Sunday 17 October 2010

तमाशा विठाबाईच्या आयुष्याचा

तमाशा विठाबाईच्या आयुष्याचा - योगिराज बागूल
राजहंस प्रकाशन
पृष्ठे - २००, मूल्य - १७५ रुपये

भर पावसाळ्याचे दिवस होते. पाऊस ये म्हटलं की, बदबद येई. पण थांब म्हटल्यावर थांबत नसे. ज्येष्ठ जाऊन अर्धा आषाढ संपत आला होता. तमाशांची फिरती बंद होती. पण पोटातली भूक थोडीच थांबणार होती? पिल्लांच्या चोचीत भरविण्यासाठी विठाला हातपाय हलवणं भागच होतं. अशा दिवसात फडातल्या निवडक आणि आवश्यक तेवढ्याच कलाकारांना घेऊन ती पुण्याच्या, कोल्हापूरच्या, जालन्याच्या किंवा मुंबईच्या थिएटर्समधून बारी करीत फिरत असे.
विठासाठी तो पाणकळा तसा जडच होता. ती पाच महिन्यांची गरवार होती. जीव जड वाटत असे. हिंडणं फिरणं खूप जीवावर येई. बोर्डावर पाय ठेवण्यास नकोसं वाटे. अशातच ’आमच्या थिएटरसाठी तुमचा संच पाठवा,’ म्हणून जालन्याच्या बन्सीकाकानं भाऊ-बापूच्या ठेकेदाराला निरोप पाठवला. ठेकेदारानं बापू आणि विठासह बारा पंधरा कलाकारांचा संच बन्सीकाकाच्या थिएटरमध्ये जालन्याला पाठवला. बन्सीकाकाच्या थिएटरमध्ये प्रत्येक कलावंतीण रसिकांच्या आवडीची लावणी गवळण गोड आवाजात गाऊन आणि अंगातून पाणी निचरूपर्यंत नाचून सादर करी. बन्सीकाकानं सा-या शहरात आणि आजूबाजूच्या खेड्यापाड्यात ’आज रात्री विठा आपल्या अदाचाअनोखा चमत्कार दाखविणार... आजची बारी पाहण्यास विसरू नका...’ अशी जाहिरात केली होती.
विठा साजशृंगार कारत होती. आज विठा गर्द आकाशी रंगाचा छानसा शालू नेसली होती. आता फक्त पायात चाळ बांधायचे बाकी होते... आणि अचानक विठाच्या ओटीत दुखू लागलं. कळा उठू लागल्या. त्या कळांच्या वेदनांनी विठाच्या अंगाचा दाह होऊ लागला. घशाला कोरड पडू लागली. किटिही पाणी प्यायली तरी घसा सुकू लागला. अशातच ओटीत एक जोराची कळ आली आणि विठा खालीच कोसळली. पोटातल्या गर्भाला धक्का बसला. ओटीतून रक्तस्त्राव सुरू झाला. शरीरातलं एवढं सारं रक्त गेल्यामुळे विठाचा चेहरा पार कोमेजून गेला होता. शरीर क्षीण झालं. हातपाय गळून गेले.
बोर्डावर हंसा-मंजुळाची बारी संपली. त्यांनी रसिकांना खूष केलं होतं. त्यानंतर भाऊ-बापूचे कलाकार बोर्डावर आले. नमन झाल्यावर गवळण झाली आणि बारीतल्या लावण्या सुरू झाल्या. एक कलावती छानशी लावणी म्हणू लागली. नाचू लागली. पण रसिकांना विठा हवी होती. त्यामुळे त्यांच्यात चुळबूळ सुरू झाली. नृत्यांगनांची लावणी अर्ध्यावर असतानाच एक प्रौढ मध्येच उठून उभा राहिला.
’ए बाई, बस कर तुझं यीवळणं. आमी विठ्याची लावणी ऐकायला आलोय. असं आलतूफालतू कायबी नही. आम्हाला विठाचं गाणं ऐकायचय.’ तो म्हणाला आणि त्याच्या पाठोपाठ सारेच गोंधळ करू लागले. विठाला ऐकण्यासाठी - पाहण्यासाठी आलेला साराच रसिक उभा राहिला. कालवा वाढला.
’राव, विठाला ऐकायला पेरतं औत सोडून आठ मैलांवरून आलो.’ एकजण शेजारच्याला म्हणाला.
’अहो, माझं पाच वर्षाचं एकुलतं एक पोरगं घरात तापानं फणफणत व्हतं. बायकू म्हणी डॉक्टरकडं जाऊ. नही गेलो अन विठाबाईचा खेळ पाह्यला आलो.’ दुसरा.
’अहो राव, तुमी तर पोराचं सांगताय... घरी माझा बाप शीक हाय. जीव राहतो का जातो असं झाल्यालं. हिथून त्याला दवा न्यायला आलो अन विठाचा खेळ म्हणताना तसाच घुसलो. आता बोला.’ आणखी एक मध्येच म्हणाला.
बन्सीकाकाच्या थिएटरमध्ये प्रेक्षकांचा कालवा खूपच वाढला होता. कोण कोणाला बोलतय, काहीच ऐकण्यास येत नव्हतं. मधूनच एखाद्याचं पागोटं सुटत होतं. ते सावरता सावरता त्याचं कोपर दुस-याच्या टोपीला लागून ती खाली नळकत होती. गोंगाट वाढतच चालला होता. थिएटर गच्च भरलं होतं. बन्सीकाका रसिकांना वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न करत होता. पण गोंधळ इतका होता की, चार माणसांच्या पलीकडे त्याचा आवाज जात नव्हता. बोर्डावरील सर्व कलाकार स्तब्ध उभे होते. थिएटरच्या हौद्यात रसिकांचा गोंधळ शिगेला पोहोचला होता. त्यांचा कालवा विठाच्या कानापर्यंत येऊ लागला. आडवी झालेली विठा तटकन उठली. शृंगाराच्या खोलीत गेली. एका मोठ्या उपरण्यानं पोट आणि ओटी करकचून आवळून बांधली. रक्तानं माखलेलं पातळ बदललं. पुन्हा साज चढवला. बापू, शंकरनं, बन्सीकाकानं विठाला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण तिनं कुणाचच ऐकलं नाही.
पायात चाळ बांधून विठा जशी बोर्डावर आली, तसे रसिकांचे पागोटे आणि शेले हवेत उडू लागले. वाकून पायरीच्या पाय पडत विठा बोर्डावर आली.हात लावून ढोलकी-तुणतुण्याच्या आणि पेटीच्याही पाया पडली. समोर येऊन डोक्यावरून पदर घेऊन रसिकांना नमस्कार केला. तसं सारं शांत झालं. काही सेकंद थिएटरमध्ये कमालीची शांतता पसरली.
... आणि मग ढोलक्याची चाटी-बायांवर जशी थाप पडली, तशी ढोलकीच्या तालावर विठाचे पाय थिरकू लागले. तिच्या पायातली घुंगरं बोलू लागली. विठा धुंद होऊन नाचू लागली. नृत्याचा एकेक आविष्कार सादर करू लागली. रसिक खूष होऊन हाळ्या-शिट्या मारू लागली. एक रुपयाच्या नोटेपासून शंभरीच्या नोटीपर्यंत बोर्डावर नोटांचा जणू सडा पडला होता. विठाला पाय ठेवण्यास जागा नव्हती. रसिकांकडून मिळालेली दाद पाहून विठा पोटातलं दु:ख विसरून गेली. विठाच्या टिपेच्या आवाजातले बोल सा-या थिएटरमध्ये घुमू लागले. शेवटचा अंतरा गायल्यावर पुन्हा मुखडा गाऊन जोरदार झटक्यावर विठाची पावलं स्थिर झाली. तसा नख-यानं हलक्याच पुढं येऊन तिनं रसिकांना मुजरा केला आणि गर्रकन पाठीमागं फिरून विंगेत निघून गेली. विठा बोर्डावरून निघून गेली तरी रसिक टाळ्या वाजवतच होते.
पाठीमागं येताच विठा पटकन खाली बसली. तिच्या अंगाला दरदरून घाम फुटला होता. ओटीपोटाला आवळलेली उपरण्याची गाठ तिनं ढिली केली. नाचून गाऊन थकल्यामुळं कोरडा पडलेला घसा पाण्याचा एक मोठा घोट घेऊन ओला केला. थकवा तर कमालीचा आला होता. हातापायांसह सारं शरीर निस्तेज निस्तेज झाल्यासारखं वाटत होतं. बराच वेळ विठा तशीच पडून राहिली.

गुलाम

गुलाम : अच्युत गोडबोले, अतुल कहाते
मनोविकास प्रकाशन, पृष्ठे : ३७६, मूल्य : ३७० रुपये

गुलामगिरीच्या विरोधातील चळवळी

गुलामगिरीच्या विरोधात संघटना आणि चळवळी एकोणिसाव्या शतकात जोर धरायला लागल्या. ’अमेरिकन ऍंटी स्लेव्हरी सोसायटी (एएएस)’ या समतावादी विचारांच्या गो-या लोकांनी उभ्या केलेल्या भूमिगत संघटनेची स्थापना १८३२-३३ साली फिलाडेल्फियामध्ये झाली. पुढची काही वर्ष एएएसनं गुलामगिरीच्या विरोधात लाखो पुस्तकं, पत्रकं, नियतकालिकं वितरित केली. विल्यम लॉईड गॅरिसन आणि इतर काही जण या संघटनेच्या प्रमुख लोकांपैकी होते. १७९० सालापासून अमेरिकन कॉंग्रेसकडे देशभरातून गुलामगिरीचा निषेध करणारी पत्रकं पाठवली गेली. एएएसचा उदय होण्यापूर्वी तॊ २०-३० च्या संख्येनं असायची. आता तब्बल चार लाख पत्रकं कॉंग्रेसकडे पोचवली जायला लागली. पण त्यांच्याकडे अजिबात लक्ष दिलं जाऊ नये असं दक्षिणेकडॆच्या राज्यातल्या सीनेटर्सनी सुचवलं. १८३६ साली गुलामगिरीच्या विरोधात छापलेलं सगळं साहित्य एकत्र करून फेकून दिलं जावं असं काही जणांनी कॉंग्रेसच्या बैठकीत म्हटलं.
दुर्दैव म्हणजे जरी या संघटनेची निर्मिती चांगल्या उद्देशानं झाली असली तरी अनेक मुद्द्यांवरून तिच्या संचालक मंडळतल्या लोकांचीच जुंपे, उदाहरणार्थ आपल्या संघटनेत आफ्रिकन बायकांना स्थान दिलं जावं का नाही, हा वादाचा मुद्दा ठरला. मग या संघटनेत १८४० साली फूट पडून एक वेगळीच संघटना तयार झाली. गॅरिसनला पकडून देणा-याला जॉर्जिया सरकारनं ४,००० डॉलर्सचं बक्षीस जाहीर केलं. ’लिबरेटर’ किंवा ’अपील’ या नावाच्या भूमिगत संघट्नांची गुलामगिरी विरोधातली नियतकालिकं वितरित करत असताना कुणी पकडलं गेलं तर त्या माणसाला नॉर्थ कॅरोलिना राज्यात १,५०० रुपयांचा दंड केला जायचा. या नियतकालिकांच्या जॉर्जिया राज्यातल्या एका वर्गणीदाराला त्याच्या घरातून खेचून काढण्यात आलं. मग ओढत नेऊन त्याला चाबकानं फोडून काढलं गेलं, नदीत बुडवलं गेलं आणि जिवंत जाळण्यात आलं. गॅरिसन सापडला तेव्हा त्याच्या गळ्यात दोरी बांधून त्याची बॉस्टनमध्ये रस्त्यात जाहीरपणे धिंड काढण्यात आली. एलिजा लव्हजॉय नावाच्या समतावादी गो-या माणसावरही काळ्यांच्या बाजूनं लिहिल्याबद्दल अनेकदा हल्ले करण्यात आले. शेवटी तर त्याचा खून करण्यात आला. नंतर गॅरिसनवादी लोकांनी शांततामय मार्गानं काळ्या लोकांच्या बाजूनं लढा देत राहण्याचा मार्ग निवडला. पण त्याला फ्रेडरिक डग्लस (१८१८ - १८९५) नावाच्या माणसानं विरोध दर्शवून आपली आक्रमक मार्ग अवलंबणारी एक स्वतंत्र चळवळ उभी केली आणि काळ्यांसाठी एक वर्तमानपत्रंही सुरू केलं.
या डग्लसचं बालपण अंगावर काटाच आणतं. डग्लसला आपण कधी, कुठे जन्मलो, आपले आई-वडील कोण याविषयी काही माहीत नव्हतं. आपण गुलामगिरीत जन्मलो आहोत एवढंच त्याला थोडा मोठा झाल्यावर उमगलं. त्याला त्याच्या मालकाच्या घरी त्याची आजी इतर अनेक मुलांबरोबर सांभाळे. तो १२ वर्षांचा असताना आजी त्याला त्याच्या मालकाच्या दुस-या लांब असलेल्या घरी कायमचंच सोडून गेली. या दुस-या घरी राहयचं नाही हा त्याचा आक्रोश अर्थातच फोल ठरला. तिथे त्याला सांभाळायला असलेली मावशी अतिशय कठोर होती. अतिशय क्षुल्लक कारणांवरून ती तिथल्या मुलांना शिक्षा करायची आणि मारायचीसुद्धा. हताश झालेला डग्लस बरेचदा अर्धपोटीच राही. मग पावाचा तुकडा तोंडात घेतलेल्या कुत्र्याच्या मागे फिरे. न जाणो तो तुकडा त्याच्या तोंडातून चुकून पडला तर आपल्याला खायला मिळेल असं त्या लहानग्याला वाटे. मावशीनं टेबलावरचं कापड साफसफाईच्या वेळी झटकलं की तेव्हा खाली पडणारे अन्नाचे बारीक सारीक तुकडे खाऊन तो पोटातली आग कमी करायचा प्रयत्न करे. पुरेसे कपडे नसल्यानं प्रचंड थंडीपासून बचाव करण्यासाठी तो मक्याची कणसं गोळा करण्यासाठीच्या पोत्यांमध्ये किंवा कपाटांमध्ये शिरून बसून राही.
थोडा मोठा झाल्यावर डग्लसनं गुलामगिरीविरूद्ध बंड करायचा आणि लिहिणं - वाच्णं शिकायचा प्रयत्न केल्यावर त्याला ४० मैल दूरवरच्या शेतावर शिक्षा म्हणून दुस-या मालकाकडे पाठवलं गेलं. तिथे तीन दिवस त्याला चाबकानं फोडून काढण्यात आलं. दिवसभर काम, प्रचंड थंडीत अंगात घालायला कपडे नाहीत, झोपताना बिछाना - अंथरूणाचा पत्ता नाही, अन्न म्हणजे जनावरंसुद्धा खाणार नाहीत असा कसला तरी लगदा आणि हे सगळं कमी म्हणून का काय खूप मारहाण या सगळ्या प्रकारांमुळे डग्लस मनानं पूर्णपणे खचून गेला. रविवारी सुट्टी असताना कसलीही हालचाल न करता हताशपणॆ पडून राही. त्याच्या नव्या मालकानं एका काळ्या बाईला आपली भूक भागवण्यासाठी विकत घेतल्याचं डग्लस बघत होता. मालक रोजच तिच्यावर अत्याचार करायचा. त्यातून तिला मुलं होणार आणि आपल्याला आणखी गुलाम मिळणार याविषयी तो मालक जाहीरपणे अतिशय गुर्मीनं फुशारक्या मारत सांगायचा आणि तसं झालंही. हे सगळं बघून डग्लस अजूनच खिन्न झाला.
एके दिवशी डग्लसला आपल्या आयुष्याची इतकी घृणा आली की त्यानं या सगळ्या व्यवस्थेशी लढा द्यायचं ठरवलं. आपल्या मालकानं मारहाण केली की प्रतिकार करायचा, असा मनोनिग्रह त्यानं केला. त्यानं नव्या मालकाकडून पळ काढून पुन्हा जुन्या मालकाचा आश्रय घेतला. जुना मालक जरा बरा होता. त्यानं डग्लसला पुन्हा वेगळ्या ठिकाणी गुलामगिरीसाठी पाठवलं. तिथे चार धट्ट्याकट्ट्या गो-या कामगारांनी डग्लसला बेदम मारहाण केली. तो तळमळत असताना कुणाचीही त्याला सोडवण्यासाठी पुढे यायची हिंमत झाली* नाही. या सगळ्यामुळे गुलामगिरीतून सुटका करून घ्यायचा डग्लसचा निश्चय अधिकाधिक पक्का होत गेला. शेवटी १८३८ साली त्यानं तिथून कसाबसा पळ काढून न्यूयॉर्कचा आश्रय घेतला. तिथेही पळून आलेल्या गुलामांना हुडकून काढून त्यांच्या मालकांकडे परत पाठवण्यासाठी अनेक हेर फिरतच होते. त्यातून कशीबशी सुटका करून एका जहाज बांधणीचं काम करणा-या गो-या मालकाकडे डग्लस काम करण्यासाठी गेला. तिथे इतर सगळे कामगार गोरे असल्यानं मालकानं डग्लसला कामवर घ्यायला नकार दिला. मग डग्लस मिळॆल ते काम करायला लागला.
एके दिवशी डग्लसच्या हातात विल्यम लॉईड गॅरिसन चालवत असलेलं ’लिबरेटर’ नावाचं वर्तमानपत्र पडलं आणी त्याच्या आयुष्यात एकदम क्रांतीच घडली. मग गॅरिसनचं भाषण ऐकायला डग्लस गेला. या सगळ्यातून डग्लसची वैचारिक जडणघडण निर्मूलनवादी आणि क्रांतिकारी झाली. त्यातूनच तो काळ्यांच्या चळवळीत पूर्ण वेळ पडला.

