Friday, 14 May 2010

मण्यांची माळ

मण्यांची माळ (ललितलेख संग्रह)


सुनीता देशपांडे


मौज प्रकाशन, पृष्ठे : ११६, मूल्य : रु. १००



मन वढाळ वढाळ...
... या निसर्गाला एकाच वेळी अनेक रूपं असतात. ज्या अरण्यात एखाद्या ऋषीला ब्रह्मज्ञानाचा साक्षात्कार होत असतो, त्याच अरण्यात त्याच वेळी एखादा लांडगा भेदरलेल्या कोकराचा घास घ्यायला त्याचा पाठलाग करत असतो. आपल्या मनाचे डोळे ज्या दिशेला लावावे ती सर्वांगांनी मनात उतरते.
पहिलं पाऊल पडलं की आपली दिशा ठरते. त्या वाटेवर सगळे खाचखळगेच असतात असंच नाही. पण पावलाला हवी हवी वाटणारी हिरवळ, डोळ्या-कानांना सुखवणारं रान किंवा आपल्यालाच हरवणारं धुकं त्या वाटेत लागेलच याची काय खात्री? अशा वेळी उघड्या डोळ्यांनी समोर दिसेल त्याचा स्वीकार करत जावं, किंवा मनाजोगं काही दिसताक्षणीच डोळे मिटून घ्यावे आणि त्या पार्श्वभूमीवर हवं हवं ते सगळं पाहत बसावं. मिटल्या डोळ्यांच्या घोड्यावर मन स्वार झालं की वाऱ्यासारख्या दाही दिशा त्याला मोकळ्या होतात.
रात्रीच्या वेळी, सदैव अस्वस्थ अशा समुद्राची गाज ऐकून त्या दिशेला पाहावं, तर त्याची अथांग खोली, त्याच्या पोटातलं गूढ साम्राज्य, त्या अफाट पसरलेल्या रत्नाकराच्या तोच-तोचपणातल्या जीवनाची समृध्दी, गुंतागुंत, स्वनिर्मिती मन भारून टाकते. लहानपणी अंगणातून आकाश डोळे भरून पाहता येई., कधी आकाशगंगेत नाहता येई, तर कधी रात्रीच्या काळोख्या प्रवाहात पानासारखा तरंगणारा पौर्णिमेचा चंद्र डोळ्यांत भरून घेता येई. तोही आपल्याला पाहत असेल का, ह्या प्रश्नानं उडालेला गोंधळ क्षणार्धात निवळून जाई; कारण तोच जर आपल्याला एवढासा चांदीच्या ताटलीसारखा दिसतोय तर आपली गोष्टच सोडा, आपलं सगळं गाव-प्रांत-सारा देशदेखील त्याला धड दिसत नसणार हे लक्षात येई, आणि सुटल्यासारखं वाटे. कधी प्रश्न पडे, आपण कशासाठी घाबरतो? तो चंद्रही आपल्यासारखाच परावलंबी. ‘आम्ही नव्हतो अमुचे बाप’, मग पश्चात्ताप तर नव्हेच, पण भीती, जबाबदारी, कशाचीही तमा बाळगायची आपल्यालाही (आणि त्यालाही) गरजच काय? आपण मनात आणलं तर त्याला ऊर्जेच्या मांजानं वरच्यावर पतंगासारखा उडवता येईल, एक नवा खेळ खेळता येईल.
