार होती. या सगळ्या व्यवहारातलं साधारण ४०० कोटी पौंडाचं बिल तेलाच्या रूपात दिलं जाणार होतं. दुस-या अशाच एका व्यवहारात अमेरिकेकडून सौदी एकाच फटक्यात दहा बोईंग ७४७.३०० ही अलिशान विमानं घेणार होता. तीही शक्तिशाली अशी रोल्स रॉईसचं इंजिन असलेली. या व्यवहाराचा नक्की आकार गुलदस्त्यात होता. पण दोन्हींच्या बदल्यात सौदी तेवढ्या किंमतीचं तेल अमेरिकेला देणार होता.



वरकरणी यात वावगं किंवा हरकत घेण्यासारखं काही नव्हतं. पण यामानींना यात वेगळा वास आला. त्यांनी अधिक चौकशी केली. त्यात धक्कादायक माहिती पुढे आली. ती म्हणजे इंग्लंडबरोबरच्या व्यवहारात राजे फहाद यांच्या मुलाला १५ टक्के मलिदा मिळणार होता. म्हणजे जवळपास ६० कोटी पौंड. आणि बोईंगकडून १० कोटी पौंड आणि वर एक भेट. अत्यंत श्रीमंती, जणू तरंगता राजवादाच वाटावा, अशी एक बोट बोईंगतर्फे या राजपुत्राला भेट दिली जाणार होती. पण राजे फाहद यांना त्याचं काहीच वाटत नव्हतं. त्यांनी यामानींना सांगितलं, " आपले तेलाचे नळ जरा जास्त उघडा. तेलाचं उत्पादन जोमानं करा आणि ते अतिरिक्त तेल द्या इंग्लंडला पाठवून... आहे काय नि नाही काय!" याबरोबरच यामानींसाठी स्पष्ट सूचना होती, " यातलं काहीही "ओपेक"ला सांगू नका म्हणजे झालं."

हे भीषण होतं. वास्तविक सौदी राजकारणात आणि सत्तेत इतका काळ घालवलेल्या यामानींना लाच, दलाली माहीत नव्हती, असं नाही. अनेक व्यवहारात सौदी राजघराण्यानं मोठमोठी दलाली खाल्ली होती. अनेकदा मोठमोठी कामं राजाच्या गोतावळ्यातल्याच कुणाकुणाला दिली गेली होती. अनेकांनी यासाठी बनावट कंपन्या काढल्या होत्या... हे सगळं यामानींच्या डोळ्यादेखतच चाललं होतं. पण आताचा मामला वेगळा होता. पहिल्यांदाच सौदी सरकार आपल्या देशाला मिळालेला नैसर्गिक प्रसाद असा चोरट्यासारखा विकणार होतं आणि त्यातली गंभीर बाब अशी की, या व्यवहारातून येणारी एक कपर्दिकही देशाच्या खजिन्यात जाणार नव्हती. यामानींचा विरोध होता तो याला. त्याचबरोबर या व्यवहाराचा दुसरा धोका होता. अन्य कोणालाही न सांगता सौदी या व्यवहारासाठी जवळपास सहा कोटी बॅरल्स इतकं तेल ओतणार होता. कुठलाही हिशेब न लागता इतकं प्रचंड तेल जगाच्या बाजारात आल्यामुळे तेलाचे भाव आणखी कोसळणार होते आणि इतरांना त्याचा फटका बसणार होता. त्यामुळे मंदीची लाट अधिकच चेवणार होती. हे वाईट होतं. एका कुटुंबाच्या फायद्यासाठी इतक्या सगळ्यांना संकटात टाकणं यामानींना मान्य नव्हतं. देशाचं इमान विकणं त्यांना पटणारं नव्हतं.

त्यांनी या सगळ्याला विरोध केला. कोणत्याही देशात सर्वसत्ताधीशाला मोडता घालायचा, तर मोठी छाती आणि शुभ्र चारित्र्य लागतं. राजाच्या विरोधात असं उभं राहाणं कुठेच सोपं नसतं. सौदीसारख्या देशात तर नाहीच नाही. हे करताना यामानींची कुठेही भूमिका आपण काही जगावेगळं करतोय, अशी नव्हती. एरवी त्याग करणा-यांना खूप दर्प येतो. नकोसा होतो तो. पण यामानींचं म्हणणं साधं होतं. जगाच्या तेलबाजाराचा तराजू सौदीच्या वाळूत दडलाय. तेल असलेल्या आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे तेल नसलेल्यांच्या हिताचं रक्षण करणं, ही आपली जबाबदारी आहे. आसपासची बेजबाबदार मंडळी डोक्यावरचं कमरेला नेसू लागली म्हणून आपणही तसच करायचं नसतं.
....पण हे सगळं शहाणपण वाळू ओली करण्यासारखं होतं. ओल दिसते, पण ओलावा नसतो.