मार्क इंग्लिस

मार्क इंग्लिस : डॉ. संदीप श्रोत्री
राजहंस प्रकाशन, पृष्ठे - १६५, मूल्य - २०० रुपये

१५ नोव्हेंबर, १९८२ रोजी सकाळी एका स्की विमानात बसून मार्क आणि फिल यांनी ’ग्रॅंड प्लेटो’ या हिमनदीकडॆ झेप घेतली. त्या अफाट बर्फाळ प्रदेशात छोट्या स्की विमानाने या दोघांना सोडले आणि विमान दिसेनासे झाले. आता वर अथांग निळे आकाश, खाली चारही बाजूला क्षितिजापर्यंत पसरलेले बर्फाळ पठार आणि शेजारी माउंट कुकसहित आओराकीची पांढरी शुभ्र पर्वत रांग. दोघांना फक्त एकच्य दिशा दिसत होती - माउंट कुकची. त्या विस्तीर्ण हिमनदीच्या कडॆवर हिमघळी पसरलेल्या होत्या. त्याच्या डोक्यावरील पर्वत शिखरांच्या द-यातून ओघळणारे भयावह हिमधबधबे, क्वचित त्या हिमधबधब्यांच्या डोक्यावर तयार झालेली तरंगती हिमसरोवरे किंवा हिमनदी आणि त्या संपूर्ण पांढ-या पार्श्वभूमीवर अगदी मुंग्यांप्रमाणे दिसणारे दोघेजण. दोघांनी तत्परतेने समोरील हिमघळी पलीकडे धाव घेतली. एक तात्पुरता झोपडीवजा तंबू आडोसा म्हणून तयार केला आणि त्यापुढील मुक्काम ’बिव्हॉक’ करायचे असे ठरवले. बिव्हॉक म्हणजे वाटेतील बर्फामध्ये गुहा खोदायची किंवा एखाद्या हिमघळीमध्ये किंवा दगडाच्या आडोशाने मुक्काम करायचा. पायथ्यापाशी थोडा स्वयंपाक शिजवला, पोटपूजा केली आणि फारसे काही सामान न घेता दुस-या दिवशी पहाटे वर चढायचे असे ठरवले.
सोळा नोव्हेंबरच्या पहाटे पाच वाजता दोघे बाहेर पडले. उभ्या कडक झालेल्या बर्फामध्ये आईस स्क्रू, कॅम्पॉन, बिले देणे फार अवघड झाले होते. तापमान शून्याखाली वीस अंश सेल्शियस होते. एकदा सूर्य उगवला की त्या उष्ण्तेने बर्फ वितळू लागते आणि हिमकडे कोसळण्याची धोके वाढतात. त्यामुळे कठीण कडे नेहेमी रात्री किंवा पहाटे चढायचे असतात. क्वचित प्रसंगी आदल्या दिवशी उष्णतेने पाघळलेले बर्फ पुन्हा रात्री कडक होते आणि त्यावेळी आकारमानाने फुगते. फ्रिजमधील पाण्याने भरलेल्या बाटलीचे टोपण ज्याप्रमाणे फुटते, त्याप्रमाणे त्यावरील हिमकडे सुटतात आणि खाली कोसळतात. हे सर्व धोके त्या दोघांना माहीत होते. अगदी हळूहळू त्यांची प्रगती होत होती. ६०० मीटर्स उंच चढाई करत पूर्व धारेच्या कडेवर येईपर्यंत दुपार झाली होती. पश्चिमेकडे ढग जमा झाले होते. वारा वेगाने वाहात होता. मार्क आणि फिलने ’मिडल पीक’च्या धारेवरच गुहा खोदून मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. एका बाजूला १००० मीटर्स खोल कॅरोलीन बाजू, तर दुस-या बाजूला ६०० मीटर्स खोल पूर्व बाजू होती. अंग गोठवणा-या वा-याशी युद्ध खेळत त्यांनी ’मिडल पीक’ गाठले तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते. दोघांनी तातडीने गुहा खोदायला सुरुवात केली आणि तात्पुरता निवारा तयार केला. नियतीच्या मनाच्या अंदाज येणे शक्यच नव्हते. हाच निवारा म्हणजे त्यांचे पुढील चौदा दिवसांचे ’मिडल पीक’ हॉटेल.
रविवार, २१ नोव्हेंबर, त्यांचा गुहेतील सहावा दिवस. त्यांनी हिशोब केला. त्यांच्यापाशी आता जगण्याचे केवळ ३६ ते ४८ तास उरले होते. आता अन्न संपून चार दिवस झाले होते. शरीर आता स्वत:चीच साठवलेली उर्जा वापरू लागले होते. त्यांचे वजन झपाट्याने कमी होत होते. त्यांच्या पायातील संवेदना नष्ट झाल्या होत्या. मार्क त्याच्या कुटुंबीयांच्या, लहानग्या ल्यूसीच्या आठवणी फिलला सांगत होता. त्या शांततेचा, त्या एकटेपणाचा, त्या समाधीअवस्थेचा भंग करण्यासाठी मार्क सर्व मार्ग अवलंबत होता. फिल मात्र शांत असायचा. इतका की, ब-याच्य वेळेला मार्क त्याच्यावर चिडायचा.
इकडे खाली पार्क मुख्यालायामध्ये हलकल्लोळ माजला होता. दोघांचे नातेवाईक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, राजकीय नेते, देशपरदेशातील गिर्यारोहक, आदी सर्वांनी भंडावून सोडले होते. दोघे पर्वतावर गेले, ते सर्वात महत्वाच्या झोपायच्या पिशव्यादेखील न घेता, याचेच सर्वांना आश्चर्य वाटत होते. वादळ सहाव्या दिवशीसुद्धा शमले नव्हते. प्रचंड हिमवर्षाव चालू होता. माऊंट कुककडे जाणारे सर्व रस्ते हिम वर्षावामुळे आणि हिम कोसळ्यांच्या शक्यतेमुळे बंद केले होते. हेलीकॉप्टर उडण्याचा तर प्रश्नच नव्हता. टास्मान हिमनदीवरील वातमापक येंत्र त्या अफाट वा-याने उडून गेले होते. शतकातील ते सर्वात दिर्घ चाललेले हिमवादळ ठरले होते आणि त्याचे बळी मार्क आणी फिल होते. बॉब मुन्रो हा पार्कचा प्रमुख, त्याने डॉ. डिक प्राइसला सातव्या दिवशी चर्चेला बोलावले. मुद्दा हा की स्लीपिंग बॅगशिवाय ते दोघेजण किती तग धरू शकतील, म्हणजे त्यांच्या सुटकेची आशा किती दिवस धरायची? डॉ. डिक, हा त्यातील तज्ञ, त्याने स्पष्ट सांगितले की जास्तीत जास्त दहा दिवस जिवंत राहण्याची आशा! बॉब मुन्रोने बोटे मोजली आणि अंदाज केला की, आणखी तीन-चार दिवस सुटकेचे प्रयत्न करायला हरकत नाही.
मार्कची मानसिक स्थिती आता दोलायमान होत होती. त्याला रात्री जास्त त्रास होत होता. कधी स्वच्छ पाणी पिण्याचे स्वप्न पडायचे, तर कधी पुस्तकातील स्वयंपाकाचे विविध पदार्थ करण्याचे स्वप्नात दिसायचे. तो जाणीवपूर्वक मागील भूतकाळाचा एक एक दिवस आठवू लागला आणि घड्याळाचा काटा पुढे ढकलू लागला. त्या वेळीच त्याने ठरवले की समजा जिवंत सुटका झालीच तर पुढे आयुष्यभर रोज एक ग्लास्व भरून थंडगार पाणी पिईन.
अद्यापपर्यंत मार्कने तो नेम सोडलेला नाही. रोज सकाळी न चुकता ग्लास भरून बर्फाचे थंडगार पाणी पित असतो.
--------------------------------------------
मार्क इंग्लिस या माणसानं हिमदंशामुळे आपले दोन्ही पाय गमावले. त्यानंतर तब्बल चोवीस वर्षानंतर दोन कृत्रिम पाय लावून तो एव्हरेस्ट शिखरावर चढला. ही आहे मानवाच्या जिद्दीची आणि दुर्दम्य इच्छाशक्तीची एक प्रेरणादायी साहसकथा.

Monday 23 August 2010

मास्तरांची सावली

मास्तरांची सावली : कृष्णाबाई नारायण सुर्वे

डिंपल प्रकाशन,पृष्ठे - १८४, मूल्य - १८० रुपये

सांताक्रूझला बाबुरावाच्या झोपड्यात असताना माझ्याकडे भांडीकुंडी काहीच नव्हती. मास्तर बाहेर गेले की मी चूल पेटवायला काटक्या, कागद गोळा करायची. चुलीवर तीन भाक-या थापायच्या आणि त्या कागदावर काढून ठेवायच्या. एखाद्या दगडावर मिरच्यांचा ठेचा नाहीतर खर्डा वाटून तो भाकरीवर ठेवायची. एक भाकरी मला, दोन मास्तरांसाठी. कित्येक दिवस हेच जेवण होतं आमचं. पण त्यालाही चव असायची. कारण ती प्रेमाचीच चटणी आणि प्रेमाचीच भाकर होती ना! याच झोपड्यात आम्ही एका भयंकर वादळाचा सामना केला होता. ते वादळ आठवलं की अजूनही अंगावर शहारे येतात.

साल आठवत नाही मला. पण त्या वर्षी भयंकर पाऊस पडला होता. प्रचंड वादळ झालं होतं. आधीच आम्ही पार कंगाल झालो होतो. त्यात झोपडीसकट सगळंच वाहून गेलं होतं. फक्त आमच्या अंगावरचे कपडे तेवढे शाबूत राहिले होते. लग्नाला जेमतेम वर्ष झालं होतं. कुसुम रणदिवेंच्या कृपेनं मला मूलबाळ काही तेव्हा झालं नव्हतं म्हणून बरं. नाहीतर आम्ही काय केलं असतं? या विचारानेच आजही अंगावर काटा येतो. तर त्या वादळी पावसातून कशीबशी वाट काढत, एकमेकांना घट्ट धरून, बिलगून आम्ही चाललो होतो. दूरवर एक मशीद दिसत होती. तिथे तरी पोचावं असा विचार मनात चालला होता. पाणी माझ्य कमरेच्या वर पोचलं होतं. मास्तर माझ्यापेक्षा उंच असल्यामुळे त्यांन तितकीशी भीती वाटत नव्हती. पण मी पडले खुजी. तशी मी सर्वच बाबतीत त्यांच्यापेक्षा खुजीच आहे म्हणा. असो. तर त्या पाण्यातून चालताना खाली खड्डा आहे का विहीर काहीच कळत नव्हतं. माझे पाय खाली खेचल्यासारखे होत होते. कुठे वळावं मागे की पुढे? काहीच कळेना. तिथे जवळ्पास मोठमोठी झाडं होती. त्या झाडांवर म्हणे तडीपार केलेले, हद्दपार केलेले लोक बसायचे आणि रात्री चो-या करायला, मारामा-या करायला बाहेर पडायचे. त्यांनी आम्हाला झाडावरून पाहिलं आणि एकदम ओरडले, ’ओ ताई, दादा थांबा तिथंच. पुढे येऊ नका. इकडे खूप पाणी आहे आणि त्या बाजूला तर पूर आलाय.’ असं म्हणून पटापट झाडावरून त्यांनी उड्या घेतल्या. मी क्षणभर घाबरलेच. मनात आलं, आपल्याला घेऊन तर जाणार नाहीत ना? किंवा ही कुणी पाठवलेली माणसं तर नसतील ना! मास्तर म्हणाले, ’किशा, घाबरू नकोस. बघू तर खरं काय करतात ते!’ ती माणसं जवळ आली तसे मास्तर त्यांना विनवू लागले, ’दादा, आम्ही पाया पडतो तुमच्या. इथलं आम्हाला काहीच माहीत नाहीये. एखाद्या सुरक्षित ठिकाणी आम्हाला घेऊन चलता का?’ त्यांनी आम्हाला मशिदीत अगदी सुरक्षितपणे पोचवलं.

मशिदीत आम्हाला आसरा मिळाला खरा, पण आम्ही पार भिजून गेलो होतो. मास्तरांना तर हळूहळू ताप चढायला लागला. मला मात्र काहीच झालं नव्हतं. मशिदीतले लाईटही गेले होते. नुसता अंधार पसरला होता. आधीच उपाशी तापाशी, त्यात हाताशी काही नाही. जे काही होतं नव्ह्तं तेही वाहून गेलं होतं. काय करावं काहीच सुचत नव्हतं. रात्र झाली. मास्तरांचा ताप अधिकच वाढला. त्यांना थंडी वाजू लागली. अगदी थाडथाड उडत होते. मी तर घाबरलेच होते. मशिदीत सगळे मुसलमान होते. त्यांच्यातला एक मौलवी बाबा पेल्यात पाणी घ्यायचा, काहीतरी मंत्र पुटपुटायचा आणि मास्तरांच्या तोंडात विभूती टाकून ते मंतरलेलं पाणी ह्यांना प्यायला द्यायचा. मला ते पटत नव्हतं. विभूती टाकून का कुणी बरं होतं? पण मी काय बोलणार तेव्हा? तो बाबा आपला अला के नामसे’, ’खुदा के नामसे’, ’उसके नामसेम्हणून सारखा यांच्या तोंडात विभूती टाकयचा. मला भीतीच वाटत होती. मनात यायचं, हा माणूस बहुधा ही विभूती खाऊन खाऊनच खलास होणार. शेवटी न राहवून मी त्या बाबाला विचारलं, ’तुम्ही यांच्या तोंडात सारखी सारखी ही विभूती का टाकता?’ तसा तो म्हणाला, ’बहेन, इसको विभूती मत बोलो. ये खुदाका प्रशाद है. ये खाके तुम्हारा जल्दी अच्छा हो जायेगा, चिंता मत करो.’ मी मनातून खचूनच गेले होते, पण परस्वाधीन असल्यामुळे काही बोलता येत नव्हतं.पावसापाण्यातून, अशा अवस्थेत मास्तरांना कुठे घेऊन जाणार होते? शेवटी तिस-या दिवशी पाऊसही उतरला आणि मास्तरांचा तापही. इकडॆ तिकडॆ बघायला लागले, मला खूप बरं वाटलं. मनातून मी त्या बाबाचे आभार मानले. मास्तर हळू आवाजात विचारत होते, ’किशा, कुठे आहोत ग आपण?’ ते तसे ग्लानीतच होते. त्यांना काही आठवत नव्ह्तं. चेहरा अगदी कसानुसा झाला होता. मी बाबांना म्हटलं, ’यांना खूप भूक लागलीय. तीन दिवस पोटात काहीच नाहीये. काही खायला मिळेला का?’ मग मशिदीतल्या माणसांनी रोटी आणि थोडीशी चटणी आणून दिली. मास्तरांनी ती खाल्ल्यावर त्यांना थोडी तरतरी आली. ’भुकेला कोंडा आणि नीजेला धोंडाम्हणतात तसं झालं होतं. जरा भानावर आल्यावर मास्तर म्हणाले, ’किशा, काय खालं असेल ग आपल्या घराचं?’

मी म्हटलं, ’मरू दे ते घर. जाऊ दे. तुम्ही ठीक झालात ना, यातच मला आनंद आहे. घर काय पुन्हा बघू कुठेतरी.’ असं म्हणून मी त्यांना घेऊन मशिदीबाहेर पडले. पुन्हा एकदा उघड्यावरचा संसार नशिबी येतोय का काय असं वाटत होतं. पुन्हा एकदा नव्या घराचा प्रश्न या वादळाने उभा केला होता.

बिलंदर टोपी बहाद्दर

बिलंदर टोपी बहाद्दर : निरंजन घाटे
रोहन प्रकाशन, पृष्ठे : १७६, मूल्य : १०० रुपये

राष्ट्रीय स्मारके विकणारे महाभाग
लोक फसतात म्हणून आम्ही त्यांना फसवतो, असं ब-याच टोपी घालणा-य़ांचं म्हणणं असतं. ’दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये’, ही म्हण आपण बरेचदा वापरतो. लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं कौशल्य असल्याशिवाय झुकानेवाला दुनियेस झुकवू शकत नाही, हे मात्र इथं लक्षात ठेवायला हवं. नाहीतर बिगबेन स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा किंवा आयफेल टॉवर यांच्यासारख्या वस्तू विकल्याच गेल्या नसत्या.
आर्थर फर्ग्युसन हा असाच एक स्कॉटसमन होता. तो एक उत्कृष्ट ’झुकानेवाला’ होता. आपण लोकांना झुकवू शकतो याची त्याला कल्पना नव्हती. पण जेव्हा आपल्या या गुणांचा त्याला साक्षात्कार झाला तेव्हा त्यानं जगाला थक्क करून सोडलं. १९२०च्या सुमारास तो ट्राफल्गार चौकात उभा असताना आर्थरला त्याच्यातील सुप्त गुणांची जाणीव झाली. एक अमेरिकन माणूस नेल्सनच्या पुतळ्याकडं अनिमिष नेत्रांनी एकटक बघत असताना आर्थरनं बघितला. आर्थर त्या अमेरिकन व्यक्तीजवळ गेला. आपण या लंडनमधल्या सर्व पुतळ्यांचे नि स्मारकांचे अभ्यासक आहोत, अशी स्वत:ची ओळख करून देत त्या अमेरिकन व्यक्तीस त्याने नेल्सनच्या पुतळ्याची माहिती द्यायला सुरुवात केली. ’हा पुतळा इंग्लंडचा राष्ट्रपुरुष मानल्या जाणा-या लॉर्ड नेल्सनचा आहे.’ आर्थर त्या अमेरिकनास माहिती देऊ लागला. ’या देशाचं दुर्दैव असं की आमच्या शासनानं हा पुतळा, हे सिंह, हे कारंजं, तो चौथरा हे सगळं विकायला काढलय. पाच वर्षे चाललेल्या युद्धामुळं आमचा देश कर्जबाजारी झालाय ना,’ चेहरा दु:खी करत आर्थर बोलत होता. त्या अमेरिकन माणसाला आर्थरची कीव आली. ’तुम्हाला खोटं वाटेल, केवळ सहा ह्जार पौंडाला हे स्मारक विकलं जातय आणि दुर्दैव असं की हे काम माझ्यावर सोपविण्यात आलय. कुणातरी जाणकार व्यक्तीच्या पदरी पडायला हवं. या स्मारकाची महती ज्याला कळते त्याने हे घेतलं तर ठीक आहे. नाही तर सगळाच बट्ट्याबोळ.’ आर्थरनं अगदी पडल्या चेहे-यानं त्या अमेरिकनास सांगितलं.
’काय म्हणताय काय, पण तुम्हाला गि-हाईक आलय का?’ त्या अमेरिकन माणसानं विचारलं.
’हो. दोन - तीन गि-हाईकं आलीत खरी, पण त्यातला एकजण तर फ्रेंच आहे. त्याला नेल्सन कसा काय विकणार?’
’तुम्ही मला थोडा वेळ द्याल का? मी माझ्या वरिष्ठांना विचारतो.’ तो अमेरिकन म्हणाला.
’अहो, खरं तर हे सगळं शासकीय गुपित आहे. तुम्ही तुमच्या वरिष्ठांना विचारणार, ते आणखी कुणाला सांगणार, माझी नोकरी जाईल.’ असा संवाद घडला. अखेरीस आर्थरनं त्या अमेरिकन व्यक्तीस एक फोन करायला हरकत नाही असं सांगितलं. त्या माणसानं फोन केला. मग आर्थरनं फोन केला. जर सहा ह्जार पौंडाचा चेक लगेच मिळाला तर व्यवहार पूर्ण करावा, असा आदेश राष्ट्रीय स्मारक समितीच्या अध्यक्षांनी आर्थरला दिल्याची माहिती आर्थरनं त्या अमेरिकनास दिली. त्याचबरोबर हा पुतळा, त्याचा चौथरा, भोवतालचे सिंह, कारंजे वगैरे सुटे करून पेटा-यात बांधून जहाजातून अमेरिकेला पाठवू शकेल, अशा शासनमान्य संस्थेचा पत्ताही आर्थरनं त्या अमेरिकनास दिला.
आर्थरनं ब्रिटीश शासनाच्या वतीने चेक स्वीकारला. पावती पाठवायचा पत्ता लिहून घेतला. त्या माणसाच्या डायरीत कच्ची पावती लिहून दिली. मग आर्थर फर्ग्युसननं लगेच तो चेक वटवला. इकडे तो अमेरिकन आर्थरनं दिलेल्या पत्त्यावर गेला. तिथं त्याचं काम स्वीकारायला त्या कंपनीनं अर्थातच नकार दिला. नेल्सनचं स्मारक ब्रिटीश सरकार कुठल्याही परिस्थितीत विकणं शक्य नाही, हे सांगून त्याला पटेना. मग तो अमेरिकन स्कॉट्लंड यार्डमध्ये पोहोचला. तेव्हा आपण फसलोय हे त्याच्या लक्षात अलं. आर्थर फर्ग्युसनला हे घबाड लाभलं त्यामुळे त्याची तहान वाढली. त्या वर्षीच त्यानं आणखी एका अमेरिकन व्यक्तीस एक हजार पौंडाला ’बिगबेन’ हे घड्याळ विकले. त्याही पुढची गंमत म्हणजे बंकिंगहॅम राजवाड्याच्या खरेदीचा विसार म्हणून त्याने दोन हजार पौंड मिळवले. या तक्रारी अर्थातच पोलिसात नोंदवल्या गेल्या. लंडनमध्ये हा उद्योग करीत राह्यलो तर पोलीस पकडतीलच, पण जर हे अमेरिकन इतके खुळे आहेत तर त्यांच्याच देशात आपण गेलो तर आपल्याला आणखी पैसा मिळेल अशी खूण गाठ बांधून आर्थर फर्ग्युसन १९२५मध्ये अमेरिकेत पोहोचला. अमेरिकेत तर विकण्यासारख्या खूपच गोष्टी उपलब्ध होत्या.
वॉशिंग्टनला पोहोचल्या पोहोचल्या आर्थरनं पहिलं गि-हाईक मिळवलं. एका गुरांच्या व्यावसायिकाला - कॅट्ल रांचरला - त्यानं दरवर्षी एक लाख डॉलर भाड्यानं ९९ वर्षांच्या करारानं व्हाईट हाऊस भाड्यानं दिलं. पहिल्या वर्षीचं भाडं त्यानं आगाऊ घेतलं होतं. एवढा पैसा मिळाल्यानंतर फर्ग्युसनच्या मनात निवृत्तीचे विचार येऊ लागले. पण निवृत्तीपूर्वी एक दणका द्यावा आणि मगच निवृत्त व्हावं. तेव्हा काही तरी धमाल उडवायलाच हवी, असा निश्चय करून तो निवृत्तीपूर्व दणकेबाज कामाची योजना करू लागला.
कसायाला गाय धार्जिणी, या उक्तीनुसार आर्थरकडं या वेळात बळीचा बकरा चालत आला. हा एक धनिक ऑस्ट्रेलियन होता. त्याला आर्थरच्या जाळ्यात फसायला वेळ लागला नव्हता. एका भोजन समारंभात दोघांची ओळख झाली. बोलण्याच्या ओघात आर्थरनं न्यूयॉर्क बंदराच्या रूंदीकरणाच्या कामात त्याचा स्वत:चा मोठा सहभाग असल्याचं या ऑस्ट्रेलियन महाभागास सुनावलं. या रूंदीकरणाच्या आड स्वातंत्र्य देवतेचा पुतळा येत होता. प्रगतीच्या आड भावना येऊ देणं अमेरिकन जनतेस मान्य नव्हतं. मात्र या पुतळ्याला भंगार माल म्हणून विकायलाही शासन तयार नव्हतं. जर योग्य त्या सन्मानासह या पुतळ्याची पुर्स्थापना करायला कुणी तयार असेल अमेरिकन शासन त्या व्यक्तीस किंवा संस्थेस हा पुतळा विकायला तयार होते. मात्र हा व्यवहार आधी उघड करणं म्हणजे जनतेचा प्रक्षोभ ओढून घेणं असल्यानं हा व्यवहार गुप्ततेनं करायला हवा होता, हेही आर्थरनं या ऑस्ट्रेलियन व्यक्तीच्या मनावर ठसवलं. जर हा पुतळा विकत घ्यायचा असेल तर आधी एक लाख डॉलरची अनामत रक्कम जमा करावी लागेल, असंही आर्थरनं त्या ऑस्ट्रेलियन माणसाला सांगितलं. या ऑस्ट्रेलियनानं पुढचे काही दिवस सिडनीशी संपर्क साधून एक लक्ष डॉलर मिळवायची धडपड केली. फर्ग्युसन कायम त्याच्याबरोबर राहात असे. ’चुकून तू हे गुपित फोडशील आणि हा व्यवहार रद्द होईल’, असं तो त्या ऑस्ट्रेलियन गृहस्थाच्या मनावर ठसवीत होता. या दोघांनी स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यासमोर आपलं छायचित्रंही काढून घेतलं होतं.
ऑस्ट्रेलियातून पैसे यायला वेळ लागला. त्यामुळं फर्ग्युसन अस्वस्थ झाला. त्याच्या अस्वस्थतेमुळे त्या ऑस्ट्रेलियन माणसाचा संशय वाढला. त्यानं एक दिवस ते छायाचित्र पोलिसांकडे दिलं. पोलिसांकडे या व्यक्तीविरूद्ध वेगवेगळ्या नावनं लोकांना राष्ट्रीय स्मारकं विकल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्याच. त्यांना आता ठोस पुरावा मिळाला. त्या ऑस्ट्रेलियन व्यक्तीच्या मदतीनं पोलिसांनी अखेरीस आर्थर फर्ग्युसनला पकडलं. त्याला पाच वर्षाच्या साध्या कैदेची शिक्षा झाली. लक्षावधी डॉलर बॅंकेत ठेऊन आर्थर आत गेला. पाच वर्षांनी त्या रकमेच्या व्याजासह ती संपत्ती घेऊन तो लॉस एंजेलीसला गेला. मग तुरुंगात न जाता लोकांना टोप्या घालत १९३८ पर्यंत राजेशाही जीवन जगला. १९३८ मध्ये स्वत:च्या प्रासादात झोपेतच मरण पावला.