समुद्राची ती गाज पार्श्वसंगीतासारखी कानांपुरतीच ठेवून डोळे मिटावे आणि डोंगर-दऱ्यांतून हिंडायला मन मोकळं सोडावं. पर्वतांची भव्यता, उत्तुंगता, दऱ्याखोऱ्यांतलं गूढ, यांची वर्णनं करणारे, ठाव घेणारे, कविमनाचे तत्त्ववेत्ते जुन्या काळीही होऊन गेले. काळाच्या ओघातही टिकून राहिलेली त्यांची निर्मिती, ती ती भाषा अलंकृत करून गेलीच, पण त्या त्या भाषेचं ते वैभव ताठ मानेनं मिरवावं असं वाटणारी जगभरातली माणसं हीच खरी चिरंजीव मानवी संस्कृती. Rainer Maria Rilke या जर्मन कवीच्या मते तर कोणत्याही गोष्टीला कवीने निश्चित नाव दिल्याशिवाय तिचं अस्तित्त्व सिध्दच होत नाही. नावनिशाणीतूनच ओळख होत जाते. भाषेतून शब्दांची, त्यांच्या सहचरी भावांची जाण येते. संबंध जडत जातात. बाह्य जगाशी धागे जोडले जातात. निदान आपण असं मानतो.
अफाट समुद्राची, उत्तुंग पर्वतांची गाणी गाणारी आपली संस्कृती, वाळवंटाला मात्र अस्पृश्यासारखी काहीशी दूरच ठेवत आली. या ‘उपेक्षितांच्या अंतरंगात’ शिरायचं नाकारलं तर तिथली श्रीमंती, वैभव कसं भोगता येणार? पण त्यासाठी वाळवंटाची ओळख करून घ्यायची म्हणजे विजनवासाचं निमंत्रण स्वीकारायचं. विजनवास! मनुष्यवस्तीपासून हजारो मैल दूर अशा एखाद्या वैराण प्रदेशात किंवा वाळवंटात राहणं! आपल्या स्मृतींची आणि भोवतालच्या निष्प्राण पोकळीची तेवढी सोबत! पण या विजनाचीही ओढ अनेकदा लागते.
आपला विचार स्वच्छ आणि शुध्द असण्याची आच असेल तर अरण्यांची किंवा डोंगर-दऱ्यांची दिशा धरणं अधिक श्रेयस्कर वाटू लागतं. म्हणूनच जुन्या काळच्या ऋषि-मुनींनी हाच मार्ग धरला असावा. पण वनस्पतिसृष्टी, प्राणिसृष्टी वगैरे मानवेतर जीवसृष्टीचाही अडथळा नको असेल, फक्त पंचमहाभूतांची अटळ सोबत स्वीकारायची अशीच मनाची अवस्था असेल, तर वाळवंटाखेरीज दुसरा आसराच नाही.
आप आणि वायू या दोन महाभूतांच्या प्रचंड शक्तीचा दिपवणारा प्रत्यय देण्याचं सामर्थ्य पर्वतात आणि समुद्रात एकवटलेलं आढळतं. आणि वाळवंट? जणू मुकं, निःशब्द, कृतिशून्य, अस्तित्वाचा सांगाडा, निर्जीव देह. विरळ, रुक्ष, शुष्क. प्रेमाचा जरादेखील ओलावा नसलेलं, विरागी. तरीदेखील साधं, सरळ, स्वच्छ. कसल्या तरी गूढतेचा पडद ओढून वाट पाहणारं. मोहिनी टाकण्याचं प्रचंड सामर्थ्य असलेलं, माणसाच्या कल्पनाशक्तीला आव्हान देणारं! एकदा का त्याच्या पाशात आपण सापडलो, की फसलोच. निसर्गानं सुस्कारा सोडल्यासारखी एखादी वाऱ्याची झुळूक आल्यासारखी भासते आणि त्या आमिषामागून आपण नकळत ओढले जातो. आपली मतीच कुंठित करण्याचं सामर्थ्य असलेलं, भविष्यवाणी आणि चमत्कृतींनी भारलेलं हे वाळवंट, निर्मितीशून्य असेलच कसं? आपल्याला एखादी गोष्ट दिसत नसली, जाणवत नसली, म्हणजे ती अस्तित्वातच नाही म्हणणं धार्ष्ट्याचंच. पंचमहाभूतांच्या प्रचंड सामर्थ्याची साधीशी झलकदेखील मानवानं अजून अनुभवली नसण्याचीच शक्यता अधिक आहे.

No comments:

Post a Comment