Sunday, 17 October 2010

तमाशा विठाबाईच्या आयुष्याचा

तमाशा विठाबाईच्या आयुष्याचा - योगिराज बागूल
राजहंस प्रकाशन
पृष्ठे - २००, मूल्य - १७५ रुपये

भर पावसाळ्याचे दिवस होते. पाऊस ये म्हटलं की, बदबद येई. पण थांब म्हटल्यावर थांबत नसे. ज्येष्ठ जाऊन अर्धा आषाढ संपत आला होता. तमाशांची फिरती बंद होती. पण पोटातली भूक थोडीच थांबणार होती? पिल्लांच्या चोचीत भरविण्यासाठी विठाला हातपाय हलवणं भागच होतं. अशा दिवसात फडातल्या निवडक आणि आवश्यक तेवढ्याच कलाकारांना घेऊन ती पुण्याच्या, कोल्हापूरच्या, जालन्याच्या किंवा मुंबईच्या थिएटर्समधून बारी करीत फिरत असे.
विठासाठी तो पाणकळा तसा जडच होता. ती पाच महिन्यांची गरवार होती. जीव जड वाटत असे. हिंडणं फिरणं खूप जीवावर येई. बोर्डावर पाय ठेवण्यास नकोसं वाटे. अशातच ’आमच्या थिएटरसाठी तुमचा संच पाठवा,’ म्हणून जालन्याच्या बन्सीकाकानं भाऊ-बापूच्या ठेकेदाराला निरोप पाठवला. ठेकेदारानं बापू आणि विठासह बारा पंधरा कलाकारांचा संच बन्सीकाकाच्या थिएटरमध्ये जालन्याला पाठवला. बन्सीकाकाच्या थिएटरमध्ये प्रत्येक कलावंतीण रसिकांच्या आवडीची लावणी गवळण गोड आवाजात गाऊन आणि अंगातून पाणी निचरूपर्यंत नाचून सादर करी. बन्सीकाकानं सा-या शहरात आणि आजूबाजूच्या खेड्यापाड्यात ’आज रात्री विठा आपल्या अदाचाअनोखा चमत्कार दाखविणार... आजची बारी पाहण्यास विसरू नका...’ अशी जाहिरात केली होती.
विठा साजशृंगार कारत होती. आज विठा गर्द आकाशी रंगाचा छानसा शालू नेसली होती. आता फक्त पायात चाळ बांधायचे बाकी होते... आणि अचानक विठाच्या ओटीत दुखू लागलं. कळा उठू लागल्या. त्या कळांच्या वेदनांनी विठाच्या अंगाचा दाह होऊ लागला. घशाला कोरड पडू लागली. किटिही पाणी प्यायली तरी घसा सुकू लागला. अशातच ओटीत एक जोराची कळ आली आणि विठा खालीच कोसळली. पोटातल्या गर्भाला धक्का बसला. ओटीतून रक्तस्त्राव सुरू झाला. शरीरातलं एवढं सारं रक्त गेल्यामुळे विठाचा चेहरा पार कोमेजून गेला होता. शरीर क्षीण झालं. हातपाय गळून गेले.
बोर्डावर हंसा-मंजुळाची बारी संपली. त्यांनी रसिकांना खूष केलं होतं. त्यानंतर भाऊ-बापूचे कलाकार बोर्डावर आले. नमन झाल्यावर गवळण झाली आणि बारीतल्या लावण्या सुरू झाल्या. एक कलावती छानशी लावणी म्हणू लागली. नाचू लागली. पण रसिकांना विठा हवी होती. त्यामुळे त्यांच्यात चुळबूळ सुरू झाली. नृत्यांगनांची लावणी अर्ध्यावर असतानाच एक प्रौढ मध्येच उठून उभा राहिला.
’ए बाई, बस कर तुझं यीवळणं. आमी विठ्याची लावणी ऐकायला आलोय. असं आलतूफालतू कायबी नही. आम्हाला विठाचं गाणं ऐकायचय.’ तो म्हणाला आणि त्याच्या पाठोपाठ सारेच गोंधळ करू लागले. विठाला ऐकण्यासाठी - पाहण्यासाठी आलेला साराच रसिक उभा राहिला. कालवा वाढला.
’राव, विठाला ऐकायला पेरतं औत सोडून आठ मैलांवरून आलो.’ एकजण शेजारच्याला म्हणाला.