शहाण्यांचा सायकिऍट्रिस्ट

शहाण्यांचा सायकिऍट्रिस्ट : डॉ. आनंद नाडकर्णी
समकालीन प्रकाशन
पृष्ठे - २८०, मूल्य - २५० रूपये

समाजापर्यंत जाऊन भिडायची प्रक्रिया चालू तर झाली होती. तशी एकही संधी आम्ही वाया घालवत नव्हतो. परंतु खर्च वाढत होते. क्लायंटकडून जे शुल्क घेतलं जात असे, ते अतिशय माफक असे. कारण या सेवा नवीन होत्या. ’बोलायच्या’ ट्रीटमेंटसाठी पैसे देणं अनेकांना जड जायचं. संस्थेवर पूर्ण वेळ अवलंबून असणारे कार्यकर्ते कर्मचारी आता चौदापर्यंत पोचले होते. त्यांचं मानधन दर महिन्याला तयार ठेवावं लागत होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर माझी गाठ पडली ज्यो अल्वारिस नावाच्या एका व्यक्तीबरोबर. ज्यो अल्वारिस ठाण्यालाच राहणारा. पाश्चात्य संगीतातला दर्दी. स्वत: उत्तम गायक.
’आपण तुझ्या संस्थेसाठी असा एक अफलातून शो करू या, जो आजवर कुणीही या शहरात केला नसेल.’ ज्यो म्हणाला.
रेमो फर्नांडिस, रॉक मशिन, शेरॉन प्रभाकर (आणि ज्यो अल्वारिस स्वत:) असे कलाकार आणायचे. म्हणजे नावीन्य या फूटपट्टीवर हा कार्यक्रम जोरदार होता. नाव ठरलं यूथ २००० एडी. दादोजी कोंडदेव स्टेडियमची तारीख मिळाली १० डिसेंबर १९९२. या त्या तारखेपासून मागे मागे येत संपूर्ण इव्हेंटचं वेळापत्रक तयार झालं. प्रमुख स्पॉन्सरशिपसाठी लागणारी सर्व कागदपत्र घेऊन मी सुनुबेन गोदरेजना भेटायला गेलो. सुनुबेनचा माझ्यावर (का कोण जाणे) पहिल्यापासून लोभ. ’तू गोदरेज सोपला जा. मी आदीशी बोलते.’ आदी म्हणजे गोदरेज. गोदरेज सोपचे सर्वेसर्वा. चार दिवसांनी मी पोचलो त्यांच्या ऑफिसमध्ये. मला फारच छान ट्रीटमेंट मिळाली. आदी गोदरेजनेही माझं म्हणणं छान ऐकलं. माझ्याकडचे स्पॉन्सरशिपचे सगळे कागद त्यांनी नजरेखालून घातले. ’माझी सेक्रेटरी तुला सॅम बलसाराच्या ऑफिसचा नंबर देईल. त्याला जाऊन भेट. तोवर मी हे कागद त्याला फॉरवर्ड करतो. सॅम बलसाराची कंपनी आमच्या जाहिराती आणि प्रसिद्धीचं काम पाहते.’
मी ते नंबर घेऊन बाहेर पडलो. दुस-याच दिवशी सॅम बलसाराच्या एजन्सीमधून फोन... ’धिस इज रिगार्डिंग स्पॉन्सरशिप ऑफ युवर इव्हेंट...’
चक्क पाच लाख रुपयांची स्पॉन्सरशिप सुनुबेनच्या शब्दांनी पक्की झाली होती. इतका मोठा इव्हेंट मॅनेज करायला अनेकजण आपापल्या परीनं झटत होते. नोव्हेंबरच्या दुस-या आठवड्यात सर्वत्र पोस्टर्स झळकली. मोठी होर्डिंग्ज लागली. लोकलच्या डब्यांमध्ये स्टिकर्स लागले. वर्तमानपत्रांमध्य्ये बातम्या-फोटो आले. स्टेशनांवर पत्रकं वाटली जाऊ लागली. तिकिटविक्रीला प्रारंभ झाला. चार डिसेंबरपर्यंत सगळीकडे झालेल्या तिकिटविक्रीचा आकडा सत्तर हजाराच्या घरात गेला होता. आमच्या टीन क्लब, यूथ क्लबची मुलंही तिकिटं खपवण्याचा जोरदार प्रयत्न करत होती. आम्हाला तीन ते पाच लाखांची तिकिट्विक्री अपेक्षित होती. दहा डिसेंबरला कार्यक्रम, तर सहा डिसेंबरपासून स्टेडियम ताब्यात येणार होतं. प्रचंड मोठं स्टेज बांधण्याचं सामान पाचला रात्रीच ट्र्कमधून येऊन पडलं. लाइटस, साऊंडची उपकरणं सहा किंवा सातला येणार. आठला स्टेज सेट कारायचं. नऊला रिहर्सल. दहाला कार्यक्रम.
सहा डिसेंबर एकोणिसशे ब्याण्णव हा दिवस सा-या देशाच्याच इतिहासात एक चक्री वादळ घेऊन आला. अयोध्येच्या बातम्यांकडे लक्ष द्यायला आम्हाला ना वेळ होता, ना वृत्ती.
़़़़़
बाबरी मशीद पडल्याचं वृत्त सर्वत्र पसरलं आणि त्याचा परिणाम जाणवू लागला. तोवर दुपार उलटली होती. आम्ही सारेच सुन्न. शिवनेरी हॉस्पिटलमधल्या आमच्या डे-केअर सेंटरमध्ये या कार्यक्रमाची कंट्रोल रूम होती. रस्त्यावरची रहदारीही संध्याकाळपर्यंत पार आटली. सगळ्या वातावरणात प्रचंड टेन्शन. पुढचे काही दिवस सगळीकडे ’एकशे चव्वेचाळीस’ कलम म्हणजे जमावबंदी लागू होणार अशी बातमी आली. पोलिस स्टेशनवर चौकशी केली. तिथून होकार मिळाला. रात्री पोलिस कमिशनर कार्यालयातून फोन-निरोप, की कार्यक्रमाला दिलेली परवानगी राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात येत आहे. कलाकारांचे ऍडव्हान्सेस, स्टेजवाल्यांचे पैसे, प्रसिद्धीवर झालेला खर्च... सगळंच एका क्षणात धुतलं गेलं होतं. होत्याचं नव्हतं झालं होतं.
सगळ्या वर्तमानपत्रांसाठी घाईघाईनं बातमी तयार केली. यूथ २००० एडी लांबणीवर टाकण्यात येत आहे. कार्यक्रम लांबणीवर... जीव टांगणीवर... एकटा, अगदी एकटा... सुन्न बसून राहिलो. सगळ्यांची मेहनत मातीमोल. जीवतोड मेहनतीचे सात महिने कोसळले. बाबरी मशिदीबरोबरच राष्ट्राच्या शोकांतिकेला मिळालेली आमच्या शोकांतिकेची ही बारीक किनार. पुढील दोन दिवसात देशात हिंसक उद्रेक सुरू झाले. अंधारच अंधार... देशापुढे. सगळ्यांपुढे.. आमच्यापुढे... माझ्यापुढे..
डिसेंबरचा तिसरा आठवडा उजाडला. या आठवड्यातला माझा वाढदिवस उसनं अवसान आणून कसाबसा साजरा केला. संस्थेचे हात दगडाखाली अडकले होते. कार्यक्रमाच्या जाहिरातीवर खर्च झालेला पैसा फुकट गेला होता. ठिकठिकाणी जे ऍडव्हान्सेस दिले होते, ते परत घेण्यापेक्षा जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा कार्यक्रम का घडवून आणू नये? प्रसिद्धीसाठी थोडे कमी पैसे खर्च केले तर चालेल या वेळेला. हा निर्णय होतोय तर गोदरेज सोप्सकडून पत्र आलं की पाच लाखांची स्पॉन्सरशिप आम्ही मागे घेत आहोत. पायाखालची वाळू सरकणं हा अनुभव नवा राहिला नव्हता. तरीही डोकं भणभणलच. मलबार हिलवरच्या बंगल्यावर सुनुबेनना फोन लावला. त्यांना सगळी हकीकत सांगितली. ’वुई कॅन नॉट गो बॅक ऑन अवर वर्ड.’ त्या ठामपणे म्हणाल्या. ’मला दोन दिवसानी फोन कर. मी आदीशी बोलते.’ सगळेच दिवस टेन्शनचे. त्यात पुढच्या दिवसांची फोडणी. तिस-या दिवशी सॅम बलसाराच्या सहीचं पत्र- वुई आर रिस्टोअरिंग द स्पॉन्सरशिप.
एक तिढा सुटला. इतर अनेक कायम होते. आम्ही जानेवारी महिन्याची तारीख ठरवली. स्टेडियम मिळवण्याच्या कागदपत्रांची पूर्तता केली. स्टार चॅनलकडून नवा होकार मिळवला.
... आणि मुंबईत दंगलींचा दोंब उसळला. पुन्हा एकदा सर्व पूर्वतयारी पाण्यामध्ये. प्रत्येक आपत्तीबरोबर आर्थिक खड्डा वाढत होता. दहावी-बारावीच्या परीक्षा झाल्यावर मार्चच्या अखेरीला करून टाकू या आता कार्यक्रम... असा निर्णय घेणंही यांत्रिक होऊन गेलं होतं.
मार्च महिन्यातल्या त्या शुक्रवारी मी दादरला क्लिनिकला जाण्यासाठी ठाणे स्टेशनला आलो, तर पुन्हा वेगळा सन्नाटा. मुंबईत ठिकठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. कार्यक्रम पुन्हा गचकलाच... आणि जिथे प्रॅक्टीस करायचो त्या जागेचा विध्वंस झालेला. या सगळ्या कालखंडात माझा पूर्ण रोबोट बनून गेला होता. आता कोणत्याच अनपेक्षित भावना त्या सुन्नपणाला छेदून आत जाऊ शकत नव्हत्या.
’आता सोडून द्या या अपशकुनी कार्यक्रमाचा नाद.’ एक हितचिंतक म्हणाले. हट्टी मनाने पुन्हा उचल खाल्ली. एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात कार्यक्रम करायचं ठरलं.
माझ्या कौटुंबिक जीवनाची वाताहत जाणवायला लागली होती. कुटुंबासाठी ना अवसर ना धीर. एप्रिलच्या उन्हात शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी माझी पराभवगाथा मनात आकार घेत होती. प्रॅक्टीसवरचं लक्ष कमी झालं होतं. आयपीएचमधल्या कुठल्याही उपक्रमावर मी भर देऊ शकत नव्हतो. सगळीकडे निर्नायकी अवस्था होती. आजवर संस्थेच्या प्रवासात काय किंवा प्रॅक्टीसमध्ये काय, नाट्यलेखनात काय किंवा पुस्तक लिखाणात काय- हात लावला की सोनं अशी परिस्थिती होती. आपला मिडास ट्च गेलाय तरी कुठे कळेना. स्वत:च्या चुकलेल्या गणितांची जबाबदारी दुस-यांवर लोटण्याची प्रवृत्ती या वेळी माझ्यामध्ये अतिशय वरचढ होती.
प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी प्रेक्षकांचे जथे स्टेडियमकडे येताना दिसले तशी थोडी उभारी आली. आधी पंचवीस हजार, त्यानंतर पंधरा, दहा असं होता होता (तरीही) पाच हजारांचा प्रेक्षकवर्ग जमला होता. सर्वांचं स्वागत करण्याचं माझ्या आयुष्यातलं सर्वात कृत्रिम भाषण मी केलं. स्मरणिकेचं प्रकाशन झालं. रेमो फर्नांडिसचा जादुई प्रवेश झाला रंगमंचावर. मी काही काळ पाहत राहिलो. रेमो गात होता. मला जाणवलं, मला ध्वनी लहरी जाणवताहेत, पण संगीत म्हणून नाही तर नुसते आवाज म्हणून. मी बॅकस्टेजला आलो. पुन्हा भुतासारखा फिरायला लागलो. रेमो, ज्यो, शेरॉन, रॉक मशिन... सा-यांचे कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमानंतर सुन्या सुन्या झालेल्या रंगमंचावर मी गेलो. प्रखर प्रकाशानंतर आता आवराआवरीचा ’वर्किंग लाइट’ म्हणजे जवळ जवळ अंधारच होता.
प्रचंड एकटेपण झाकोळून येत होतं. स्टेडियमच्या एका कोप-यात एक गाडी थांबली. पांढरे कपडे घातलेली एक आकृती माझ्य्या बाजूने चालत आली. ते आनंद दिघे होते. ’खूप श्रम केलेत डॉक्टर... वेळ वाईट होती, तरीसुद्धा.’ आनंद दिघे तुटक बोलायचे. ’आता थोडी विश्रांती घ्या. दमलात.’ त्यांनी माझ्या खांद्यावर थोपटलं आणि ते निघून गेले.
त्या एकट्या रात्री एवढा एकच अनपेक्षित हात माझं सांत्वन करून गेला.

द सेकंड सेक्स

सेकंड सेक्स
सिमोन द बोव्हुआर
अनुवाद ; करुणा गोखले
पद्मगंधा प्रकाशन
पृष्ठे : ५५८, मूल्य : ४५०


सिमोन द बोव्हुआर - संक्षिप्त चरित्र
पुरुषात रुजवल्या जाणा-या स्वातंत्र्य, निर्णयक्षमता, तर्कनिष्ठता, आत्मविश्वास या गुणांचे सिमोनला अतोनात कौतुक होते. स्त्रीमध्ये हे गुण रुजवले जात नाहीत व त्यामुळे स्त्री दैनंदिन रहाट्गाडग्यात अडकून पडते. याउलट पुरुष मात्र रोजच्या दिनचर्येपेक्षा व शारीरधर्मापेक्षा उदात्त असे काही तरी भरीव कार्य तडीस नेऊन ’स्व"चे प्रकटीकरण साधतो हा सिमोनच्या ’सेकंड सेक्स’ मधील वारंवार प्रतिपादला जाणारा मुद्दा होता. ’सेकंड सेक्स’ प्रकाशित झाल्यानंतर स्त्री दास्याविषयीचे तिचे सिद्धांत स्त्रीविषयक भान जागृत होण्यास खूप उपयुक्त ठरले. मुलगा व मुलगी यांना वाढवण्यात केला जाणारा भेदभाव, त्याचे स्त्री व पुरुष दोघांच्याही मानसिकतेवर होणारे दूरगामी परिणाम, स्त्रीच्या मानसिक दौर्बल्यामागची तिच्यावरील कुसंस्कारांची परंपरा यांचे विस्तृत
विश्लेषण सिमोनने केल्यामुळे स्त्री समस्यांविषयी झोपी गेलेला समाज थप्पड बसून जाग यावी त्याप्रमाणे खडबडून जागा झाला. ’सेकंड सेक्स’ वाचून अनेक स्त्रियांना स्वत:च्या दुय्यमपणाची कारणे कळली. अनेक आयांना मुली वाढवताना काय टाळले पाहिजे याचे भान आले. तरुण मुलींना स्वत:च्या शरीराची, पर्यायाने स्त्रीत्वाची लाज वाटणे बंद होऊन ताठ मानेने आयुष्याला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास आला. थोडक्यात, सिमोनच्या पुस्तकाने स्त्रियांची एक संपूर्ण पिढीच स्वत:कडे अधिक डोळसपणे बघून स्वत:शी संवाद साधू लागली. या पुस्तकाने स्त्रीच्या मानसिकतेत आमूलाग्र क्रांती केली. त्याचा फायदा व्यक्तिगत पातळीवर स्त्रियांना झालाच, पण पुढच्या पिढीतील मुलीचं संगोपन अधिक जाणीवपूर्वक करण्यासाठी, त्यांना माणूसपण देण्यासाठी सुजाण मातांची एक फळीच या पुस्तकाने तयार केली. ’स्त्री जन्मत नाही, तर घडवली जाते’, या सिमोनच्या गाजलेल्या विधानाचे दूरगामी परिणाम लक्षात घेऊन अनेक स्त्रियांनी आपल्या मुली चुकीच्या पद्धतीने घडू नयेत याची खबरदारी घेतली.

