Monday 26 April 2010

मेंदूतला माणूस

मेंदूतला माणूस

डॉ.आनंद जोशी, सुबोध जावडेकर

राजहंस प्रकाशन, पृष्ठे २३३, मूल्य : २२५ रुपये

लिंडा सिड्नी ही स्वित्झर्लंड्मध्ये राहणारी एक वृद्ध महिला. त्र्याहत्तराव्या वर्षी तिला पक्षाघाताचा झटका आला. त्याचा एक परिणाम म्हणून तिला कमी दिसायला लागलं. आजीबाईंच्या मेंदूच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यात आढळलं की मेंदूच्या मागच्या बाजूचा ऑक्सीपिटल लोब नावाचा जो भाग असतो, त्याला होणारा रक्तपुरवठा कमी झालाय. ऑक्सीपिटल लोब हे दृष्टीचं महत्वाचं केंद्र. त्यामध्ये बिघाड झाल्यामुळे दृष्टी कमी होणं साहजिकच होतं. औषधोपचार सुरू झाल्यावर हळूहळू दृष्टी सुधारली. पण एक वेगळाच त्रास आजीबाईंना होऊ लागला. त्यांच्यावर उपचार करणा-या त्या म्हणाल्या, ’डॉक्टर, मला छान दिसायला लागलय आता. पण एक मात्र झालय, मला हल्ली स्वप्नं पडायची अजिबात बंद झाली आहेत. हे काही चांगलं नाही झालं.’
डॉक्टरांना गंमत वाटली. ते हसून म्हणाले, ’वय झालं तुमचं, आजीबाई, आता कोण परीकथेतला राजकुमार तुमच्या स्वप्नात येणार आहे?’
लिंडाबाई चांगल्या खमक्या होत्या, त्यांनी डॉक्टरांवरच बाजी उलटवली.
’तुम्हाला कळत कसं नाही डॉक्टर? आता या वयात प्रत्यक्ष कुणी राजकुमार येणार नाही, हे मला माहीत आहे. म्हणून तर स्वप्नात यायला हवाय. काय? बरोबर आहे ना?’
डॉक्टरांनी हार मान्य केली. त्यांना डॉक्टरांनी झुरिकच्या विद्यापीठातील हॉस्पिटलमधील क्लडिओ बसेटी या मेंदूतज्ञकडे पाठवलं. त्यांनी मेंदूची एमाआरआय चाचणी घेतली. ऑक्सीपिटल लोबला इजा झाली आहे, हे निदान बरोबर होतं. ऑक्सीपिटल लोब या भागात दृष्टीसंवेदनांचं संस्करण होतं. म्हणजे माणूस जे पाहतो, त्याला जे काही दिसतं, त्याला इथं अर्थ प्राप्त होतो. माणसांचे चेहरे, आजूबाजूच्या वस्तू, स्थळे यांच्या डोळ्याकडून आलेल्या प्रतिमा इथं पूर्वस्मृतींशी ताडून पाहिल्या जातात. त्यांची ओळख पटते. दृष्टीशी संबंधित भावना आणि आठवणी याही ऑक्सीपिटल लोबमध्येच साठवल्या जातात.
क्लाडिओ बसेटींनी लिंडाच्या झोपेतील मेंदूलहरींचा सखोल अभ्यास केला. आपल्या झोपेचं एक चक्र असतं. कुणाची झोप सावध असते, कुणाची नसते. पण सगळ्यांच्या झोपेच्या चार अवस्था असतात. त्या आळीपाळीनं चालू असतात. त्या त्या वेळी मेंदूतून ज्या लहरी निघतात, त्यांचा पॅटर्न प्रत्येक अवस्थेत वेगळा असतो. या लहरीचा वेध घेऊन शात्रज्ञांना झोपेची कोणती अवस्था चालू आहे, ते समजू शकतं. क्लाडिओ बसेटींना दिसून आलं की लिंडाबाईंचं हे निद्राचक्र भंग पावलेलं नाहीये. त्यात कुठलाही व्यत्यय आलेला नाही, येतही नाहीये, मग काय झालय? स्वप्नं पडायची का थांबली?
