Friday 14 May 2010

सोनेरी धराचे ठसके (पाव शतकी सौदी अनुभव)

सोनेरी धराचे ठसके (पाव शतकी सौदी अनुभव)


डॉ. उज्ज्वला दळवी


ग्रंथाली प्रकाशन, पृष्ठे : २७२, मूल्य : २७५ रुपये


जावे तिच्या वंशा

"या दक्तूर, अस्सलाम आलेकुम व श्लोनक? ये, ये, कॉफी प्यायला ये."
हाजचा पवित्र महिना होता. आम्ही दोघं आमच्या चौदा वर्षांच्या लेकीला घेऊन जुबैलच्या समुद्रावर संध्याकाळी फिरायला गेलो होतो. किना-यावरच्या वाळूत गालिचा अंथरून, एक पंचावन्नचा ढोल्या बेदू कुटुंबकबिल्यासह मजेत गहवा पीत पहुडला होता.

बायको, तीन वयात आलेल्या मुली, दोन लहान मुलगे, असं ते समस्त कुटुंब पेशंट म्हणून आम्हाला कधी ना कधी भेटलेलं होतं. त्यामुळे आम्हाला पाहिल्या पाहिल्या त्याने उठून कॉफी प्यायला बोलावलं. "श्लोनक"चं दळण दळून झालं. मग आम्ही कॉफी पीत, खजूर खात होतो. इकडचं तिकडचं बोलणं चाललं होतं. त्याच ओघात, अगदी सहजपणे तो म्हणाला, "या दक्तूर, ही कोण आहे तुझ्याबरोबर? तुझी मुलगी का? मला आवडली ती. देऊन टाक ती मला. तिचे किती पैसे घेशील तू? आणि तूसुद्धा आवडतोस मला. या माझ्या मुली. यांच्यातली कुठली तुला हवी तर बघ. जी आवडेल ती दिली तुला. काय म्हणतोस?"

माझ्या घशात खजूराची बी अडकली. एका दमात तो दोन मागण्या घालून मोकळा झाला होता. हसावं का रडावं ते कळेना. पण आमच्या लेकीचे बाबा परिस्थिती सांभाळायला समर्थ होते. "मलाही अतिशय आवडले असतं. पण या माझ्या लेकीला गेल्याच महिन्यात माझ्या दुस-या एका मित्राने मागणी घातली आणि ठरलं ते लग्न. आता नाइलाज आहे. आणि माझं म्हणशील तर माझ्या बाकीच्या तीन बायका भारतात आहेत. त्यामुळे पाचवं लग्न कठीण जाईल मला. शिवाय तुझ्या मुलीलासुद्धा तसं आवडणार नाही."
"असं म्हणतोस? मग कठीण आहे. बरं जाऊ दे. घ्या घ्या मामूल खाऊन तर बघा. माझ्या बायकोने केलेत."
आम्ही निर्धास्तपणे तो खाऊ खाल्ला. रणरागिणी असलेल्या आमच्या लेकीने एरवी तिसरा डोळा उघडून त्या माणसाचं भस्मच केलं असतं. पण अरबीत झालेलं ते संभाषण तिला कळलच नव्हतं. त्यामुळे तिने तो खाऊ आम्हाला खाऊ दिला. त्या माणसाच्या, तिच्याच वयाच्या मुलींना हसून थॅंक यू सुद्धा म्हटलं.
आम्ही बेदू असतो तर त्या बैठकीत ही दोन्ही लग्न सहज ठरली असती. तान्हं बाळ असल्यापासून अंगाखांद्यावर खेळलेली मित्राची मुलगी वयात आली की तिला स्वत:साठी मागणी घालणं इथे रास्तच असतं. इतकच नव्हे तर तो त्या मुलीच्या बापाचा बहुमान असतो. मुलगी दहा वर्षांची झाली की तिचं खेळणं, मोठ्यानं बोलणं, मान वर करून पुरुषांशी बोलणं, सा-यावर बंदी येते. आतापर्यंत चढला नसलाच तर आता तिच्या अंगावर अबाया म्हणजे बुरखा चढतोच. खास पदार्थ शिजले की पुरुष नोकरांनीसुद्धा ओरबाडून खाल्ल्यावर जे काही ताटात उरतं ते उष्टंच तिला खायला मिळतं. तिचं एकटीनं बाहेर जाणं बंद होतं. तिला कुठेही बाहेर जाताना बरोबर मुहर्रीम म्हणजे पाठीराखा लागतो. बाप, भाऊ, नवरा किंवा मुलगा यांच्यापैकीच एक जण पाठीराखा म्हणून जाऊ शकतो.
डॉक्टर, नर्स, शिक्षिका किंवा कारकून या चारच व्यवसायात तिचा शिरकाव होऊ शकतो. पुरुषांना काही काम सांगणं, त्यांना सल्ला देणं याचा अधिकार तिला नसतो. तिला गाडी चालवता येत नाही. भारतीय उद्योगपती श्री विक्रमपत सिंघानिया जेव्हा त्यांच्या छोट्या विमानातून पृथ्वीप्रदक्षिणा करत होते, तेव्हा सौ. सिंघानिया त्यांच्या सावलीसारख्या जमिनीवरून त्यांच्या मागोमाग प्रवास करत होत्या. वॉकीटॉकीने दोघं सतत संपर्कात होते. प्रवासाचा मार्ग सौदी अरेबियात शिरला मात्र आणि त्यांचा हा सततचा संपर्क तुटला. बाईनं गाडी चालवणं हा सौदी अरेबियात गुन्हा असल्यामुळे देशाची सरहद्द ओलांडल्याबरोबर सौ. सिंघानियांच्या गाडीची किल्ली जप्त झाली होती.