’सेकंड सेक्स’ या पुस्तकावर विचार विनिमय करण्यास तिने १९४६ मध्ये सुरुवात केली. त्या वेळेला स्त्रीवादी साहित्य ही कल्पनाही अस्तित्वात नव्हती. 'Vindication of Rights of Women' यासारख्या पुस्तकांचे लेखन झाले असले तरी स्त्रीविषयक अभ्यासग्रंथ तर अजिबात अस्तित्वात नव्हते. स्त्रियांच्या सामाजिक व आर्थिक दृष्टीकोनातून विचार करणारे तत्वचिंतक म्हणजे जॉन स्टुअर्ट मिल, मार्क्स व एंगल्स. विशेषत: मिलचे 'Subjections of Women' (1869), एंगल्सचे Origin of the Family, Private Property and the State (1888), व एलिस हॅवलॉकचे लैंगिक संदर्भात विश्लेषण करणारे Man and Women (1894) ही ख-या अर्थाने स्त्री विषयाचा ऊहापोह करणारी प्रसिद्ध पुस्तके होत. एकोणिसाव्या व विसाव्या शतकात स्त्रियांच्या हक्कांविषयी ज्या चळवळी झाल्या, त्या मुख्यत्वेकरून वाढत्या औद्योगिकरणाशी संबंधित होत्या. समान कामासाठी समान वेतन, कामाचे तास १२ न ठेवता १०, कामाच्या जागा आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित करणे, बाळंतपणाची व आजारपणाची रजा यांसारख्या स्त्रीच्या अर्थार्जनाशी निगडित मागण्या घेऊन चळवळी होत होत्या. स्त्रियांच्या लढण्याचा दुसरा मुद्दा होता मतदानाच्या हक्काचा.

’सेकंड सेक्स’ मध्ये सिमोनने स्त्रीचा अगदी कृषीसंस्कृतीच्या उगमापासून ते फ्रेंच राज्यक्रांतीचा काळ व तेथून पुन्हा आधुनिक काळापर्यंतचा जो राजकीय व सामाजिक इतिहास विस्तृतपणे नोंदला आहे. स्त्रीच्या सामाजिक दर्जाची एवढी सखोल कारणमीमांसा याआधी कोणीही केली नव्हती. सिमोनच्या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिने स्त्रीची मानसिक जडणघडण, तिच्यावरील कौटुंबिक व धार्मिक संस्कार, बालपणापासून तिच्यात निर्माण केली जाणारी परावलंबित्वाची, असहायतेची भावना, तिच्या शारीरिक सौंदर्याला दिले जाणारे अवास्तव महत्व, आणि त्याच वेळी तिच्या शारीरिक क्षमतांकडे केले जाणारे दुर्लक्ष, तिच्या बौद्धिक विकासाचा उपहास करून तिची तिच्या लैंगिक देहधर्मात केलेली स्थानबद्धता याचा सविस्तर उहापोह केला. त्यातून सिमोनने सप्रमाण दाखवून दिले की स्त्री निसर्गत: अबला नसते, तर ती बनवली जाते. स्त्री व पुरुषांमधील नैसर्गिक घटकांना अवास्तव प्रमाणत भडक करून त्यांच्या मानसिक व शारीरिक क्षमतांमध्ये व पर्यायाने त्यांच्या सामाजिक स्तरांमध्ये जी खोल दरी निर्माण केली जाते, ती निसर्गसुलभ नसून मानवनिर्मित आहे. या संदर्भात तिने केलेले ’स्त्री जन्मत नाही, तर घडवली जाते’ हे वाक्य अजरामर झाले.

हेडहंटर

हेडहंटर : गिरीश टिळक
राजहंस प्रकाशन
पृष्ठे : १९९, मूल्य : २०० रुपये

देहाला खरोखरच विश्रांती हवी होती. पण मनाला काय हवं होतं कुणास ठाऊक? आठवडाभरातलं ते झोपणं कंटाळवाणं होतं खरं. पण मनाला आल्हाद मिळण्याऐवजी उद्विग्नताच भरून आली. विचित्र हिशेब मन मांडू लागलं. ’सिग्मा’नं अनपेक्षित वेतनवाढी दिल्या ख-या, पण आपण ’सिग्मा’चा काही कोटींचा फायदा करून दिला आहे. तो फायदा, आपण पुरवठादारांकडे पैसे न खाल्ल्यामुळेच केवळ मिळाला आहे असं नाही, तर आपले गृप्समधले वा अन्यत्रचेही संपर्कमैत्र वापरून कंपनीला सुयोग्य पुरवठादार मिळवून देऊनही करून दिला आहे. ’हेडहंटिंग’ नव्हे ’पुरवठादारांचं हंटिंग’ मिळवून दिलेला फायदा हा प्रचंड आणि चिरस्थायी आहे. ’सिग्मा’सारख्या आधी सुस्थापित असलेल्या कंपनीला आपल्या संपर्कमैत्रांमुळे फायदा करून देण्यात जिंदगी घालवण्यापेक्षा ’रिझ्युमे’सारख्या सुस्थापित होऊ घातलेल्या कंपनीला वर आणण्यासाठी ते वापरणं हे अधिक आनंदाचं आहे. ’पुरवठादारांचं हंटिंग’ नव्हे, तर हेड हंटिंग’! त्यासाठी आपल्याला भागीदारी द्यायलाही उत्सुक असल्याचं उदय जर खुलेपणानं म्हणाला होता...तर सोडावी का नोकरी? पत्करावा का धोका? ’रिझ्युमे’त काम किती सुखात असायचो आपण! आणि जातीनं खुद्द आपणच राबत असूनही किती कमी वेळात कामं व्हायची तिथली! इथल्या इतकं पूर्ण वेळ तिथेच राबलो तर ’नोकर’ म्हणून जिंदगी काढण्यापेक्षा ’मालक’ म्हणून सहभागी होण्याची उदयनं देऊ केलेली संधी नाकारण्याचा करंटेपणा का म्हणून दाखवावा आपण? हे आणि असे प्रश्न घेऊनच दहा - बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर मी ’सिग्मा’त हजर झालो.
त्या पूर्ण दिवसभर मी माझ्या नेहेमीच्या शिस्तीनं, क्षमतेनं मनापासून काम करत होतो खरं, पण हेही खरं आहे की अधून मधून ’रिझ्युमे’चं पुण्याचं ऑफिस मला आठवत राहायचं. ’बोरिंघर’ला मी मिळवून दिलेला मटेरियल्स मॅनेजरही आठवत राहायचा आणि असं काहीबाही कित्येक! अखेर संध्याकाळी मी उदयच्या कार्यालयात गेलो. त्या दिवशीचं माझं सात वाजताचं निघणं ’आजारातून नुकताच उठलाय’ या कारणावर खपून गेलं. मी म्हणालो, ’उदय, मी जर ’सिग्मा’तली नोकरी सोडली तर... पूर्वी जी संधी तू मला देऊ केली होतीस, ती मी आजही कायम आहे असं गृहीत धरू का?’
’निश्चितच. दिलेला शब्द हा तारीख न घातलेला बेअरर चेकच असतो. तुझं इथे केव्हाही स्वागतच आहे. कधी सोडतोयस नोकरी?’
’लगेचच सोडायचा विचार आहे माझा.’
’लगेचच रुजू हो आपल्याकडे. पहिल्या महिन्यापासून तुला आणि मला मिळणारा पगार सारखाच असेल. आपल्या दोघांच्याही पगाराखेरीजच्या सुखसोयी सारख्या असतील. भागीदारी किती टक्के असेल ते थोड्या काळानंतर सांगेन मी. एवढं नक्की, ’रिझ्युमे’त तू रुजू होशील तो एम्प्लॉयी म्हणून नाही तर भागीदार म्हणूनच.’
त्यानंतर दुस-याच दिवशी मी ’सिग्मा’चा राजीनामा दिला. एक महिन्याची पूर्वसूचना देणं आवश्यक होतं. त्या महिनाभर मी ’सिग्मा’त जात होतो. मोडकसाहेब-कौलगीसाहेब, दोघांनीही माझं मन वळवायचा खूप प्रयत्न केला, पण माझा निर्णय पक्का होता. राजीनामा त्यांना स्वीकारावा लागला. तो सहजासहजी स्वीकारला गेला नाही तो आमच्या घरातून. मी राजीनामा देणार असल्याचं घरात जाहीर केलं, म्हणजे तो देऊन टाकला असल्याचं लपवून ठेऊन ’देण्या’चा विचार असल्याचं सांगितलं. तेव्हा तो अविचारच कसा आहे, हे पटवून देण्याची घरात अहमहमिकाच लागली. ’अर्धवेळ काम करत होतास तसं पुन्हा करू लाग’, ’मागे एकदा ’शेअर्स’च्या व्यवसायात धिंडवडे निघाले होते ते आठवत नाहीत का’, उत्तम नोकरी सोडून धंद्यात ’पडण्याचा’ हा कसला दळभद्री विचार’, ’अरे, तुझं बालपण आठव. कसलीच अपेक्षा नव्हती आम्हाला तुझ्याकडून. आता स्वत:च्या पायावर उभा आहेस, तर करंटेपणानं कशाला निमंत्रण द्यावं’, ’आता तू एकटा नाहीस, संसार आहे तुझ्या खांद्यावर’, अशी नाना परींनी ’भवति न भवति’ झाली. कोण काय बोललं याला महत्व नसून घरातून उमटलेली एकूण प्रतिक्रिया महत्वाची नोती.
ती एवढी दाहक होती की घरात त्या काळात पूर्ण अबोला पसरला. त्या काळात घरात मी एक नगण्य, बेजबाबदार, हेकेखोर असा घटक ठरून गेलो. अशा घरात हे घडलं होतं की परस्पर आस्था आणि एकोपा हे जिथले स्थायीभाव होते. नारळाच्या ताटभर वड्या केल्या गेल्या तर ते कापलेले चौकोन ठेवण्यासाठी आईला डब्याची कधीच नेमणूक करावी लागली नाही. वड्या सुकण्यापूर्वीच उभं घर जुगलबंदी लागावी तसं खाऊन टाकायचं. वडीइतकाच तो सहस्वादाचा सोहळा मधुर, रसाळ असायचा. मऊ, ओलसर पोटातून गरम असणा-या त्या वड्या ताटातून खाताना, वड्या बनवताना घरात कोंडून राहिलेला वेलचीचा वासही ओसरून गेलेला नसायचा, तो साथीला असायचा... त्या अस्वस्थ - अशांत पर्वकाळात कुणीतरी कोवळे नारळ आणून दिले, म्हणून असावं, आईनं वड्यांचा घाट घातला. नेहेमीप्रमाणे ताट आणून बाहेर हॉलमध्ये पंख्याखाली ठेवलं. वेलचीचा गोड वास तर तोच आणि नेहेमीप्रमाणे दरवळत होता. तिथेच अवती भवती सगळी माणसं बसलेली होती. पण ताटापाशी जाऊन वड्यांना स्पर्श करण्याची कुणालाच इच्छा झाली नाही. जणू वड्यांची गोडी हरवली होती. वास्तवात घरातलीच गोडी हरबून गेली होती. या भयकारी स्थितीला आपणच कारण आहोत, असं मला वाटत राहिलं. मात्र आपला निर्णय अचूक आहे याची खात्री मला सावरत राहिली.

धाकट्या नजरेतून

धाकट्या नजरेतून : अलका गोडे
राजहंस प्रकाशन
पृष्ठे - १५५, मूल्य - २०० रुपये

दिलीपच्या छोट्या मोठ्या नोक-या चालू असतानाच ’डोंगरे बालामृत’मधली नोकरी चक्क आफ्रिकेलाच चला म्हणत होती. दिलीप आता महत्वाच्या टप्प्यावर उभा होता. एका बाजूला घरातलीच ध्येयवेडी माणसं सामाजिक बांधिलकीला अनुसरून एका निष्ठेभोवती फिरत होती. अनेक बाबींमधला तोकडेपणा, पण जोडीला कमालीची जिद्द या दोहोंमधला मेळ महत्प्रयासानं सांभाळत होती. या प्रवासात त्यांची झालेली मानसिक, आर्थिक कुचंबणा, लहान लहान स्वप्नांची गळचेपी, न पेलणारं नुकसान, सगळंच दिलीपला पचायला जड जात होतं. या सगळ्यात स्थैर्य आणि सुरक्षितता यासाठी लागणारी महत्वाची आर्थिक बाजू पा-याप्रमाणे चंचल राहणार होती. रस्ते खडबडीत वाटत होते. अशा वेळी त्याची मानसिकता कशी काम करत होती, मला माहीत नाही. या पार्श्वभूमीवर विचार करावयाचा झाला तर आलेली संधी म्हणजे एक परदेशी नोकरी, लठ्ठ पगार, बढती, उच्चपदी वर्णी, संसार, ऐषाराम, असा निळ्या झाकणाच्या बाटलीतल्या जंतुविरहित पाण्याप्रमाणे नितळ, गुळगुळीत प्रवासही मोह पाडणारा होता. पण का कुणास ठाऊक, दिलीपनं काही निश्चित विचार करून ती मोहक नोकरी नाकारली. ठाम निर्णय घेऊन कंपनीलाही तसं कळवलं.
लहान वयात दिलीपच्या अंगात तरुणाईची रग होती. ’हा काम ऐकणार नाही,’ याची बाकीच्यांना सवय झालेली. पण वेळ आलीच तर हे सगळं जागच्या जागी रोखून धरण्याची ताकद एकट्या भाऊच्या नजरेत आणि आवाजाच्या टीपेत असायची. भाऊ दिलीपमधल्या सूक्ष्म बदलांकडे लक्ष ठेऊन असायाचा, तसाच दिलीपही भाऊच्या सामाजिक प्रभावानं त्याच्याकडे आतल्या आत आकर्षित होत असावा. थोडीशी खोडसाळ बंडखोरी सोडली तर याच्यात काही तरी वेगळी ठिणगी आहे, हे भाऊला जाणवत होतं. त्याला ते आव्हान वाटायचं, हेही भाऊनं मला मोठेपणी गप्पांमध्ये सांगितलं आहे.
बाबासाहेब (पुरंदरे), भाऊ (श्री. ग. माजगावकर), कुमुद (निर्मला पुरंदरे), यांचं सामाजिक काम आपापल्या मार्गानं पुढं सरकत होतंच. एखाद्या नवख्या वाटसरूला एकाच वेळी, अनेक रस्त्यांचं आकर्षण वाटावं, अशी परिस्थिती रोजच दिलीपसमोर तयार होत होती. त्याचा थोडासा बेदरकार, बंडखोर स्वभाव बिघडायचं म्हटलं, तरी या तीनही रस्त्यांना चुकवू शकत नव्हता. आज, उद्या, नाहीतर परवा दिलीपच्या कर्तृत्वसंपन्न अशा प्रवासाची गाडी या तीनही भक्कम पुलांवरून धावणार, हे बहुधा तेव्हाच निश्चित झालं ह्योतं. दोनही भावांचं एक अनोखं नातं आकाराला येत होतं. कोणत्याही नात्यांच्या कोष्टकात ते बसणारं नव्ह्तं. खरं तर पाच-दहा मिनिटांच्यावर दोघंही एकमेकांच्या समोर थांबत नसत. कबूल करत नसेल, पण दिलीपला भाऊबद्दल एक आदरयुक्त भीती वाटायची. म्हणूनच दोघांच्या मध्ये संकोचाचा एक पडदा निर्माण झाला होता. त्यांना संवादासाठी तिस-या व्यक्तीची गरज भासायची. मी पण ब-याच वेळा ही भूमिका निभवायची. भाऊ गंमतीनं मला बफर म्हणायचा. मध्ये कोणी तरी बफर असल्यावर दोघंही खुलायचे. जे इतर तिथे हजर असायचे, त्यांना दोघांमधली बौद्धिक चमक जाणवल्याखेरीज राहायची नाही. शेरेबाजीसह बोलणं अनेक विषयांना स्पर्शून जायचं. घरातला सासू-सुनेचा कळीचा मुद्दा असो, कधी व्यवसायातली देणीघेणी असोत, कधी माणूस अंकावर आलेली कायदेशीर नोटीस असो, तर कधी डॉक्टरी इलाजासाठी पैशाची जमवाजमव असो, कितीही गंभीर ताण असला तरी, दोघांच्या बोलण्यातून हलका होत असे. प्रश्न मिटलेला नसे, पण तात्पुरती वाट शोधली जात असे.
एकूण दोघंही एकमेकांशिवाय हरवल्यासारखे असायचे. दिलीपचं नुसतं जवळपास असणं भाऊला पुरेसं असायचं. तर भाऊचं नसणं म्हणजे दिलीपला सूर सापडत नसल्याचं जाणवायचं. इतर वेळी एकमेकांचा अभ्यास करणं, एकमेकांना नकळत न्याहाळणं, न सांगताच दुस-याची अडचण ओळखणं, पहिल्याची काळजी करणं, असं गुंतागुंतीचं नातं दोघांमध्ये एकाच वेळी विणलं जात असावं. दिलीपचं वाचन, हुषारी, निरीक्षण या सगळ्या बाबींचा भाऊ मनापासून अंदाज घेत होता, आपल्याबरोबर पुढच्या वाटचालीत दिलीप असावा, ही त्याची इच्छा होती, स्वप्नं होतं. पण ते दिलीपच्या पुढाकारानंच प्रत्यक्षात येणं त्याला अभिप्रेत असावं. त्यासाठी भाऊनं आपला एकही शब्द खर्ची घातलेला नसावा. आपल्यापेक्षा जास तडफेनं दिलीप या क्षेत्रात काम करेल, याबद्दल भाऊला ठाम खात्री होती. दिलीपचा निवडक मित्र परिवार, उत्तम आणि दर्जेदार वाचनाकडे कल, आपलं म्हणणं विचारपूर्वक पटवून देण्याची हातोटी, मत मांडण्याची पद्धत, हे सर्व आपल्या व्यवसायाशी, ध्येयवादाशी कुठे तरी निगडित आहे, असं भाऊला वाटायचं. मात्र दिलीपच्या स्वागतासाठी उत्सुक असलेला भाऊ त्याच्या बाबतीत निमंत्रणाचा धोका पत्करायला तयार नव्हता. ’सावध’पणा हा स्वभाव विशेष आमच्या आईनं दोन्ही भावांमध्ये खुबीनं पेरलेला असावा. पुढील सहप्रवासात दोघाही भावांनी तो अतिशय कौशल्यानं हाताळलेला दिसतो.
सरतेशेवटी साधारण १९६६ साली दिलीप ख-या अर्थानं भाऊचा साहाय्यक म्हणून ’माणूस’ मध्ये प्रवेशकर्ता झाला. शेवटी काळाची, वेळेची म्हणून काही मागणी असतेच. तसा ’माणूस’ला आलेला ’एकसुरीपणा’ बदलायला हवा होता. याच बाजूवर दिलीपनं काम करणं अपेक्षित होतं. एकमेकांना समजून घेण्याची क्षमता दोघाही भावांमध्ये पूर्णपणे असल्यामुळे ’निर्णयस्वातंत्र्य’ ही दिलीपची गरज भाऊनं ओळखली होतीच. दिलीप स्वत:च्या पद्धतीनंच काम करणार होता. जाहिरातींना आपल्याकडे वळवण्यासाठी ’माणूस’चं दृश्यरूप बदलायला हवं होतं. रंगीत मुखपृष्ठाबरोबर हाताला गुळगुळीत स्पर्शही हवा होता. चित्रपट विषयांचा अंतर्भाव करून थोडासा चटपटीत मजकूरही भुरभुरायला पाहिजे होता. गंभीर मजकुराबरोबर हलकं फुलकं विनोदी लिखाण, कागदाचा दर्जा आणि पृष्ठसंख्या अशा अनेक बाबींवर दिलीपनं परिश्रम घ्यायला हवे होते. सर्वात महत्वाचं म्हणजे यासाठी लागणारं आर्थिक धाडस पेलायला हवं होतं.
भाऊला नेहेमीच नशिबाशी खेळ करत जगणं आवडायचं. आपल्याला प्राक्तन प्रतिकूल होतय असं वाटलं की तो जास्तच इरेला पेटायचा. सतत टोकाची भूमिका घ्यायचा. परिणाम आणि निर्णय चुकले तरी त्याला पर्वा नसायची. घरगुती असो, वैयक्तिक असो वा व्यावसायिक असो, त्याचा हट्टीपणा अवेळी आणि त्रासदायक आहे, असं जाणवत असे. कोणतीही तडजोड करणं म्हणजे आपण हार पत्करली, असंच त्याला वाटायचं. याउलट दिलीपनं स्वत:ला समजायला लागल्यापासून केलेली वाटचाल ही नशिबाचा कौल लक्षात घेऊन केलेली दिसते. स्वत:चा निर्णय कृतीत आणताना त्यानं नियतीचा कौल प्रमाण मानलेला आहे. प्रसंगी तशीच वेळ आली, तर पांढरं निशाण दाखवून तो मोकळादेखील होतो.
हा मूळ वृत्तीतला फरक, की मोठ्याच्या अनुभवातून धाकट्यात झालेला बदल आहे, कुणास ठाऊक! काहीही असो, पण एकमेकांच्या नातेसंबंधात किंवा व्यवसाय प्रवासात हा फरक कधीही आड आलेला नाही.
दिलीप मनात म्हणायचा, ’मी करायचं ठरवतोय, बघूया उद्या श्रीभाऊ काय म्हणतोय ते’, तर भाऊ म्हणायचा, ’हे धाडस बहुधा दिलीपच्या अंगावर येणारसं दिसतय, पण करू देत. तयारी तर दिसतेय! आणि आपण आहोतच.’
असं कौतुक आणि आदर दोघांकडूनही सांभाळला जायचा.