माणसाला झोप नक्की कशासाठी आवश्यक आहे, यावर अजूनही शास्त्रज्ञांचं एकमत झालेलं नाही. पण झोप या विषयावर संशोधन मात्र भरपूर झालेलं आहे. आपल्याला जेव्हा गाढ झोप लागते, तेव्हा डोळ्यातल्या बुबुळांची सतत हालचाल होत असते. त्यामुळे झोपेच्या या अवस्थेला रॅपिड आय मूव्हमेंट स्लीप, रेम झोप, असं नाव आहे. रेम झोपेच्या काळात माणसाचा मेंदू अतिशय क्रियाशील असतो. अगदी जागृतावस्थेप्रमाणेच पूर्णपणे सजग असतो. पण माणसाची झोप मात्र गाढ असते. हे कसं हे कोडंसुद्धा अजून उलगडलेलं नाही.
या रेम झोपेच्या काळातच माणासाला स्वप्नं पडतात. रेम झोप आणि स्व्प्नं पडणं या गोष्टी जोडीजोडीनं होतात. जुन्या मराठीतला शब्द वापरायचा तर एकसमयावच्छेदेकरून घडतात. त्यामुळे या दोन्हीसाठी असलेली मेंदूतील यंत्रणा एकच आहे, असे शात्रज्ञांना वाटत होते. किंबहुना रेम झोपेतली डोळ्यांची हालचाल हा स्वप्नावस्थेचा दृष्य आविष्कार आहे अशी एक थिअरीही मांडण्यात आली होती. लिंडाबाईंची ही रेम झोप व्यवस्थित होती, पण त्यांना स्वप्नं मात्र पडत नव्हती. हे काही तरी वेगळंच होतं. शास्त्रज्ञांची झोप उडवणारं होतं. कारण आजवर त्यांचा जो समज होता, त्याला त्यामुळे जोरदार धक्का बसला होता.
डॉक्टर मार्क ब्लग्रोव्ह यांच्या मते स्वप्न पडणं हा उत्क्रांतीवादाचाच एक आविष्कार आहे. उत्क्रांतीत स्वप्नांचं काहीतरी कार्य आहे हे नक्की. ते काय हे अजून आपल्यालोआ माहीत झालेलं नाही. किंवा असं असू शकेल की दुसरी कुठलीतरी यंत्रणा उत्क्रांत होत असताना त्याचा एक सहाअविष्कार, एक बायप्रॉडक्ट म्हणून हे स्वप्नांचं प्रकरण निर्माण झालं असेल. लोबासे विद्यापीठातले डॉक्टर जिम हॉर्न म्हणतात, ’स्वप्नं हा मनाचा सिनेमा आहे. झोपेसारख्या कंटाळवाण्या अवस्थेत मेंदूचं मनोरंजन करण्यासाठी स्वप्नं पडत असावीत.’ वेस्ट इंग्लंड विश्वविद्यालयातल्या मनोविज्ञान संशोधिका जेनी पार्कर यांच्या मते स्वप्नांना निव्वळ मनोरंजन मानणं चुकीचं आहे. स्वप्नं हा माणसाच्या जाणिवेचाच आवर्ती प्रकार आहे. झोपेत जाणिवांची आवर्तनं होतात, पुन:पुन्हा होत राहातात. माणसाला स्वप्नं पडतात, याचा अर्थ झोपेतही माणसाचा मेंदू जागा असतो. काहीतरी करत असतो. निजलेलं असतानाही माणसाच्या जाणिवा जाग्या असतात. आपल्याला स्वप्नं का पडतात ते कळलं तर मानवी जाणिवेच्या इतर अंगांवरही प्रकाश पडेल.

No comments:

Post a Comment