’अहो, माझं पाच वर्षाचं एकुलतं एक पोरगं घरात तापानं फणफणत व्हतं. बायकू म्हणी डॉक्टरकडं जाऊ. नही गेलो अन विठाबाईचा खेळ पाह्यला आलो.’ दुसरा.
’अहो राव, तुमी तर पोराचं सांगताय... घरी माझा बाप शीक हाय. जीव राहतो का जातो असं झाल्यालं. हिथून त्याला दवा न्यायला आलो अन विठाचा खेळ म्हणताना तसाच घुसलो. आता बोला.’ आणखी एक मध्येच म्हणाला.
बन्सीकाकाच्या थिएटरमध्ये प्रेक्षकांचा कालवा खूपच वाढला होता. कोण कोणाला बोलतय, काहीच ऐकण्यास येत नव्हतं. मधूनच एखाद्याचं पागोटं सुटत होतं. ते सावरता सावरता त्याचं कोपर दुस-याच्या टोपीला लागून ती खाली नळकत होती. गोंगाट वाढतच चालला होता. थिएटर गच्च भरलं होतं. बन्सीकाका रसिकांना वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न करत होता. पण गोंधळ इतका होता की, चार माणसांच्या पलीकडे त्याचा आवाज जात नव्हता. बोर्डावरील सर्व कलाकार स्तब्ध उभे होते. थिएटरच्या हौद्यात रसिकांचा गोंधळ शिगेला पोहोचला होता. त्यांचा कालवा विठाच्या कानापर्यंत येऊ लागला. आडवी झालेली विठा तटकन उठली. शृंगाराच्या खोलीत गेली. एका मोठ्या उपरण्यानं पोट आणि ओटी करकचून आवळून बांधली. रक्तानं माखलेलं पातळ बदललं. पुन्हा साज चढवला. बापू, शंकरनं, बन्सीकाकानं विठाला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण तिनं कुणाचच ऐकलं नाही.
पायात चाळ बांधून विठा जशी बोर्डावर आली, तसे रसिकांचे पागोटे आणि शेले हवेत उडू लागले. वाकून पायरीच्या पाय पडत विठा बोर्डावर आली.हात लावून ढोलकी-तुणतुण्याच्या आणि पेटीच्याही पाया पडली. समोर येऊन डोक्यावरून पदर घेऊन रसिकांना नमस्कार केला. तसं सारं शांत झालं. काही सेकंद थिएटरमध्ये कमालीची शांतता पसरली.
... आणि मग ढोलक्याची चाटी-बायांवर जशी थाप पडली, तशी ढोलकीच्या तालावर विठाचे पाय थिरकू लागले. तिच्या पायातली घुंगरं बोलू लागली. विठा धुंद होऊन नाचू लागली. नृत्याचा एकेक आविष्कार सादर करू लागली. रसिक खूष होऊन हाळ्या-शिट्या मारू लागली. एक रुपयाच्या नोटेपासून शंभरीच्या नोटीपर्यंत बोर्डावर नोटांचा जणू सडा पडला होता. विठाला पाय ठेवण्यास जागा नव्हती. रसिकांकडून मिळालेली दाद पाहून विठा पोटातलं दु:ख विसरून गेली. विठाच्या टिपेच्या आवाजातले बोल सा-या थिएटरमध्ये घुमू लागले. शेवटचा अंतरा गायल्यावर पुन्हा मुखडा गाऊन जोरदार झटक्यावर विठाची पावलं स्थिर झाली. तसा नख-यानं हलक्याच पुढं येऊन तिनं रसिकांना मुजरा केला आणि गर्रकन पाठीमागं फिरून विंगेत निघून गेली. विठा बोर्डावरून निघून गेली तरी रसिक टाळ्या वाजवतच होते.
पाठीमागं येताच विठा पटकन खाली बसली. तिच्या अंगाला दरदरून घाम फुटला होता. ओटीपोटाला आवळलेली उपरण्याची गाठ तिनं ढिली केली. नाचून गाऊन थकल्यामुळं कोरडा पडलेला घसा पाण्याचा एक मोठा घोट घेऊन ओला केला. थकवा तर कमालीचा आला होता. हातापायांसह सारं शरीर निस्तेज निस्तेज झाल्यासारखं वाटत होतं. बराच वेळ विठा तशीच पडून राहिली.

No comments:

Post a Comment