Friday 14 May 2010

अर्थात

अर्थात


अच्युत गोडबोले


राजहंस प्रकाशन, पृष्ठे : ४४६, मूल्य : ३०० रुपये


बार्टर आणि कमॉडिटी मनी
अमेरिकन टूरिस्टांविषयी बरेच विनोद फिरत असतात. एकदा म्हणे असाच एक अमेरिकन प्रवासी त्याच्या बायकोबरोबर इस्रायलमध्ये एके ठिकाणी बसला असताना एक अरब सेल्समन त्यांच्याजवळ आला. आपल्याकडच्या वस्तूंचं सेल्स टॉक करूनही त्या जोडप्यानं त्याच्यात काहीच रस न दाखवल्यानं शेवटी त्यानं त्या अमेरिकनाला विचारलं, ‘तुम्ही कुठचे?’ तो म्हणाला, ‘अमेरिका.’ त्याच्या बायकोच्या काळ्या केसांकडे आणि ऑलिव्ह रंगाच्या त्वचेकडे बघून तो सेल्समन म्हणाला, ‘पण ही नक्कीच अमेरिकन नाही.’ ‘मीही अमेरिकनच आहे,’ ती म्हणाली. मग सेल्समननं तिच्याकडे बघून विचारलं, ‘हा तुझा नवरा का?’ ती म्हणाली, ‘हो.’ मग त्या अमेरिकनाला तो म्हणाला, ‘तू तिला मला विकलस तर मी तुला शंभर उंट देईन.’ नवरा बराच काळ शांत बसला. शेवटी विचार करून म्हणाला, ‘ती विक्रीसाठी नाहीये.’ तो सेल्समन निघून गेल्यावर बायकोनं हसत हसत त्याला विचारलं, ‘तू उत्तर द्यायला एवढा वेळ का घेतलास?’ त्यावर तो म्हणाला, ‘ते शंभर उंट अमेरिकेला सहजपणे नेता येतील का याचा मी विचार करत होतो.’ यावर बायकोचा चेहरा बघण्यासारखा झाला, हे सांगायला नकोच.
आज हा आपल्याला विनोद वाटेल, पण एके काळी बायका या चक्क विकतही घेतल्या जायच्या. आणि त्याही गुरं ढोरं, धान्य यांच्या मोबदल्यात.(तेव्हापासून बहुधा ‘विकतची कटकट’ हा वाकप्रचार निघाला असावा.) आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की अनेक वर्षे मानवी इतिहासात पैसा असा नव्हताच. अलीकडले चेकबुक्स, क्रेडीट कार्ड अशा गोष्टी तर सोडाच, पण साधी नाणी आणि नोटाही नव्हत्या. पण व्यवहार मात्र होत असत. आणि ते वस्तूंमधलेच असत. त्यालाच ‘वस्तुविनिमय’ म्हणजेच ‘बार्टर’ म्हणतात.
बार्टर पध्दतीनं नाटकंही पूर्वीपासून बघितली जायची. नाटक बघायला पैसे देऊन तिकिट काढण्याऐवजी काही तरी वस्तू आणायच्या, अशी ही बार्टर थिएटरची कल्पना होती. १८३१ साली अशा बार्टर थिएटरच्या नाट्यगृहाची इमारत उभी राहिली. व्हर्जिनियन नावाचं नाटक १४ जानेवारी १८७६ रोजी दाखवलं गेल्याची एक नोंद आपल्याला मिळते. या नाटकातून मिळालेले पैसे त्या नाट्यगृहाच्या डागडुजीसाठी वापरले गेले. जेव्हा नाटक चालू नसे तेव्हा त्या इमारतीचा उपयोग अनेक कार्यालयांसाठी होई. या इमारतीच्या छपरावर एक फायर अलार्म बसवलेला होता. रात्री किंवा दिवसा जर कुठे आग लागली तर तो वाजे. जर तो वाजला आणि तेव्हा कुठलंसं नाटक चालू असेल तर आहे त्या पोझिशनमध्ये सगळ्या नटांना ‘स्टॅच्यू’ होऊन तो सायरन वाजेपर्यंत उभं राहावं लागे. हा अलार्म १९९४ सालापर्यंत होता. नंतर तो आधुनिक पध्दतीप्रमाणे इलेक्ट्रॉनिक करण्यात आला.
१९२९ साली चालू झालेल्या अमेरिकेतल्या महाअरिष्टाच्या (डिप्रेशन) काळात पुन्हा ही बार्टर थिएटरची कल्पना वर आली. याच काळात रॉबर्ट पोर्टरफील्ड नावाचा एक तरुण कलाकार नट त्याच्या व्हर्जिनियामधल्या मूळ गावी परतला तो एक भन्नाट कल्पना डोक्यात घेऊनच. त्या प्रांतातल्या भाज्या आणि फळं देऊन त्याच्या मोबदल्यात लोकांना नाटकं बघू द्यायची ही ती कल्पना. लोक या कल्पनेला हसले आणि त्यांनी त्याला चक्क वेड्यात काढलं. पण या पठ्ठ्यानं काही जिद्द सोडली नाही. १० जून १९३३ रोजी त्यानं त्याचं नाट्यगृह खुलं केलं. ‘तुमच्याकडल्या ज्या काही भाज्या विकल्या जात नसतील, त्या घेऊन या आणि तासभर तरी खळखळून हसा.’ अशी त्यानं जाहिरातही करायला सुरुवात केली. ‘ज्यांना शक्य होईल, त्यांनी ४० सेंटस द्यावेत, नाही तर भाज्या आहेतच’ अशा त-हेनं ते नाट्यगृह सुरू झालं. आणि मग काय विचारता! लोकांनी नाटक बघायला ही गर्दी केली. डिप्रेशनच्या काळात ब-याच गोष्टी विकल्या जात नव्हत्याच. मग उगाचच त्या वाया घालवण्याऐवजी नाटक बघायला काय हरकत आहे, असा विचार त्यांनी केला. हॅम्लेट बघायचय ना, मग हॅम (डुकराचं मांस) घेऊन या! ‘हॅम फॉर हॅम्लेट’ ही कल्पना खूपच हिट झाली. फक्त पंचवीस टक्के लोकांनी पैसे देऊन नाटक बघितलं. बाकीच्यांनी अनेक भाज्या, फळं, जिवंत प्राणी आणि काय काय आणायला सुरुवात केली.
खूप पूर्वी झेंदावेस्तमध्ये डॉक्टरची फी पशूंच्याच स्वरूपात द्यावी लागत असे. होमरच्या काव्यामधून डायमेडच्या शस्त्रांची किंमत नऊ बैल आणि युद्धात पकडून आणलेल्या कुशल स्त्रीची किंमत चार बैल होती, असं वर्णन आहे. पूर्व आफ्रिकेत बोकडाचा वापर पैसा म्हणून केला जात असे. दहा बोकडांच्या बदल्यात शिकारीचं शस्त्र, एका बोकडाला पन्नास केळी आणि सहा बोकडांना सुंदर स्त्री असे व्यवहार होत. आपल्याकडच्या पुराणांमध्ये अनेक ठिकाणी गायी, घोडे, यांचाही विनिमयासाठी वापर केल्याचा उल्लेख आहेच. शिवाय धार्मिक कार्यात ब्राह्मणाला हजारो गायी देत असत. न्यू गिनी इथल्या टोळ्या डुकरांचा पैसा म्हणून वापर करत. आफ्रिकेतले मासाई योद्धे गुरं देऊन बायको विकत घेत. नंतर धान्य, मासे, गन पावडर, पिसं, शंख, शिंपले, तंबाखू ( आणि चक्क माणसंही) अशा चित्रविचित्र वस्तू पैसा म्हणून वापरल्या गेल्या. जिवंत माणसं सोडल्यास यातल्या अनेक गोष्टी आज कॉंटिनेंटल बॅंकेच्या म्युझियममध्ये बघायला मिळतात.

केवळ मैत्रीसाठी

केवळ मैत्रीसाठी

उमेश कदम

मेहता प्रकाशन, पृष्ठे : १६०, मूल्य : १३० रुपये


मी दहशतवादी?
"अहो, मी खरच दहशतवादी नाही, तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर!, मी त्या अधिका-यास पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो. पण तो काही ऐकायलाच तयार नव्हता."
आता ही चित्रफित पाहिल्यावर कोण शहाणा माणूस तुम्ही दहशतवादी नाही यावर विश्वास ठेवेल? त्या अधिका-याने मलाच विचारले.
गेले पाच दिवस मी उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे होतो. ताश्कंद येथील आमच्या कार्यालयातील सर्गी राखीमॉव्ह याची व माझी चांगलीच ओळख होती. जिनिव्हा येथील वार्षिक बैठकांदरम्यान त्याची व माझी भेट व्हायचीच. तसेच पूर्वी श्रीलंकेतील कॅंडी या सुंदर गावी झालेल्या एका प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात सर्गी हजर असताना मी तीन व्याखाने दिली होती. ती त्याला खूप आवडली होती. त्यानेच पुढाकार घेऊन मला ताश्कंदला आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याच्या एका स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बोलवावे, असे आमच्या तेथील कार्यालयाच्या प्रमुखांना सुचवले होते.
तीन-चार दिवसांच्या सततच्या कामानंतर आम्हाला थोडासा मोकळा वेळ होता त्या दिवशी ताश्कंदमधल्या काही महत्वाच्या प्रेक्षणीय स्थळांना आम्ही भेटी द्याव्यात असे सर्गीने सुचवले. त्याने आमच्यासाठी ऑफिसची गाडी आणि ड्रायव्हर यांची सोय केली. सर्गी म्हणाला, "येथे जवळच एक कपड्यांचे मोठे दुकान आहे, एक वस्तुसंग्रहालय आहे व एक छोटासा पार्क आहे. तुम्हा लोकांना कुठे जायचे आहे?"
पीटर म्हणाला, "मला वस्तुसंग्रहालय पाहायचे आहे." फ्रॉन्स्वाज म्हणाली, "मला कपड्यांच्या दुकानात जायचे आहे." तर ऑंत्वान म्हणाला,"मी पार्कमध्ये झाडाखाली बसून पुस्तक वाचत बसेन. "
"उमेश, तू काय करतोस?" सर्गीने मला विचारले.
"मला फोटोग्राफीची आवड आहे, मी या ऑपेरा हाऊसचे वेगवेगळ्या बाजूने फोटो घेईन व काही व्हिडिओ चित्रणही करेन. "
ऑपेरा हाऊसच्या उजव्या बाजूला थोडेसे चित्रण करत असतानाच पोलिसासारखा गणवेष परिधान केलेला एक गृहस्थ माझ्यासमोर आला. त्याने मला चित्रण थांबवण्याचा इशारा केला. त्याला इंग्रजी समजत नव्हते. तो मला त्याच्याबरोबर जायचा इशारा करत होता. मला अर्थातच त्याच्याबरोबर जाणे भाग होते. शेजारच्याच एका इमारतीत प्रवेशद्वारातून आत गेल्या गेल्या एक कार्यालय होते. तेथील एका अधिका-यास त्याने त्यांच्या भाषेत माझ्याविषयी काही तरी सांगितले. ते ऐकून तो अधिकारी आश्चर्यचकीत झाला व माझ्याकडे संशयास्पद नजरेने पाहू लागला. सुदैवाने त्याला इंग्रजी येत होते.
"तुम्ही कोणत्या उद्देशाने या इमारतीचे चित्रण करत होतात?"
मी त्याला माझा उद्देश सांगितला.
"ही इमारत अमेरिकन दूतावास आहे. आम्हाला तुमची कसून तपासणी केली पाहिजे." तो म्हणाला.
मागच्याच महिन्यात वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटॅगॉन या ठिकाणांवरील हल्ल्यांपासून अमेरिकन सरकारने आपल्या दूतावासांच्या सुरक्षा व्यवस्थेत आमूलाग्र बदल करून ती अतिशय कडक केली होती. या अधिका-याने आता माझी चौकशी करायची म्हटल्यावर मी मनातल्या मनात स्वत:लाच दोष दिला. छायाचित्रणाच्या हौसेखातर मी विनाकारण अडचणीत आलो होतो. त्यात गेल्या वर्षीपासून मी दाढी वाढवलेली. ब-याच वेळा लोक मला अरब समजायचे.
त्या अधिका-याने माझी व्हिडिओ टेप मागे फिरवून पहिल्यापासून दाखवायला सांगितले. टेप मागे फिरवून कॅमे-राच्या छोट्या पॅनलवर दाखवायला सुरुवात केली.
"हे काय? ताश्कंदचा विमानतळ?"
"हो. परवा इथे पोचल्यानंतर अन्यत्र क्वचितच दिसणारी रशियन बनावटीची टुपॉलोव्ह व अंतोनॉव्ह विमानं पाहायला मिळाली. मला विमानं बनवायला आवडतं." मी खुलासा केला.
"विमान अपहरण करायचा विचार दिसतोय. आताच तर तुम्ही म्हणालात की तुम्ही आंतरराष्ट्रीय कायद्याचे सल्लागार आहात म्हणून. मग एकदम एरॉनॉटीकल इंजिनियर झालात की काय विमानं बनवायला?"
"छे, छे, मला विमानांची छोटी छोटी मॉडेल्स बनवायचा छंद आहे."
"माझा तुमच्यावर मुळीच विश्वास नाही. नक्कीच एखादं विमान अपहरण करायचा किंवा विमानात स्फोटकं ठेवण्याचा तुमचा इरादा असणार! बरं पुढे पाहू काय आहे ते!"
मी पॉज केलेली टेप पुढे चालू केली. काल संध्याकाळी आम्ही सर्वजणं मिळून एका अरेबियन उपाहारगृहात जेवायला गेलो होतो. तिथे वैशिट्यपूर्ण अरेबियन बेली डान्स चालला होता. त्याचेही काही चित्रण मी केले होते.
"अरेबियन उपाहारगृह दिसतेय. तिथे नक्कीच तुमची आणि तुमच्या सहका-यांची गुप्त बैठक झाली असणार. ओसामा बिन लादेनचा सौदी अरेबियात खूप मोठा तळ आहे म्हणे. कित्येक अरेबियन राष्ट्र दहशतवाद्यांना आर्थिक मदत करतात, हे आता सिध्द झालेलं आहे. तुमचा आणि अरेबियन लोकांचा संबंध मला आता स्पष्टपणे दिसून येतो आहे."
आता त्याचा गैर्समज कसा दूर करावा, या संभ्रमात मी पडलो. तो कलुषित नजरेनेच माझ्याकडे पाहत होता. त्याने टेप पुढे चालू करायला सांगितली.
"हे काय? ताश्कंदचा गोल बाजार? गर्दीच्या ठिकाणी बॉंबस्फोट करण्यात दहशतवादी तरबेज असतात, हे जगजाहीर आहे. त्याचीच तयारी दिसतेय." तो म्हणाला.
"अहो, येथील संस्कृती लक्षात राहावी म्हणून हे चित्रण केलं आहे." मी माझा हेतू सांगितला.
"संस्कृती कसली? तुमची दहशतवादी विकृतीच मला यात दिसतेय. पुढे सुरू करा टेप."
नंतर संसद आणि महापौरांचे कार्यालय पाहिल्यावर तो म्हणाला, "पाहा, ताश्कंदमधील अतिमहत्वाच्या ठिकाणांना लक्ष्य बनवायच्या उद्देशानेच तुम्ही हे चित्रण केलेलं आहे, यात शंकाच नाही."
यावर काय बोलावे मला सुचेना. मी टेप पुढे चालू केली. सर्गी आम्हाला एक मदरसा दाखवायला घेऊन गेला होता. तिथे हस्तकलेचे पारंपरिक शिक्षण तरूण मुलांना दिले जायचे. आतमध्ये चित्रण करायला परवानगी नव्हती. मी मदरशाचे बाहेरूनच चित्रण केले होते.
"हे पाहा, तुम्ही मदरशांना भेटी देता म्हणजे तुमचा आणि दहशतवाद्यांचा घनिष्ट संबंध सिद्ध करायला आणखी कसला पुरावा हवा?"
"अहो, एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून त्याचं चित्रण केलं आहे. आयुष्यात पुन्हा कधी ताश्कंदला यायची संधी मिळेल असं वाटत नाही. म्हणून इथल्या आठवणींसाठीच केवळ हे चित्रण केलं आहे. " मी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होतो.
"एकदा इथे दहशतवादी कारवाया करून येथून पळ काढल्यानंतर तुम्ही परत कशाला इकडे याल?"
मी टेप पुढे चालू केली. नंतर ऑपेरा हाऊसचे व त्याच्या परिसरातील इमारातींचे चित्रण होते. ते बारकाईने पाहिल्यानंतर तो म्हणाला, "हे काय, दूतावासाच्या इमारतीचं अगदी सगळ्या बाजूंनी व्यवस्थित चित्रण केलेलं दिसतय. कोणत्या खिडकीतून आत घुसायचं, सुरक्षा कर्मचा-यांना कसं चकवायचं, स्फोटकं कुठे लावायची या तयारीशिवाय दुसरा कसला उद्देश असणार तुमचा? बरं, इतर प्रेक्षणीय स्थळांच्या बाबतीत मी समजू शकतो. पण या इमारतीत तसं पाहण्यासारखं आहेच काय? चित्रण करून जतन करण्याजोगं यात काहीच नाही. दिसायला अगदीच साधी आणि अनाकर्षक अशीच ही इमारत आहे. आता तर माझी खात्रीच पटली आहे. आता पुढच्या चौकशीसाठी आम्ही तुम्हाला ताब्यात घेणार आहोत." तो थंडपणे म्हणाला.
"अहो, दुपारी शिक्षणमंत्र्यांची भेट घ्यायची आहे"
"म्हणजे मंत्रालायालाही लक्ष्य करण्याचा इरादा दिसतोय. बरं झालं, कसलंही दहशतवादी कृत्य करायच्या आधीच तुम्ही आमच्या तावडीत सापडलात. मी आता माझ्या वरिष्ठांना फोन करतोय. कित्येक दिवस एखादी सनसनाटी कामगिरी पार पाडायची वाट्च पाहात होतो. तो योग आज आला. "
"अहो, कृपा करून जाऊ द्या. हवं तर ही टेप तुम्ही ठेवून घ्या."
"छे,छे, आता जायचं ते पोलीस कोठडीतच."
"बरं, माझे सहकारी आता मला भेटण्यासाठी ऑपेरा हाऊससमोर उभे असतील. त्यांच्यात एक स्थानिक सहकारी आहे. तो सगळा खुलासा करेल. तुम्ही चला माझ्याबरोबर." मी त्याला विनंती केली. त्यावर एक मिनिट विचार करून तो म्हणाला, "ठिक आहे. चला तर मग. आणखी काही दहशतवादी माझ्या तावडीत येतील."
माझ्या दोन्ही बाजूला बंदूकधारी पोलीस आणि तो पुढे अशी आमची वरात निघाली. आम्हाला पाहताच माझे सहकारी आश्चर्य चकीत झाले. त्यावर सर्गी उझबेकी भाषेत त्या अधिका-यांशी बोलाला. "उमेश, मी या साहेबांचा गैरसमज दूर केला आहे. पण हे म्हणतात की तुझ्या टेपमधील अमेरिकन दूतावासाचं चित्रण पुसून टाकलं पाहिजे."
हे ऐकल्यावर मी सुटकेचा नि:श्वास टाकला. मनातल्या मनात मी म्हटलं," हवं तर टेप किंवा टेपसहीत कॅमेराही जप्त करा म्हणावं. पण मला दहशतवादी असल्याच्या संशयावरून डांबून ठेवू नका. नाही तर यथावकाश माझी रवानगी ग्वांतानामो-बे कडे व्हायची.
सर्गी, तो अधिकारी, त्याचे बंदूकधारी सहकारी आणि मी त्याच्या कार्यालयात पुन्हा आलो. टेप पुन्हा रिवाईंड करून त्याला दाखवली. ते पाहिल्यावर त्याने मला जाऊ दिले.
"बरं झालं सर्गी तू होतास म्हणून, नाहीतर माझी काही धडगत नव्हती."
एवढ्यात पीटर मला म्हणाला, " माझा आणि ऑंत्वान व फ्रॉन्स्वाजबरोबर एक फोटो काढ." पीटरने आपला कॅमेरा माझ्याकडे दिला.
तो नाकारत मी म्हणालो, "माफ कर पीटर. तू अमेरिकन नागरिक आहेस. आता कोणत्याही अमेरिकन सजीव अथवा निर्जीव गोष्टींचं चित्रण करायचं नाही असा ठाम निर्णय मी घेतला आहे."