पंचविशीची, काळीसावळी पण रेखीव, उंचीपुरी, डौलदार आयेषा प्रकृतीने रसरशीत होती. ती झोकात इमर्जन्सीत शिरली. तिथल्या डॉक्टरांना म्हणाली, "मला उलटीत रक्त पडतं आहे कालपासून."
"कालपासून? आणि तू आजपर्यंत घरी बसून काय केलंस? संडासला कसं होतं? त्याचा रंग कसा आहे?"
"माझ्या केसांसारखा काळा."
"कसली ऍस्प्रोसारखी गोळी घेतली होतीस का? किती रक्त पडतं वेळेला? पेलाभर? चमचाभर?"
"साधारण अर्धा पेला. मला आत्ता उलटी येते आहे."
नर्सने घाईघाईने तस्त तिच्यापुढे केलं. आयेषा रक्त ओकली. तिला भरती करून तात्काळ चाचण्या सुरू झाल्या. दुर्बिणीतून अन्ननलिका, जठर इत्यादींचा तपास रातोरात झाला. पुढच्या आठवडाभर यकृताच्या, रक्ताच्या गोठण्याच्या या आणि त्या ब-याच परीक्षा झाल्या. आयेषाची प्रकृती त्या सगळ्यात फर्स्ट क्लासमध्ये पास झाली. शेवटी तिच्या कान-नाक-घशाचीसुद्धा तपासणी झाली. तब्येत ठणठणीत असल्याचा शिक्का बसला.
"आयेषा, आज संध्याकाळी घरून कुणी आलं की सांग हं. आज तुला घरी जायचय." सकाळच्या राउंडमध्ये डॉक्टरांनी सांगितलं.
दुपारी आयेषाला पुन्हा रक्ताची उलटी झाली. तिची पाठवणी लांबणीवर पडली.
पुढचा महिनाभर आयेषाची रक्तगुळणी तिच्या पाठवणीशी पाठशिवणीचा खेळ खेळली. शेवटी सगळ्या डॉक्टरांची एकत्र मीटिंग होऊन या रहस्याबद्दल वादविवाद झाला. कुणालाही उलगडा होईना. मग तिला रियाधच्या मोठ्या हॉस्पिटलला धाडायचं ठरलं. तिथल्या ओपीडीची एक आठवड्यानंतरची तारीख मिळाली. पण त्या आठवड्यात आयेषाला रक्त पडले नाही.
"मी आता घरी जाऊ का दक्तूर? आता बरी आहे मी."
"अग, घरी गेल्यावर पुन्हा रक्त पडलं तर?"
"नाही पडणार आता."
"तुझ्या स्वप्नात येऊन सांगतं का तुला ते?"
"ते सोडा ना. मला जाऊ दे. नाहीतर मी सही करून आपली आपणच निघून जाईन." तिने धमकावले.
डॉक्टरांनी सायकायट्रिस्ट डॉ. करीमना ती घरी जाण्यापूर्वी एकदा तिच्याशी बोलायची विनंती केली. आयेषाने धरलेली गुपिताची गुळणी बाहेर काढण्याचं काम करीमबाबांना बरोब्बर जमलं.
आयेषाच्या वडिलांनी तिचं लग्न एका म्हाता-याशी ठरवलं होतं. ते मोडावं म्हणून तिने हे नाटक महिनाभर चालू ठेवलं होतं. ती नखाने आपल्या नाकाचा घोणा फोडून तिथून वाहणारं रक्त पिऊन घेई. मग ते ओकून दाखवी. एकदोनदा ते पोटातच ठेवून त्याचा शेवटपर्यंतचा प्रवासही तिने पाहून घेतला होता. हॉस्पिटलमध्ये कान-नाक-घशाचा तपास सर्वात शेवट, जवळ जवळ आठवड्याने होई. तोवर नाकाची जखम भरलेली असे.
तिच्याच शब्दात सांगायचं तर महिन्याभरात या प्रकरणाचा "दमदमा दम (रक्ताचा डंका)" गावभर दणाणला. त्या "लग्ना अजुनी लहान" असलेल्या म्हाता-याने असल्या "रोगट" मुलीला नकार दिला. त्याचा असा निक्काल लावल्यावरच या रक्तपिपासू वाघिणीने नखं कापली.

दौला नावाची, पंधरासोळा वर्षाची एक देखणी मुलगी अशीच नेहेमी उगाचच भरती करा म्हणून हटून बसे. इमर्जन्सीच्या डॉक्टरांना मामा बनवून ऍडमिट होई आणि मग हजार सबबी सांगून घरी जाणं टाळत राही. अशीच एकदा ती घरी जायची टाळाटाळ करत बरेच दिवस वॉर्डात टिकून राहिली. तेव्हा मी ठरवलं, हिच्या नव-यालाच सांगावं, "ही धडधाकट आहे. हिला पुन्हा पुन्हा इथे आणू नका." साडेतीन वाजता तो नवरा आला, म्हणून मला फोन आला. मी तावातावाने गेले. तो नवरा माझ्यासमोर उभा राहिला. उकिरड्याच्या परिमळाने दरवळणारा, ढेरपोट्या, काळाकभिन्न, पंचाहत्तरीचा, डोळ्यात फूल पडलेला तो माणूस... त्याच्या चेहे-यावरचा तो रंगेल भाव... माझा आवेश माझ्या काळजाच्या पाण्यात कधी वाहून गेला ते मलाच कळलं नाही. "दौला बरीच आजारी आहे. तिला अजून इथेच राहावं लागेल," एवढच कसंबसं बोलले मी.

No comments:

Post a Comment