तेलाची घसरण चालूच होती. यामानी ती रोखण्यासाठी जाणूनबुजून काही करत नाहीयेत, असं राजघराण्यातल्यांना वाटत होतं. त्यातून १९८६ सालच्या ऑक्टोबर महिन्यात जिनिव्हात ओपेकची बैठक भरली. त्यासाठी जावं की न जावं, हे यामानींना कळत नव्ह्तं. पण अजून तरी ते सौदीचे तेलमंत्री होते. तेव्हा जाणं भाग होतं. ते बैठकीला गेले. पुन्हा तेच, चर्चेचं दळण. त्यातून काहीही निष्पन्न न होणं. मतभेद. वादविवाद आणि आरोप प्रत्यारोप. जवळपास आठवडा झाला. तरी चर्चा तिथेच. शेवटी राजे फाहद यांनी ही कोंडी फोडायची ठरवलं. त्यांच्या मनात आता इतर देशांनाही धडा शिकवायची खुमखुमी दाटून आली. त्यांनी रियाधमधून जिनिव्हात असलेल्या यामानींना आदेश दिला. तेलाचे भाव १८ डॉलर्सवर स्थिर ठेवायचे आणि सौदीला तेलकोट्यातून मुक्त करायचं. सौदीला हवं तेवढं तेल काढायची मुभा ओपेकनं द्यायची.

"जमणार नाही," यामानींनी थंडपणे आपल्या राजाला सांगितलं.

दुस-याच दिवशी राजे फाहद यांच्या शाही सही-शिक्क्यानिशी यामानींच्या नावे ओपेक कार्यालयात याबाबतचा आदेश आला. दस्तुरखुद्द राजाचा फॅक्स होता. आपल्या मंत्र्यांनी काय करावं, याचा आदेश देणारा. पण यामानी बधायला तयार नव्हते. त्या दिवशीच्या बैठकीत इराणचे मंत्री जाहीरपणे म्हणाले, " सौदी राजाला कसलीही ताकद नाही... त्यांचा मंत्रीच त्यांचं ऐकत नाही." यामानींनी यावरही काही प्रतिक्रिया दिली नाही. पण एवढं मात्र त्यांना मनोमन कळून चुकलं की पुढल्या ओपेक बैठकीला यायचा प्रसंग आपल्यावर येणार नाही. रियाधमधून राजे फाहद यांची भुणभुण सुरूच होती. त्यावर आता यामानींनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी राजाला स्वच्छ सांगितलं, " जे काही तुम्हाला करायचय, ते मी जरूर करीन. पण त्याबाबतच्या कोणत्याही करारावर वा कागदपत्रावर माझी स्वाक्षरी असणार नाही. हा सगळा व्यवहार तुम्ही तुमच्या सहीनं करा."

फाहद यांना हे अपेक्षित नव्हतं. आपला मंत्री आपल्या इतका विरोधात जाईल. याचा अंदाज त्यांना आला नाही. परिस्थिती इतकी ताणली गेल्यानंतर काही मार्ग सापडणं शक्य नव्हतच. बैठकीचाही बो-या वाजला. २२ ऑक्टोबरला ओपेकची आणखी एक अपयशी बैठक सरली. यामानी परत आले. आल्यावर ते रिवाज चुकले नाहीत. राजाला भेटून आपला सलाम अदा केला. रितीप्रमाणे सगळा अहवाल सादर केला. त्यानंतर आठवडाभरात दोनदा त्यांची राजाशी भेट झाली, पण सगळ्यांनाच जाणवत होतं. त्यात ओलावा नाही. मृतदेहाचा थंडावा आहे. पण जिवंत ओलावा नाही.

यामानी आता शिणले होते. जराही पुढे न सरणा-या या खेळाचा त्यांना आता कंटाळा आला होता. त्या दिवशी संध्याकाळी विरंगुळा म्हणून मित्रांकडे पत्त्याचा डाव मांडला, पण त्यातही पानं मनासारखी येत नव्हती. हुकमाचा पत्ता चुकत होता. डावामागून डाव हरत होते ते. पराभावाचं चक्र मोडावं म्हणून मित्रानं सहज टीव्ही लावला. बातम्या सुरू होत्या. त्या मध्येच थांबवून राजकीय आदेश वाचून दाखवला गेला.

यामानींना तेलमंत्रीपदावरून काढून टाकण्यात आलं होतं.

हे असं काही होईल, असं अनेकांना वाटत होतंच. त्यामुळे ज्यांना यातलं काहीच माहीत नव्हतं, अशांना या बातमीचा धक्का बसला. यामानी मात्र शांत होते. ही घटना घडल्यावर जणू दुस-याच कुणाच्या तरी बाबतीत आपण काही ऐकतोय, असा यामानींचा चेहरा होता. त्यांची प्रतिक्रिया होती फक्त एक मोठा नि:श्वास. पण तोही छातीवरनं कसलं तरी वजन, दडपण दूर झाल्यासारखा. मोठ्या काळजीतून दूर झाल्यावर एखाद्याची भावना व्यक्त होते, तशीच यामानींची प्रतिक्रिया होती.

एका क्षणात ते सगळं त्यांनी झटकून टाकलं.
मित्राला सांगितलं, पत्ते पीस.
खेळ नव्यानं सुरू झाला.
आणि डाव त्यांच्या मनासारखा पडायला लागला.
ते जिंकायला लागले.

No comments:

Post a Comment