सोनेरी धराचे ठसके (पाव शतकी सौदी अनुभव)

सोनेरी धराचे ठसके (पाव शतकी सौदी अनुभव)


डॉ. उज्ज्वला दळवी


ग्रंथाली प्रकाशन, पृष्ठे : २७२, मूल्य : २७५ रुपये


जावे तिच्या वंशा

"या दक्तूर, अस्सलाम आलेकुम व श्लोनक? ये, ये, कॉफी प्यायला ये."
हाजचा पवित्र महिना होता. आम्ही दोघं आमच्या चौदा वर्षांच्या लेकीला घेऊन जुबैलच्या समुद्रावर संध्याकाळी फिरायला गेलो होतो. किना-यावरच्या वाळूत गालिचा अंथरून, एक पंचावन्नचा ढोल्या बेदू कुटुंबकबिल्यासह मजेत गहवा पीत पहुडला होता.

बायको, तीन वयात आलेल्या मुली, दोन लहान मुलगे, असं ते समस्त कुटुंब पेशंट म्हणून आम्हाला कधी ना कधी भेटलेलं होतं. त्यामुळे आम्हाला पाहिल्या पाहिल्या त्याने उठून कॉफी प्यायला बोलावलं. "श्लोनक"चं दळण दळून झालं. मग आम्ही कॉफी पीत, खजूर खात होतो. इकडचं तिकडचं बोलणं चाललं होतं. त्याच ओघात, अगदी सहजपणे तो म्हणाला, "या दक्तूर, ही कोण आहे तुझ्याबरोबर? तुझी मुलगी का? मला आवडली ती. देऊन टाक ती मला. तिचे किती पैसे घेशील तू? आणि तूसुद्धा आवडतोस मला. या माझ्या मुली. यांच्यातली कुठली तुला हवी तर बघ. जी आवडेल ती दिली तुला. काय म्हणतोस?"

माझ्या घशात खजूराची बी अडकली. एका दमात तो दोन मागण्या घालून मोकळा झाला होता. हसावं का रडावं ते कळेना. पण आमच्या लेकीचे बाबा परिस्थिती सांभाळायला समर्थ होते. "मलाही अतिशय आवडले असतं. पण या माझ्या लेकीला गेल्याच महिन्यात माझ्या दुस-या एका मित्राने मागणी घातली आणि ठरलं ते लग्न. आता नाइलाज आहे. आणि माझं म्हणशील तर माझ्या बाकीच्या तीन बायका भारतात आहेत. त्यामुळे पाचवं लग्न कठीण जाईल मला. शिवाय तुझ्या मुलीलासुद्धा तसं आवडणार नाही."
"असं म्हणतोस? मग कठीण आहे. बरं जाऊ दे. घ्या घ्या मामूल खाऊन तर बघा. माझ्या बायकोने केलेत."
आम्ही निर्धास्तपणे तो खाऊ खाल्ला. रणरागिणी असलेल्या आमच्या लेकीने एरवी तिसरा डोळा उघडून त्या माणसाचं भस्मच केलं असतं. पण अरबीत झालेलं ते संभाषण तिला कळलच नव्हतं. त्यामुळे तिने तो खाऊ आम्हाला खाऊ दिला. त्या माणसाच्या, तिच्याच वयाच्या मुलींना हसून थॅंक यू सुद्धा म्हटलं.
आम्ही बेदू असतो तर त्या बैठकीत ही दोन्ही लग्न सहज ठरली असती. तान्हं बाळ असल्यापासून अंगाखांद्यावर खेळलेली मित्राची मुलगी वयात आली की तिला स्वत:साठी मागणी घालणं इथे रास्तच असतं. इतकच नव्हे तर तो त्या मुलीच्या बापाचा बहुमान असतो. मुलगी दहा वर्षांची झाली की तिचं खेळणं, मोठ्यानं बोलणं, मान वर करून पुरुषांशी बोलणं, सा-यावर बंदी येते. आतापर्यंत चढला नसलाच तर आता तिच्या अंगावर अबाया म्हणजे बुरखा चढतोच. खास पदार्थ शिजले की पुरुष नोकरांनीसुद्धा ओरबाडून खाल्ल्यावर जे काही ताटात उरतं ते उष्टंच तिला खायला मिळतं. तिचं एकटीनं बाहेर जाणं बंद होतं. तिला कुठेही बाहेर जाताना बरोबर मुहर्रीम म्हणजे पाठीराखा लागतो. बाप, भाऊ, नवरा किंवा मुलगा यांच्यापैकीच एक जण पाठीराखा म्हणून जाऊ शकतो.
डॉक्टर, नर्स, शिक्षिका किंवा कारकून या चारच व्यवसायात तिचा शिरकाव होऊ शकतो. पुरुषांना काही काम सांगणं, त्यांना सल्ला देणं याचा अधिकार तिला नसतो. तिला गाडी चालवता येत नाही. भारतीय उद्योगपती श्री विक्रमपत सिंघानिया जेव्हा त्यांच्या छोट्या विमानातून पृथ्वीप्रदक्षिणा करत होते, तेव्हा सौ. सिंघानिया त्यांच्या सावलीसारख्या जमिनीवरून त्यांच्या मागोमाग प्रवास करत होत्या. वॉकीटॉकीने दोघं सतत संपर्कात होते. प्रवासाचा मार्ग सौदी अरेबियात शिरला मात्र आणि त्यांचा हा सततचा संपर्क तुटला. बाईनं गाडी चालवणं हा सौदी अरेबियात गुन्हा असल्यामुळे देशाची सरहद्द ओलांडल्याबरोबर सौ. सिंघानियांच्या गाडीची किल्ली जप्त झाली होती.

पंचविशीची, काळीसावळी पण रेखीव, उंचीपुरी, डौलदार आयेषा प्रकृतीने रसरशीत होती. ती झोकात इमर्जन्सीत शिरली. तिथल्या डॉक्टरांना म्हणाली, "मला उलटीत रक्त पडतं आहे कालपासून."
"कालपासून? आणि तू आजपर्यंत घरी बसून काय केलंस? संडासला कसं होतं? त्याचा रंग कसा आहे?"
"माझ्या केसांसारखा काळा."
"कसली ऍस्प्रोसारखी गोळी घेतली होतीस का? किती रक्त पडतं वेळेला? पेलाभर? चमचाभर?"
"साधारण अर्धा पेला. मला आत्ता उलटी येते आहे."
नर्सने घाईघाईने तस्त तिच्यापुढे केलं. आयेषा रक्त ओकली. तिला भरती करून तात्काळ चाचण्या सुरू झाल्या. दुर्बिणीतून अन्ननलिका, जठर इत्यादींचा तपास रातोरात झाला. पुढच्या आठवडाभर यकृताच्या, रक्ताच्या गोठण्याच्या या आणि त्या ब-याच परीक्षा झाल्या. आयेषाची प्रकृती त्या सगळ्यात फर्स्ट क्लासमध्ये पास झाली. शेवटी तिच्या कान-नाक-घशाचीसुद्धा तपासणी झाली. तब्येत ठणठणीत असल्याचा शिक्का बसला.
"आयेषा, आज संध्याकाळी घरून कुणी आलं की सांग हं. आज तुला घरी जायचय." सकाळच्या राउंडमध्ये डॉक्टरांनी सांगितलं.
दुपारी आयेषाला पुन्हा रक्ताची उलटी झाली. तिची पाठवणी लांबणीवर पडली.
पुढचा महिनाभर आयेषाची रक्तगुळणी तिच्या पाठवणीशी पाठशिवणीचा खेळ खेळली. शेवटी सगळ्या डॉक्टरांची एकत्र मीटिंग होऊन या रहस्याबद्दल वादविवाद झाला. कुणालाही उलगडा होईना. मग तिला रियाधच्या मोठ्या हॉस्पिटलला धाडायचं ठरलं. तिथल्या ओपीडीची एक आठवड्यानंतरची तारीख मिळाली. पण त्या आठवड्यात आयेषाला रक्त पडले नाही.
"मी आता घरी जाऊ का दक्तूर? आता बरी आहे मी."
"अग, घरी गेल्यावर पुन्हा रक्त पडलं तर?"
"नाही पडणार आता."
"तुझ्या स्वप्नात येऊन सांगतं का तुला ते?"
"ते सोडा ना. मला जाऊ दे. नाहीतर मी सही करून आपली आपणच निघून जाईन." तिने धमकावले.
डॉक्टरांनी सायकायट्रिस्ट डॉ. करीमना ती घरी जाण्यापूर्वी एकदा तिच्याशी बोलायची विनंती केली. आयेषाने धरलेली गुपिताची गुळणी बाहेर काढण्याचं काम करीमबाबांना बरोब्बर जमलं.
आयेषाच्या वडिलांनी तिचं लग्न एका म्हाता-याशी ठरवलं होतं. ते मोडावं म्हणून तिने हे नाटक महिनाभर चालू ठेवलं होतं. ती नखाने आपल्या नाकाचा घोणा फोडून तिथून वाहणारं रक्त पिऊन घेई. मग ते ओकून दाखवी. एकदोनदा ते पोटातच ठेवून त्याचा शेवटपर्यंतचा प्रवासही तिने पाहून घेतला होता. हॉस्पिटलमध्ये कान-नाक-घशाचा तपास सर्वात शेवट, जवळ जवळ आठवड्याने होई. तोवर नाकाची जखम भरलेली असे.
तिच्याच शब्दात सांगायचं तर महिन्याभरात या प्रकरणाचा "दमदमा दम (रक्ताचा डंका)" गावभर दणाणला. त्या "लग्ना अजुनी लहान" असलेल्या म्हाता-याने असल्या "रोगट" मुलीला नकार दिला. त्याचा असा निक्काल लावल्यावरच या रक्तपिपासू वाघिणीने नखं कापली.

दौला नावाची, पंधरासोळा वर्षाची एक देखणी मुलगी अशीच नेहेमी उगाचच भरती करा म्हणून हटून बसे. इमर्जन्सीच्या डॉक्टरांना मामा बनवून ऍडमिट होई आणि मग हजार सबबी सांगून घरी जाणं टाळत राही. अशीच एकदा ती घरी जायची टाळाटाळ करत बरेच दिवस वॉर्डात टिकून राहिली. तेव्हा मी ठरवलं, हिच्या नव-यालाच सांगावं, "ही धडधाकट आहे. हिला पुन्हा पुन्हा इथे आणू नका." साडेतीन वाजता तो नवरा आला, म्हणून मला फोन आला. मी तावातावाने गेले. तो नवरा माझ्यासमोर उभा राहिला. उकिरड्याच्या परिमळाने दरवळणारा, ढेरपोट्या, काळाकभिन्न, पंचाहत्तरीचा, डोळ्यात फूल पडलेला तो माणूस... त्याच्या चेहे-यावरचा तो रंगेल भाव... माझा आवेश माझ्या काळजाच्या पाण्यात कधी वाहून गेला ते मलाच कळलं नाही. "दौला बरीच आजारी आहे. तिला अजून इथेच राहावं लागेल," एवढच कसंबसं बोलले मी.

स्वरार्थमणी : रागरससिद्धांत

स्वरार्थमणी : रागरससिद्धांत


गानसरस्वती किशोरी आमोणकर


राजहंस प्रकाशन, पृष्ठे : १५८, मूल्य : ४०० रुपये


वाणीच्या वा वाद्याच्या माध्यमातून जे स्वरमय साकार होते, व्यक्त होते, ते सारे संगीत या शब्दाने ओळखले जाते। ज्याला आपण संगीत म्हणतो, ती खरे म्हणजे स्वरभाषा आहे. मानवी भावसृष्टीचे म्हणजेच मनोवस्थांचे साक्षात तसेच रमणीय दर्शन घडवणारे सौंदर्यप्रधान गायनवादन हेच रागसंकल्पनेचं अधिष्ठान आहे. स्वरमाध्यमातून व्यक्त होणारी श्रवणप्रधानता आणि तर्कनिष्ठता - म्हणजे विवक्षित रागात ठराविकच स्वर येतात, त्या रागाचा विशिष्ट असा एक मुख्य वादी स्वर असतो इत्यादी विधाने- यांना महत्व असते; ते त्या रागाच्या मूळ स्वरूपाचे तत्व, भाव, आणि शास्त्र जाणून घेण्यासाठी किंवा रागभावाच्या वातावरणाची साधारण कल्पना येण्यासाठी. स्वरभाषा हे जसे शास्त्र आहे, तसेच ते भाव प्रकट करणारे नाट्यही आहे आणि काव्यही आहे. राग म्हणजे तालबद्ध, शब्दबद्ध आणि स्वरबद्ध असलेली बंदीश नव्हे. रागविस्तार किंवा रागदर्शन हे वाद्यावर वाजवल्या जाणा-या कोणत्याही तालाच्या आधाराने मांडलेले स्वरप्रकटीकरण किंवा शब्दबद्ध वा नोटेशनबद्ध केलेले संगीतही नव्हे. मग राग म्हणजे नेमके काय, याचा विचार होणे आवश्यक आहे.

विश्वातील सर्वच स्वरव्यवहार हा स्वर आणि भावार्थ यांच्याच माध्यमातून होत असतो. म्हणून व्यक्त होणा-या अभिव्यक्तीचे शरीर आणि आत्मा या दोहोंच्या संदर्भात होणा-या अभिव्यक्तीचा त्या दृष्टीने विचार होणे आवश्यक आहे. स्वर आणि अर्थ यांच्या सहिततत्वातून शरीराच्या अस्तित्वाचे अंतर्बाह्य सम्यक ज्ञान प्राप्त होऊ शकते. म्हणूनच रागाच्या आत्म्याचा शोध घेताना त्याच्या वादी, संवादी, अनुवादी, विवादी, पकड, चलन व इतर लक्षणांबरोबरच या लक्षणांहून अधिक सूक्ष्म अशा पूर्वसूरींनी दिलेल्या एकादश लक्षणांचा भावार्थसिद्धतेसाठी विचार करावा लागेल. इथे राग या शब्दाचा व्यापक अर्थ गृहीत धरून रागतत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
भरतमुनींनी नाट्यशास्त्रात नाट्याच्या संदर्भात काव्याची चर्चा करताना "अर्थ क्रियोपेतम काव्यम" म्हणजे अभिनयाच्या माध्यमातून व्यक्त होणारा सौंदर्यपूर्ण अर्थ म्हणजे काव्य, अशी व्याख्या केली आहे. राग हा निखळ स्वरूपामध्ये, नाट्य स्वरूपामध्ये आणि काव्य स्वरूपामध्ये वेगवेगळी रूपे धारण करत असतो. सर्वसाधारणपणे श्रोत्यांसमोर रागाचे होणारे सादरीकरण हे त्या रागाचे नाट्यस्वरूप असते. तसेच स्वराभिनयाच्या माध्यमातून व्यक्त होणारा सौंदर्यपूर्ण भावार्थ म्हणजे रागकाव्य, अशी रागकाव्याची व्याख्या करता येईल. रागाचे उच्चतम प्रकटीकरण म्हणजे रागकाव्य. नाटकातील अर्थ अभिनयातून व्यक्त करावयाचा असल्याने नाटकात दृश्यक्रियेला महत्व असते. काव्यामध्ये हाच अभिनय सौंदर्यपूर्ण शब्दार्थातून प्रकट होत असतो. म्हणजेच काव्यात सौंदर्यपूर्ण शब्दार्थाचा अभिनय होत असतो. नाट्यचर्चेचे संक्रमण काव्यचर्चेत झाले आणि दोन्हीचे संक्रमण रागचर्चेत करताना क्रियेची म्हणजेच अभिनयाची जागा आता स्वरांनी घेतली. हा स्वरांनी केलेला अभिनय असतो. म्हणजेच स्वर अभिनीत होत असतात. गायकाच्या किंवा वादकाच्या अंत:करणातील रागभाव श्रोत्यांच्या मनात संक्रमित करणे हेच स्वराभिनयन असते. असा स्वर प्रतिभावंत कलाकाराच्या स्वरव्यापारातून अवतरत असतो आणि त्यामुळे अशा स्वरातून व्यक्त होणारा अर्थ हा केवळ श्रवणार्थ किंवा स्वरार्थ राहात नाही. त्याला रससौंदर्य प्राप्त झालेले असते. रागाचे भावार्थपूर्ण प्रावाहिक सौंदर्यपूर्ण स्वरप्रकटीकरण हे त्या रागाला रसरूप प्राप्त करून देत असते. म्हणूनच राग हा नुसता त्याच्या आरोहावरोहातून वा वादी-संवादी तत्वातून प्रकट होत नसतो. ज्यामुळे रागभाव रसरूप धारण करतो, अशाच स्वरव्यापाराला म्हणजेच रागाला काव्यस्वरूप येत असते. नुसत्याच कंठातील सामर्थ्याला किंवा माध्यमातील कौशल्याला रागरूप म्हणता येणार नाही.
जसा नाट्यशास्त्र आणि काव्यशास्त्र यांचा अभ्यास झाला, चर्चा झाली, तशीच रसप्रचीतीच्या दृष्टीकोनातून रागव्यापाराची चर्चा व्हायला हवी. रसाशिवाय कोणताही अर्थ प्रवर्तित होत नाही, या भरताच्या वाक्याच्या संदर्भात अर्थ म्हणजे रसयुक्त रागार्थ, ही कल्पना स्पष्ट होते. रागगायनातून जर रस प्रतीत होत नसेल तर ती एक आत्मविरहित अशा रागशरीराची अनुभूती असते. आत्म्यासह येणा-या शरीराची प्रचिती ही त्या शरीराच्या चैतन्याची प्रतीती असते. म्हणूनच इथे स्वर आणि अर्थ यांचा आशय किती व्यापक आहे, याची कल्पना येऊ शकेल. कलाकाराच्या प्रातिभस्पर्शाने अपूर्व रूप धारण करून प्रकट होणारा स्वर आणि त्यातून अभिव्यक्त होणारा चमत्कृतीपूर्ण अर्थ म्हणजेच रागार्थाचे साहित्य होय. अशा प्रकारच्या स्वरविश्वातून रागमांडणी करायची असेल तर इथे रागातील स्वरार्थांच्या ठिकाणी असे कोणते वैशिष्ट्य असते की ज्यामुळे साध्या नुसत्या स्वरार्थातून अपूर्व अशा अर्थसौंदर्याचा साक्षात्कार व्हावा? साहित्यातील गुण, औचित्य, अलंकार, रीती, ध्वनी, इत्यादी तत्वे तसेच नाट्यशास्त्रातील विभावानुभवादी तत्वे स्वरभाषेला लावल्याखेरीज रागातून रसप्रचिती येते, हे सिद्ध करता येणार नाही. सह्र्दय रसिकाच्या ठिकाणी भावार्थसौंदर्याची प्रचिती घडवून आणणे, हेच नाट्य आणि काव्याप्रमाणे रागप्रकटीकरणाचे उद्दिष्ट आहे. म्हणूनच रागातील स्वरार्थांना रसत्व प्राप्त करून देणा-या स्वरमाध्यामातील निश्चित व्यापाराचा शोध घेणे आवश्यक ठरते.

सर्वोत्तम रवींद्र पिंगे

सर्वोत्तम रवींद्र पिंगे


राजहंस प्रकाशन, पृष्ठे: ३०४, मूल्य: २०० रूपये


पोएट बोरकरांच्या अंगणातलं चांदणं
मानापमान हा माझा विषयच नाही. संमेलनाध्यक्ष झाल्यामुळं मी अधिक मोठा झालो नसतो आणि न झाल्यामुळं लहानही झालेलो नाही. माझी कविता माझ्याबरोबर आहे आणि तेवढं पुण्य मला बस आहे. मला रसिकांचा कौल हवा होता आणि मला वाटतं तो यावच्चंद्रदिवाकरौ माझ्याच बाजूनं राहील.
तुमचं कविता लेखन काय म्हणतय?
उत्तम चाललय. एक लक्षात ठेवा, मी ईश्वराचा लाडका मुलगा आहे. आय अँम ए मॅन ऑफ डेस्टिनी!
याचं गमक काय?
पाहा, माझ्याबरोबरीच्या सर्वांचं स्फुरण थांबलं. मंदावलं. मला मात्र सारखी नवी नवी कविता स्फुरतच असते. याचा अर्थ, देवाचा अजूनही माझ्यावर अनुगख आहे. एरवी असं घडतच ना?
असं बोलत बोलत, डुलत डुलत आम्ही प्रराम अपार्ट्मेंटमधल्या त्यांच्या कन्येच्या घरी दाखल झालो.
बसल्या बसल्या मला त्यांचं पंधरा वर्षापूर्वीचं संभाषण आठवलं. तेव्हा कवी म्हणाले होते, आपल्या आयुष्यात एसेन्शियल्स असतात, तशीच नॉन-एसेन्शियल्सही असतात. पैकी, आयुष्यातल्या उच्च बाबींवर तडजोडी करू नये. मामुली बाबींवर तडजोड केल्यामुळं काही बिघडत नाही. शुध्द अभिजात कविता हे माझ्या आयुष्यातलं प्रधान अंग आहे. तिथं मी कालत्रयी तडजोड करणार नाही. कधी केलेली नाही. प्रचारी लेखनही मी केलं, तिथं फार काटेकोर राहिलो नाही. अभिजात कविता साहित्यात मोडते. प्रचारी पदं आणि लेख हे साहित्य नव्हे. तो मजकूर म्हणून त्याचे संगख मी काढले नाहीत. माणसानं प्रथम एसेन्शियल्स कुठली, ती ठरवून त्यांचा अग्रक्रम निश्चित केला पाहिजे. मग गोंधळ होत नाही. ज्यामुळे तुमचा विकास होईल, तिथे तडजोड नसावी. तसा मी फार सोवळा नाही. नीतिग्रस्त व्यक्तिमत्वाने पछाडलेला नाही. भीतीच्या पोटी जन्मलेली नीतिमत्ता मला नामंजूर आहे. माणसाकडे स्वत:ची म्हणून चिंतनसिध्द, अनुभवसिध्द अशी नैतिक मूल्य असावीत आणि ती त्यानं स्वत:ला नि इतरांना समदृष्टीने लावावीत. जे स्वातन्त्र्य मी भोगलं, ते मी इतरांनाही लुटू देईन. पर्सनल गॉडवर माझी श्रध्दा नाही. पण देव आहे. दैव आहे. पावलोपावली मला याचा प्रत्यय येतो.

व्हाय नॉट आय?

व्हाय नॉट आय?

वृंदा भार्गवे

अमेय प्रकाशन, पृष्ठे : २५२, मूल्य : २५० रुपये

सायनला जाताना देवूच्या डोळ्यांना जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून स्टरलाईज्ड गॉज डोळ्यांवर ठेवायचे. त्यावर काळा गॉगल घालायचे. कधी कडेवर घेऊन बसमध्ये, तिथून स्टेशन. मग परत ट्रेन. सायनला उतरून हॉस्पिटलपर्यंत चालणे, आता तिनेही निमूट सा-याची सवय करून घेतली होती.
जखमा ब-या झाल्या आणि तिच्या डोळ्यात एक पडदाही निर्माण झाला. त्या दिवशी सायनला डॉक्टर माधवानींनी तिचे डोळे तपासायला सुरुवात केली आणि देवूने सांगितले, "डॉक्टर, मला काहीच दिसत नाही. खूप सारा अंधार आहे. "
मी वेड्यासारखी पाहातच राहिले. डॉक्टरांनाही भीती होतीच. एक विलक्षण कातर क्षण होता तो.

माझ्या डोळ्यांसमोर तिचे मोठ्ठाले डोळे, हसणे, व्रात्यपणा सगळं येऊन गेलं. तिनं पाहिलेलं थोडंसं जग, थोडा निसर्ग आणि तिच्या जवळची माणसं आता गुडुप झाली असणार...
डॉक्टर म्हणाले, " काहीच दिसत नाही?"
"नाही. अंधार आहे. काळं काळं..."
डॉक्टरांनी मला पुन्हा त्यांच्या केबिनमध्ये आणलं. एक ग्लास पाणी दिलं.
"तुम्ही शक्य तितक्या लवकर हैदराबादला जाऊ शकता?"
"हैदराबाद?"
"भारतातलं कॉर्नियावरचं एक उत्तम रुग्णालय आहे तिथं. जाऊ शकाल, म्हणण्यापेक्षा जाच. मी तिथल्या डॉक्टरांशी बोलून ठेवतो. "

मी केबिनबाहेर पडले. बाहेरच्या बाकावर डोळ्यांवर गॉगल लावलेली माझी देवू बसली होती. कालपर्यंत तिला थोडंफार दिसत होतं. आता तिची दृष्टीच नव्हती. मला केविलवाणं वाटलं. क्षणभर सा-यांचा राग, संताप, नैराश्य दाटून आलं. या चार महिन्यात किती डॉक्टर, केवढे उपचार, किती हॉस्पिटल्समध्ये जाऊन किती खुर्च्यांवर तिला बसवलं. प्रखर लाईटस नी डोळ्यांची तपासणी, तिच्या शरीरावरचे डाग, व्रण, जखमा, डोळ्यांची बुबुळं, पापण्या चिकटू नयेत म्हणून केलेले प्रयोग. हा माझा पोटचा जीव, काय नशिब घेऊन आला आहे? आंधळेपणाचा शाप हिलाच का? आता इथून पुढे ना पाहिलेले हैदराबाद. तिथे पुन्हा डॉक्टर्स. ते काय बोलणार काही कळणार नाही. तेच ऑप्शन्स देणार. आपण कोणाची तरी मदत घेऊन एका ऑप्शनवर टीकमार्क करणार... कदाचित तोच ऑप्शन देवूच्या दृष्टीने घातक असेल. शेवटी कोणालाही आपल्या या मुलीच्या डोळ्यांबद्दल एवढी सहानुभूती वाटण्याचे कारण काय? त्यांच्या दृष्टीने एक पेशंट, एक नवी केस.

मी देवूपाशी गेले. तिला कडेवर घेतले. "ममा, मी चालेन. हां...पण मला आता गाड्या दिसणार नाहीत.”
आवंढा गिळला. चालू लागले.
"ममा, तू बोलत नाहीस. रडतेय?" तिने तिच्या बोटांनी माझ्या चेह-याला स्पर्श केला. तिची बोटं ओली झाली.
"ममा, मी त्रास देणार नाही. शहाण्यासारखी वागेन... तू मला काठी आणून दे."
रस्त्यावरून मी रडत चालले होते. कशाचीच पर्वा नव्हती. लोकांची...त्यांच्या पाहण्याची...गर्दीची...

------------------------------------------------------------------------------------------------
पाणीदार डोळ्याच्या देखण्या मुलीची दृष्टी डॉक्टरांच्या चुकीमुळे गेली. वय होतं सात. त्वचा, दात, केस, वर्ण सगळ्यावर परिणाम झाला. पण तरी या गोष्टीचं निराश समर्थन न करता माणसाचं जगणं अतिसुंदर अनुभव असतो, हेच आग्रहानं सांगणा-या आई-मुलीची ही संघर्ष आणि जिद्दीची प्रेरणादायी कहाणी.

व्हाया...वस्त्रहरण

व्हाया...वस्त्रहरण


गंगाराम गवाणकर


डिंपल प्रकाशन, पृष्ठे : २५६, मूल्य : २५० रुपये


पूर्वी कोकणात बोटीने प्रवास करताना आम्ही नाळीवर बसून प्रवास करीत असू। योगायोग असा की विमानातसुद्धा आम्हाला नाळीवरील (विमानाच्या शेपटीकडील) जागा मिळाली होती. पहाटेचे दोन वाजले होते. सर्वांनीच कसेबसे दोन घास खाऊन रात्री नऊ वाजता घर सोडलं होतं. त्यामुळे सर्वांच्याच पोटात कावळे ओरडत होते. आमचं विमान अध्ये मध्ये कुठेही न थांबता थेट लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उतरणार होतं. "विमान कुठेही थांबणार नाही" म्हटल्यानंतर आम्हा कोकण प्रांतियांमध्ये चुळबुळ सुरु झाली. कारण आम्हा कोकणवासीयांना धुळीनं माखलेल्या, कुबट वासाच्या, लाल डब्याच्या एसटीतून खाचखळग्यातून धडपडत प्रवास करण्याची सवय. शिवाय तासागणिक "येथे एसटी फक्त पाच मिनिटे थांबेल" असा कंडक्टरचा पत्रा कापल्यासारखा आवाज कानावर पडल्याशिवाय प्रवासही सुखकर होत नसे. पण विमानात खाण्यापिण्याची सर्व सोय आहे, हे कळल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला. तरीही "रेड वाईन अजून कशी येना नाय?" अशी काही जणांची चुळबुळ चालू होती.


काही वेळाने, पण अगदी वेळेवर आम्हाला लंडनला सुखरूप नेण्यासाठी विमानाची घरघर सुरू झाली. थोडंसं चुकल्यासारखं वाटलं. कारण आम्हाला बॉम्बे सेंट्रलच्या एसटी आगारातला ड्रायव्हर बघण्याची सवय. तो तंबाखू मळत एसटीभोवती आरामात फिरून मागील आणि पुढील टायर्सवर लाथा घालणार. स्वत:च्या सीटवर बसल्यावर पाचकन तंबाखूची पिचकारी खिडकीतून बाहेर टाकणार. कधीकधी ही पिचकारी एखाद्या प्रवाशाच्या मस्तकावर मारून झाल्यावर कंडक्टरने बॉम्बस्फोट झाल्यासारखा दरवाजा लावून घंटी वाजवली की ड्रायव्हर एखादी दरड कोसळल्यासारखी एसटी सुरू करायचा. हे सर्व आवाज कानात फिक्स असल्यानं कोकणात निघालोय असं मनापासून वाटायचं.

पण इथं तसं काहीच नव्हतं. सर्व कसं शांत शांत. फक्त विमानाच्या पंख्याची कानावर पडणारी घरघर... विमानातून प्रवास करायची बहुतेक जणांची पहिलीच वेळ होती. सर्वांनीच क्षणभर डोळे मिटून आपापल्या देवाचा धावा सुरू केला. पण त्या अगोदर म्हणजे विमान धावपट्टी सोडण्यापूर्वी रोबोसारखा दिसणारा एक माणूस समोर आला. त्याने कमरेला पट्टा कसा बांधावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. शिवाय देखण्या हवाई सुंद-या लगबगीने काहीजणांना कमरेला पट्टा बांधायला मदत करू लागल्या. खरं म्हणजे, अगदी सोपी कृती होती ती! पण इतरांनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा आपणाला कमरेला पट्टा बांधता येत नाही, असा अभिनय करायला सुरुवात केली. कारण त्यांना हवाई सुंदरीच्या नाजूक हाताने कमरपट्टा लावून घ्यायचा होता. सर्वांचे कमरपट्ट्याचे काम सुरू असतांना मोंडकरबाई खुर्चीतल्या खुर्चीत चुळबुळ करीत होत्या. सुलोचनाबाई त्यांच्या शारीरिक क्षेत्रफळाच्या मानाने खुर्चीत अगदी फीट बसल्या होत्या. त्यांना पट्ट्याचे टोक सापडत नव्हते. सुलोचनाबाईंच्या शेजारीच संजीवनी जाधव ( नाटकातील मंजुळाबाई) बसल्या होत्या. सुलोचनाबाईंची चुळबुळ पाहून हवाईसुंदरी आपलं नेहेमीचं झेरॉक्स हास्य करीत त्यांच्याजवळ आली आणि आपल्या मंजुळ आवाजात विचारती झाली, " शाल आय हेल्प यू?" तिचे अस्पष्ट उच्चार सुलोचनाबाईंना नीटसे कळले नाहीत. त्यांनी मग जवळच बसलेल्या संजीवनी जाधवना विचारलं, " संजीवनी, ह्या दात विचकून घुडग्या काय इचारताहा गो? " संजीवनीने हवाई सुंदरीच्याच पद्धतीने अगदी मृदू आवाजात तिला समजावून सांगितले, " अगो, तुझ्या कमरेक पट्टा बांधूक मदत करू काय, असं इचारता हा."

त्यावर सर्वांना ऐकू जाईल अशा मालवणी कचक्यात सुलोचनाबाई म्हणाल्या, " शिरा घाल या नकटीच्या तोंडार. अगो, बसल्याजागेर ह्या खुर्चेत मी इतक्या गच्च बसल्याला असय की, तुमचा ईमान जरी उलटा पालटा झाला तरी ह्या खुर्चेतून मी काय पडूचच नाय. माका तुमच्या टीचभर पट्ट्याची गरजच काय?" आणि मग स्वत:च सात मजली हसत सुटल्या. त्याबरोबर आम्ही एकाच वेळी बावीस जण ढग गडगडल्यासारखे हसत सुटलो. तशी विमानाची नाळ गदगदली आणि ब्रिटिश प्रवासी वर्गाच्या काळजाचे ठोके चुकले. त्यांनी बायबल वाचन सुरु ठेवलं.

काही जणांनी लाल शर्टस घातले होते. त्या लाल शर्टाकडे पाहून आणि अंगठा तोंडाकडे नेऊन रेड वाईन कधी येतली, असे एकमेकांना खाणाखुणा करून विचारीत होते. त्यांच्या खाणाखुणा सुरू असताना शिरस्त्यानुसार "संकटकाळी बाहेर पडनेका मार्ग" ची प्रात्यक्षिके एक जिवंत माणूस यंत्रमानवासारखा दाखवायला लागला. त्याच्या हालचाली इतक्या यंत्रवत होत्या की तो खरोखरच जिवंत माणूस आहे का नाही, अशी शंका येत होती.

यंत्रमानवाची प्रात्यक्षिके संपतात ना संपतात तोच फुलपाखरांसारख्या त्या सुंदर हवाईसुंद-यांनी प्रत्येकाच्या हातात आपल्या नाजूक हातांनी एकेक ट्रे द्यायला सुरुवात केली. त्या ट्रेमध्ये तेवढ्याच नाजूक चिमट्यांनी त्या एक हिरवी सुरळी ठेवत गेल्या. आमच्या दिलीप कांबळीची (गोप्या) चुळबुळ सुरू झाली. त्याला त्या हिरव्या सुरळीचं काय करावं ते कळत नव्हतं. तो माझ्या पाठीमागेच बसला होता. "गवाणकरानूं, या हिरव्या सुरळीचा फाटफाटी दोन वाजता काय करूचा?" असं विचारू लागला. ब्रिटिश वर्गाचा एक डोळा बायबलवर आणि दुसरा डोळा आमच्या कृतीवर होता. मी दिलीपला मागं वळून काही सांगणार तोच ब्रिटिश प्रवासी जो क्षणभरापूर्वी घाबरलेला होता, तो फिदीफिदी हसत होता. मी मागं वळून पाहिलं तर आमच्या दिलीपने ती हिरवी सुरळी काही तरी खाद्य पदार्थ आहे असं समजून त्याचा लचका तोडला होता. ब्रिटिश प्रवाशांना हसू फुटणं साहजिक होतं. कारण ती सुरळी म्हणजे चेहरा स्वच्छ पुसण्याचा जंतूनाशक रुमाल होता. दिलीपच्या कृतीने ब्रिटिश प्रवासी थोडे रेलॅक्स झाल्यासारखे वाटले. त्यांनी मनात विचार केला असेल, की ज्या माणसांना हातरुमालाचा उपयोग कसा करायचा हे कळत नाही ते रिव्हॉव्हरचा कसा काय उपयोग करणार?

मॅजेस्टिक कोठावळे

मॅजेस्टिक कोठावळे

संपादन : वि.शं. चौघुले

मॅजेस्टिक प्रकाशन, पृष्ठे : ३०८, मूल्य : ३०० रूपये


केशवराव-एक चांगला माणूस
पु.ल.देशपांडे

केशवराव हे अशा एका व्यवहारात होते की ज्यात 'लेखक' नावाच्या काहीशा 'स्फोटक' घटकाशी सतत संबंध येतो. केशवरावांनी हे सारे स्फोटक पदार्थ खूप चातुर्याने सांभाळले. मला वाटतं, त्यांना पुस्तक आणि पुस्तकाशी संबंधित असणारा जो कोण असेल त्याच्याविषयी आतूनच प्रेम असावं. 'पुस्तक' या गोष्टीवरच त्यांचं अतोनात प्रेम होतं. म्हणूनच त्यांनी केवळ स्वत: प्रकाशित केलेल्या पुस्तकांवरच प्रेम केलं नाही, आपल्या पुस्तकालयात सर्व मराठी प्रकाशकांकडची पुस्तकं ठेवली. मॅजेस्टिक ग्रंथप्रदर्शनात सगळ्या मराठी साहित्याच्या वैभवाचं प्रदर्शन दिसेल याची दखल घेतली. लेखकांत आपले लेखक आणि इतर प्रकाशकांचे लेखकआ सा पंक्तीप्रपंच केला नाही. उत्तम पुस्तकाला पुरस्कार देतांना ते मॅजेस्टिकचं प्रकाशन असावं असा कधी अप्रत्यक्ष सूचनेतून सुध्दा प्रयत्न केला नाही. या ग्रंथप्रेमामुळेच ते संबंध आलेल्या प्रत्येक ग्रंथप्रेमी माणासाला सोयरे सकळ आप्तजन या भावनेनेच भेटले. आणि त्यांच्याशी संबंध आलेल्या प्रत्येकाला जाणवला तो हा त्यांच्या आप्तभावापोटी आलेला चांगुलपणा. मॅजेस्टिक गप्पा ऐकायला आनंदाने जमणारा ग्रंथप्रेमी श्रोत्रृसमुदाय पाहणे याचाच आनंद त्यांना मोठा होता. ग्रंथजत्रेला जमणारी आबालवृध्दांची गर्दी हे त्यांचं टॉनिक होतं. लेखकांच मन:पूर्वक आदरातिथ्य करणं हा व्यावहारिक डावपेचाचा भाग नसून एक प्रकारचा कुळाचार असल्यासारखा हा प्रसंग ते साजरा करीत. या सर्व उपक्रमांचं नेतृत्व पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असे. पण चुकूनही त्यांनी कधी ते नेतृत्व किंवा यजमानपण मिरवलं नाही. मॅजेस्टिक गप्पांना येणार्या, ग्रंथप्रदर्शनात हिंडणार्या, ग्रंथ विकत घ्यायला येणार्या कित्येकांनी केशवराव कोठावळे यांना पाहिलेलंही नसेल. किंबहुना आपन दिसावं यापेक्षा आपण दिसू नये याच धडपडीत ते असायचे.

केशवरावांचं हसणं मिस्किल असे. ते कधी आवाज चढवूनही बोलत नसत. व्यवसायाचा व्याप प्रचंड होता. पण आसपासच्या मित्रमंडळींना त्यांनी कधी तो व्याप किती प्रचंड आहे, हे भासूही दिलं नाही. एक विलक्षण शांत, संयमी आत्मविश्वासानं ते हा व्याप सांभाळत असत. त्या व्यापाचा त्यांनी स्वत:चं मोठेपण सिध्द करायला कधी बाऊ करून दाखवला नाही. लक्षावधी रूपयांची उलाढाल करणार्या या माणसानं स्वत:च्या यशाची जाहिरात सदैव टाळली. यामागे नुसती खुबी नव्हती. एक प्रकारची सभ्यता होती. आपलं मोठेपण सतत दुसर्याच्या डोळ्यात खुपेल अशा पध्दतीनं मिरवणं ही अस्भ्यता आहे- नव्हे बराचसा अडाणीपणा आहे. अशा रीतीनं मिरवणं हास्यास्पद ठरतं हे कळण्याच्या सभ्यतेइतकीच सूक्ष्म विनोदबुध्दीही केशवरावांना होती. त्यांच्या सार्या वागण्या वावरण्यात एक प्रकारचा साधेपणा होता. कुणावर छाप टाकण्याचा प्रयत्न नव्हता. आपलं श्रेष्ठत्व सिध्द करण्याचा अट्टहास नव्हता. त्याबरोबरच गुळमट गोडवा किंवा भावनांचं प्रदर्शनही नव्हतं. एखाद्या पुस्तकाची भरमसाठ स्तुती करतांना मी त्यांना कधी ऐकलं नाही किंवा नावड्त्या पुस्तकाची किंवा लेखकाची अकारण निंदा करतानाही पाहिलं नाही. मतभेदाचा आग्रह किती ताणायचा याबद्दलही त्यांचे काही आडाखे होते. आपल्याला न पटणारी गोष्ट मुळात कुणालाही पटण्याच्या लायकीची नाही अशा हट्टाला पेटून ते कधीच उभे राहिले नाहीत.

मी बॅरिस्टरचं कार्ट बोलतोय!

मी बॅरिस्टरचं कार्ट बोलतोय!

डॉ. हिम्मतराव साळुबा बावस्कर

मॅजेस्टिक प्रकाशन, पृष्ठे : १०६, मूल्य : १०० रुपये



बिनडोक, अडाणी व दरिद्री शेतक-याच्या पोटी मी जन्मलो। शेतक-याच्या जीवनाशी निगडित असलेली जीवघेणी संकटे पाहिली, सोसली। विंचूदंश, सर्पदंशावर संशोधन केले। हे करत असताना नकळतपणे संसाराकडे दुर्लक्ष झाले. चंगळवादाचा अनुभव नाही. त्यामुळे ईश्वरचरणी एकच प्रार्थना की पुनर्जन्म मिळाल्यास तो मंत्र्याच्या पोटी व्हावा; म्हणजे कलियुगातील सा-या सोयी अनुभवण्यास मिळतील. भारत हा कृषीप्रधान देश केव्हा होईल, व या भारतात सोन्याचा दिवस तो असेल की ज्या दिवशी शेतक-याच्या घरावर इन्कमटॅक्स अधिका-यांच्या धाडीत हजारो रुपयांची रोकड मिळेल.

वैद्यकीय शिक्षण हे गरिबाच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहे. एका वैद्यकीय महाविद्यालयात मुलाला प्रवेश घेण्यासाठी गेलो असता वीस लाख भरा असे सांगितले गेले. मी केलेले संशोधन न ऐकल्यासारखे. जेथे महात्मा गांधीही त्यांचा मुलगा घेऊन गेल्यास पैसेच लागतील. अशाच एका वैद्यकीय कॉलेजातील प्राध्यापकाला विचारले की, अमाप देणगी देऊन तयार झालेला डॉक्टर गरीबांना सेवा देईल काय? त्यावर त्यांचे ( न पटण्यासारखे) उत्तर असे की ही मुले जन्मत:च श्रीमंताची आहेत. त्यामुळे त्यांच्यापुढे पैसा कमावणे हा हेतू नसतो. खरोखर, असे घडले तर महात्मा गांधीजींचे स्वप्न खरे ठरेल. कारण आतापर्यंतच्या माझ्या अनुभवास वैद्यकीय अधिकारी, जो गरिबीत जन्मला असूनही नोकरीमध्ये विनामूल्य वैद्यकीय सेवा देणारा क्वचितच. आजच्या जमान्यात वैद्यकीय पेशा हा एक बदनाम झालेला पेशा आहे. याचे कारण अज्ञानाद्वारे नकळत निरनिराळ्या तपासण्या करणे, अमाप पैसा वसूल करणे. सरकारी दवाखाने तर गुरांचे गोठे झाले आहेत. जोपर्यंत मंत्री किंवा त्यांचे नातेवाईक प्राथमिक आरोग्य केंद्रात फाटलेल्या, डाग पडलेल्या चादरीवर, घाणीचे साम्राज्य असलेल्या ठिकाणी भरती होऊन व न ऐकलेले शब्द तेथील कर्मचा-यांच्या कृपेने त्यांच्या कानी येतील, प्रत्येक वस्तू पदरमोड करून आणावी लागते हे त्यांना कळेल, तेव्हाच आरोग्य खाते सुधारेल. अन्यथा सर्व व्यर्थ आहे. नुकतेच मराठवाडा व विदर्भामध्ये हजारो लोकांना चिकनगुनियाची बिमारी झाली. हे एक संकट समजून त्यावर वैद्यकीय मंडळींनी मात करायला हवी होती. परंतु घडले ते उलटेच. काही वैद्यकीय अधिका-यांनी एक ते दोन महिन्यांच्या रजा काढून सरकारी दवाखान्याच्या शेजारी आपले खाजगी दवाखाने थाटले व हजारो रुपये मिळवले.
सर्पदंश म्हणजे कुटुंबावर येणारे एक धर्मसंकटच होय. त्याकरता सर्पदंशाच्या आणि विंचूदंशाच्या रूग्णावर सरकारी रूग्णालयात इलाज होणे महत्वाचे आहे. कारण हा गरीब शेतक-याचा जीवघेणा प्रश्न आहे. सर्पदंशावरील प्रतिलसेसाठी ४५० रुपये लागतात. एखाद्या वेळेस २०-२५ बाटल्या द्याव्या लागतात. ही प्रतिलस सरकारी दवाखान्यात विनामूल्य मिळते. म्हणून आजपर्यंतचे सर्व रूग्ण सरकारी दवाखान्यात नेऊन मी त्यांच्यावर इलाज करतो व करीत आहे. तेथे माझी सेवाही मी विनामूल्य देतो. महाराष्ट्रात आजही घोणस, मणेर व नागदंशाचे ३० टक्के रूग्ण मृत्यू पावतात. याला कारण म्हणजे वेळेवर प्राथमिक आरोग्य केंद्रात हजर नसलेले वैद्यकीय अधिकारी. तसेच प्रतिलस न देणे अथवा उपलब्ध नसणे. मी सतत दहा वर्षे वारंवार शासनास पत्रे लिहून प्रथमिक आरोग्य केंद्रास कृत्रिम श्वासोछ्वास देण्यासाठी ऍम्बू बॅग व इतर साहित्य उपलब्ध करावे अशी विनंती करत आहे. परंतु अद्याप यश आलेले नाही. ग्रामीण भागात व्हेंटीलेटर दिल्यास ते विनामूल्य वापरून दरवर्षी अहवाल पाठवीन अशी मी लेखी विनंती करूनही मुंबईच्या एका श्रीमंत देवालयाने नाकारली; परंतु माझ्या दोन मित्रांना मात्र त्यांची मंत्र्यांशी जवळीक असल्यामुळे याच देवालयाने करोडो रुपयांची यंत्रसामग्री दिली.
२१ सप्टेंबर, २००६ रोजी एका डॉक्टर मित्राचा दूरध्वनी आला व रात्री नऊ वर्षांची एक मुलगी सर्पदंशाने दगावली. सर्व माहिती विचारली असता, या मुलीला नाग या सर्पाने दंश केला होता व तिला श्वासोछ्वास घेण्यास त्रास होत होता. श्वसन नलिकेत टाकण्यासाठी असलेली नळी व इतर सामुग्रीचा ट्रे रोजच्या ठिकाणी नव्हता. म्हणून डॉक्टर स्वत: तो शोधण्यासाठी अपघाती विभागात पळत गेला, पण तेथेही नव्हता. दरम्यानच्या काळात ती मुलगी दगावली. नंतर शोध लावला असता ही जीवदान देणारी सामुग्री एक मंत्रीमहोदय त्या भागात दौ-यावर असताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणा-या ऍम्ब्युलन्समध्ये गेली होती. धन्य ती लोकशाही आणि धन्य ते आरोग्य खाते!

मालगुडी डेज

मालगुडी डेज


आर. के. नारायण


अनुवाद : मधुकर धर्मापुरीकर, साकेत प्रकाशन, पृष्ठे : ३०४, मूल्य : २५० रूपये

या संग्रहाला "मालगुडी डेज" असं नाव देण्याचा माझा हेतू असा की त्याला एक विशिष्ट भौगोलिक असं परिमाण मिळावं. मला अनेक वेळा विचारण्यात येतं की "हे मालगुडी कुठे आहे?" यावर मला एवढंच सांगायचं असतं की ते एक काल्पनिक असं नाव असून कोणत्याही नकाशात सापडणार नाही. ( तरीही शिकागो विद्यापीठाच्या प्रेसने प्रसिध्द केलेल्या एका साहित्य विषयक नकाशात मालगुडी हे ठिकाण दाखविलेलं आहे.) मी जर म्हटलं की मालगुडी हे गाव दक्षिण भारतात आहे तर मी केवळ अर्धसत्य सांगितलं असं होईल, कारण मालगुडीतील ही स्वभाववैशिष्ट्य तर मला जगात सर्वत्र दिसत असतात.
मालगुडीतील माणसं तर मी न्यूयॊर्कमध्येही पाहू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर वेस्ट ट्वेंटी थर्ड स्ट्रीट इथे मी काही महिने राहिलो होतो, तिथलं देता येईल. १९५९ पासून माझं इथं जाणं येणं राहिलं आहे. ही जागा मालगुडीची सगळी वैशिष्ट्य सांभाळून होती. रस्ते आणि माणसं यात काहीच बदल झालेला नव्हता. सिनागॊगच्या रस्त्यावर रेंगाळणारे तेच दारूडे, चमकदार अक्षरांच्या दुकानांवरच्या त्या पाट्या- या दुकानातली प्रत्येक वस्तू आठवड्यातच संपून जाते. सगळ्या मालावर पन्नास टक्के सूट, केव्हाही!- असे फलक, तो न्हावी, तो दातांचा डॊक्टर, वकील आणि मासेमारीचे हूक्स-जाळी-काठ्यांचे ते जाणकार, मांस-चीज-विक्रीची दुकानं ( एकानं तर माझे स्वागत केले होते. अरे, एवढे दिवस तिम्ही कुठे होतात? आअणि सध्या तुम्ही डाळ तांदूळ कुठून घेत असता? खरं म्हणजे त्या ट्वेंटी थर्ड स्ट्रीटचा, इतकेच काय, अमेरिकाचाही कायमचा रहिवासी नव्हतो, याची पुसटशीदेखील जाणीव नव्हती. ) ही सगळी जशीच्या तशी राहिली होती. आपल्या अविचलीत आणि शाश्वत आशा परिचयाचं ते वातावरण, त्याहीपेक्षा जेव्हा मी चेल्सिया हॊटेलला फार वर्षांनंतर पुन्हा एकदा गेलो, तेव्हा त्या मनेजरने मिठि मारून माझं उत्स्फूर्त असे स्वागत केलेच, शिवाय त्याच्या सहका-यांची ओळख करून दिली - जे हयात होते. त्यात एक गृहस्थ एकशे सोळा वर्षांचे होते. ते इथले कायमचे रहिवासी होते. ज्यावेळी मी इथे आलो होतो, तेव्हा ते नव्वदीचे असावेत.
मालगुडी हे अशा त-हेनं कल्पनेतलं असलं तरी माझ्या लेखनकामासाठी फार उपयोगी ठरलेलं आहे. तथापि मला कितीही वेळा विचारलं तरी यापेक्षा जास्त असं मूर्त स्वरूप देऊ शकत नाही. जेव्हा लंडनच्या एका उत्साही टीव्ही निर्मात्याने मला गाठले आणि मालगुडीला नेऊन त्याला तो परिसर दाखवावा, कादंबरीतल्या त्या सगळ्या पात्रांची ओळख करून द्यावी, असं सांगू लागला. त्याला त्यावर तासाभराची डॊक्युमेंटरी करायची होती. त्यावेळी मला क्षणभर धक्काच बसला. मी मोठ्या नम्रतेनं त्याला म्हणालो, मी एका कादंबरीच्या लेखनात व्यस्त आहे.
मालगुडीवर आणखी एक कादंबरी? त्याने विचारलं.
होय. मी म्हणालो.
ती कशाबद्दल आहे?
मानवी आत्मा असलेल्या वाघाबद्दल.
वा! फारच इंटरेस्टिंग! मला असं वाटतं की मी सध्या थांबावं. माझ्या डॊक्युमेंटरीमध्ये वाघाचा समावेश करणं फारच छान राहील....
आर. के. नारायण

नोबेल ललना

नोबेल ललना


मीरा सिरसमकर


मेहता प्रकाशन, पृष्ठे : २३०, मूल्य : १८० रुपये



१८६४ च्या सुमारास रसायन्शास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांनी नायट्रोग्लिसरीन आणि केसलगुर या दोन पदार्थांवर रासायनिक प्रक्रिया करून "डायनामाईट" हे स्फोटक तयार करण्याचे नवे तंत्र शोधले. त्याचप्रमाणे नायट्रोग्लिसरीनमध्ये गन कॉटन घालून जेलीग्नाईट नावाचे शक्तिशाली स्फोटक बनवले. पुढे १८७६ च्या सुमारास पोटॅशियम नायट्रेट आणि लाकडाचा लगदा वापरून अनेक प्रकारची स्फोटके तयार केली. परंतु दुर्दैवाने काही लोकांकडून या स्फोटकांचा युद्धाच्या वेळी गैरवापर होऊ लागला. त्याचप्रमाणे ही स्फोटके तयार करण्याच्या कारखान्यात योग्य सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे अनेक वेळा स्फोट होत असत. अशा स्फोटांमुळे किती तरी कामगारांचा भीषण मृत्यू होत असे. आल्फ्रेड नोबेल यांचे बंधू एमिल यांचेही अशा स्फोटादरम्यान कारखान्यात निधन झाले. या अपघातानंतर युरोपमधील काही लोक नोबेल यांना मृत्यूचा व्यापारी म्हणून संबोधू लागले. डायनामाईट आणि विविध प्रकारच्या स्फोटकांच्या शोधामुळे नोबेल यांचा आर्थिक फायदा झाला आणि अनेक जणांना मृत्यूच्या वेदीवर चढावे लागले, अशी उघड उघड टीका होऊ लागली. या टीकेनंतर ते खूप व्यथित झाले.

खरं तर कठीण कातळ, खडक फोडून रस्तेनिर्मिती करणे, मोठमोठ्या डोंगरांमध्ये बोगदे निर्माण करून वाहतुकीचा मार्ग आखणे, बांधकामाच्या वेळी मोठमोठ्या दगडांचा अडसर दूर करणे, खाणकामाच्या वेळी भुयारी मार्ग निर्माण करणे, पृथ्वीच्या पोटात दडलेल्या खनिजांचा आणि दुर्मिळ मूलद्रव्यांचा शोध घेणे, अनेक रासायनिक प्रक्रियांच्या वेळी घटक पदार्थ म्हणून वापर करणे अशा किती तरी लहान मोठ्या बाबतीत स्फोटकांचा वापर अत्यावश्यक असतो. परंतु वैज्ञानिक शोधांचा गैरवापर करणारी मूठभर माणसे या महत्वपूर्ण गोष्टींकडे दुर्लक्ष करून समाजाला त्या शोधांच्या आधारेच विध्वंसाकडे नेतात.

शस्त्रास्त्र म्हणून युद्धकाळात माणसे मारण्यासाठी या स्फोटकांचा वापर जेव्हा अति प्रमाणात वाढला, तेव्हा सह्र्दयी सर आल्फ्रेड नोबेलचा भ्रमनिरास झाला. शास्त्रांच्या प्रगतीमुळे व त्यामुळे उपलब्ध होणा-या शोधांमुळे मानवी जीवन अधिक सुखकर आणि सुकर व्हावे, अशी ख-याखु-या शास्त्रज्ञांची इच्छा असते. भौतिक जगातील शास्त्रज्ञ म्हणजे कळकळीने काम करणारी माणसे असतात. त्यामुळे आपल्या वैज्ञानिक शोधाचा वापर विघातकतेसाठी होत असल्याचे पाहून उत्कर्षदायी व प्रगतीशील समाजाचे स्वप्न पाहणा-या सर आल्फ्रेड नोबेलना आयुष्याच्या उत्तरार्धात निराश वाटू लागले. आपण आयुष्यभर कमावलेल्या संपत्तीचा आपल्या मृत्यूनंतर योग्य विनियोग व्हावा असा विचार त्यांच्या मनात घोळू लागला.

जगभरातल्या शास्त्रज्ञ, विचारवंत, संशोधकांनी काही तरी सकारात्मक, भरीव कार्य करावे, ज्यायोगे नवनवे शोध लागतील, निसर्गातील गूढ उकलतील, आणि त्यांच्या साहाय्याने अखिल विश्वातील मानव जातीचा विकास होईल, त्याचप्रमाणे साहित्यातून आणि शांततेच्या मार्गावरून मानवतावाद वाढीस लागेल, अशा संकल्पनेतून त्यांच्या मनात नोबेल पुरस्काराची कल्पना आकार घेऊ लागली आणि २७ नोव्हेंबर, १८९५ रोजी त्यांनी ही योजना आपल्या मृत्यूपत्राद्वारे सर्वांसमोर मांडली. सॅनरेमो येथे त्यांचा १० डिसेंबर, १८९६ रोजी मृत्यू झाला. जवळपास एकतीस दशलक्ष स्वीडिश क्रोनर एवढी रक्कम त्यांनी नोबेल पुरस्कार फाऊंडेशनला दिली.

विज्ञानातून आधुनिकता, साहित्यातून भावसृजनात्मकता व संस्कृती संवर्धन आणि शांततेच्या प्रसारातून स्थैर्य यांच्यामुळेच मानवाचा प्रवास सुखकर होणार आहे, हे जाणून त्यांनी नोबेल पारितोषिके देण्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शरीरविज्ञान/वैद्यकीय, साहित्य आणि शांतता या पाच शाखांची निवड केली.